स्वच्छतेची ही लढाई भारत जिंकतो आहे - बिल गेट्‌स

बिल गेट्‌स
गुरुवार, 27 एप्रिल 2017

स्वच्छ मोहिमेंतर्गत एका मोठ्या समस्येची व्याप्ती निश्‍चित करण्यात आली, त्यावर प्रत्येकाकडून काम करुन घेण्यात आले आणि कोठे वेगळे काम करण्याची आवश्‍यकता आहे, हे अधोरेखित करण्यासाठी मूल्यमापन करण्यात आले - ही या मोहिमेसंदर्भात मला सर्वांत जास्त आवडलेली बाब आहे. ज्या गोष्टीचे मूल्यमापन होते, ती गोष्ट तडीस जाते, अशी एक जुनी म्हण आहे...

"मायक्रोसॉफ्ट'चे निर्माते व जगामधील सर्वांत श्रीमंत नागरिक असलेल्या बिल गेट्‌स यांनी भारतामध्ये सध्या राबविण्यात येणाऱ्या "स्वच्छ भारत' मोहिमेसंदर्भात लिहिलेला हा लेख...

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे तीन वर्षांपूर्वी सार्वजनिक आरोग्य क्षेत्रासंदर्भात एक विधान केले. "लोकनियुक्त प्रतिनिधीं'नी या क्षेत्रासंदर्भात केलेले यापेक्षा धाडसी विधान मी याआधी कधीही पाहिलेले नाही. आजही या विधानाचा प्रचंड प्रभाव जाणवतो आहे.

भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशास प्रथमच संबोधित करताना मोदी म्हणाले होते - ""आपण 21 व्या शतकामध्ये राहतो आहोत. आपल्या माता भगिनींना अजूनही उघड्यावर शौचास बसावे लागते, या वस्तुस्थितीमुळे आपल्याला कधीतरी त्रास झाला आहे काय? गावांमधील गरीब महिला शौचास जाण्यासाठी रात्र होण्याची वाट पाहतात. अर्थातच रात्र होईपर्यंत त्यांना शौचासाठी जाता येत नाही. यामुळे त्यांच्यावर काय प्रसंग गुदरत असेल, त्यांच्या या कृतीमुळे किती आजारांना निमंत्रण मिळत असेल? आपल्या माताभगिनींच्या आत्मसन्मानाच्या संरक्षणासाठी आपण शौचालये उभारु शकत नाही काय?''

इतक्‍या संवेदनशील मुद्यावर राष्ट्रीय पातळीवरील एखादा नेता सार्वजनिक स्तरावर इतक्‍या स्पष्टपणे बोलल्याचे अन्य उदाहरण माझ्या पाहण्यात नाही. याशिवाय, मोदी यांनी त्यांच्या शब्दांना कृतीची जोडही दिली. या भाषणानंतर दोनच महिन्यांच्या आतमध्ये त्यांनी "स्वच्छ भारत' मोहिमेची घोषणा केली. देशभरामध्ये 2019 पर्यंत साडेसात कोटी शौचालये बांधून उघड्यावर होणारे शौच पूर्णत: बंद करणे; तसेच प्रक्रिया करण्यात न आलेले कोणतेही सांडपाणी वा मैला पर्यावरणात थेट मिसळण्यापासून रोखणे हे या मोहिमेचा उद्देश आहेत. साडेसात कोटी शौचालये!

माझ्या भारत भेटीमध्ये मी या प्रभावी मोहिमेसंदर्भात बनविण्यात आलेला एक छोटा व्हर्च्युअल-रिऍलिटी व्हिडिओ प्रसिद्ध केला होता.

आपल्यापैकी बहुसंख्य ज्याचा विचारही करणार नाहीत; अशा विषयावर पंतप्रधानांनी लक्ष केंद्रित का करावे, असा प्रश्‍न पडला असल्यास यासंदर्भातील आकडेवारी पहा. जगभरामध्ये दरवर्षी अस्वच्छता, असुरक्षित पाणी आणि प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या 1.7 कोटी नागरिकांमध्ये सहा लाखांहूनही जास्त जण भारतीय नागरिक असतात. स्वच्छ स्वच्छतागृहे नाहीत, या एका कारणासाठी देशामध्ये 25% विद्यार्थिनींना शाळा सोडावी लागते. सांडपाणी व्यवस्थापन चांगले नसल्याने भारतास दरवर्षी 106 अब्ज डॉलर्सपेक्षाही जास्त आर्थिक नुकसान सोसावे लागते.

दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास, ही समस्या सोडविल्यास दरवर्षी हजारो जीव वाचविण्यात यश येणार आहे, मुलींना सोडायची पाळी येणार नाही आणि देशाच्या अर्थव्यवस्थेस उभारी मिळेल. सांडपाणी व्यवस्थापनामध्ये सुधारणा करणे, हे आमच्या संस्थेचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट असून यासंदर्भात आम्ही भारतीय सरकारबरोबर काम करत आहोत.

स्वच्छ भारत मोहिमेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी दोन महत्त्वपूर्ण बाबी आवश्‍यक आहेत. यातील एक म्हणजे प्रत्येकास चांगल्या स्वच्छतागृहाची सुविधा मिळावयास हवी. म्हणजेच विविध आजारांचे कारण असलेल्या विष्ठामय मैल्यावर तत्काळ वा अन्य ठिकाणी प्रक्रिया करावयास हवी. ही सर्व प्रक्रियेची मैल्याचे एकत्रीकरण, गरज असल्यास त्याची वाहतूक आणि नंतर त्यावर करण्यात येणारी प्रक्रिया अशा प्रत्येक टप्प्यावर काटेकोर अंमलबाजवणी होणे आवश्‍यक आहे. कारण कुठल्याही टप्प्याची अंमलबजावणी यशस्वी न झाल्यास आजार पसरतील.

