Gandhi Jayanti : प्रभाव तत्त्वज्ञानाचा 

Gandhi Jayanti : प्रभाव तत्त्वज्ञानाचा 

२ ऑक्‍टोबर १८६९ पोरबंदर येथे जन्मलेल्या एका असामान्य व्यक्तिमत्त्वाने केवळ भारतीय स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले नाही, तर आपल्या विचारसरणीने जगाला वेगळा आदर्श दिला. मोहनदास करमचंद गांधी म्हणजे बापूंच्या गांधीवादी विचारसरणीने जगभरातील अनेक सन्माननीय व्यक्ती प्रभावित झाल्या. गांधींचे विचार म्हणजे प्रेरणा, दृष्टी आणि गांधीजींच्या जीवनकार्याचे दर्शन घडते. सत्य आणि अहिंसा ही गांधी विचाराने जगाच्या इतिहासावर कायमचे चिन्ह कोरले. 

बराक ओबामा
बराक ओबामा २००९ साली एकदा व्हर्जिनिया प्रांतातील वेकफिल्ड हायस्कूलमध्ये शालेय विद्यार्थ्यांशी गप्पा मारत होते. तेव्हा एका नववीतील विद्यार्थ्याने बराक ओबामांना प्रश्‍न विचारला की, अशी कोणती व्यक्ती आहे की त्यांच्यासोबत तुम्हाला जेवण घ्यायला आवडेल? त्यावर ओबामांनी उत्तर दिले, ‘महात्मा गांधी..!’ बराक ओबामांच्या सिनेटमधील तत्कालीन कार्यालयात गांधींजींच्या अनेक प्रतिमा लावल्या आहे. त्यावर ओबामा म्हणाले की, कामाची प्रेरणा केवळ वॉशिंग्टनमधून नाही तर इतर लोकांकडूनसुद्धा मिळाली पाहिजे.

मार्टीन ल्युथर किंग
अमेरिकेतील स्थानिकांच्या नागरी हक्क चळवळीचे नेतृत्व केले होते. त्यांच्या अहिंसात्मक आंदोलनाने लाखो अमेरिकन-आफ्रिकन लोकांना त्यांचे हक्क मिळवून दिले. त्यांच्या आंदोलनाची रणनीती आखताना तसेच भाषणे लिहिताना गांधी विचारांचा फायदा झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मार्टीन ल्युथर किंग यांचे याबाबत प्रसिद्ध वाक्‍य आहे, ‘येशू ख्रिस्ताने आम्हाला ध्येय, तर गांधीजींनी रणनीती शिकवली.’  

स्टीव्ह जॉब्स
सुरुवातीच्या काळात जेव्हा स्टीव्ह जॉब्स भारत दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांनी गांधीजींबद्दल बरेच वाचन केले होते. भारतातील आध्यात्मिक शक्तीने प्रेरित पूर्वग्रहाने त्यांना वेगळ्या पद्धतीने विचार करण्यास प्रोत्साहन दिले. गांधीजींच्या विचाराने ते एवढे प्रभावित झाले की, त्यांनी ॲपलच्या जाहिरातीत गांधीजींच्या ‘थिंक डिफरन्ट’ या विचारांचा वापर केला. १९९७ साली जॉब्स यांनी ॲपलमध्ये दुसरी इनिंग्स सुरू केली, तेव्हा महात्मा गांधींच्या प्रतिमेसमोर उभे राहून उपस्थितांसमोर उद्‌गारले, सलाम त्या वेड्या आणि बंडखोर मानवाला! कारण ज्या लोकांकडे आपण जग बदलू शकतो हा आत्मविश्‍वास असतो, तेच खरोखरच जग बदलविण्यास सामर्थ्यशील असतात. असे मानतात की त्यांना या शब्दांमागील प्रेरणा महात्मा गांधींकडून आली. 
 
आंग सान स्यू ची
म्यानमारमधील लोकशाहीवादी नेत्या आणि नोबेल विजेत्या आंग सान स्यू ची सुद्धा गांधी विचाराने प्रभावित होत्या. २०१२ साली अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी म्हटले की, गांधीजींचा माझ्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव आहे आणि तुम्हीसुद्धा त्याचे विचार वाचले पाहिजे.

नेल्सन मंडेला
महात्मा गांधींच्या विचारांचा नेल्सन मंडेलांवर खूप मोठा प्रभाव होता. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या भेटीत ते गांधीजींच्या विचार आणि वाणीने प्रभावित झाले. ‘मंडेला हे आपले वडील तर गांधीजी आपले आजोबा आहेत,’ असे दक्षिण आफ्रिकेचे भारतातील तत्कालीन राजदूत हॅरिस मॅजेक यांनी त्यांच्याप्रती भावना व्यक्त केल्या. गांधीजींचा सत्याग्रहाच्या लढ्याचा आदर्श घेत मंडेलांनी आफ्रिकेत होणाऱ्या अत्याचाराविरोधात लढा दिला.   

दलाई लामा
महात्मा गांधी हे माझ्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रेरणास्थान असल्याचे दलाई लामा यांनी नेहमीचे म्हटले आहे. राजकीय बदल हा आध्यात्मिक क्रांतीपेक्षा नेहमी दुय्यम असावा, याबाबत दोन्ही नेत्यांचे एकमत होते. दलाई लामा एकदा म्हणाले की, महात्मा गांधी यांचा माझ्या आयुष्यावर खूप प्रभाव आहे. मानवी मूल्यांचा खोलवर अभ्यास असणारे हे अद्वितीय व्यक्तिमत्त्व आहे.  

अल गोर
अमेरिकेचे माजी उपराष्ट्रपती आणि पर्यावरणवादी नेते अल गोर यांच्यावरसुद्धा गांधीवादी विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ‘‘महात्मा गांधींच्या सत्याग्रहाचे तत्त्वज्ञान हे सत्याच्या शक्तीचे गमक आहे. ते आपल्याला लोकसहभागातून हक्कांसाठी लढण्याकरिता प्रेरणा देते,’’ असे गोर यांनी म्हटले आहे.

( संकलन - ऋषिराज तायडे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com