कुणाचं पारडं जड? (हेन्‍री मेनेझिस)

हेन्‍री मेनेझिस
रविवार, 10 जून 2018

विश्‍वकरंडक स्पर्धा कोण जिंकणार, या प्रश्‍नाचं उत्तर अतिशय अवघड असतं. अनेक गोष्टी झटक्‍यात बदलून जातात. मात्र, काही गोष्टींचे "ताळेबंद' मांडता येतात. या स्पर्धेत कुणाचं पारडं जड आहे, कोणता संघ गुणवत्तेनं परिपूर्ण आहे, "स्टार' असलेल्या खेळाडूंची सध्याची अवस्था काय आहे, कोण "अंडरडॉग' ठरेल आदीबाबत चर्चा.

विश्‍वकरंडक स्पर्धा कोण जिंकणार, या प्रश्‍नाचं उत्तर अतिशय अवघड असतं. अनेक गोष्टी झटक्‍यात बदलून जातात. मात्र, काही गोष्टींचे "ताळेबंद' मांडता येतात. या स्पर्धेत कुणाचं पारडं जड आहे, कोणता संघ गुणवत्तेनं परिपूर्ण आहे, "स्टार' असलेल्या खेळाडूंची सध्याची अवस्था काय आहे, कोण "अंडरडॉग' ठरेल आदीबाबत चर्चा.

विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा कोण जिंकणार, हा प्रश्न काही नवीन नाही. प्रत्येकाला याचं उत्तर हवं आहे, मग तो फुटबॉलचा जाणकार असो किंवा नसो. या स्पर्धेचा इतिहास पाहिला, तर फुटबॉलतज्ज्ञांनी छातीठोकपणे संभाव्य विजेता सांगितलेला संघ साखळीत बाद होण्याचे प्रसंगही घडले आहेत. तरीही याबाबत अंदाज वर्तवले जातात. यास अपवाद कोणीच नाही.

प्रत्येक स्पर्धेत आघाडीवरचे संघ कोणते असतील, याचा अंदाज बांधता येतो. अर्थातच त्यासोबत "डार्क हॉर्स'ही असतात, तेच सगळी समीकरणं बिघडवतात. बत्तीस संघांच्या या स्पर्धेचा विजेता सांगणं अवघड असतं. मात्र, काही संघातल्या खेळाडूंचा सूर एकमेकांशी चांगला जुळलेला असतो. ते स्पर्धेत आघाडीवर असतात; पण त्याची वाटचालीत कोणी तरी "डार्क हॉर्स' येतोच. असो, संभाव्य विजेत्याबाबत थेट अंदाज बांधण्याऐवजी आघाडीवर कोण, "डार्क हॉर्स' कोण, विजेतेपदाची खूपच कमी संधी असलेले कोण याची बऱ्यापैकी गणितं बांधता येतील. अर्थात खेळाडूंच्या अचानक उद्‌भवलेल्या दुखापती, काही निर्णय चित्र बदलतात; पण हे घडतं म्हणून तर त्यातली रंगत वाढते. चला तर मग, "लेट्‌स किक-ऑफ!'

संभाव्य विजेते कोण?
जर्मनीत विश्वकरंडक विजेतेपद राखण्याची नक्कीच ताकद आहे. त्यांना सर्वांनीच पसंती दिली आहे. जोशीम लोव यांच्या नेतृत्वाखालच्या या संघानं 15 जुलैला मॉस्कोत विश्वकरंडक उंचावला, तर जास्त आश्‍चर्य वाटायला नको. प्रत्येक स्पर्धेत विजेतेपदाच्या शर्यतीत अंतिम टप्प्यापर्यंत जाण्याची आपली ताकद आहे, हे त्यांनी सातत्यानं दाखवलं आहे. गटात मेक्‍सिको, स्विडनविरुद्धच्या लढती जर्मनीची नेमकी तयारी दाखवतील, त्याचबरोबर दक्षिण कोरियाही आहेच. नेमार तंदुरुस्त झाल्यापासून ब्राझिलला जर्मनीइतकीच किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त पसंती मिळत आहे. नेमार अजूनही पूर्णवेळ खेळलेला नाही, त्यामुळं स्पर्धा सुरू होईपर्यंत त्यांच्या तंदुरुस्तीबाबत शंका घेतलीच जाणार. नेमार पूर्ण फिट नसला, तरी त्यांची ताकद कमी होत नाही. त्यांनी पात्रता स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावरच्या उरुग्वेला दहा गुणांनी मागं टाकत आपली तयारी दाखवली. ब्राझिलचा गट जर्मनीच्या तुलनेत अवघड आहे. सर्बिया, स्वित्झर्लंड आणि कोस्टारिका हे कठोर मेहनतीस तयार असलेले संघ. ब्राझिलला रोखण्याची त्यांची ताकद नक्कीच आहे. हा गटच ब्राझिलचा चांगलाच कस पाहिल. त्यांनी खरं तर बाद फेरीही गृहीत धरणं अयोग्य होईल.