दुदैवाने, प्रत्येक ठिकाणी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारणे वा मैला वाहून नेणाऱ्या वाहिनी (पाईप्स) उभारणे शक्‍य नाही. यामुळे भारतीय संशोधकांकडून यासंदर्भात विविध पर्यायांची चाचणी करण्यात येत आहे. यामध्ये मानवी मैल्यावर आधुनिक पद्धतीने प्रक्रिया करणाऱ्या व सांडपाणी व्यवस्थापनासाठी वाहिनीची गरज नसलेल्या नव्या संरचनेच्या स्वच्छतागृहांच्या पर्यायाचाही समावेश आहे.

आत्तापर्यंत या क्षेत्रात झालेली प्रगती कौतुकास्पद आहे. 2014 मध्ये स्वच्छ भारत मोहिमेची घोषणा झाली. यावेळी केवळ 42% भारतीयांनाच सांडपाणी व्यवस्थापनाची सोय उपलब्ध होती. सद्यस्थितीत हे प्रमाण 64 टक्‍क्‍यांवर जाऊन पोहोचले आहे. आणि 2 ऑक्‍टोबर 2019 पर्यंत, महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीपर्यंत, हे काम पूर्णत्वास नेण्याचा योजनाबद्ध कार्यक्रम सरकारकडे आहे. याशिवाय बांधण्यात येणाऱ्या प्रत्येक नव्या स्वच्छतागृहाची छायाचित्रे व भौगोलिक स्थलनिश्‍चिती (जिओटॅगींग), यांमुळे या मोहिमेमध्ये कोणती राज्ये प्रगतिपथावर आहेत; आणि कोणती मागे पडली आहेत, याची माहिती प्रशासनाकडे आहे.

मात्र केवळ नवी स्वच्छतागृहे बांधणे पुरेसे नाही. नागरिकांना ही स्वच्छतागृहे वापरण्यास उद्युक्त करणेही आवश्‍यक आहे. स्वच्छ भारत मोहिमेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी ही दुसरी बाब आवश्‍यक आहे. आणि नवी स्वच्छतागृहे बांधण्यापेक्षा हे काम अवघड आहे. जुन्या सवयी बदलण्यास लोक अनुत्सुक असू शकतात.

या समस्या सोडविण्यासाठी स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत काही "खास' मार्ग अवलंबिण्यात आले आहेत. काही समाजसमुहांमध्ये उघड्यावर शौचासाठी जाणाऱ्या लोकांना रोखून त्यांना सार्वजनिक शौचालयांचा वापर करण्यास भाग पाडण्यासाठी लहान मुलांचा उपयोग करण्यात येत आहे. पुढच्या वर्षी विकसित करण्यात येणाऱ्या पथदर्शी प्रकल्पांतर्गत सरकारने "गूगल'बरोबर काम केले आहे. या प्रकल्पान्वये देशातील 11 शहरांमध्ये युजर्स जवळचे सार्वजनिक शौचालय ऑनलाईन शोधू शकतील, इतर युजर्सनी या शौचालयांसंदर्भात लिहिलेले परीक्षणही वाचू शकतील. देशभरातील रस्त्यांवर उभारण्यात आलेले फलक येणाऱ्या जाणाऱ्यांना या मोहिमेचे स्मरण करुन देत आहेत. चित्रपटसृष्टीमधील अभिनेते वा क्रिकेटपटू टीव्ही वा रेडिओच्या माध्यमामधून याविषयी बोलत आहेत. किंबहुना, देशाच्या चलनावरही स्वच्छ भारत मोहिमेचे बोधचिन्ह (लोगो) आहे.

या कष्टांचे फायदे दिसत आहेत. आज भारतामधील 30 टक्‍क्‍यांहून जास्त गावे उघड्यावर शौच करण्याच्या या समस्येपासून मुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. 2015 मध्ये हे प्रमाण 8% होते.

स्वच्छ मोहिमेंतर्गत एका मोठ्या समस्येची व्याप्ती निश्‍चित करण्यात आली, त्यावर प्रत्येकाकडून काम करुन घेण्यात आले आणि कोठे वेगळे काम करण्याची आवश्‍यकता आहे, हे अधोरेखित करण्यासाठी मूल्यमापन करण्यात आले - या मोहिमेसंदर्भात ही मला सर्वांत जास्त आवडलेली बाब आहे. ज्या गोष्टीचे मूल्यमापन होते, ती गोष्ट तडीस जाते, अशी एक जुनी म्हण आहे. जर तुम्ही महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून प्रगतीचे मूल्यमापन योग्य पद्धतीने केले नाही; तर कोणत्याही मोहिमेचा अंत पठडीबद्ध पद्धतीनेच होतो. आणि या प्रकरणी पठडीबद्ध अंत याचा अर्थ दरवर्षी सांडपाणी व्यवस्थापनाच्या भीषण कमरतेमुळे पन्नास हजारपेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यु होणे, असा आहे.

महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवण्यामधून भारतीय बदलाची मागणी करत आहेत; आणि ही उद्दिष्टे प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ते कृतीही करत आहेत. इतर देशांसाठी हे अत्यंत चांगले उदाहरण आहेच; शिवाय प्रत्येकाला एक आरोग्यपूर्ण, उत्पादक आयुष्य जगण्याचा अधिकार आहे, असे मानणाऱ्या आमच्यासारख्या प्रत्येकासाठी ही एक प्रेरणादायी मोहिम आहे.

Web Title: India Is Winning Its War on Human Waste, writes Bill Gates

व्हिडीओ गॅलरी