भाषिक अभिव्यक्तीतील विसंगती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिव्यक्ती

भाषिक अभिव्यक्तीतील विसंगती

नकालखंडांतील राजकीय तत्त्वप्रणालीत मूलभूत फरक पडला नसला, तरी अशा दोन (कालखंडातील) युगांतील राजकीय परिभाषा अत्यंत वेगळ्या आहेत, असेही पाहायला मिळते. बाराव्या आणि सोळाव्या शतकातील सरंजामी राजवटीतील परिभाषेतील मोठे बदल त्याचे उत्तम उदाहरण सांगता येईल. एक कल्हानचे ‘रजतरंगणी ’(११८४) आणि अल बदाऊनीचे ‘तारीख-इ-बदाऊनी (१५९५)’. कल्हान आणि बदाऊनी दोघांच्या रचनांतील उद्देश आणि रचनांतील साधर्म्य लक्षणीय आहे.

कल्हण आणि बदाऊनी या दोघांना राजाश्रय होता आणि आपल्या सत्ताधाऱ्याच्या राजवैभवाचे वर्णन करणे हा त्यांच्या साहित्याचा उघड हेतू होता. रजतरंगिणी आणि तारीख-इ-बदाऊनी या दोन्ही रचनांत त्यांच्या पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांची यादी, त्यांची गुंतागुंतीची वंशावळ आणि योग्य ऐतिहासिक छाननी करत त्या वारशावरील आपला हक्क स्थापित करण्यासाठी प्रचंड ऊर्जा खर्च केलेली दिसते. या रचनांत नोंदलेली माहिती वास्तुनिष्ठ कमी आणि काल्पनिक अधिक आढळते. कल्हान याने ख्रिस्तपूर्व ११८२ पासून त्याच्या काळापर्यंतचा कालखंड नोंदलेला आहे; तर बदाऊनी याने सन ९७७ (पहिला इस्लामी सत्ताधारी साबुक्तीगीनपासून) ते त्याच्या जीवनकाळापर्यंतचा काळ नोंदला आहे. या दोन्ही रचनाकारांत वास्तविक चार शतकांचे अंतर असले, तरी आज एकविसाव्या शतकात हे साहित्य वाचणाऱ्याला या दोन्ही रचना सारख्याच वाटतील. बारकाईने वाचल्यावर मात्र लक्षात येते की बदाऊनीच्या लिखाणात प्रसंगी सत्ताधाऱ्यां‍वर टीका करण्यासाठी उपरोध आणि वक्रोक्तीचा वापर केलेला दिसतो. मात्र त्या तुलनेत कल्हानच्या लिखाणात काश्मीरच्या हर्षाबाबत अशा प्रकारची ‘टीका’ आढळत नाही. बदाऊनीच्या लिखाणात अकबराच्या धार्मिक दृष्टिकोनावर भरपूर टीका केलेली आहे. म्हणूनच त्याचे लिखाण अकबराच्या मृत्यूनंतर मुगल सत्तेवर जहांगीराचा पूर्ण कब्जा प्रस्थापित होईपर्यंत, दहा वर्षे लपवून ठेवण्यात आले.

स्थापित, प्रचलित भाषिक शब्दप्रणालीच्या जागी वेगळ्या प्रकारची शब्दप्रणाली व्यवहारात येते त्यामागे अनेक घटक असतात. समाजातील बदललेले कामगार संबंध, नव्या तंत्रज्ञानाचा उदय, अर्थव्यवस्थेतील परिवर्तन आणि जनसमूहांचे स्थलांतर असे काही घटक सांगता येतात. या सगळ्या घटकांचा राजकारणाशी थेट संबंध नसतो. मात्र हे सर्व घटक राजकीय व्यवहाराशी घनिष्ठपणे जोडलेले असतात. याचा दुसरा अर्थ नवी राजकीय व्यवस्था निर्माण होते तेव्हाच राजकीय परिभाषा नवे रूप घेते, असे नाही. नवी राजकीय व्यवस्था निर्माण झाली नसेल, तरीसुद्धा राजकीय परिभाषेत परिवर्तन घडणे शक्य असते.

या संदर्भातील दोन उदाहरणे आपण पाहू. ही दोन्ही उदाहरणे वेगवेगळ्या कालखंडातील, पण वेगळ्या देशांतील आहेत. साधारणपणे दीडशे वर्षांपूर्वी गेटिसबर्ग येथे अब्राहम लिंकन यांनी लहानसे भाषण केले होते. युद्धाने उद्ध्वस्त झालेल्या अमेरिकेला अब्राहम लिंकन यांच्या या भाषणाने पुन्हा सावरले. या भाषणात त्यांनी युद्धात स्वत:चे प्राण अर्पण करणाऱ्या अमेरिकन वीरांबद्दल बोलताना म्हटले की, त्यांनी समता टिकून राहावी, यासाठी आपले जीवन अर्पण केले आहे. ते आपल्या भाषणात म्हणतात,

‘‘सत्याऐंशी वर्षांपूर्वी आमच्या पूर्वजांनी या उपखंडात एक नवीन राष्ट्र निर्माण केले. स्वातंत्र्याची संकल्पना निर्माण केली आणि त्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेप्रति आपली निष्ठा घोषित केली; ती अशी, की जन्माला आलेली सर्व माणसं समान आहेत.

