टिकली तर टिकली! | Indian Culture | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Spangle
टिकली तर टिकली!

टिकली तर टिकली!

sakal_logo
By
रसिका आगाशे

कमी कपडे म्हणजे मॉडर्न आणि पारंपरिक तेच चांगलं अशा घट्ट संकल्पनांमध्ये, अशा विश्वात जगणं खूप अवघड आहे. कपडे ही सोय आहे. स्त्री आणि तिचे वस्त्रालंकार यावरही बोललं गेलं पाहिजे...

मध्यंतरी विविध जाहिरातींमध्ये हिंदू बायकांनी टिकली लावावी की नाही, यावर हिरिरीने चर्चा झाली. ज्या स्त्रीला टिकली लावाविशी वाटते तिने लावावी... जिला नाही तिने लावू नये, इतकं हे गणित सोप्पं नाही. कारण टिकली हा हिंदू संस्कृतीचा गाभा आहे, असं या निमित्ताने अनेकांना वाटायला लागलं आणि स्त्रीची इच्छा, हा मूलभूत मुद्दा मागे पडून तिने संस्कृती कशी सांभाळली पाहिजे याकडे या चर्चेचा कल होता. असो, या निमित्ताने संस्कृती चिन्ह आणि स्त्रिया यावर जसं बोललं गेलं पाहिजे तसंच जाहिरातीतील स्त्रीचं स्थान यावरही चर्चा व्हायला हवी. स्त्री आणि तिचे वस्त्रालंकार, तिचे हक्क आणि तिची सोय यावरही बोललं गेलं पाहिजे.

एक किस्सा मला आठवतो... लग्नानंतर दिल्लीला काय पद्धतीचे कपडे मी घातले पाहिजेत यावर मी कधी विचार केला नव्हता. मी सहसा जेंडर न्यूट्रल (कुठल्याही लिंगाचे लोक घालू शकतील) असे कपडे घालते. त्यावर सासरच्या एका बाईंना आक्षेप होता. सलवार कमीज, त्यात पाठ कितीही उघडी राहिली किंवा गळा कितीही खोल असेल तर त्यांचं काहीही म्हणणं नव्हतं! त्यांच्या दृष्टीने हेच स्त्री-सुलभ होतं! मला कपड्यातून विविक्षित अवयव अधोरेखित करायला आवडत नाही. त्यात लपवण्यासारखं काही नाही आणि दाखवण्यासारखं तर अजिबात नाही, असं मला वाटतं.

अर्थात मला हवे तसे कपडे मी घालू शकते, हे पटवून देण्याचं अवघड काम मी तेव्हा केलं! आणि त्याचबरोबर इतरांनी काय घालावं किंवा काय घालू नये, याबद्दल निर्णय घेण्याचा कुठलाही हक्क जसा मला नाही तसा इतरांनाही नाही हेही मी समजावलं! मी किती यशस्वी झाले ते माहीत नाही. माझं माझ्या सोयीनुसार कपडे घालण्याचं स्वातंत्र्य मी नक्की अबाधित ठेवलं, पण शतकानुशतके असलेल्या बंधनामुळे स्त्री-सुलभ म्हणजे काय, याची एक व्याख्या तयार झाली आहे. त्यामुळेच फेमिनिस्ट बायका कशाही राहतात (घाणेरड्या, पारोशा...) अशा प्रकारची एक मांडणी तयार होते.

बाईच्या जातीला नटावंसं वाटतंच, ही अजून एक धारणा! स्त्री-सुलभ म्हणजे काय हो? जे स्त्रीला वाटतं? का स्त्रीला असं वाटलंच पाहिजे, असं समाजाला वाटतं! आणि पुरुषांना नटावंसं वाटत नसतं तर पुरुषी कपड्यांचे इतके ब्रॅण्ड्स, त्यांच्यासाठी इतकी सलून्स तयार झाली असती का? आपण छान दिसावं हे कुणालाही वाटू शकतं... यात लिंगाचा काय संबंध? पण छान म्हणजे कसं, याची प्रत्येक धर्म आणि संस्कृतीमध्ये एक व्याख्या तयार झालेली असते अन् त्याबरहुकूम कोणी तयार होत नसेल तर त्याला / तिला सतत समाजाबाहेर केलं जातं.

