महत्त्व पूर्वतयारीचं (सुनंदन लेले)

सुनंदन लेले
रविवार, 17 मार्च 2019

वेळ गेल्यानंतर एखादी गोष्ट केली, तर पश्‍चात्ताप होतो. शारीरिक तंदुरुस्तीपासून इतर अनेक गोष्टींमध्ये हे सांगता येईल. मात्र पश्‍चात्तापाची वेळ येण्यापेक्षा आधीच थोडी तयारी करणं आवश्‍यक आहे. पूर्वतयारी नेमकी, योग्य असली, की मग अनेक गोष्टी सोप्या होतात आणि जगणंही मग आनंददायी होतं.

वेळ गेल्यानंतर एखादी गोष्ट केली, तर पश्‍चात्ताप होतो. शारीरिक तंदुरुस्तीपासून इतर अनेक गोष्टींमध्ये हे सांगता येईल. मात्र पश्‍चात्तापाची वेळ येण्यापेक्षा आधीच थोडी तयारी करणं आवश्‍यक आहे. पूर्वतयारी नेमकी, योग्य असली, की मग अनेक गोष्टी सोप्या होतात आणि जगणंही मग आनंददायी होतं.

पुण्यातल्या ओशो रजनीश आश्रमात गेला आहात कधी? तुम्हाला वाटेल, की ओशो रजनीश देवाघरी जाऊन बरीच वर्षं झाली; मग आश्रम अजून सुरू आहे? अगदीच सुरू आहे. कारण रजनीश यांनी आपल्या शिष्यांना मनोमन पटवलं आहे, की ते सतत त्यांच्यासोबत आहेत. ओशो रजनीश यांच्या समाधीवरची ती अक्षरं माझ्या मनात अजून घर करून आहेत...

ओशो 
नेव्हर बॉर्न 
नेव्हर डाईड
ओन्ली व्हीजिटेट दी 
प्लॅनेट अर्थ बिटवीन 
११ डिसेंबर १९३१ - १९ जानेवारी १९९०

होय! रजनीश यांचे शिष्य ओशो त्यांना सोडून गेले नाहीयेत असं मानतात. ही कहाणी आध्यात्मिक गुरूची आहे; पण निष्काम कर्मयोगी देवाघरी जातात, तेव्हा त्यांनी निर्माण केलेला आदर्श पुढं सुरू ठेवणं फार मोठी जबाबदारी असते. कारण ते नुसतं काम नसतं- तर तो असतो ‘वारसा!’ तो जपणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं असतं. खेळ म्हणा किंवा तंदुरुस्तीच्या क्षेत्रात काम करणारी तीन उदाहरणं मला नव्यानं अनुभवायला मिळाली- जे समाजाला जणू विचारत आहेत, की ‘सांगा कसं जगायचं!’ होय! मंगेश पाडगावकर यांच्या अजरामर कवितेतल्या त्याच ओळी मला हा लेख लिहिताना साद घालत आहेत. 

योगाचार्य बीकेएस अय्यंगार गुरुजींना देवाघरी जाऊन चार वर्षं लोटली. सन २०१८ हे तर गुरुजींचं जन्मशताब्दी वर्ष होतं. संस्थेनं गुरुजींना श्रद्धांजली अर्पण करताना योगप्रशिक्षणाचं फार सुरेख शिबिर घेतलं. गुरुजींच्या ज्येष्ठ कन्या गीताबाईंनी शिबिरात मार्गदर्शन केलं. त्या शिबिरादरम्यान त्या सतत सहायकांना विचारत होत्या ः ‘सगळं नीट होतंय ना? सगळ्या आसनांच्या आणि त्याच्या योग्य पद्धतीचं अनुकरण गुरुजींनी नेमून दिल्याप्रमाणं होतं आहे ना? माझं व्याख्यान रेकॉर्ड केलं जात आहे ना?’ 

