वीटभट्टी हेच आमचं गाव! (हेरंब कुलकर्णी)

heramb kulkarni
heramb kulkarni

वीटभट्टीवर करुण, उदास चेहऱ्याचे मजूर नारायणराव भेटले. वय साठीचं. चेहरा कष्टानं रापलेला. ‘‘किती वर्षं वीटभट्टीवर आहात?’’ या माझ्या प्रश्‍नावर ते विषण्ण हसले. म्हणाले ः ‘‘जन्मापासून’’. यावर काय प्रतिक्रिया द्यावी ते मला सुचलंच नाही. ते पुढं म्हणाले ः ‘‘वडील वीटभट्टीवरच कामाला होते. साहजिकच माझा जन्मही वीटभट्टीवरचाच. आम्हाला गाव नव्हतं त्यामुळे वर्षभर भट्टीवरच राहायचो. माझं लग्नही भट्टीवर झालं आणि आमच्या पोरांचे जन्मही भट्टीवरचेच. त्यामुळे आम्हाला गाव नाही. वीटभट्टी हेच आमचं गाव!

धु  मसणारी वीटभट्टी...मजुरांसाठी एका रांगेत बांधलेली विटांची बसकी घरं... एका बाजूला राख...कोळशाचे ढिगारे...दुसरीकडं विटांसाठी आणलेल्या मातीचा भला मोठा डोंगर... ट्रॅक्‍टर, विटा वाहणारा गाडा...मजुरांचं वेगात सुरू असलेलं काम आणि या गर्दीतून वाट काढत फिरणारी उघडी-नागडी पोरं...त्यांचे विस्कटलेले केस आणि वाहणारी नाकं... ‘सकाळी खूपच लवकर वीटभट्टीवर पोचतोय’ असं वाटलं; पण प्रत्यक्षात ‘उशिरा आलो’ असं वाटावं इतका वेग वीटभट्टीवरच्या वेगवेळ्या कामांनी घेतला होता. प्रत्येक कामगार नवरा-बायकोच्या किमान ४०० विटा पाडून झाल्या होत्या. रोज एक हजार विटा पाडायच्या असतात.

‘कधी सुरवात केली?’ असं विचारलं तर उत्तर आलं ‘पहाटे पाच वाजताच.’ बाजूला मळलेला चिखल...विटेच्या साच्यात पाणी टाकून तळाचा चिखल काढणं, त्यात पुन्हा चिखल टाकणं, तो टाकलेला चिखल दाबून बसवणं, त्यावरून हात फिरवून चिखल सपाट करणं, नंतर जमिनीवर राख टाकणं आणि त्या राखेवर विटेचा तो साचा उलटा करणं आणि पुढं सरकून पुन्हा साचा धुणं...ही सारी प्रक्रिया एक ते दीड मिनिटात पूर्ण होत होती. यावरून त्या वेगाचा अंदाज यावा. एक वीट अडीच किलोची; पण दोन विटांच्या चिखलाचं साच्यासह वजन पाच किलोपेक्षा जास्त. इतका जड चिखल भरायचा आणि पालथा करायचा. एक हजार विटा म्हणजे दोन हजार वेळा ही कृती करायची. हे करताना मनगटावर खूप ताण येतो व ती साहजिकच दुखू लागतात. किमान चार ते पाच तास पती-पत्नी उकिडवे बसून हे काम करत असतात. पाठीला आणि कमरेला अतिशय रग लागते. निम्म्या विटा झाल्यावर उठावं आणि थोडंस थांबावं असं वाटतं; पण वाढत जाणारं ऊन्ह तसं करू देत नाही. कितीही रग लागली तरी काम लवकर संपवायचं असल्यानं ते ओढतच राहावं लागतं. उन्हाळ्यात तर हे कामगार घामाघूम होऊन जातात; पण काम थांबवता येत नाही. मुंबई परिसरातली भट्टी खूपच अवाढव्य असते; पण इतरत्र असलेल्या एका भट्टीवर कामगारांच्या चार ते आठ जोड्या दिसतात. कामगारांच्या एक हजार विटा पाडून झाल्यावर मग मी मजुरांशी बोललो.

