'मुलींनो, लग्न करायचे आहे की अटी घालायच्या आहेत?'

'मुलींनो, लग्न करायचे आहे की अटी घालायच्या आहेत?'
'मुलींनो, लग्न करायचे आहे की अटी घालायच्या आहेत?'

'मुलींनो, विवाह स्पष्ट अटी घालूनच करा...' या लेखात लेखिकेने ज्वलंत विषयावर चर्चा केली आहे. वास्तविक, विवाह म्हणजे केवळ आर्थिक व्यवहार किंवा शरीरसंबंधांसाठी मिळालेला अधिकृत परवाना नसतो. तर विवाह म्हणजे दोन मनांचे, दोन देहाचे, दोन कुटुंबांचे, दोन संस्कृतींचे मिलन असते. आपले संपूर्ण आयुष्य ज्या कुटुंबात घालवायचे आहे त्याबाबत मुलींनी काही विचार नक्कीच करावा; मात्र या प्रक्रियेला "अटी' हा शब्द वापरणे अव्यवहार्य किंवा असंवेदनशीलपणाचे लक्षण वाटते.

आपण माणूस म्हणून जन्मलो आहोत. आपले मन, आपले शरीर आणि एकूणच आपला भवताल कालौघात हळूहळू उत्क्रांत होत गेलेले आहे. वर्तमान विवाहसंस्था ही देखील उत्क्रांतीच्या अनेक टप्प्यातून इथवर पोचली आहे. अर्थात, विवाहसंस्थेचे हे आदर्श स्वरूप आहे, असे म्हणणे योग्य नाही. आज काळानुरूप त्यामध्ये बदल होत आहे. पूर्वी मुलगी अज्ञान असतानाच तिचा विवाह निश्‍चित केला जात होता. वधू-वरांना परस्परांचे मुखदर्शन थेट बोहल्यावर चढल्यावरच होत असे. आता, तशी परिस्थिती राहिलेली नाही. अर्थात, अशा काही घटना कधी तरी समोर येतात. मात्र, त्याचे प्रमाणही कमी होत आहे. आता कायद्यानेच मुला-मुलींनी विवाहयोग्य वय निश्‍चित करून देण्यात आले आहे. सज्ञान मुली सुज्ञपणाने भावी जीवनाचे स्वप्न रंगवू लागल्या आहेत. आपला पती स्वत:च निवडत आहेत. त्यांनी जात, पात, धर्म, पंथ, संप्रदाय, रंग, रूप, प्रदेश ही सारी बंधने केव्हाच झुगारून दिली आहेत. विवाह आणि भावी जीवनसाथी हा प्रेमाचा आणि हळुवारपणे जपण्याचा विषय बनलेला आहे. मुलांनीही हुंडा, रूसवा-फुगवा आदी बाबींना लाथ मारलेली आहे. कायद्यानेही तसे नियंत्रण आणले आहे. अर्थात, ग्रामीण भागातील काही समाजात ही प्रथा छुपणेपणाने आजही सुरू असल्याची उदाहरणे कधीतरी समोर येतात. मात्र ते प्रमाणही अत्यल्प म्हणावे एवढेच आहे.

'मुलींनो, विवाह स्पष्ट अटी घालूनच करा...' या लेखात मुलींच्या अटींचा नमुना दिलेला आहे. प्रत्येकाचे आयुष्य स्वतंत्र असते. प्रत्येकाच्या आवडी-निवडी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे विवाहसारख्या गंभीर विषयाबाबत आपण सरसकट "नमुना अटी' सादर करणे व्यवहार्य नाही. या अटींमध्ये सर्वाधिक चर्चा "व्यवहार'या बाबीवर करण्यात आलेली आहे. विवाह झाला की मुलगी माहेरपासून विभक्त होते किंवा तिचा माहेराशी किंवा माहेरच्या लोकांचा तिच्याशी काहीही संबंध राहात नाही, असे गृहित धरूनच या "नमुना अटी' तयार करण्यात आल्या आहेत. एखाद्या विवाहित मुलीला सासूचा फोन आला आणि आईचा फोन आला तर त्यातून तिला सर्वाधिक आनंद हा आईसोबत बोलण्यातूनच मिळतो. यावरूनच मुलीला माहेराविषयी विवाहापूर्वीएवढेच विवाहनंतर किंवा त्यापेक्षा किंचित अधिक प्रेम असते, हे दिसून येते. अर्थात नव्याने निर्माण झालेल्या सासूच्या नात्याविषयी प्रेम वाटत नाही, असे नाही. मात्र, तिला माहेरची आणि माहेरच्या व्यक्तींची अधिकाधिक काळजी वाटत असते. त्यामुळे ती सासर सांभाळून शक्‍य तेवढी मदत माहेरी करत असतेच. मुलीच्या भावंडांचे शिक्षण, आई-वडिलांचा सांभाळ आदी गोष्टी एवढ्या सामान्य झालेल्या आहेत की वर्तमान समाजाने त्या केव्हाच स्वीकारलेल्या आहेत. मात्र, तरीही सासरच्या घरात काही उणीव भासत असताना मुलीने माहेरी मदत करावी का? हा चर्चेचा विषय आहे. वाढती महागाई, वाढता खर्च, हौस-मौज जोपासणे आदींसाठी पैसा लागतो. त्यामुळे सुशिक्षीत मुलीने विवाहानंतर नोकरी करणे हे देखील एवढे अंगवळणी पडले आहे की त्याकडे "जाचक अट' म्हणून पाहण्याचे काही कारण नाही.

