अवकाशाचं भान (हेमंत जोशी)

हेमंत जोशी
रविवार, 25 मार्च 2018

जेव्हा एखाद्या टेबलावर भांडं ठेवलेलं असतं, तेव्हा ते भांड होतं 'आकार' व ते टेबल 

जेव्हा एखाद्या टेबलावर भांडं ठेवलेलं असतं, तेव्हा ते भांड होतं 'आकार' व ते टेबल 
होतं 'अवकाश' आणि जेव्हा टेबल होतं 'आकार', तेव्हा ती खोली होते 'अवकाश'! असंच डोंगरावरून खालचा गाव पहिला की गाव होतं 'आकार' आणि जिथवर आपली नजर जाते ते सारं 'अवकाश'. हे सारं सामावून घेणारी पृथ्वीसुद्धा या अंतरिक्षातला गोलाकार होते...आणि अशी अनेक अंतरिक्षं हीसुद्धा अमर्याद अवकाशातले (जे आपल्याला फक्त विचारानंच 'पाहता' येतं), त्या ब्रह्मांडातले आकार होतात. माणसाचं शरीर हे अवकाश मानलं तर एकेक अवयव आकार होतात, अगदी मेंदूही आकार होतो. आपल्या मेंदूचा आकार पाहा... इतकासाच. मात्र, त्यातलं विचारांचं अवकाश....किती प्रचंड! हे सारं उलट आणि अचाट! 

झाड अवकाश, त्याचं फळ आकार...फळ अवकाश, तर बीज आकार आणि बीजात पुन्हा अवकाशरूपी झाड निर्माण करण्याची क्षमता. अवकाशातून आकार आणि आकारातून अवकाश. हे चक्र अजब नव्हे का? 'जाळीदार पानं' या माझ्या रेखाचित्रमालिकेतलं एक चित्र आहे. पानांनी आपलं रंगाचं लेणं, तेजरूप सोडलेलं, अस्थिपंजर झालेलं शरीर उरलेलं. रंगाचं देणं पुन्हा निसर्गाला परत. बहरलेल्या झाडाप्रमाणे लगडलेली फळं त्यागलेली. तपस्व्याप्रमाणे सर्वस्व त्यागलेलं, वैभव त्यागून वैराग्य स्वीकारलेलं. आकाररूपी शरीर सोडलेलं आणि त्यांचं अवकाश झालेलं! 

हे रंगांच्या बाबतीत पडताळून पाहिलं तर किती वेगळं! या सृष्टीत आकारहीन, रंगहीन काही असेल का? चित्रकारासाठी आकार आणि रंगांचं देणं मोठंच. एक ठिपका कितीही सूक्ष्म असला तरी तो आकार आणि ओढलेली रेघ ही रंगाचीच! साऱ्या अंतरिक्षात रंगाशिवाय (रंगहीन) काही असेल असं शक्‍य वाटत नाही. रंगांच्या कक्षासुद्धा अमर्याद! या निसर्गाच्या रंगपेटीत पाहा...अगणित रंग आहेत; पण त्यातल्या एकेका रंगाची ओळख....आभाळाला रंग वेगळा, काळोखालाही रंग, प्रकाशलाही रंग, ग्रह-ताऱ्यांनाही रंग. झाडालाही अनेक रंग...त्यातल्या पानाला एक रंग, फुलाला एक रंग, खोडाला एक रंग, इतकंच नव्हे तर, काट्यालाही त्याचा स्वतःचा असा एक रंग... रंगांच्या अवकाशातले हे रंगांचे आकार, म्हणजे निसर्गतःच प्रत्येक रंगालाही ठरवून दिलेली ही ओळख आणि मर्यादासुद्धा! बऱ्याचदा चित्र पाहताना एखादा रंग, एखादा आकार खटकतो असं म्हणतात. म्हणजे तो मर्यादा तोडण्याचा प्रयत्न करत असतो का? मात्र, कधी कधी तेच त्या चित्राचं शक्तिस्थानही असतं. अन्यथा विवेक सुटला की वाऱ्याचं वादळ होतं...पाण्याचा पूर होतो आणि चित्र सैरभैर होतं. बेसूर होतं. या अवकाशाच्या रंगमंचावर रंग आणि आकार हे परफॉर्मरप्रमाणे असतात. ते आपल्या मर्यादेत राहून आपली अदा पेश करत असतात आणि ते रंगभाव रसिकांना मोहवून टाकतात. 'प्रातःस्वर' हा कार्यक्रम ऐकण्याचा योग दोन महिन्यांपूर्वी आला. शास्त्रीय गायन होतं. पंडितजींच्या गायनानं-अदाकारीनं तिथलं वातावरण मंत्रमुग्ध झालं होतं. भर पौष महिन्यात दिवाळीपहाटेच्या अभ्यंगस्नानासारखं दरवळून गेलं होतं. त्यांच्या स्वराकारातून तिथलं रसिक-प्रेक्षकांचं अवकाश भारून गेलं होतं. दोन राग आणि ग्वाल्हेर घराण्यातला खास टप्पा गायल्यानंतर भैरवी झाली...रंगमंचावरचा तबला-पेटी-तानपुऱ्याची साथ आणि गायन थांबलं. रसिक-प्रेक्षकांच्या पुढं पंडितजी विनम्रपणे हात जोडून बसलेले...टाळ्यांचा गजर थांबेना...रसिकांचं मन तृप्तच होत नव्हतं तेवढ्यानं...पंडितजी नम्रपणे म्हणाले ः ''मै इशारा समझ सकता हूँ! अभी तो भैरवी भी हो गई। राग-रागिणी तो पेश होने के बाद गंधर्वलोक चले जाते है।'' तरीही कुणीही जागेवरून हलेना. पंडितजी पुन्हा तितक्‍याच नम्रपणे म्हणालेः ''संगीत में भी मर्यादा होती है, जिसका उल्लंघन करना उचित नही! भेंट तो होती रहेगी ।'' 

संगीताप्रमाणे चित्रातसुद्धा आकारानं, रंगानं अवकाशाचं भान राखावं लागतं...नम्रपणे! 

'सप्तरंग'मधील लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Hemant Joshi writes about art in Saptaranga