फुलराण्या बहरण्याची आशा (संजय घारपुरे)

Saina Nehwal
Saina Nehwal

पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल या फुलराण्या यंदा तरी जिंकणार का, असा प्रश्‍न बॅडमिंटन चाहते प्रत्येक स्पर्धेच्या वेळी विचारतात. सिंधू आणि साईनाला उपांत्य फेरीत हार पत्करावी लागली, तरी प्रश्‍न उपस्थित केला जातो. आता सिंधू आणि साईना खेळत असलेल्या बहुतेक स्पर्धांचा दर्जा कमालीचा उच्च असतो. त्यात सातत्यानं कोणालाच यश मिळत नाही, तरीही या दोघींकडून विशेषतः सिंधूकडून प्रत्येक स्पर्धेत भारतीयांना विजेतेपद हवं असतं. आपले खेळाडू महत्त्वाच्या लढतीत नांगी टाकतात, हे त्यांच्याबाबत म्हटलं जातं, हे खरंच कितपत योग्य आहे? आपण प्रत्येक स्पर्धेतल्या कामगिरीस, त्यातल्या विजेतेपदास सारखंच महत्त्व देतो ही आपली चूक नाही का, याचाही आपण विचार करायला हवा. 

पी. व्ही. सिंधू ही जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पदक जिंकलेली पहिली भारतीय! तिनं ही कामगिरी सन 2014 च्या स्पर्धेत केली होती. त्यावेळी तिचं कमालीचं कौतुक झालं; पण त्यापूर्वीच तिनं एकच ग्रॅं. प्रि. गोल्ड स्पर्धा जिंकली होती. एवढंच कशाला, या जागतिक ब्रॉंझपूर्वी तिला चार सुपर सिरीज स्पर्धांत पहिल्या फेरीत हार पत्करावी लागली होती, तर 2016 च्या ऑलिंपिक स्पर्धेतील रौप्यपदकापूर्वी पंधरा स्पर्धात ती उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच पराभूत झाली होती. सन 2017 च्या जागतिक स्पर्धेपूर्वी ती सहा स्पर्धांत उपांत्यपूर्व फेरीत पराजित झाली होती. फार दूरही जायला नको. गेल्या वर्षी भारतीयांसाठी चार स्पर्धा महत्त्वाच्या होत्या. राष्ट्रकुल; तसंच आशियाई क्रीडा या स्पर्धांबरोबरच जागतिक स्पर्धेत रौप्य आणि सिंधू संपत चालली अशी हाकारी देणाऱ्यांची तोंडं बंद करणारं वर्ल्ड टूर फायनल्सचं विजेतेपद. आता आपल्याला जागतिक, ऑलिंपिक स्पर्धेतलं यश हवं, की अन्य स्पर्धांतली कामगिरी हे आपण ठरवायला हवं. खरं तर सिंधूला आपलं लक्ष्य काय आहे ते माहीत आहे. जागतिक; तसंच ऑलिंपिकसारख्या महत्त्वाच्या स्पर्धांत सर्वोत्तम कामगिरी कशी होईल, याकरिता जगभरातले खेळाडू अनेक तज्ज्ञांबरोबर चर्चा करून आपला सर्व कार्यक्रम ठरवतात; पण सिंधू ते साध्य करत आहे. हे तिच्या स्पर्धक असलेल्या चिनी किंवा जपानी खेळाडूंना जमलेलं नाही आणि ते सिंधू करत आहे तरी 'चायनीज ड्रॅगन' आणि 'जापनीज रोडब्लॉक' हे शब्द तिच्या पराभवानंतर वापरले जातात. 

फिटनेसचा प्रश्न नाही 
सिंधूची कामगिरी गेले काही दिवस काहीशी खालावलेली दिसत आहे, तिचे पराभव काहीशी चिंता करणारे असले, तरी महत्त्वाच्या स्पर्धांत सर्वोत्तम कामगिरी करण्याचं कसब तिनं साधलं आहे. गेल्या वर्षी चार महत्त्वाच्या स्पर्धांत सर्वोत्तम कामगिरी आपल्याला हवी होती. ती तिनं साध्य केली. हे नक्कीच सुखावणारं चित्र आहे. तिच्यासमोर फिटनेसचा प्रश्न क्वचितच असतो. तिनं आक्रमकता वाढवली, तसंच खेळातला काही वेळा दिसणारा एकसुरीपणा कमी केला, तर तिला अजून जास्त यश मिळेल. महत्त्वाच्या स्पर्धेत यशस्वी होण्याची तिची क्षमता, कौशल्य बघितल्यास सध्या तरी चिंता वाटत नाही. एखाद्या महत्त्वाच्या स्पर्धेत ती अपयशी ठरली, तरच तिच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करणं योग्य होईल, असं नामवंत मार्गदर्शक विमलकुमार यांनी 'सकाळ'शी बोलताना स्पष्ट केलं. 

