विनोद खन्ना : उमदा माणूस

Vinod Khanna
Vinod Khanna

'लोकप्रतिनिधित्वाच्या माध्यमातून पंजाबमधील जनतेच्या समस्या सोडविण्यावर आता माझा भर राहील. अर्थात, त्यामुळे चंदेरी दुनियेतून काही मी एक्‍झिट घेणार नाही. विविधरंगी भूमिका करून रसिकांचीही मने मी तृप्त करीन. चांगली भूमिका असेल, तर अभिताभ बच्चनसमवेत काम करण्याची आजही माझी तयारी आहे..' 

मर्दानगी आणि मार्दवतेचा अनोखा संगम असलेल्या व्यक्तिमत्त्वामुळे खलनायकाच्या भूमिकेतून नायकाच्या भूमिकेपर्यंत पोचलेला, कसदार अभिनयामुळे 'सुपरस्टार'पदासाठी थेट अमिताभशी टक्कर देणारा, यशाच्या शिखरावर असताना रुपेरी पडद्याला रामराम ठोकून अज्ञातवासात जाणारा, पाच वर्षांच्या खंडानंतर केलेल्या पुनरागमनानंतरही चंदेरी दुनियातील स्थान अबाधित राखलेला आणि सलग दुसऱ्यांदा खासदारपदावर विराजमान झालेला विनोद खन्ना आपले मनोगत व्यक्त करीत होता. 

हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या बत्तीस वर्षांत विनोदने आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे. रुबाबदार व्यक्तिमत्वामुळे व सहजसुंदर अभिनयामुळे त्याच्या चाहत्यांचा वर्ग मोठा आहे. 1968 ला 'मन का मीत' चित्रपटातून त्याची कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर 'मेरा गाव मेरा देश', 'रेश्‍मा और शेरा', 'अनोखी अदा' अशा चित्रपटांतील खलनायकाच्या सशक्त भूमिकेमुळे रसिकांचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले. नामवंत दिग्दर्शक गुलजार यांनी त्याच्यातील कलागुण हेरले. त्यांनी 'मेरे अपने' या चित्रपटातून त्याला नायकाच्या भूमिकेत सादर केले. बेरोजगारीमुळे गुन्हेगारीकडे ओढल्या जाणाऱ्या तरुणांची फरपट हा अतिशय वेगळा विषय गुलजार यांनी या चित्रपटाद्वारे 1971 मध्ये रसिकांसमोर मांडला. देखण्या विनोदच्या संवेदनशील, सहजसुंदर अभिनयामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट भावला. 'कोई होता जिसको अपना' गुणगुणणारा विनोद प्रेक्षकांच्या हृदयात जाऊन बसला. रसिकांच्या मनातील ते स्थान आज पन्नाशी उलटल्यानंतरही कायम ठेवण्यात विनोद यशस्वी ठरला आहे. 

पुण्यातील मुक्कामात त्याच्याशी संवाद साधला. कोणतेही आढेवेढे न घेता चित्रपटसृष्टीतील आणि राजकारणातील आगामी भूमिका, वीरप्पनच्या कारवाया, 'ओशो कम्युन'मधील वाद अशा अनेक विषयांवर त्याच्याशी दिलखुलास गप्पांची मैफल जमली. 

मृदू आवाजात, संथ लयीत तो बोलत होता. 'माझी चित्रपट कारकीर्द माझ्या दृष्टीनं तरी यशस्वी ठरली. खलनायकीतून नायकाकडे अशा प्रवासानंतर मी रुपेरी दुनियातील सर्वोच्च स्थानी पोचलो. मात्र, मोक्‍याच्या वेळी काही कारणांमुळे मला चित्रपटसृष्टीकडे पाठ फिरवावी लागली. मात्र, पुनरागमनानंतरही रसिकांनी प्रेमपूर्वक माझे स्वागत केले. विजनवासाचा कोणताही परिणाम माझ्यावर झाला नाही. तब्बल दीडशे चित्रपटही केले. गुलजार, महेश भट, यश चोप्रा, मुकुल आनंद, चेतन आनंद, के. सी. बोकाडिया, मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा आदी नामवंत दिग्दर्शकांसमवेत काम केले. अरुणा राजे यांचा 'शक', गुलजार यांचा 'अचानक' हे समांतर चित्रपट होते. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे चंदेरी दुनियेत माझं स्वत:चं स्थान निर्माण झालं. अगदी सुपरस्टारपदाच्या टप्प्यापर्यंत मी पोचलो होतो.'' 

