राकट देशा, कणखर देशा, "पेटंट'च्याही देशा ! (जागतिक बौद्धिक संपदा दिन विशेष )

स्वप्नील जोगी
बुधवार, 26 एप्रिल 2017

नव्या पेटंट नोंदणीत देशात महाराष्ट्र आघाडीवर; "डिजिटल इंडिया'मुळे नोंदणीही वेगात 

नव्या पेटंट नोंदणीत देशात महाराष्ट्र आघाडीवर; "डिजिटल इंडिया'मुळे नोंदणीही वेगात 

पुणे : एरवी चटकन कुणाचंही लक्ष जाणार नाही अशा बौद्धिक संपदेच्या (इंटलेक्‍च्युअल प्रॉपर्टी) क्षेत्रातही "डिजिटल इंडिया'ने आता वेग धरला आहे. विविध संशोधनांचे पेटंट नोंदविण्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 टक्‍क्‍यांनी वाढ झाली असून, त्यांपैकी तब्बल ऐंशी टक्के पेटंट हे ऑनलाइन नोंदवले गेले आहेत. विशेष म्हणजे, पेटंटच्या संख्येत महाराष्ट्राने देशपातळीवर आघाडी घेतल्याची शुभवार्ता आहे! 
"इंटलेक्‍च्युअल प्रॉपर्टी इंडिया' या राष्ट्रीय संस्थेने नुकत्याच जाहीर केलेल्या 2015-16 या वर्षीच्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संपदा व्यवस्थापन संस्थेने दिलेल्या माहितीचाही यात समावेश आहे. देशात आघाडी नोंदवतानाच, गेल्या वर्षीच्या आपल्याच नोंदणीत महाराष्ट्राने यंदा 14 टक्‍क्‍यांची वाढ दाखवत पेटंटचा आकडा 3654 पर्यंत गाठला आहे. 
 

या संशोधनांची आघाडी : संरक्षण, मूलभूत विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधन ही तीन क्षेत्रे पेटंट मिळवण्यात गतवर्षी आघाडीवर आहेत. या क्षेत्रांनी मिळून देशात तब्बल 200 पेटंट प्राप्त केले आहेत. पैकी 113 पेटंट हे फक्त कौन्सिल ऑफ सायंटिफिक ऍण्ड इंडस्ट्रिअल रिसर्च (सीएसआयआर) या संस्थेने मिळवले आहेत. तर, परदेशी कंपन्यांमध्ये प्रामुख्याने इलेक्‍ट्रॉनिक क्षेत्रातील पेटंट मिळविण्याची संख्या अधिक आहे. 

स्टार्ट-अप साठी खुशखबर ! 
स्टार्ट-अप कंपन्यांच्या बौद्धिक संपदेचे संरक्षण करण्याच्या संदर्भात केंद्र सरकारने विशेषार्थाने सुरू केलेल्या "स्टार्ट-अप इंटलेक्‍च्युअल प्रॉपर्टी प्रोटेक्‍शन' या योजनेचा कालावधी नुकताच तीन वर्षांसाठी वाढवण्यात आला आहे. नव्या स्टार्ट-अपना अधिक प्रोत्साहन मिळावे आणि बौद्धिक संपदेच्या क्षेत्रात अधिक भरीव काम व्हावे, म्हणून ही योजना आता 2020 च्या मार्च अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. 

काय आहे "इंटलेक्‍च्युअल प्रॉपर्टी' ? 
इंटलेक्‍च्युअल प्रॉपर्टी अर्थात, बौद्धिक संपदा म्हणजे बुद्धिरूपातील संपत्ती ! जसा आपला आपल्या वस्तूंवर, मालमत्तेवर हक्क असतो, तसाच हक्क हा बुद्धिमत्तेने निर्मिलेल्या गोष्टींवर देखील असावा, या हेतूने जगभरात जी "बौद्धिक संपदा आणि तिचे स्वामित्व' या गोष्टीची चळवळ निर्माण झाली, ती आहे इंटलेक्‍च्युअल प्रॉपर्टी राइट्‌स मूव्हमेंट. आजघडीला अनेक हस्तलिखिते, डिझाईन्स, नव्याने निर्मिलेले तंत्रज्ञान, वस्तूंचे आकार, नवे संशोधन, कल्पना... अशा अनेक गोष्टी या बौद्धिक संपदेच्या आधारावर तयार झालेल्या गोष्टी म्हणून ओळखल्या जातात. पेटंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क अशा कायद्यांनी ते संरक्षित केले जातात. 
 

Web Title: intellectual property copyrights day