‘कंबर दुखत नाही का?’ हा प्रश्न घाम पुसणाऱ्या मजूर महिलेला विचारला. उत्तरदाखल ती फक्त कसनुसं हसली..त्या हसण्यात विषाद, कारुण्य, हताशा, अगतिकता सारं सारं होतं. हे मजूर कुठून आले? ते गावं का सोडत असतील ? विचारलं तर समजलं की बहुतांश मजूर हे भिल्ल जमातीचे आहेत. विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यातून जास्त मजूर येतात, तर कोकणात कातकरी व इतर आदिवासी मजूर हे काम करतात. बहुतेक मजूर हे भूमिहीन. शेतमजुरी हेच उदरनिर्वाहाचं साधन असलेले आहेत. ते पावसाळ्यात शेतीची कामं करतात. तीही कामं सलगपणे मिळतातच असं नाही. अशा काळात वीटभट्टीमालक त्यांना भेटतात आणि 25 ते 30 हजारांची रक्कम उचल म्हणून त्यांना देतात. त्या रकमेत ते उर्वरित दिवस काढतात. दिवाळी करतात आणि दिवाळीनंतर बिऱ्हाड उचलून वीटभट्टीवर येतात आणि थेट मे महिन्यापर्यंत म्हणजे एकूण सहा महिने नवरा-बायको वीटभट्टीवर राहतात.
***

विटा पाडून झाल्यावर पुरुष मजूर झाडाखाली बसले आहेत; पण महिलांची मात्र कामातून सुटका नाही. घाम पुसत त्यांना स्वयंपाक करायला जावं लागत आहे. विटांनी बांधलेल्या कमी उंचीच्या घरांवर पत्रा असल्यानं पुन्हा घामाच्या धारा लागल्या आहेत. काहींनी बाहेर उन्हात चुली मांडल्या आहेत. काय स्वयंपाक चालला आहे, ते मी उत्सुकता म्हणून पाहायला गेलो. बहुतेक ठिकाणी भाकरी केल्या जात आहेत आणि भाकरीबरोबर डाळीचं कालवण. भात खाल्ल्यानं झोप येते आणि कामावर परिणा होऊ शकतो म्हणून भात केला जात नाही.
‘एखादी पालेभाजी का केली नाही?’ असं विचारलं तर उत्तर मिळालं ः ‘बाजाराच्या दिवशी भाजी आणली जाते आणि ती दोन-तीन दिवसच पुरते.’ एकूणच आहारात पालेभाज्या कमी खाल्ल्या जात असलेल्या दिसल्या. बाजाराच्या दिवशी मटणही आणलं जातं. मुलांसाठी फळं आणणं ही तर चैन होती. मी वीटभट्टीवर गेलो तेव्हा आदल्या दिवशी गुढी पाडवा होता.
‘घरात सणाला काय गोड केलं?’ असं त्या पाचपैकी प्रत्येक कुटुंबाला विचारलं. भाजी-भाकरीच केली असल्याचं उत्तर मिळालं. एका कुटुंबात भजी आणि दुसऱ्या कुटुंबात पुऱ्या करण्यात आल्या होत्या. ‘पाडव्याचा सण उत्साहात साजरा’या बातम्या मला आठवल्या आणि त्या बातम्यांचा परीघ किती मध्यमवर्गीय असतो, ही जाणीव झाली. बाजाराच्या दिवशी मालक ५०० ते १००० रुपये ‘खर्ची’ म्हणून देतात व ती रक्कम मजुरीतून कापून घेतली जाते. या रकमेपैकी सगळ्यात मोठा खर्च हा धान्यावर होतो. या लोकांचं रेशनकार्ड गावाकडं असतं. हे लोक सहा महिने इकडं असतात. त्यामुळे तिथं नातेवाईक असतील तर यांच्याऐवजी ते कार्डावरचं धान्य घेतात अन्यथा धान्य बुडतं व इकडं या गरीब माणसांना धान्य बाजारभावानं खरेदी करावं लागतं. त्यामुळे स्थलांतरित मजूर ज्या ठिकाणी जातील तिथं गावाकडचं त्यांचं रेशनचं धान्य देण्याची तरतूद असायला हवी. -महाराष्ट्रात काही लाख मजूर स्थलांतरित होत असल्याचं चित्र असताना हा मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे.
***