उदात्त ध्येयासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्यांनी आपल्या समोर सर्वोच्च त्यागाचा आणि निष्ठेचा आदर्श निर्माण केला आहे - ते ध्येय म्हणजे देवाच्या कृपेने हे राष्ट्र एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून जन्म घेईल... आणि लोकांनी, लोकांसाठी चालवले जाणारे सरकार असणारे हे राष्ट्र पृथ्वीतलावरून कधीही नष्ट होणार नाही... आता या क्षणी ते ध्येय साध्य करण्यासाठी संपूर्ण निष्ठेने आपले प्राण अर्पण करणाऱ्या या महान योद्ध्यांच्या त्यागाचा योग्य गौरव करण्यासाठी आपण अधिक निष्ठेने त्यांचे कार्य पुढे नेण्याचा निश्चय केला पाहिजे.

२०२० मध्ये पोलिसी हिंसाचाराला बळी पडत असताना शेवटच्या आठ मिनिटांत त्याचे अखेरचे श्वास कोंडत असताना जॉर्ज फ्लॉईड या काळ्या अमेरिकन माणसाने नेमके तेच सांगितले, जे लिंकन सांगत होते किंवा ज्यो बायडेन आपल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारात जे सांगत होते, ‘‘मनातून गुलामगिरीचे पाप तुम्हाला जोवर धुऊन टाकता येत नाही, तोवर (स्वतंत्र) अमेरिकेचे उदात्त स्वप्न वास्तवात उतरू शकत नाही.’’ जीव गुदमरत असताना जॉर्ज फ्लॉईडने उच्चारलेले ते १२७ शब्द म्हणजे मानवी प्रतिष्ठा आणि समानतेसाठी केलेला आक्रोश म्हणून अजरामर होतील.

‘‘माणसा, अरे तो माझा चेहरा आहे; अरे, मी खरंच काहीही गंभीर कृत्य नाही केलेलं; प्लीज, प्लीज, प्लीज अरे मला श्वास नाही घेता येत रे; प्लीज माणसा; प्लीज कोणीतरी, प्लीज माणसा; मला श्वास नाही घेता येत; अरे, माझा श्वास कोंडतोय; प्लीज (त्याचे शब्द अस्पष्ट होत जातात, नीट ऐकू येत नाहीत) माणसा मला श्वास नाही घेता येत; माझा चेहरा; उठ रे, लवकर उचल; माझा श्वास कोंडतोय; प्लीज अरे तुझा गुढघा माझ्या मानेवर आहे; अरे खरंच मला श्वास नाही घेता येत;... अरे मी; मला हलताही येत नाही; ममा, ममा. मला खरंच श्वास घेता येत नाही... प्लीज सर, प्लीज, प्लीज, प्लीज. मला श्वास घेता येत नाही.”

फ्लॉईडचे शब्द म्हणजे अक्षरश: त्यांची मृत्यूपूर्व जबानी होती. त्या वक्तव्यात एक प्रश्न दडलेला आहे तो म्हणजे ‘काळ्या माणसाला अमेरिकेतील गोऱ्या माणसांइतकाच जगण्याचा हक्क आहे की नाही?’ लिंकन यांनी ते नागरी युद्ध नेमक्या याच प्रश्नावर लढले होते. आपल्या डौलदार वक्तृत्वशैलीतील त्या अजरामर भाषणात लिंकन यांनी तोच प्रश्न विचारला होता.

या दोन्ही भाषिक वक्तव्यांचा विचार केला, तर त्यात व्यक्त होणाऱ्या समानतेच्या आदर्श मूल्याचा अर्थ आपण समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. डोनॉल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात तयार झालेल्या द्वेष आणि तिरस्काराच्या उजव्या अतिरेकी विचारसरणीला एक सामाजिक आणि नैतिक मान्यता मिळाली होती. जॉर्ज फ्लॉईडच्या घटनेनंतर या विचारसरणीपासून मुक्तता मिळायला सुरुवात झाली. त्या घटनेनंतर सुरू झालेल्या ‘ब्लॅक लाईव्ज मॅटर’ या चळवळीमुळे २०२० मध्ये झालेल्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल बदलले. भारतात ‘मॉब लिंचिंग’द्वारे केल्या जाणाऱ्या या दलित आणि मुस्लिमांच्या हत्या आणि मोदी सरकारद्वारे अशा हत्यांना मिळणारा पाठिंबा यामुळे अस्वस्थ होणाऱ्या भारतीयांच्या मनातही ‘ब्लॅक लाईव्ज मॅटर’ या चळवळीचा खोल परिणाम झाला. भाजपच्या एका महत्त्वाच्या राजकीय नेत्याने २०२०च्या सुरवातीला निषेध आंदोलनांत सहभागी झालेल्या मुस्लिमांविरुद्ध द्वेषाचे गरळ ओकणारे वक्तव्य केले होते. त्या वेळेस जॉर्ज फ्लॉईड घटनेनंतर संपूर्ण अमेरिकेत सुरू झालेल्या ब्लॅक लाइव्ज मॅटर पाहून भारतातल्या अनेकांच्या मनात आले की भारतात अशा प्रकारची चळवळ का निर्माण होत नाही.

राजकीय परिभाषेतील बदल म्हणजे प्रत्येक वेळी व्यवस्थेत झालेल्या बदलाचे निदर्शक असेल असे नाही. त्या त्या काळातील राजकारण, त्याची परिभाषा आणि त्याची भाषिक अभिव्यक्ती यातील विसंगती या तीन घटकांत कसलेच नाते नाही, असाही त्याचा अर्थ गृहीत धरण्याचे कारण नाही. अशी विसंगती त्या काळातील भाषिक व्यवहार पद्धतीमुळे मुख्यत: तयार होते.

(लेखक भाषाशास्त्रज्ञ असून

भारतीय बोलीभाषेचे संशोधक आहेत.)

(मराठी अनुवाद : प्रमोद मुजुमदार)