एकाग्रता साधायला हवी 
विमलकुमार यांचा मुद्दा स्पष्ट करणारा आहे. सिंधू 2013 च्या ऑगस्टमध्ये पहिल्यांदा जागतिक क्रमवारीत पहिल्या दहा खेळाडूंत आली. तिनं सहभागी झालेल्या पाचपैकी चार जागतिक स्पर्धांत पदकं जिंकली, त्याचबरोबर रिओ ऑलिंपिकची ती उपविजेती होती. खरं तर यंदा सिंधूचंही लक्ष्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांत चांगली कामगिरी करून उच्च मानांकन राखण्याचं आहे, ज्याद्वारे ऑलिंपिक पात्रता लवकरात लवकर निश्‍चित होईल. या वर्षाच्या सुरवातीस राष्ट्रीय मार्गदर्शक पुल्लेला गोपीचंद यांनी याकडंच लक्ष वेधलं होतं. ऑलिंपिक पात्रतेच्या कालावधीत प्रभावी कामगिरी सुरवातीस झाल्यास अंतिम टप्प्यात फारसं दडपण येत नाही. आता एकाच वेळी खूप काही घडत असल्यानं सिंधूचं लक्ष काहीसं विचलीत झालं आहे. 

बदललेलं क्रीडा साहित्य 
नामवंत मार्गदर्शक उदय पवार एका गोष्टीकडं लक्ष वेधतात. ''सिंधूनं गेल्या वर्षाच्या अखेरीस लि निंगबरोबर करार केला आहे. त्यामुळे ती आता त्यांचं क्रीडा साहित्य वापरणार आहे. इतकी वर्षं सवय असलेल्या योनेक्‍सऐवजी ली निंगबरोबर थेट जुळवून घेणं त्रासदायक असतं. राष्ट्रीय स्पर्धा; तसंच ऑल इंग्लंड स्पर्धा बघितलीत, तर त्या दोन्ही स्पर्धांच्या वेळी ती काहीशी अस्वस्थ दिसत होती. त्याच्याशी पूर्ण जुळवून घेण्यास वेळ लागतो. तोच घडत आहे. त्याचमुळं सिंधूच्या अपयशाची चिंता नाही, कारण महत्त्वाच्या स्पर्धेत यश मिळवण्याची तिची हातोटी मी जाणतो. मला चिंता एका वेगळ्याच गोष्टीची आहे. यंदाचे सहापैकी पाच पराभव दोन गेम्समधले आहेत. त्यातल्या गमावलेल्या गेम्समधले कमी गुण चिंता वाढवतात. त्यात ती दोन गेम्समध्ये सातच गुण जिंकली आहे. सिंधू नक्कीच मार्गदर्शकांसोबत याची चर्चा करत असेल आणि त्यावर मात महत्त्वाची आहे. अर्थात आपण तिच्याकडून प्रत्येक स्पर्धेत यशाची अपेक्षा बाळगणंही चुकीचं आहे; पण त्याची तिला आता सवय झाली असणार, त्यामुळे मी तो मुद्दा जास्त महत्त्वाचा मानणार नाही,'' अशा शब्दांत उदय पवार यांनी सिंधूच्या कामगिरीचं विस्लेषण केलं. 

पुरुष खेळाडूंवरही लक्ष हवे 
उदय पवार यांनी आणखी एका वेगळ्याच मुद्द्याकडं लक्ष वेधलं. ''सिंधू भारतीय बॅडमिंटनसाठी महत्त्वाची आहे; पण ती म्हणजेच भारतीय बॅडमिंटन नव्हे. तिच्यापेक्षाही पुरुष एकेरीतले किदांबी श्रीकांत, साई प्रणित, एच. एस. प्रणॉय, पारपली कश्‍यप यांचं अपयश सलत आहे. इंडोनेशियाचे मूल्यो हांदोयो यांनी गेल्या वर्षाच्या सुरवातीस राजीनामा दिला आणि भारतीयांची कामगिरी बघा. श्रीकांतचं जागतिक क्रमवारीतलं अग्रस्थान इतिहास वाटत आहे. एच. एस. प्रणॉय आणि साई प्रणीत यांच्यातली अंतिम लढत फार वर्षांपूर्वी झाली असं वाटत आहे. त्यांची पिछेहाट जास्त चिंताजनक वाटत आहे. श्रीकांत तर जास्तच मागं पडत आहे. आपण सिंधू, साईनाच्या अपयशाची चर्चा करण्यापेक्षा पुरुष एकेरीतल्या अपयशावर काय उपाय करता येतील याकडं लक्ष द्यायला हवं. साईनाचं वाढतं वय, तिच्या दुखापती, तिचं आजारपण बघितलं, तर ती देत असलेलं आव्हानही कौतुकास्पद वाटतं,'' असं ते म्हणाले. 

