प्रकाश सणाच्या निमित्ताने...

प्रकाश सणाच्या निमित्ताने...

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन आपल्याकडे 'बालदिन' म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त 'सकाळ अर्काईव्ह'मधून पुनर्प्रकाशित केलेला लेख.

सण धडाक्‍यात साजरे करण्यात आपण अजिबातच मागे नसतो, पण तरीही मनापासून सण साजरे करायला आवडतात ते मुलांना. सण खरे तर सगळ्यांसाठीच... पण ते काही मुलांना छान साजरे करता येतात; काही मुलांना मात्र आपल्या आनंदाला आवर घालावा लागतो. असं का? आपण एक समाज म्हणून यासाठी काही करू शकू का? आजच्या बालदिनाच्या निमित्ताने...

सण साजरे करण्यात आपण मुंबईकर तसे खूप ग्रेट असतो. कोणत्याही सणांना ग्लॅमरस करण्यात मजा येते ती मुंबईकरांनाच. चार दिवस आपण सर्व जण धूमधडाक्‍यात दिवाळी साजरी करतो. सण आनंदाचा, त्यामुळे उत्साहही तेवढाच मोठा, याच दिवाळी निमित्ताने...

दोन वर्षांपूर्वीची गोष्ट. अशाच दिवाळीने भारलेल्या आपल्या मुंबई शहरात एका कार्यशाळेसाठी जाण्याचा योग आला. त्या कार्यशाळेसाठी खासगी आणि महानगरपालिकांच्या शाळांमधून मोठ्या प्रमाणात मुलं आलेली होती. सर्वच जण आनंदाने शिबिरात सहभागी झाले होते. दिवाळीत काय काय करायचं ठरवलंय यावर धमाल चर्चा चालली होती. तोच धागा पकडत मी मुलांना सांगितलं, "तुम्हाला दिवाळीत काय करावंसं वाटतं, घरी आईनं काय करावंसं वाटतं, ते प्रत्येकाने लिहा.' मुलांमध्ये चुळबूळ सुरू झाली, मुलंच ती! प्रत्येक मुलानं काही ना काही वेगळं मांडण्याचा प्रयत्न केला. काही मुलांनी आपण किती रुपयांचे फटाके आणणार इथून सुरुवात केली, तर काहींनी फिरायला कुठे जाणार याची माहिती मांडण्याचा प्रयत्न केला. यातील दोन परस्परविरोधी प्रतिक्रिया माझ्या मनाला विलक्षण चटका लावून गेल्या.

एका मुलानं म्हटलं होतं, मी घरी आईला सांगणार आहे, की रोजरोजचं घरचं जेवण आणि दिवाळीचे पदार्थ खाऊन कंटाळा आलाय, छानपैकी हॉटेलात जाऊन आपण जेऊ या...

त्याच शिबिरातील एका सामान्य कुटुंबातील मुलगा म्हणत होता, "मी आईला सांगणार आहे, आई दिवाळी आहे. निदान आज तरी संध्याकाळी डाळ-भात करशील का?'

कसंय ना? एका कुटुंबातून मुलांना एवढं मिळेल का ही अपेक्षा व्यक्त केली जातेय. मुंबईसारख्या शहरामधून मी अशा कुटुंबांना भेटलोय की ज्यांना दिवाळी सण हा इतरांच्या आनंदाच्या क्षणांसाठी स्वतःच्या आनंदाला आवर घालावा लागतोय. सण सर्वांसाठीच, मग असं का? सर्वांनाच आनंद मिळेल यासाठी आपण पुढाकार घेऊन काही करू शकतो का? खास करून सर्वांत जास्त सण साजरे करायला आवडतात ते मुलांना; मात्र एक संवेदनशील माणूस-नागरिक या नात्यानं आपल्यालाही काही करता येईल का? यावर आपण मुंबईकरांनी विचार करायला हवा असं तुम्हालाही वाटलं तर नक्कीच विचार करा...

0 एकट्या मुंबई शहरात दिवाळीच्या आठवडाभरात आर्थिक उलाढाल केवळ फटाक्‍यांपोटी 500 कोटींच्या घरात आहे.
0 फराळाचं आणि भेटी देण्या-घेण्याचं मार्केट 200 कोटींच्या घरात आहे.
0 नवीन वस्तू खरेदी करणं (घर/दागिने/कपडे) हे मार्केट 500-700 कोटींच्या घरात आहे. त्याच वेळेस
0 मुंबई शहरातील दीड कोटी नागरिकांपैकी 8-10 टक्के नागरिकांना दिवाळी साजरी करता येत नाही. कारण नोकरी नाही/ कुटुंबाचा अधिक भार.
0 या शहरात 15-17 हजार एकटी राहणारी मुलं आहेत. ज्यांची पहिली आंघोळ कधीच होत नाही, बाकीचं सोडूनच द्या.
0 8-10 हजार वेगवेगळ्या संस्थांमधून राहणारी मुलं आहेत. ज्यांची इतरांना खूश करण्यासाठी दिवाळी साजरी होते.
म्हणूनच आपण जबाबदार नागरिक या नात्यानं किमान स्वतःपुरत्या या गोष्टी करू शकतो का?
0 माझ्या कुटुंबात, माझ्या परिसरात प्रकाशाचा सण साजरा करण्यासाठी प्रयत्न असेल.
0 मुलांचं बालपण हिरावून बनविण्यात आलेल्या फटाक्‍यांना मी, माझे कुटुंब आणि माझे मित्र फोडणार नाही.
0 आवाजमुक्त, प्रदूषणमुक्त, प्रकाशाचा सण साजरा करताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेईन.
0 माझ्या घरी/माझ्या कुटुंबात जवळच्याच वस्तीतील मुलांना हा आनंदाचा सण साजरा करायला मिळावा म्हणून प्रयत्न.

आमच्या एका मित्राने औरंगाबाद येथे एक अनोखा प्रयोग केला. संपूर्ण औरंगाबादमधून 50-60 संवेदनशील कुटुंबांची यादी तयार केली आणि या 50-60 कुटुंबांमध्ये निराधार, निराश्रीत मुलांना दिवाळी साजरी करण्यासाठी आठवडाभर नेण्यात आलं. या निमित्तानं का होईना, मुलांना कुटुंबाचा सहवास मिळाला. या सहकार्यातून या मुलांना कुटुंबसंस्थेला जवळून पाहता आलं. आपलं पण असंच कुटुंब असतं का? मी मग निराधार/निराश्रीत मुलांसाठीच्या गृहात का? हे सर्व प्रश्‍न या मुलांसमोर आले; मात्र तरीसुद्धा एक वेगळा आनंददायी अनुभव मुलांना घेता आला.

त्याच वेळेस ज्यांच्या घरी ही मुलं गेली होती, त्या कुटुंबाचं खरंच कौतुक व्हायला हवं. त्यांनी खऱ्या अर्थानं ही दिवाळी वेगळ्या पद्धतीनं साजरी केली. या कुटुंबात सर्वसामान्य कुटुंबांचा अधिक भरणा होता. मला वाटतं हीच खरी आजची आपली गरज आहे.

"प्रेम दिल्यानं प्रेम वाढणार आहे.'

मुलांच्या भावनांचा विचार करून आपल्याला यापैकी एक जरी गोष्ट भविष्यात करता येईल का, याचा विचार आपण सर्वांनी या दिवाळीनिमित्तानं, प्रकाशाच्या सणानिमित्तानं करायला हरकत नाही. आपल्या आनंदात इतरांनाही आणि खासकरून अशांना समाविष्ट करायला हरकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com