'पूर्वीच्या व आताच्या चित्रपटांमध्ये कमालीचा फरक झाला आहे. तंत्रज्ञानानं वेगानं या सृष्टीचा कब्जा घेतला. अभिनत, गीत, संगीत आदी क्षेत्रांत नवी पिढी जोमाने पुढे येऊ लागली आहे. या नव्या मुलांची मेहनत करण्याची तयारी असते. मात्र, त्यांच्यामध्ये परिपक्वतेचा अभाव आढळतो. दिग्दर्शन क्षेत्रातील परिस्थिती वेगळी नाही. पूर्वी मेहबूब, के. ए. अब्बास यांच्यासारखे दिग्दर्शक इथं होते. आपले कलागुण पणाला लावून अविरत मेहनत करून 'मोगल ए आझम', 'मदर इंडिया' असे अजरामर चित्रपट त्यांनी बनविले. तो जमाना आता सरला. त्या दर्जाचे लोक आता या क्षेत्रात जवळपास उरलेले नाहीत. लोकांना 'इन्स्टंट' यश हवे असते. मात्र, त्यासाठी कष्ट करण्याची त्यांची तयारी नाही. महागाई वाढली. पूर्वी एक कोटी रुपयांत चांगला चित्रपट तयार होत असे. आता चांगला चित्रपट तयार करण्यासाठी दहा कोटी रुपयेही कमी पडतात.'' जुन्या व नव्या चित्रपटांतील फरकाबाबत त्याचे हे मत होते. 

'माझ्या पहिल्या 'मन का मीत' चित्रपटाचे दिग्दर्शक ए. सुब्बाराव यांना मी खूप मानतो. राज खोसलांच्या दिग्दर्शनाखाली माझा अभिनय अधिक खुलला. त्यांचे 'मेरा गाव मेरा देश', 'कच्चे धागे', 'मै तुलसी तेरे आंगन की' या चित्रपटांतील माझ्या भूमिका मला आवडतात. त्याचबरोबर 'हत्यारा', 'इम्तिहान', 'अचानक', 'लेकीन', 'रिहाई' या चित्रपटांतीलही भूमिका माझ्या आवडत्या आहेत. अमिताभबरोबरची माझी जोडी रसिकांना विशेष भावली. 'खून पसीना', 'हेरा फेरी', 'परवरिश', 'जमीर', 'अमर अकबर अँथनी' या आमच्या चित्रपटांना उदंड यश मिळाले. 'मुकद्दर का सिकंदर'नंतर आम्ही चित्रपटांमध्ये एकत्र आलो नाही. माझ्या पुनरागमनानंतर काही दिग्दर्शकांनी आम्हाला घेऊन चित्रपट काढण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या कारणांमुळे ते शक्‍य झाले नाही. मात्र, त्याच्याबरोबर काम करण्याची माझी आजही तयारी आहे. अर्थात, ती भूमिका तितकी तोलामोलाची असली पाहिजे.'' वयाची पन्नाशी उलटली तरीही व्यक्तिमत्त्वातील दिमाख कायम असलेला विनोद आपल्या कारकिर्दीविषयी बोलताना भूतकाळात रमला होता. 

'राहुल आणि अक्षय ही माझी दोन्ही मुलं चित्रपटसृष्टीत धडपडत आहेत. अक्षय तर त्याच्या भूमिकेसाठी अक्षरश: सोळा-सोळा तास काम करतो. येत्या जानेवारी महिन्यात मी नव्या चित्रपटाच्या निर्मितीला सुरवात करीन. चित्रपटात अर्थातच अक्षयची महत्त्वाची भूमिका असेल. चित्रपटाचे कथानक व अन्य कलाकारांबाबतच्या बाबी अजून निश्‍चित व्हायच्या आहेत. अर्थात, चित्रपटाला 'विनोद खन्ना' टच असणार, हे निश्‍चित!' विनोदच्या बोलण्यात आत्मविश्‍वास जाणवत होता. 

