पांढरीचं झाड (हेमंत जोशी)

पांढरीचं झाड (हेमंत जोशी)

गेले कित्येक दिवस ते पांढरीचं झाड रंगवायचं असं मी ठरवत होतो. एकदाचा योग आला. पिळदार होत गेलेल्या बुंध्याचं १५-२० फूट उंच झाड रस्त्यापासून उतारावर काही पायऱ्यांना लागूनच होतं. मुळावरची माती ढासळून गेली असली तरी बाजूच्या जांभ्या दगडांच्या पायऱ्यांना घट्ट पकडून आपला भार सांभाळत ते उभं होतं. वयानं वाकलं असलं तरी ताठा अजून कायम होता. वर खूप फांद्या नव्हत्या. खाली मुळं तेवढी वाढलेली होती. खाली वाढलेला मुळांचा पसारा पाहून उन्हाळ्यातली पाण्याची तहान भागवण्यासाठी ती मुळं कुठवर खोल जमिनीत शिरली असतील, याचा थोडाफार अंदाज येत होता. निसर्गातल्या प्रत्येक सजीवाला जगण्यासाठीची धडपड काही केल्या सुटत नाही हेच खरं!

हे असं म्हातारं होत चाललेलं झाड...तेही रस्त्याच्या अगदी कडेला. सुरक्षिततेच्या कारणास्तव अजून कुणी तोडलं-पाडलं कसं नाही? कोकणात पाऊस तर अगदी दणकून असतो, त्या वादळ-वाऱ्यातही हे पडलं कसं नाही? चित्र रंगवता रंगवता असे अनेक विचार मनात तरळून जात होते. त्या रखरखीत वैशाखाच्या उन्हात अंगाला राखाडी फासून, राठ झालेल्या दाढीच्या केसांच्या गुंडाळ्या सोडलेल्या भणंग तपस्व्यासारखं एकटं तापत उभं असल्यासारखं ते झाड दिसत होतं. आता मी बसलो होतो तिथंही डोक्‍यावर ऊन्ह चांगलंच तापलं होतं. ब्रेक घेऊन, थोडंसं खाऊन पुन्हा बसावं म्हणून बाजूच्या मंदिरात आलो. जेवत असताना समोरून गुडघ्यापर्यंत लांब खाकी चड्डी घातलेले एक आजोबा आले, हातात पाण्याचा तांब्या-भांड घेऊन.
मला म्हणाले ः ‘‘कवापासनं बघतूय, तुमी या उन्हात बसलाय...या पांढरीचं चित्र काढताय... वाट्‌लं, बगावं आन्‌ जेवाय बसलाय तर पानी तरी द्येवाला पायजे नाय का’’?

त्या आजोबांनी थेट माझ्या मनालाच हात घातला.  
पुढं म्हणाले ः ‘‘आता हे ‘पांढरीचं झाड’ बगा कसं शाप सुकून गेलंय. त्यालापन रोज पानी द्येवाचं या उन्हाच्या दिसांत. पर एकदा का श्रावन आला की निस्तं हिरवंगार होऊन जातंय. इस इस फुटांचा निसता हिरवा मांडव होतोय पानांचा.’’
आजोबा जुन्या आठवणींत रंगून गेले. स्वतःविषयी सांगू लागले ः ‘‘आता माझं वय बी ऐंशीएक वर्सांचं झालंय, तरीही कुदळीनं शेताची उखळनी करतो मी. पूर्वी धा धा तास शेतात मातीची ढेकळं फोडून भर पावसात आवनी करायचो...’’
या सगळ्या कष्टाच्या खुणांनी ‘अलंकृत’ झालेलं त्यांचं शरीर त्याची साक्ष पटवत होतंच. उन्हानं रापलेल्या त्यांच्या काळ्या कांतीवर एक निळसर राखाडी रंगाची वेगळीच चकाकी होती. बारीक चण; परंतु पिळदार शरीर...हाता-पायावरच्या नसा तर मोजून घ्याव्यात इतक्‍या स्पष्ट. उन्हाळ्यात-पावसाळ्यातसुद्धा मातीशी घट्ट धरून ठेवलेलं नातं...त्यांच्याही आयुष्यात मुलां-बाळांनी-सुनांनी मोहरलेले अनेक श्रावण येऊन गेलेले. त्या समाधानाचंही प्रतिबिंब त्यांच्या थकत चाललेल्या डोळ्यांत झळकत होतंच. किती विलक्षण साम्य! असंख्य उन्हाळे-पावसाळे झेलत या रेताड मातीवर घट्ट पाय रोवून उभं राहत आपल्या खांद्यावर पाना-फुलांचा प्रचंड डोलारा सांभाळत असलेलं हे पांढरीचं झाड...

त्या आजोबांच्या येण्यानं, बोलण्यानं आणि त्या बोलण्यातल्या त्यांच्या संदर्भांमधून या झाडाकडं पाहण्याची माझी दृष्टीच बदलून गेली. आज हे चित्र रंगवून पूर्ण करायचंच, असं मी मनोमन ठरवलं. प्रभाकर बर्वे यांच्या म्हणण्यानुसार ः ‘चित्रकाराला अभिप्रेत असलेलं दर्शन प्रथम निरीक्षणातून, चिंतनातून, वस्तूच्या सर्व संदर्भांच्या अभ्यासातून, त्या वस्तूमध्ये असलेल्या विशिष्ट प्रतिमेतून त्याला घडत असतं. चित्रकाराला अंतःप्रेरणेतून एक दृष्टी प्राप्त होते. त्या दृष्टीमुळंच त्याला वस्तूचा चित्रार्थ स्पष्ट होतो.’ याचा खरा अर्थ आज मी अनुभवला... थोडातरी !
अनेकदा चित्रकाराला असे अनुभव येत असतात. म्हणजे, प्रथमदर्शनी ते केवळ झाड म्हणून चित्र रंगवायला मी सुरवात केली. रात्री घरी आल्यानंतर जाणीवपूर्वक काही रेखाटनं केली, ज्यांत त्यातलं मानवी रूपही दिसू लागलं. दिसलं... बघितलं...आणि दर्शन झालं, असा हा प्रवास घडतो चित्रकारासाठी! आणि पाहिलं...मात्र त्यात अधिकही काही दिसलं, हा अनुभव चित्र पाहणाऱ्याला जास्त आनंद देऊन जातो!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com