माजी विजेत्या स्पेनला विसरून चालणार नाही. त्यांनी आठ वर्षापूर्वीच ही स्पर्धा जिंकली आहे. अर्थात 2008 ते 2012 दरम्यान फुटबॉल जगतावर हुकुमत राखलेल्या संघाइतका आताचा संघ ताकदवान नाही. सर्जिओ रामोस, इस्को, आंद्रेस इनिएस्ता असलेला हा संघ कोणासाठीही कायम धोकादायकच ठरू शकतो. अर्थात त्यांचा पारंपरीक प्रतिस्पर्धी पोर्तुगाल त्यांच्याच गटात आहे आणि त्याचबरोबर मोरोक्को आणि इराणही. आता पोर्तुगाल आणि स्पेन हे इबेरियन प्रतिस्पर्धी गटाचा अडथळा नक्कीच पार करू शकतील. दोन दशकांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची संधी फ्रान्सला नसेल तर कोणाला असेल? दिदिएर देशॅम्प यांच्या नेतृत्वाखालच्या या संघात अनेक गुणवान खेळाडू आहेत.

खेळाडूंची "स्टार' पॉवर
लिओनेल मेस्सी हा विश्वकरंडकाचा स्टार कधी होणार, त्याद्वारे आपलं श्रेष्ठत्व कधी सिद्ध करणार, हा प्रश्न तज्ज्ञांना पडला आहे. चार वर्षांपूर्वी हा बार्सिलोना स्टार उपविजेता होता; पण सध्या तो तेवढा प्रभावी वाटत नाही. विश्वकरंडकाच्या पात्रतेची मोहीम लवकरात लवकर विसरावी हेच त्यांना वाटत आहे. मेस्सी मॅजिकनंच त्यावेळी त्यांना तारलं होतं. क्रोएशिया, आईसलॅंड आणि नायजेरिया हे सर्व संघ अर्जेटिनाच्या क्षमतेचा नक्कीच कस पाहतील. युरोविजेत्या पोर्तुगालला फारशी संधी नाही; पण ख्रिस्तियानो रोनाल्डोचा समावेश असलेल्या या संघास पूर्ण दुर्लक्षित करण्याचा मूर्खपणा कोणीही करणार नाही. रेयाल माद्रिदचा हा स्टार चांगला बहरात आहे. पात्रतेत 15 गोल करत त्यानं देशाकडूनही प्रभावी ठरू शकतो, हे दाखवलं आहे. फर्नांडो सॅंतोस यांच्या या संघात आंद्रे सिल्वा, जोओ कॅन्सेलो आहेत; पण त्यांची ताकद खऱ्या अर्थानं रोनाल्डो वाढवत आहे आणि तेच महत्त्वाचं आहे.

या स्पर्धेच्या विजेतेपदाच्या शर्यतीत बेल्जियमही आहे. केविंद डे ब्रुईन, एडेन हॅझार्ड, रोमेलु लुकाकू यांची ही गोल्डन जनरेशन आता चांगली परिपक्व झाली आहे. चार वर्षांपूर्वी पात्रतेत प्रभावी ठरलेला संघ मुख्य स्पर्धेत गुणवत्तेस न्याय देऊ शकला नव्हता. मात्र, गेल्या स्पर्धेचा अनुभवच त्यांची ताकद ठरू शकेल आणि ते विजेतेपदाच्या प्रबळ दावेदारांना नक्कीच धक्का देऊ शकतात. रेड डेव्हिल्स विश्वकरंडक स्पर्धेप्रमाणंच युरोतही उपांत्यपूर्व फेरीत पराजित झाले. रशियात नक्कीच यापेक्षा सरस कामंगिरी करु शकतात. इंग्लंड, पनामा आणि ट्युनिशिया असलेला त्यांचा गट सोपा आहे. फुटबॉल जगतास धक्का देण्यासाठी ते चांगलेच उत्सुक आहेत.