नेहमी गीताबाई प्रसिद्धीपासून दूर असायच्या. मग यंदाच्या शिबिरात त्या त्यांचं सगळं बोलणं आणि मुख्य व्याख्यान याचं बरोबर चित्रीकरण होतं आहे ना, असं सतत का विचारत होत्या, याचं उत्तर संस्थेत काम करणाऱ्यांना लवकरच समजलं. शिबिर पार पडल्यावर काही दिवसांतच गीताबाई देवाघरी गेल्या. संस्थेत काम करणाऱ्या सगळ्यांनाच हा मोठा धक्का होता- कारण गुरुजी देवाघरी गेल्यावर गीताबाईंनी संस्थेची धुरा समर्थपणे पेलली होती. शेवटच्या प्रवासाला निघतानाही गीताबाईंनी गुरुजींचा योगप्रशिक्षणाचा वारसा पुढं कसा सुरू ठेवला पाहिजे याचा आदर्श निर्माण केला. अय्यंगार गुरुजींची नात अभिजाता श्रीधर आता तरुण वयात रमामणी अय्यंगार मेमोरियल योगा इन्स्टिट्यूटचा वारसा पुढं चालवायचा ध्यास मनात बाळगून आहे.  

‘‘खूप मोठं आव्हान आहे हे. योगासनं शिकवणारे जगात खूप आहेत. अगदी चांगलं काम ते करत आहेत; पण माझ्या आजोबांनी ज्या पद्धतीनं योगासनं जगाला शिकवली, तो प्रकार वेगळा होता. त्यांना तिन्हीत्रिकाळ योगाभ्यासाचा ध्यास असायचा. प्रत्येक आसन सर्वोत्तम शास्त्रशुद्ध पद्धतीनं करता येत येईल, त्यात सुधारणा करून त्याचा उपयोग अध्ययन करणाऱ्या लोकांना कसा होईल याचा विचार गुरुजी सतत करत असायचे. शेवटचा श्‍वास घेईपर्यंत गुरुजींचं योगासनांचा अभ्यास आणि शोधकार्य सुरू असलेलं मी प्रत्यक्ष अनुभवलं आहे. गुरुजी तंदुरुस्ती आणि चांगल्या जीवनशैलीकरता योगाभ्यास करून घ्यायचे; तसंच व्याधींमधून मुक्तीकरताही योगासनांचा ते वापर करायचे. दुर्धर शारीरिक आजार बरे करायचा त्यांचा प्रयत्न असायचा,’’ अभिजाता भरभरून बोलत होती.

वारसा पुढं चालवण्याचा विषय निघाला, तेव्हा अभिजाता म्हणाली ः ‘‘गुरुजींनी योग्य विद्यार्थी-विद्यार्थिनी हेरून उत्तम शिष्य निर्माण केले. आपल्या पश्‍चात रमामणी अय्यंगार मेमोरियल योगा इन्स्टिट्यूटचं काम अव्याहतपणे सुरू राहिलंच पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. गुरुजी देवाघरी गेल्यावर गीताबाई आम्हाला मार्गदर्शन करायला होत्या, म्हणून दु:ख पचवता आलं; पण आता गीताबाईसुद्धा देवाघरी गेल्यावर हे काम पुढं त्याच तन्मयतेनं चालवणं हे मोठं आव्हान आहे. माझ्या एकटीचं हे काम नाही. गुरुजींनी ज्या शिष्यांना स्वत: लक्ष घालून तयार केलं, त्यांच्या सोबतीनं मी कार्य पुढं चालू ठेवायचा प्रयत्न करणार आहे. अय्यंगार योगा शिकवणाऱ्या रमामणी अय्यंगार मेमोरियल योगा इन्स्टिट्यूट जगभर आहेत. गुरुजी आणि गीताबाईंनंतर पुण्यातल्या मुख्य संस्थेत कसं काम केलं जातं याकडे त्या सगळ्यांचं लक्ष आहे. त्यामुळं आम्हाला गुरुजींनी आखून दिलेल्या मार्गावरून प्रवास करायचा आहे.’’