माझ्या असंख्य मुस्लिम मैत्रिणी आहेत, ज्यांना कुंकू लावायला आवडतं. अनेक हिंदू मैत्रिणी आहेत, त्यांना आवडत नाही. अनेक ख्रिश्चन लग्नं लाल साड्यांमध्ये होतात, मेहंदीसारखे मुस्लिम रिवाज हिंदू लग्नसोहळ्यात पाळले जातात आणि हळदीसारख्या हिंदू चालींनी मुस्लिम लग्नात स्थान मिळवलं आहे. ही सांस्कृतिक देवाणघेवाण आहे. (यात हुंड्यासारख्या कुप्रथा बाकी धर्म स्वीकारत, हेही सत्य आहे). पण बहुतेक चालीरीतींत स्त्रीने काय घालावं, काय घालू नये यावरच खूप चर्चा होत असते. कमी कपडे म्हणजे मॉडर्न आणि पारंपरिक तेच चांगलं अशा घट्ट संकल्पनांमध्ये, अशा विश्वात जगणं खूप अवघड आहे. कपडे ही सोय आहे. अगदी ऑलिम्पिकमध्येही बिकिनीऐवजी शॉर्टस् घालणं सोयीचं आहे हे नॉर्वेजियन बायकांनी दंड भरूनही सिद्ध केलंच की!

जाहिरात ही कुठली तरी वस्तू विकण्यासाठी असते. अनेकदा जाहिरातीत (मालिका-चित्रपटातही) स्त्री स्वतःच एखाद्या वस्तूसारखी दाखवण्यात आलेली असते. मग तिने बुरखा घातलेला असो की बिकिनी, साडी... तिने टिकली लावलेली असो वा नसो याने फरक पडत नाही. मुळात बुरख्यापासून बिकिनीपर्यंतचे अनेक वस्त्राविष्कार, दागिने हे स्त्री-अवयव झाकणं किंवा दाखवणं, अधोरेखित करणं यांसाठी निर्माण झाले आहेत. स्त्रियांनी त्यांच्या सोयीचे कपडे घालावेत, त्यांना वाटत असेल तर बुरखा किंवा बिकिनीही घालावी, पण त्यांना ते कपडे सोयीचे वाटत असतील तर! ही संकल्पना आपल्याकडे अजून रूढ झालेली नाही. स्त्रीच्या शरीराचा आकार स्पष्ट दिसावा, असे कपडे घालणं हे फक्त पुरुषांच्या दृष्टीने सोयीस्कर आहे.

म्हणजे अगदी पाश्चात्य पद्धतीत कॉरेस्ट घालणं (अगदी त्यामुळे श्वास रोखला गेला तरी चालेल) किंवा अजूनही तंग कपडे घालणं, यामध्ये स्त्रीची सोय पाहिली जात नाही आणि स्त्री शरीर झाकलेलं असावं, कारण त्याला बघून कुणाच्या मनात वासना निर्माण होऊ शकते हे त्याचं दुसरं टोक! एकीकडे स्त्री ही लोणच्याच्या बरणीसारखी असते. उघडी टाकली तर तोंडात पाणी येणारच ना, हे या समाजात शिकवलं जातं आणि दुसरीकडे, आहे की समाजात बरोबरी... अजून का लढताय, असले मूर्ख प्रश्न विचारले जातात. हा दुटप्पीपणा आहे फक्त! असे प्रश्न जेव्हा स्त्रिया विचारतात तेव्हा त्याही पितृसत्तेच्या विषवल्लीच आहेत. मुळात पितृसत्ता टिकली, म्हणून तर टिकली टिकली!

beingrasika@gmail.com

loading image
go to top