फोनची 'स्मार्ट' सफाई! (गौरव मुठे)

सोमवार, 9 जुलै 2018

स्मार्ट फोनची नियमितपणे स्वच्छता करणं गरजेचं असतं. अनावश्‍यक ॲप्स काढून टाकण्यापासून फोनला ‘दूषित’ करणाऱ्या व्हायरसला दूर ठेवण्यापर्यंत अनेक कामं करणारी ॲप्स आता आपल्या मदतीला येतात. अशाच काही स्वच्छतादूतांची माहिती.

दिवाळी-दसरा आला, की आपल्या प्रत्येकाच्या घरात सुरू होते ती सगळीकडं साफ-सफाई. कारण ‘स्वच्छतेच्या घरी नांदते लक्ष्मी’ असं म्हणतात. असं असताना आपल्याला अगदी जवळच्या असणाऱ्या आणि अगदी जीवाभावाच्या स्मार्ट फोनला विसरून कसं चालेल? त्याचीदेखील ‘स्मार्ट’ सफाई झालीच पाहिजे. त्यामध्ये अगदी फोनच्या बाह्य सफाईपासून आतल्या सॉफ्टवेअरची देखील सफाई तेवढीच महत्त्वाची आहे. स्मार्ट फोन आता प्रत्येकाच्या हातात आला आहे; पण सर्वांनाच त्याची प्रत्येक उपयुक्तता माहीत असतेच असं नाही. त्यामुळं त्याचा तितका ‘स्मार्ट’  वापर होत नाही. त्यामुळं त्यातल्या बऱ्याच गोष्टी वापराविना तशाच पडून राहतात. ॲप्स, जंक फाइल्स, टेम्प फाइल्सचा साठा वाढत जातो. बऱ्याचदा फोनमध्ये व्हायरसचंदेखील आगमन होतं. अशा वेळी तुमचा फोन महत्त्वाच्या वेळी तुमची साथ सोडू शकतो.

जंक फाइल्स
सर्वांत प्रथम स्मार्ट फोनमधल्या जंक फाइल्सची ठराविक काळानं सफाई झाली पाहिजे. कारण अशा जंक फाइल्स ‘क्‍लीन’ केल्या नाहीत, तर स्मार्ट फोनमध्ये बऱ्याचदा ‘नो स्पेस’ मेसेज दाखवला जातो. जंक फाइल्स मोबाइलमधली मेमरी व्यापतात. अँड्रॉइड सिस्टिमचा वेग कमी करण्यासाठी या मुख्यत: कारणीभूत ठरतात. या जंक फाइल्सच्या सफाईसाठी अनेक ॲप्स आता ‘फ्री’मध्ये उपलब्ध आहेत. ही ॲप्स स्मार्ट फोनमधल्या गरजेच्या नसलेल्या जंक फाइल्स डिलिट करायला मदत करतात. अशा काही ॲप्सची आपण माहिती घेऊ या. 

क्‍लीनमास्टर ॲप
जंक फाइल्ससोबत व्हायरसवरही योग्य नियंत्रण मिळवतं. सुपरक्‍लीनरप्रमाणं सर्व फीचर यात आहेतच. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे यात तुमचे खासगी फोटो आणि व्हिडिओ हाइड करण्याची सुविधा आहे. शिवाय फोनमध्ये सिस्टिमच्या मागे सुरू असलेली ॲप्स बंद ठेवून रॅम ‘फ्री’ करतं.  विशेष काय? : फोटोज आणि व्हिडिओज हाइड करण्याची क्षमता. रेटिंग : ४.७. 

क्‍लीन माय अँड्रॉइड ॲप
हे ॲप होमस्क्रीनवरून वापरता येतं. एका क्‍लिकमध्ये जंक फाइल्स साफ करणं यातून शक्‍य असून, हे ॲप अत्यंत कमी मेमरी व्यापतं. शिवाय नेहमी वापरात असलेल्या ॲप्सची वेगळी यादी करता येते. आपण सध्या वापरत नसलेली आणि अधिक मेमरी वापरणारी ॲप्स एका क्‍लिकमध्ये बंद करता येतात. विशेष काय? : कमी मेमरी वापरून अधिक वेगवान काम करू शकतं. हे ॲप फक्त ६.२ एमबी जागा व्यापतं. रेटिंग : ४.७. 

सुपर क्‍लीनर ॲप
जंक आणि केश फाइल्स डिलिट (केश रिमूव्हर) करण्यास मदत करतं. त्याशिवाय स्मार्ट फोनचा वेग आणि वाया जाणारी मेमरी यावर योग्य नियंत्रण मिळवून फोनमध्ये अधिकाधिक जागा मिळवून देतं. महत्त्वाचं म्हणजे यात फोनमधला व्हायरस शोधून तो डिलिट करण्याची क्षमता आहे. यात आता फेसबुकमधल्या जंक फाइल्स डिलिट करण्याचं नवीन फीचरही येणार आहे. मोबाईलमधली इतर संवेदनशील ॲप्स म्हणजे फेसबुक, मेसेज, जीमेल, व्हॉट्‌सॲप आणि स्नॅपचॅट वगैरेंची गोपनीयता ठेवण्यासाठी पासवर्ड किंवा पॅटर्न पासवर्ड ठेवता येतो. विशेष काय? : नको असलेल्या फाइल्ससह व्हायरस डिलिट करण्याची क्षमता. सुपरक्‍लिनरनं दिलेल्या माहितीनुसार, साडेआठ कोटी युजर्स हे ॲप वापरतात. रेटिंग : ४.६. 