मजुरांची जेवणं झाली. पुरुषमंडळी झाडाखाली लवंडली. महिलांनी लगेच भांडी घासून थोडा आराम केला. सायंकाळी चार वाजता महिलांनी डोक्‍यावर चुंबळ घेतली व वाळलेल्या विटा भट्टीवर रचण्यासाठी त्या वाहायला लागल्या. ती कसरत जीवघेणी होती. डोक्‍यावर दोन विटा ठेवल्या गेल्या आणि त्यावर एकूण सहा थर अशा १२ विटा रचल्या गेल्या. शेवटचा सहावा थर ठेवताना त्यांचा हात वरपर्यंत नीट पोचत नव्हता. अगोदरच्या १० विटा पायावर पडण्याची भीती होती. पुन्हा खालच्या रांगेतून विटा उचलताना खूप सावकाशीनं, हळुवारपणे उठावं लागत होतं. मी नंतर दुकानात नेऊन वजनकाट्यावर विटेचं वजन केलं तर एक वीट अडीच किलो वजनाची असल्याचं स्पष्ट झालं. म्हणजे १२ विटांचं वजन ३० किलो. इतकं वजन घेऊन त्या महिला ५० मीटर अंतरावरच्या भट्टीवर एका वेळी दोन चकरा मारत होत्या. काही ठिकाणी हे अंतर खूप दूर असतं. सहज हिशेब केला तर विटा वाहण्यासाठी जवळपास ८३ फेऱ्या म्हणजे जाऊन-येऊन १६६ फेऱ्या माराव्या लागतात. हे अंतर किलोमीटरमध्ये मोजलं तर ते आठ किलोमीटरपेक्षा जास्त भरतं. भर उन्हात इतकं ओझं घेऊन १६६ चकरा मारण्याची मजुरी आहे फक्त १५० रुपये. म्हणजे एका चकरेला ९० पैसे फक्त! विटा पाडण्याची मजुरीसुद्धा अशीच अत्यंत तुटपुंजी आहे. १००० विटा पाडण्याची मजुरी आहे ५०० रुपये. अनेक ठिकाणी ती ४५० रुपये आहे. म्हणजे ५०० रुपये धरली तरी एका विटेची मजुरी आहे ५० पैसे आणि नवरा-बायको मिळून हे काम करतात म्हणजे एका विटेची मजुरी होते प्रत्येकी फक्त २५ पैसे. आज भिकारीसुद्धा भीक म्हणून २५ पैसे स्वीकारतोच असं नाही. मात्र, हीच वीट किमान चार ते पाच रुपयांना विकली जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणातलं हे शोषण आहे. या शोषणाचा पुढचा टप्पा म्हणजे, मजुरांनी ११०० विटा द्यायच्या आणि त्या मोजल्या जातात एक हजारच. म्हणजे १०० विटा फुकट द्याव्या लागतात. ‘असं का?’ म्हणून मालकांना विचारलं तर ते म्हणाले ः‘तूटफूट होते म्हणून आम्ही १०० विटा जास्त घेतो.‘वास्तविक, विटा ताब्यात घेतल्यावर त्या फुटल्या तर ती मालकाची जबाबदारी असते. याचा अर्थ एका हंगामात पाच लाख विटांमध्ये ५० हजार विटा या मजुरांकडून फुकट पाडून घेतलेल्या असतात. मात्र, प्रगत-पुरोगामी महाराष्ट्रात ‘हजार म्हणजे अकराशे’ हे गणित अजूनही चूक ठरत नाही! ‘हजारला अकराशे’ या फसवणुकीवर मालक गप्प बसले. ‘हजारला अकराशे’ ही लूट त्यांना मान्यच दिसली.

‘तुम्ही वीट पाच रुपयांना विकता आणि मजुरांना ५० पैसेच मजुरी का देता?’ असा प्रश्‍न मग मी मालकांना विचारलं. माझ्या या प्रश्‍नावर त्यांनी भट्टीतून वीट निघेपर्यंतचे खर्च सांगितले. मातीची ‘रॉयल्टी’, वाहतुकीचा खर्च, भरण्याचा खर्च, दगडी कोळशाची खरेदी, राख, भुसा, मळी, भट्टी पेटवणाऱ्याची मजुरी, विटा जागेवर पोचवताना भरण्याचा खर्च, ट्रॅक्‍टरचालकाचा पगार असे अनेक खर्च त्यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एकलहरे औष्णिक केंद्रा’तून राख आणावी लागते. जीएसटी लागू झाल्यावर कोळसा एकदम चार हजार रुपयांनी वाढला. पाण्याचीही व्यवस्था करावी लागते. त्यात पुन्हा एखादी भट्टीच पेटत नाही, विटा खराब निघतात. ज्यांना उचल दिलेली असते त्या काही मजुरांकडून फसवणूक झाल्याचेही प्रकार घडतात, अवकाळी पावसात नुकसान होतं. बांधकामात मंदी असल्यानं विटांचे भावही पडलेले आहेत. काहीजण कर्जबाजारीही झालेले आहेत. अशा सगळ्या कारणमालिकेमुळे जास्त मजुरी देणं मालकांना परवडत नाही. ‘जीएसटीनं गणित बिघडलं’ हा ठळक निष्कर्ष होता; त्यामुळे विटेची किंमत वाढणं हेच उत्तर आहे. हा हिशेब शासनानं जरूर तपासून मजुरीचे दर ठरवले पाहिजेत. १०० विटा फुकट घेण्याचा प्रकार तर तातडीनं थांबायला हवा.
***  