खेळाडू असो वा सर्वसामान्य माणूस, कोणालाही शरीरस्वास्थ्याची नितांत गरज असते. खेळाडूला खेळातलं ध्येय गाठायला, तर सर्वसामान्य माणसाला व्याधींमधून मुक्तीकरता आणि निर्दोष जीवनशैलीकरता सर्वोत्तम तंदुरुस्तीची गरज असते. खेळाडूला इजा होते किंवा सर्वसामान्य माणसाला व्याधी होते, तेव्हा ती व्यक्ती डॉक्‍टरांकडे धाव घेते. व्याधी दोन प्रकारच्या असतात. त्यातला एक प्रकार असतो निसर्गानं निर्माण केलेल्या आणि दुसऱ्या असतात माणसानं निर्माण केलेल्या. पहिल्या प्रकारात उपचारांविना पर्याय नसतो. दुसऱ्या प्रकारात नीट काळजी योग्य वेळी घेतली, तर बऱ्याच यातना टाळता येतात.

ज्येष्ठ नागरिक आपल्याच घरात पडतात आणि मग ‘खुब्याचं हाड मोडलं’ ही गोष्ट सध्या वारंवार ऐकू येते. गुडघे बदलण्याची शस्त्रक्रियाही केली गेल्याचं सतत कानावर येतं. खेळाडूंच्या बाबतीत चुकीची शैली खेळात घुसल्यानं त्याचे खराब परिणाम शरीरावर झाल्याचे दिसतात. खुब्याचे हाड मोडल्यावर काही ज्येष्ठ नागरिक शस्त्रक्रियेला सामोरे जातातही; पण वयापरत्वे सुधारणा भरभर होत नसल्यानं खूप चांगले निष्कर्ष निघत नाहीत. 

हाच गंभीर विषय मी पुण्यात काम करणारे निष्णात क्रीडावैद्यकतज्ज्ञ डॉ. श्रीधर चिपळूणकर यांच्याशी बोलताना काढला. ‘‘व्याधी झाल्यावर होणाऱ्या पश्‍चात्तापात मन:स्ताप आहे; पण ‘पूर्वतयारी’ करता आली, तर बऱ्याच व्याधी टाळता येतात. कोणताही खेळ असो- तुम्ही प्रशिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन  घेता; तसंच थोडं मार्गदर्शन तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून घेतलं, तर खेळाडूला भविष्यात ताप देतील असे बरेच शारीरिक दुखापतींचे खड्डे टाळता येतील. वजन उचलणं असो वा क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, गोल्फ खेळातली आपापल्या आयुधांची पकड म्हणजेच ग्रिप असते. आपली ग्रिप योग्य आहे का नाही हे एकदा बरोबर तपासलं आणि मामुली बदल केले, तर मोठ्या आजारांचा धोका टाळता येतो. जरा दुखापत झाली, की त्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज नसते. दुखऱ्या भागाजवळच्या स्नायूंना मजबूत करून दुखापतग्रस्त भागाला मदत करता येते,’’ असं डॉ. चिपळूणकर सांगत होते.

