वंध्यत्वावर बोलू काही!

infertility
infertility


ऋतुरंगाचे आसुसलेले पर्व असे
नयनी एक स्वप्न वसे
तान्हुल्या बाळाचे ते स्वप्न दिसे
ओढ ही मातृत्वाची
एक आशा अजुनी असे
मायाला एक गोड मुलगी झाली. मायाच्या नणंद, जयाताई पेढे घेऊन डॉक्‍टर्सरूममध्ये मला भेटायला आल्या. हातात पेढ्याचा पुडा देत "डॉक्‍टर, थॅंक्‍स' एवढंच म्हणाल्या. मी म्हटलं "जयाताई, मी डॉक्‍टर म्हणून फक्त उपचार केले, पण खरं बक्षीस तर तुम्हालाच मिळायला हवं.' जयाताई म्हणाल्या, "आपलं कर्तव्यच आहे'. पण, पुढे त्यांना बोलवेना व त्या पटकन बाहेर निघून गेल्या. मला आठवले, गेली दोन तीन वर्षे त्यांनी त्यांच्या भावजयीबरोबर वंध्यत्व-गरोदरपण ते बाळंतपण असा कठीण प्रवास स्वत:चे मोठे खटल्याचे घर सांभाळून केला होता. दोघीही नणंदा-भावजया नागपूरपासून तीस कि. मी. असलेल्या वेगवेगळ्या छोट्या गावात राहत होत्या. जयाताईंचा भाऊ दारूमुळे पूर्ण वाया गेला होता. मायाला, माहेर, सासर व पती कुणाचेही पाठबळ नसताना जयाताई अगदी सावलीसारख्या खंबीरपणे तिच्या पाठीशी होत्या. वेळप्रसंगी स्वत:च्या पदरचे पैसेही खर्च करायच्या. कारण वंध्यत्वाची समस्या असल्यामुळे, मायाला सासरी खूप त्रास होता. आणि शेवटी आज यश मिळालं होतं. खऱ्या अर्थाने एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला पाठिंबा देऊन महिला आरोग्य सबलीकरणाचा एक महत्त्वाचा संदेश नकळत सगळ्यांना दिला होता.
राकेश व रीमा, वय 32 व 30 वर्षे, दोघेही आज अगदी वेळ काढून आले होते. दोघेही आपापल्या व्यवसायात कार्यरत. लग्न होऊन तीन वर्षे झाली. थोडेफार उपचार पण झाले, पण अजून गुड न्यूज पदरात पडत नव्हती. रीमाचा आता धीर सुटत चालला होता. "डॉक्‍टर, याबद्दल जरा सविस्तर सांगाल काय?' मला बाळ होणार की नाही?
वंध्यत्व हा असा प्रश्‍न आहे की शारीरिक समस्येबरोबर मानसिकदृष्ट्या पण पेशंट खूप अस्वस्थ असतो. तसेच कौटुंबिक, सामाजिक तणाव पण त्यात सामील होतात. आजच्या काळात वंध्यत्व ही जागतिक समस्या झाली आहे. आणि वरचेवर याचे प्रमाण वाढत आहे. वंध्यत्वाचे प्रमाण सरासरी 15 टक्के आहे.
एखाद्या जोडप्याला वंध्यत्व आहे असे आपण केव्हा म्हणतो?
ज्या जोडप्याला लग्न झाल्यानंतर कुठलेही कुटुंब नियोजनाचे साधन न वापरता वर्षभरात जर मूल होत नसेल तर त्या जोडप्याला वंध्यत्व आहे असे म्हणतात.
वंध्यत्वाची कारणे :
वंध्यत्वामध्ये स्त्री व पुरुष दोघेही समप्रमाणात कारणीभूत असतात. त्यामुळे वंध्यत्वाच्या तपासण्यांची सुरुवात पती-पत्नी अशी बरोबरच सुरू होते.
स्त्री वंध्यत्व :-
1) अंडकोषातील दोष :- 25-30 टक्के वंध्यत्व, अंडकोषातील दोषांमुळे येते. गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला एक असे दोन अंडकोष असतात. साधारणपणे दर महिन्याला दोन्हीपैकी एका अंडकोषातून एक स्त्रीबीज परिपक्व होत असते. ही प्रक्रिया बऱ्याच स्त्रियांमध्ये व्यवस्थित होत नाही. उदा. पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोममध्ये स्त्रीबीजे जास्त प्रमाणात असतात पण परिपक्वच होत नाहीत.
काही स्त्रियांमध्ये जर वय तिशीच्या पुढे असेल तर स्त्रीबीज बनण्याची क्षमता कमी होते. तसेच उशिरा लग्न व गर्भधारणा लांबवणे, चुकीची जीवनशैली यामुळे होणारे अंडकोषातील बदल वंध्यत्वाचे कारण बनतात. त्यामुळे तिशीच्या आत एक तरी मूल होऊ देणे जरूरी आहे.
2) बीजनलिका :- गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला दोन बीजनलिका असतात. प्रजनन, फलनाचे महत्त्वाचे कार्य बीजनलिकेत होते. बीजनलिका अतिशय नाजूक असते. वेगवेगळ्या जंतूंच्या उपसर्गामुळे तसेच इतर काही कारणांमुळे कमी जास्त प्रमाणात बीजनलिका खराब होते. यामुळे प्रजनन प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. भारतात क्षयरोग (TB) हे एक महत्त्वाचे कारण आहे.
3) गर्भाशय :- गर्भाशयाच्या आवरणातील गाठी, गर्भाशयातील जन्मजात दोष, जंतूंची लागण तसेच गर्भपात (झालेले किंवा करवलेले) अशी अनेक कारणे गर्भधारणा गर्भाशयात स्थापित होण्यास अडथळे आणतात.