भट्टीवर आल्यावर मुलं शाळेत फारसं जात नाहीत. त्यामुळं आता मुलं गावाकडंच ठेवण्याचं प्रमाण हळूहळू वाढत असल्याचं मजुरांनी सांगितलं.
या मजुरांना राहण्यासाठी मालकाकडून ज्या खोल्या दिल्या जातात, त्या मी आतून पाहिल्या तर त्या खुराड्यासारख्या होत्या. त्यांची उंची होती जेमतेम चार ते पाच फूट. या खोल्यांमध्ये हे मजूर कडाक्‍याच्या उन्हात कसे राहत असतील?
***  
महिला विटा वाहत होत्या. उन्हात घामानं जणू त्या न्हात होत्या. त्यांच्या त्या यांत्रिक फेऱ्या अस्वस्थ करून गेल्या. दुसरीकडं संध्याकाळ होऊ लागताच पुरुष-मजूर उठले. त्यांच्यापैकी एकानं चिखल मळायला घेतला. मातीचं भलं मोठं आळं केलं. त्यात पाणी सोडलं आणि त्या आळ्यात मध्ये उतरून तो खोऱ्यानं चिखल एकसारखा करू लागला. त्याचा घाम चिखलात पडत होता. एका भट्टीवर मात्र माती मळण्यासाठी ट्रॅक्‍टरची मदत घेतली जात असलेली दिसली. त्याच भट्टीवर विटा वाहायला गाडा व त्या वर न्यायला लिफ्टही बसवलेली होती. हळूहळू कष्टातून सुटका होण्याचे प्रयत्न होत आहेत; पण मशिन आलं की मजुरी कमी दिली जाते. शिवाय मजूरही संख्येनं कमी लागतात. त्यामुळे ‘आम्ही कष्ट करतो; पण आमचं काम कायम राहिलं पाहिजे,’ अशा मानसिकतेत मजूर दिसले.
***

आता महिला थोडा आराम करून चहा घेत होत्या. संध्याकाळ होऊ लागली होती. करुण, उदास चेहऱ्याचे मजूर नारायणराव भेटले. वय साठीचं. चेहरा कष्टानं रापलेला.
‘किती वर्षं वीटभट्टीवर आहात?’ या माझ्या प्रश्‍नावर ते विषण्ण हसले. म्हणाले ः ‘जन्मापासून’. यावर काय प्रतिक्रिया द्यावी ते मला सुचलंच नाही.
ते पुढं म्हणाले ः ‘वडील वीटभट्टीवरच कामाला होते. साहजिकच माझा जन्मही वीटभट्टीवरचाच. आम्हाला गाव नव्हतं त्यामुळे वर्षभर भट्टीवरच राहायचो. माझं लग्नही भट्टीवर झालं आणि आमच्या पोरांचे जन्मही भट्टीवरचेच. त्यामुळे आम्हाला गाव नाही. वीटभट्टी हेच आमचं गाव! आता मुलं नाशिकला राहतात इतकंच’. ६० वर्षं भट्टीवर राहून या वृद्ध नारायणरावांनी काय कमावलं होतं? - मुलींची लग्न केवळ ते करू शकले होते. त्यासाठी झालेलं कर्जही पुन्हा विटा पाडूनच फेडावं लागत होतं. या भट्टीवर त्यांचं सगळं आयुष्य भाजून निघालं होतं आणि इतकं करून एकाही रुपयाची बचत ते करू शकले नव्हते...६० वर्षांच्या कष्टानं नारायणरावांना काहीच दिलेलं नव्हतं. पाच वर्षं आमदारकी केली तरी पेन्शन देणाऱ्या या व्यवस्थेनं या वीटभट्टी-मजुराला वृद्धपणी पेन्शनची सोय मात्र केलेली नव्हती. हात-पाय चालेपर्यंत नारायणरावांना भट्टीवरच राहण्याशिवाय पर्याय नव्हता. बाहेरच्या जगाशी त्यांचं काहीच नातं नव्हतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शब्द मला आठवले ः I have no motherland.  
या मजुरांच्या रक्ताचं हे असं शोषण वर्षानुवर्षं सुरूच आहे. या पार्श्‍वभूमीवर विटांचा लाल रंग मला मोठा समर्पक वाटला!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com