गो स्पीड
तुमच्या स्मार्ट फोनमधली कमी वापरात असलेली ॲप्स शोधायला मदत करतं. शिवाय गरज नसलेली किंवा सतत वापरात नसलेली ॲप्स स्वत:हून सुरू होण्यापासून रोखली जातात. जंक क्‍लीनरच्या वापरासाठी होम स्क्रीनवर बटन देण्यात आलं आहे. विशेष काय? : कमी गरजेची ॲप्स स्वत:हून सुरू होण्यापासून रोखण्याची क्षमता. ॲप १२ एमबी जागा व्यापतं. रेटिंग : ४.६. 

स्मार्ट फोनसाठी अँटिव्हायरस 
स्मार्ट फोनमुळं कोणतंही ज्ञान काही सेकंदांत आपल्यासमोर सादर होतं. हे करत असताना आपण वेगवेगळ्या वेबसाइट्‌सना भेटी देतो. मात्र, यातूनच मालवेअरसारख्या काही जोखमी आल्या आहेत. मालवेअर म्हणजे वाईट हेतूनं फोनचं किंवा त्यातल्या महत्त्वाच्या माहितीचं नुकसान करण्याकरिता तयार करण्यात आलेली प्रणाली. व्हायरस, वर्म, ट्रोजन हे त्याचे काही प्रकार आहेत. त्यामुळं आपल्या फोनमधल्या ॲप्सचं नुकसान होते. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या स्मार्टफोनला अशा मालवेअरचा धोका अधिक असतो. यावर उपाय म्हणून अँटीमालवेअरचा वापर करावा. ती बाजारात ‘फ्री’मध्येही उपलब्ध आहेत. आपल्या फोनचा आपण किती, काय आणि कसा उपयोग करतो याचं मूल्यमापन करून अँटीमालवेअर म्हणजेच अँटीव्हायरस वापरायचं. आपले पासवर्ड आणि गोपनीय माहिती व्यवस्थित राहावी यासाठीही अँटीव्हायरस वापरणं गरजेचं आहे. 

अवास्त मोबाइल
अवास्त (AVAST) अँटीव्हायरस हे प्ले-स्टोअरमधलं विनामूल्य ॲप आहे. फेसबुक, मेसेज, जीमेल किंवा संक्रमित वेबसाइटच्या माध्यमातून येणाऱ्या व्हायरसपासून तुमचं डिव्हाइस सुरक्षित करतं. यामध्ये ॲप लॉक, कॉल ब्लॉक करण्याची सोय, फोटो वॉल्ट; तसंच जंक फाइल्सची सफाई करण्यासाठी जंक-क्‍लीनर अशी विविध फीचर्स देण्यात आली आहेत. वाय-फाय नेटवर्क स्कॅनिंग; वायफाय स्पीड टेस्टचे पर्यायदेखील उपलब्ध आहेत. माहितीची देवाणघेवाण करताना कोणत्याही प्रकारचा व्हायरस त्यामध्ये असेल, तर आपल्याला हा अँटीव्हायरस वेळीच सांगतो. ती माहिती स्कॅन करण्याची सुविधाही यामध्ये आहे. आलेली माहिती स्कॅन करून त्यातला व्हायरस काढून टाकला जातो.

एव्हीजी अँटिव्हायरस 
एव्हीजी (AVG) अँटीव्हायरस वापरकर्त्याच्या वैयक्तिक डेटाची सुरक्षितता सुनिश्‍चित करतो. तो ड्युअल-इंजिन अँटीव्हायरस असून ॲप्स, गेम आणि विविध फाइल्स स्कॅन करतो. महत्त्वाचं म्हणजे रिअल टाइममध्ये स्कॅन करून तो फाइल्स आणि ॲप्लिकेशन्स तपासतो. स्मार्टफोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास गूगल मॅप्स आणि जीपीएसच्या साह्यानं तुमच्या डिव्हाइसचं लोकेशन ट्रेस करू शकतो; तसंच त्यातल्या बदललेल्या सिम आणि त्यामधून केल्या जाणाऱ्या कॉल्सची माहिती देऊ शकतो. हा अँटीव्हायरस ‘गुगल प्ले’वरून डाउनलोड करता येतो. 

काही वेळा या अँटीव्हायरसमुळे स्मार्ट फोन थोडा स्लो होतो. ट्रस्टगो, नॉर्टन, कॅस्परकी, मॅकेफी आदी अँटीव्हायरसही गुगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध आहेत. त्यातून आपल्या गरजेनुसार आणि सुरक्षित ॲप आपण वापरून फोनची ‘स्मार्ट’ सफाई करायला पाहिजे, जेणेकरून आपल्या जीवाभावाचा फोन कायम ‘स्मार्ट’ राहू शकतो.

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: How to clean your mobile memory