अपत्यनिर्मिती आणि अपत्यसंगोपन याबाबतही लेखात चर्चा करण्यात आली आहे. मुळातच, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्‍न आहे. त्यासंदर्भातील काही आदर्श परिमाणे निर्माण करण्याच्या प्रयत्नात सुज्ञ समाजाने पडण्याचे कारण नाही. समाजात अशीही काही जोडपी आहेत की त्यांनी जाणून-बुजून अपत्यनिर्मिती केलेली नाही. काही जोडपी अशीही आहेत की, ज्यांनी एका अपत्यानंतर दुसरे अपत्य दत्तक घेतले आहे. आता विषय राहिला तो नसबंदीचा! ती कोणी करावी? हा देखील ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्‍न आहे. अर्थात, "पुरुषाने नसबंदी करावी' हा सल्ला बहुपत्नीत्व किंवा तोंडी तलाक पद्धतीला ज्या समाजात मान्यता आहे, त्या समाजासाठी उपयुक्त आहेत. त्या उद्देशाने जर हा सल्ला दिलेला असेल, तर त्यात गैर काही नाही. "अपत्यसंगोपनासाठी करिअरचा बळी देऊ नये', हा सल्ला तर हास्यास्पदच वाटतो. कारण, निसर्गानेच अशा काही मर्यादा लादून दिलेल्या आहेत की अपत्य हे आईशिवाय राहुच शकत नाहीत. "ज्याला सोस असतो त्यानेच अपत्यसंगोपनासाठी करिअरला तिलांजली द्यावी' हा सल्ला प्रत्यक्षात आणायचा म्हटला तरीही पुरुषाने किंवा पित्याने त्याच्या अपत्याला स्तनपान कसे करावे? या निसर्गाच्या मर्यादेवर मात कशी करणार? पती आणि पत्नी नोकरी करणारे असतील तर बहुतेक घरांमध्ये धुणे, भांडी, स्वयंपाक आदी कामांसाठी मोलकरीण ठेवली जाते. त्यामुळे पत्नी ही पतीची सेवक असा भ्रम करून घेणे चुकीचे आहे. लग्नसमारंभ हौस-मौज आणि आनंदसोहळा म्हणून करायचा की दीनदुबळ्यांना दानधर्म करून साजरा करायचा हा देखील ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्‍न आहे. त्यामुळे या संदर्भात दिलेले सल्लेही अनावश्‍यक वाटतात.

थोडक्‍यात काय तर विवाह करताना मुलींनी माफक अपेक्षा नक्कीच ठेवाव्यात. पण त्याचे सार्वत्रिकीकरण करण्याची गरज नाही. मुलगा निवडताना त्याचा सध्याचा पगार नक्कीच पाहावा. मात्र, समजा भविष्यात दुर्दैवाने तो ज्या कंपनीत काम करतो, ती कंपनीच बंद पडली तर स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी काही कौशल्य मुलाकडे आहे का? याचा दूरदृष्टीने विचार करावा. उदरनिर्वाहाशिवाय माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्‍यक असलेली रसिकता मुलाकडे आहे का, आयुष्य जगत असताना तो ठेच लागून पडला; तर पुन्हा उठण्याचे, उठून लढण्याचे, पळण्याचे आणि जिंकण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे आहे का, हे मुलींनी पाहणे आवश्‍यक आहे. विवाहानंतर कुटुंबातील व्यक्तींसोबत काही विषयांवरून मुलीचे मतभेद निर्माण झाले तर अशा परिस्थिती मुलीला समजून घेऊन मुलगा मध्यममार्ग काढू शकेल का, याचा विचार मुलींनी करावा, असे प्रामाणिकपणाने वाटते. कोणत्याही कर्तृत्त्वाशिवाय बापाच्या जीवावर श्रीमंत झालेल्या मुलाची पत्नी म्हणून उर्वरित आयुष्य आरामात जगावे की स्वकर्तृत्त्वाने जगण्याशी झुंज देत असलेल्या कर्तृत्त्ववान मुलाची जीवनसाथी होऊन संघर्षाने अवघे विश्‍व निर्माण करण्याचा आनंद लुटावा, याचा विचारही मुलींनी करणे आवश्‍यक आहे. या सर्व बाबींचा विचार करूनच मुलींनी ठरवावे की त्यांना लग्न करायचे आहे की अटी लादायच्या आहेत?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com