‘‘आम्ही खेळाडूंना मदत करतोच; पण सर्वसामान्य आयुष्य जगताना त्यातला आनंद कसा राहील, याकरता जास्त मनापासून प्रयत्न करतो. साध्या माणसांना रोजच्या व्याधींपासून मुक्ती कशी मिळेल, याकरता विविध शोधकार्य करतो. स्त्री असो वा पुरुष- वय वाढत जातं, तसं शरीराकडे जरा जास्त लक्ष द्यायला हवं इतकंच माझं आग्रही म्हणणं आहे. रोजची बसण्याची पद्धत, मोबाईल पकडण्याची ग्रिप अशा साध्या गोष्टींनाही महत्त्व आहे. पूर्वी सगळे रोज आरामात उन्हात फिरायचे. त्यामुळे डी व्हिटॅमिनची कमतरता शरीराला भासायची नाही. आता बरेच लोक बंदिस्त वातावरणात दिवसभर बसलेले असतात. कोणी कामाला, तर कोणी घरात. मग डी व्हिटॅमिनची कमतरता भरून काढली नाही, तर हाडांच्या स्नायूंची ताकद कायम राहणार कशी? शहरांतल्या बऱ्याच लोकांना सध्या पळण्याच्या व्यायामाची गोडी लागली आहे. दहा किलोमीटर पळून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायला सगळे धडपडत असतात. पळणं चांगलं आहे; पण त्याची योग्य तयारी व्यायाम आहार आणि विश्रांतीची सांगड घालून करायला नको का? पुण्यातून लेहला लोक दुचाकीवर जातात. उत्साह असतो. मोहीम पूर्ण करतात; पण परत आल्यावर दुखापतग्रस्त होतात. शेवटचं साधं उदाहरण म्हणजे पर्यटनाकरता देशात किंवा परदेशात भरपूर पैसे खर्च करून लोक जातात; पण सहलीला जाण्याअगोदर चालण्याचाही व्यायाम करत नाहीत. मग होतं काय, की सहलीदरम्यान थकव्यानं कोणती तरी जुनी व्याधी डोकं वर काढते आणि आनंदावर विरजण पडतं. माझं म्हणणं इतकंच आहे, की कोणतीही योजना आखताना शारीरिक तयारीकडे थोडं लक्ष द्या- की जेणेकरून तुम्हालाच आनंदात बाधा येणार नाही. म्हणून परत सांगतो पश्‍चात्तापाला किंमत नाही...‘पूर्वतयारी’ महत्त्वाची,’’ डॉ. चिपळूणकर यांनी पोटतिडकीनं सांगितलं. 

गाणं म्हणत जगायचं
‘सांगा कसं जगायचं’ याचं उत्तर ‘कण्हत कण्हत नव्हे, तर गाणं म्हणत’ हेच असायला हवं. बीकेएस अय्यंगार गुरुजींनी मनोभावे शिकवलेल्या योगाभ्यासातून तंदुरुस्ती राखता येईल किंवा नव्या पिढीतले डॉ. श्रीधर चिपळूणकर यांनी सांगितल्याप्रमाणं थोडी तयारी केली, तर लांबच्या सहलीच्या आनंदात व्यत्यय येणार नाही. 

शेवटचं उदाहरण मला ‘ॲडव्हेंचर बियाँड बॅरीयर्स’ या संस्थेचं द्यावं वाटतं. दिव्यांशू गणात्रा नावाच्या हरहुन्नरी व्यक्तीनं सुरू केलेल्या या संस्थेला पंख फुटले आहेत. नेत्रहीन असलेल्या दिव्यांशूनं मित्राच्या सोबतीनं टॅंडम सायकलवरून मनाली खारदुंग ला प्रवास पूर्ण केला. त्या मोहिमेत दिव्यांशूला इतका आनंद आणि समाधान मिळालं, की त्यानं ॲडव्हेंचर बियाँड बॅरीयर्स या संस्थेची स्थापना करून तमाम डिफरंटली एबल्ड मित्र-मैत्रिणींना साहसी क्रीडा प्रकारात उडी घ्यायचं आवाहन केलं. आता बरेच उत्साही नेत्रहीन किंवा अपंग लोक दिव्यांशूबरोबर हिमालयात सायकलिंगचा आनंद घेतात, तर कोणी खोल समुद्रात स्कुबा डायव्हिंग करायची हिंमत करतात. फक्त मोहीम आखताना त्याची पूर्वतयारी दिव्यांशू नेटानं करून घेतो. 

खेळाडू असो वा नसो, आपणही नेहमीचे जीवन उत्तम प्रकारे जगता यावे, म्हणून शारीरिक तंदुरुस्तीच्या बाबतीत पूर्वतयारी करूयात,  म्हणजे जीवन म्हणजे सुरेल गाणे होईल हो. मंगेश पाडगांवकर कवितेत म्हणतातच ः

सांगा कसं जगायचं? 
कण्हत कण्हत 
की गाणं म्हणत 
तुम्हीच ठरवायचं!

'सप्तरंग'मधील लेख वाचण्यासाठी क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Importance of preparation writes Sunandan Lele