#InnovativeMinds 'जागरा'मुळे इनोव्हेशन्सची संख्या वाढणारच ! 

#InnovativeMinds 'जागरा'मुळे इनोव्हेशन्सची संख्या वाढणारच ! 

"जागर नवकल्पनांचा' या नवरात्रीमध्ये चालविलेल्या मालिकेला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. अनेकांनी त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या व अनेक प्रश्‍नही विचारले. देशातील तंत्रकुशल युवकांना इनोव्हेशनच्या दिशेने नेणे आणि त्याद्वारे त्यांनी देशासमोरील समस्या सोडविणे, हा या मालिकेचा उद्देश होता व तो यशस्वीही झाला. विविध माध्यमांतून वाचकांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे देण्याचा हा प्रयत्न... 

प्रश्‍न ः आपल्या शिक्षण व्यवस्थेत "आउट ऑफ द बॉक्‍स' थिंकिंगला स्थान नाही. मळलेल्या वाटेवरून चालत राहण्याशिवाय विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पर्याय ठेवलेला नाही. या अडथळ्यांवर उपाय काय? 

ः मुलांनी आउट ऑफ बॉक्‍स विचार करण्यासाठी आम्ही हॅकेथॉन, आयडिया कॉम्पिटीशनसारख्या कल्पना राबवत आहोत. यामधून विद्यार्थी समस्यांशी जोडले जातात व त्यातून नवकल्पनांना चालना मिळते. शिक्षकही या सर्वांशी जोडले गेल्याने त्यांना लक्षात येतं, की नवीन कल्पनांचे स्वागत करायला हवे. प्रत्येक शाळा, महाविद्यालयात "आयडिया कॉम्पिटीशन' राबविली पाहिजे व त्यातील कल्पनांचे एखाद्या उत्पादनामध्ये रूपांतर करण्याचा विचार केला पाहिजे. सध्या प्रशासनही यासाठी योजना आणत आहे. अटल टिंकरिंग योजना हीदेखील त्यातील एक. बहुतांश शाळांमध्ये टिंकरिंग लॅब सुरू झाल्या आहेत. या लॅबमुळे मुलांना कल्पनांशी खेळता येते. 

प्रश्‍न ः शिक्षणक्षेत्रात मूल्यांकन करणाऱ्या व्यक्ती शिक्षण क्षेत्रातीलच असतात व त्यांनी व्यावहारिक जग पाहिलेले नसते. त्यामुळे त्यांच्या एक्‍सलन्सच्या कल्पना खुरटलेल्याच असतात, यावर उपाय काय? 

ः "हाउ टू ट्रेन द ट्रेनर' या विषयावर सध्या आमचे काम सुरू आहे. शिक्षकांचा दर्जा वाढवल्यावर मूल्यांकनातही फरक पडेल. शिक्षकांना एक दृष्टिकोन देण्याची गरज आहे. किंबहुना त्यांच्या कक्षा रुदांवण्याची गरज आहे. यावर एमएचआरडीएमध्ये प्रयत्न सुरू आहेत. लवकरच याबाबत तुम्हाला एखादा कार्यक्रम आखलेला पाहायला मिळेल. 

प्रश्‍न ः सर्व प्रकारच्या इनोव्हेशन्सना एकाच व्यासपीठावर संधी मिळाली पाहिजे. त्यावर स्वतःचे इनोव्हेशन नोंदविण्यासाठी सोय हवी आणि सर्वोत्तम कल्पनेला प्रॅक्‍टिकल प्रतिसाद कसा मिळेल, याची व्यवस्थाही हवी. ही व्यवस्था कोण, कशी आणि कधी निर्माण करणार? 

ः आम्ही असे व्यासपीठ तयार करीत आहोत, जिथे सर्वांना त्यांच्या कल्पना सादर करता येतील. इतरांना त्यावर प्रतिक्रियाही देता येतील, टीका करता येईल किंवा त्यांच्या नवकल्पना त्याला जोडता येतील. पुढील चार ते पाच महिन्यांतच हे व्यासपीठ कार्यरत होईल. 

प्रश्‍न ः आपले इनोव्हेशन पैसे वाचवण्यासाठी दिसते. अमेरिकेत ते पैसे कमावण्यासाठी असते, हा विचार समाजात रुजवायचा कसा? 

ः आपण देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचा विचार जरी रुजवू शकलो, तरी चांगल्या संकल्पना यायला लागतील आणि त्यामधून आपण देशासाठी निधी तयार करू शकू. 

प्रश्‍न ः "ऍस्पायरिंग माइंड्‌स' या व्यावसायिक संस्थेच्या पाहणीनुसार 20 टक्‍क्‍यांहून कमी पदवीधर नोकरी देण्यालायक असतात. व्यवस्थेला या 80 टक्के नोकरी न मिळवू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची जबाबदारी घेणे क्रमप्राप्तच आहे. ही जबाबदारी कोण, कधी घेणार आणि त्यावर मार्ग कोण काढणार? 

ः यासाठी आवश्‍यक असलेले बदल, योजना यांमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या वर्षी एआयसीटीने आभ्यासक्रमात काही बदल करण्याचे प्रयत्न केले. विद्यार्थ्यांना इंटर्नशिप अनिवार्य केली. यातून विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये काय बदल चालू आहेत, काम कसे चालते, कोणत्या कौशल्याची मागणी आहे, हे कळेल. 

प्रश्‍न ः काही तज्ज्ञांनी आपापल्या क्षेत्रातील ज्ञानाचा फायदा करून देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांनी नेमके कसे काम केले पाहिजे? 

ः आपल्याकडे एका बाजूला तरुण संशोधकांना मार्गदर्शनाची मोठी गरज आहे. असे मार्गदर्शन देऊ इच्छिणाऱ्यांना माझी अशी विनंती आहे, की त्या सर्वांनी महाविद्यालयातील इन्क्‍युबेशन सेंटरशी जोडले जावे. तेथे मुले स्टार्टअपसाठी प्रयत्न करत असतात, त्यांना या ज्ञानाचा निश्‍चित फायदा होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com