साईनाची जिगर प्रेरणादायी 
साईनाबाबत चर्चा सुरू झाल्यावर बॅडमिंटनचं अभ्यासक, ती 29 वर्षांची आहे याकडं लक्ष वेधतात. एवढ्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर खेळत राहणं हेच तिच्यासाठी खूप आहे. त्यातही तिनं गेल्या वर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, तर जागतिक स्पर्धेत ब्रॉंझ जिंकलं. कमालीचा थकवणारा; तसंच तंदुरुस्तीचा कस पाहणाऱ्या या खेळात ती अजून टिकाव धरून आहे. जगात अव्वल दहात आहे, हेच तिच्यासाठी महत्त्वाचं आहे. जागतिक स्तरावरचे अव्वल खेळाडू अजूनही तिच्याविरुद्धचा विजय गृहीत धरत नाहीत, हेच तिचं यश आहे. 

साईना आता न्यूझीलंड ओपनमध्ये जागतिक क्रमवारीत 212 व्या खेळाडूविरुद्ध पराजित झाली असं म्हणून तुम्ही तिच्यावर टीका करता; पण ती खेळाडू चीनची होती हे लक्षात घ्यायला हवं. चीनमध्ये देशांतर्गत विजेतेपदासाठी सुरवातीच्या काही फेऱ्यांनंतर कमालीची चुरस असते, मग तिथले किती खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत येणार. ज्या येतात, त्या एकमेकांच्या तोडीच्या असतात. आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळत नसल्यामुळं त्यांचं जागतिक मानांकन खूपच कमी असतं हे आवर्जून लक्षात घ्यायला हवं. केवळ मानांकनच खेळाडूचा दर्जा ठरवत नाही, हे आपण कधी लक्षात घेणार आहोत? आपण फक्त विजेतेपदच म्हणजे सर्व काही हा विचार कधी बदलणार? उपांत्यपूर्व फेरीत पराभव होतो, त्यावेळी पदक एकच विजय दूर असते, हेही लक्षात घ्यायला हवं. 

सिंधूनं आनंद घ्यायला हवा 
सिंधूच्या कामगिरीबाबत नक्कीच चिंता आहे; पण तीही थोडी फार. आता एक प्रकारे बोलायचं झाले, तर ती एका बदलातून जात आहे, याकडे बॅडमिंटन अभ्यासक लक्ष वेधतात. गेल्या काही स्पर्धांत तिच्या चेहऱ्यावरचं हसू लुप्त झालं आहे, इकडे ते लक्ष वेधतात. निकाल काहीही असला, तरी तिच्या चेहऱ्यावर हसू दिसायचंच. ती खेळाचा खरा आनंद घेत असे. आता ते क्वचितच दिसतं. कधीकधी ते सक्तीनं आणल्याचंही दिसतं. 

केवळ हेच एक कारण नाही. यंदापासून तिच्या सरावाची जागाही बदलली आहे. गेल्या वर्षी ती गोपीचंद यांच्याबरोबर एकटीच सराव करीत होती. आता ती परदेशी मार्गदर्शकांसह राष्ट्रीय खेळाडूंबरोबर एकत्रित सराव करत आहे. आता या सगळ्या गोष्टीबरोबर एकाच वेळी जुळवून घेणं सोपं नसतं. आता यात सातत्यानं असलेल्या विजेतेपदाच्या अपेक्षाही आहेत. आता सुरवातीपासून 'हॅप्पी गो लकी' असलेल्या, 'सरावाच्या वेळी कसून सराव आणि ब्रेकच्या वेळी पूर्ण ब्रेक, मित्र-मैत्रिणींसोबत पूर्ण धमाल' असं करणाऱ्या सिंधूच्या चेहऱ्यावर ताण जाणवत आहे. आता यातून बाहेर पडण्यासाठी तिला एक विजेतेपद हवं आहे. इंडिया ओपन स्पर्धेद्वारे तिचा विजेतेपदाचा दुष्काळ संपणार असं वाटतही होतं; पण त्यावेळी प्रतिकूल ड्रिफ्टमुळं (वातानुकूलित यंत्रणेमुळे असणारी वाऱ्याची दिशा आणि त्यामुळं शटलची गती; तसंच दिशेत होणारा बदल) तिच्याकडून विजेतेपद निसटलं. आता तिनंच उंचावलेला मूलभूत दर्जा, यशाचा आलेख राखणं तिला अवघड जात आहे. आता विमलकुमार यांच्या शब्दात सांगायचं, तर केवळ अपयशातूनच ती शिकत नाही, तर विजेतेपद जिंकल्यावरही आपण कुठं कमी पडलो का याचा अभ्यास करणारी ती खेळाडू आहे. जागतिक स्पर्धा होईपर्यंत तिच्या कामगिरीची तरी चिंता नाही. 

हाच दिलासा सिंधूनं द्यावा हीच अपेक्षा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com