4) एण्डोमेट्रीऑसिस :- यामध्ये गर्भाशयातील अंतर्भितीवर असलेल्या पेशी त्यांची जागा सोडून इतरत्र जातात व या पेशी स्त्री हार्मोन्सना प्रतिसाद देतात व त्यामुळे वेगवेगळ्या समस्या तयार होतात.
5) हार्मोन्समध्ये असंतुलन, ताणतणाव
6) इतर अनेक कारणे
पुरुष वंध्यत्व :-
पुरुषांमध्येदेखील जननेंद्रियाचे दोष, हार्मोन्सचे असंतुलन, काही आजार अशी अनेक कारणे आहेत. आजच्या काळात, ताणतणाव, व्यसने अशा अनेक कारणांमुळे पुरुष वंध्यत्वाचे प्रमाण वाढत आहे. बऱ्याच ठिकाणी पती-पत्नी वेगवेगळ्या गावात नोकरीसाठी राहतात. सध्याचं आयुष्यच खूप वेगवान झालं आहे. स्पर्धा, करिअर यामध्ये दोघेही भरडले जात आहेत.
वंध्यत्वाचे उपचार :-
आम्ही क्‍लिनिकमध्ये पुरुषाची व स्त्रीची पूर्ण तपासणी करतो.
1. यामध्ये दोघांचे वय, व्यवसाय अशा बऱ्याच वैयक्तिक गोष्टींची माहिती व शारीरिक तपासणी करावी लागते.
2. त्यानंतरचा भाग असतो रक्त, लघवी व पुरुषांमध्ये वीर्य तपासणी. कधी कधी विशेष हार्मोन्सची जरूरीप्रमाणे तपासणी केली जाते.
3. त्यानंतर स्त्रियांच्या गर्भाशयाची, बीजनलिका, अंडाशय वगैरे भागांची तपासणी सोनोग्राफी, लॅपरोस्कोपीद्वारे केली जाते.
1) सोनोग्राफी : सोनोग्राफीद्वारे गर्भाशय, अंडाशय, बीजनलिका (Fallopian Tubes) यांची पूर्णपणे तपासणी केली जाते. त्यानंतर Ovulation study (स्त्री बीजांची वाढ) पाळीच्या 8 व्या ते 10 व्या दिवसापासून केली जाते. जवळपास सलग पाच ते सहा दिवस रोज किंवा एक दिवसाआड सोनोग्राफी केली जाते. कधी अंडाशयातील पुटकांची वाढ बरोबर होत नसते व स्त्रीबीज पुटकांतून बाहेर पडत नाही. हा दोष औषधांद्वारे दूर करता येतो. कधी कधी हार्मोन्सच्या इंजेक्‍शनची पण गरज भासू शकते. या सर्व गोष्टींमध्ये अतिशय नियमितता लागते.
2) बीजनलिकेची तपासणी : गर्भाशयाला दोन्ही बाजूला दोन नलिका असतात. अंडकोषात तयार झालेले स्त्रीबीज झेलून आत घेणे, फलन आणि तयार झालेले गर्भ वाहून परत गर्भाशयामध्ये आणणे हे महत्त्वाचे काम ते करतात. या नलिकांची तपासणी करण्यासाठी हिस्टेरोसालपिंगोग्राफी, सोनोसालपिंगोग्राफी व दुर्बीणचा वापर करतात.
अ) हिस्टेरोसालपिंगोग्राफी : यामध्ये रेडिओओपेक द्रव्य हे गर्भाशयात टाकले जाते व त्याचवेळेस त्याचे एक्‍स-रे काढले जाते. यावरून आपल्याला या नलिकांविषयीची, गर्भाशयाची माहिती मिळते.
ब) सोनोसालपिंगोग्राफी :- यामध्ये पण गर्भाशयात कॅथेटरद्वारे द्रव्य टाकून सोनोग्राफीवर नलिका पाहिल्या जातात.
क) संचंतवेबवचल (दुर्बीणद्वारे तपासणी) :- यामध्ये पेशंटला भूल देऊन पोटातील अवयवांची तपासणी केली जाते. गर्भाशय गर्भनलिका, अंडकोष या सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत का किंवा आजूबाजूला, कुठे चिटकलेल्या आहेत नाही हे पाहिले जाते.
जसे दोष असतील त्याप्रमाणे त्याचवेळी दुर्बिणीद्वारे उपचार केले जातात.
ड) हिस्टेरोस्कोपी म्हणजेच दुर्बीणद्वारे गर्भाशयाच्या अंतर्भागाची तपासणी.
यामध्ये गर्भाशयाच्या पोकळीतील गाठी काढणे, गर्भाशयाची पोकळी चिटकलेली असेल तर ती मोकळी करणे अशा अनेक समस्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीने उपचार उपलब्ध आहेत.
इतक्‍या या टेस्ट करून बऱ्याच वेळेला काही फरक लक्षात नाही आला तर आणखी काही टेस्ट असतातच. प्रत्येक पेशंटला वेगवेगळे त्रास असतात. त्याप्रमाणे उपचारांचा कल तिकडे झुकतो.
पुढील लेखात बघु कुतूहल जागवणारा आजार :- एण्डोमेट्रीऑसिस
स्त्री-पुरुष दोघे जन्माचे साथीदार
सुख-दु:खात दोघे भागीदार
वंध्यत्वासाठी समप्रमाणात जबाबदार
कारणमीमांसा मिळून करा, व्हा समजूतदार  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com