"अंडरडॉग' कोण?
विश्वकरंडक स्पर्धेच्या वेळी इंग्लंडवासीयांना आपल्या संघाकडून विजेतेपदाशिवाय काहीही नको असायचं; पण यंदा त्यांच्या अपेक्षा फार नाहीत. गेराथ साऊथगेट यांच्या संघात फार कोणी "स्टार' नाही. मात्र, रशियात ते खरोखरच "अंडरडॉग' आहेत. थ्री लायन्सनं पात्रता सहजपणे साध्य केली. त्यांनी ब्राझिल, जर्मनी, नेदरलॅंड्‌स, इटलीविरुद्ध सराव लढती खेळत स्वतःची चांगली पूर्वतयारीही केली. अपेक्षांचं ओझे नसल्यामुळं खेळाडू मुक्तपणे खेळतील. त्यामुळंच तर ते काहीही करू शकतात. दोन वेळचा विजेता असलेल्या उरुग्वेलाही "अंडरडॉग' म्हणण्यात वावगं ठरणार नाही. संघाच्या प्रतिष्ठेसाठी कोणत्याही आव्हानास सामोरं जाण्याची त्यांची तयारी असते. पात्रता स्पर्धेत ब्राझिलपाठोपाठ दुसरे येताना त्यांनी अर्जेंटिनास मागं टाकलं. उरुग्वेचं या स्पर्धेतलं यश सुवातीच्या टप्प्यातलं आहे; पण त्याव्यतिरिक्त ते तीनदा तिसरे आहेत, हे विसरून चालणार नाही. त्याहीपेक्षा लुईस सुआरेझ, एडिनसन कॅव्हिनीसारखे आक्रमक त्यांची ताकद नक्कीच वाढवतात.

फ्रान्स स्पर्धेत तिसरे आलेल्या क्रोएशियास त्यानंतर कामगिरी उंचावता आली नाही. 2002, 2006 आणि 2014 च्या स्पर्धेत ते साखळीतच गारद झाले. त्यांनी यावेळची पात्रताही "प्लेऑफ' लढत जिंकून साध्य केली. रेयाल माद्रिदचा ल्युका मॉद्रिक आणि बार्सिलोनाचा इवान राकितीक असलेल्या या संघातली गुणवत्ता पाहून अनेक संघांना त्यांचा हेवा वाटतो. त्यानंतरही त्यांना विजेतेपदाच्या स्पर्धेत कोणीही गृहीत धरण्यास तयार नाही.

खूपच कमी संधी
प्रत्येक स्पर्धेत बाद फेरीत कोणीही अपेक्षित न धरलेला संघ दिसतो. गटात त्यांनी प्रस्थापितांना धक्का दिलेला असतो. सेनेगलनं 2002 च्या स्पर्धेत तत्कालीन गतविजेत्या फ्रान्सला धक्का दिला होता. त्यांनी उपांत्यपूर्व फेरीही गाठली होती. रशियात सर्वाधिक प्रभावी करणाऱ्या आफ्रिकन संघात ते असतील. सात वेळा आफ्रिकन कप जिंकलेला इजिप्त आफ्रिकेतला सर्वांत यशस्वी संघ आहे. मात्र, जागतिक स्तरावर ते अपयशी ठरले आहेत. मोहंमद सालाहमुळे त्यांची ताकद वाढली आहे; पण त्याच्या तंदुरुस्तीचा प्रश्नच संघासाठी मोठा झाला आहे.

आत्तापर्यंत वीस स्पर्धांमध्ये सहा वेळा यजमान जिंकले आहेत; पण या वेळी यजमान हा चमत्कार करण्याची शक्‍यता खूपच धूसर आहे. गेल्या वर्षीच्या कॉन्फेडरेशन्स स्पर्धेत ते साखळीत बाद झाले होते. त्यांनी एकही सरावाची लढत गमावलेली नाही. घरच्या मैदानावर यजमानांची कामगिरी उंचावते, या इतिहासाचाही विचार करायला हवा. संघास लाभणारं जोरदार प्रोत्साहन रशियाला गटसाखळी पार करण्याच्या खडतर आव्हानास सामोरं जाण्यासाठी नक्कीच साह्य करेल. आईसलॅंड प्रथमच स्पर्धेत आहेत; पण त्यांच्याकडून फार आशा नाहीत. त्यापेक्षा कमी संधी प्रथमच पात्र ठरलेल्या पनामाला आहे. स्पर्धा तर काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. कोण होणार चॅम्पियन, या प्रश्‍नाचं उत्तर जाणून घ्यायला आपण सगळेच जण खूप उत्सुक आहोत. विश्वकरंडकाच्या पेटाऱ्यात खूप काही दडलेलं असतं. बघू या त्यातून काय बाहेर पडतं ते!

(लेखक माजी आंतरराष्ट्रीय गोलरक्षक आहेत; तसंच सध्या राज्य फुटबॉल संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या तांत्रिक समितीचे ते उपाध्यक्ष आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: henry menezes write football world cup article in saptarang