ज्येष्ठ कन्नड अभिनेते डॉ. राजकुमार यांच्या अपहरणाबाबत तो म्हणाला, 'वीरप्पननं राजकुमार यांचं अपहरण केल्यामुळे गंभीर पेच निर्माण झाला आहे. आगामी काळातील संकटांची चाहूल त्यामुळं लागली आहे. वीरप्पननं केलेल्या अपहरणाला अनेक कंगोरे आहेत. मात्र, ती वृत्तीच भयानक आहे. ही वृत्ती उद्या आमच्या कोणत्याही अभिनेत्याला संकटात आणू शकते. या संदर्भात चित्रपटसृष्टीतील सर्वांनी एकत्र बसून विचार करायला हवा. हे प्रकार टाळण्यासाठी त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.'' 

'चंदेरी दुनियेइतकंच राजकीय कारकिर्दीलाही मी महत्त्वाचं स्थान देतो. गुरुदासपूरमध्ये (पंजाब) निवडून आल्यानंतर मी विकासकामांसाठी प्रयत्न केले. त्यामुळेच तेथील जनतेने मला दुसऱ्यांदा खासदारपदी निवडून दिले. या मतदारसंघात मी फारसा फिरत नाही, असा स्थानिक रहिवाशांचा आक्षेप असल्याचा अपप्रचार केला जातो; तो मला मान्य नाही. उलट, माझा संपर्क इतका आहे, की तेथील लोक मला इतक्‍या लवकर परत येऊ नका, असं सांगतात.'' खासदाराच्या वास्तव भूमिकेतील विनोद खन्ना बोलत होता. 

'काँग्रेसने देशात चाळीस वर्षे राज्य केले; पण देशाचा कोणत्याही पातळीवर विकास ते करू शकले नाहीत. भारतीय जनता पक्ष ही 'सही' पार्टी आहे. देशाच्या गाडा चालविण्याची क्षमता या पक्षात आहे. हा पक्ष जातीयवादी असल्याचे आरोप केले जातात; ते खरे नाहीत. काँग्रेसकडून तसा हेतुत: अपप्रचार केला जातो. गुरुदासपूर हा मागास व सीमावर्ती प्रदेश आहे. तेथील रहिवाशांच्या समस्या वेगळ्या आहेत. लोकप्रतिनिधित्वाच्या माध्यमातून तेथील लोकांचे प्रश्‍न मला मार्गी लावायचे आहेत. मतदारसंघाचा विकास करायचा आहे. खासदारपदाची माझी ही दुसरी खेप असली, तरी राजकीय क्षेत्रातूनही 'एक्‍झिट' घ्यायचा माझा विचार नाही. कारण मी जाणीवपूर्वक हे क्षेत्र निवडले आहे. लोकांची, देशाची सेवा मला करायची आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे कोणाच्या सांगण्यावरून मी निवडणूक लढविलेली नाही. त्यामुळे मागं फिरण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही.'' 'सुपरस्टार'ला मारलेल्या या मार्मिक टोल्याने खासदार विनोद खन्ना राजकारणात चांगला रुळू लागला असल्याचे प्रत्यंतर आले. 

वैयक्तिक समस्यांनी ग्रासल्यानंतर मन:शांती मिळविण्यासाठी विनोदने ओशोंचा आसरा घेतला. पुण्यातील ओशो आश्रमात स्वामी विनोद भारती या नावाने दीक्षा घेऊन तो आत्मशोधाचा प्रयत्न करीत होता. ओशोंचा तो निस्सीम भक्त बनला. त्यांनी आत्मशोधाचा मार्ग दाखविल्याचे ऋण विनोद आजही मान्य करतो. त्यामुळेच अधूनमधून पुण्यातील ओशो कम्युनची, तेथील सहकाऱ्यांची तो भेट घेतो. ओशोंच्या साहित्याची विक्री करण्यावरून भक्तांमध्ये दोन गट पडले आहेत. त्याबाबत व्यथित मनाने तो म्हणाला, 'आपलं विचारधन अधिकाधिक लोकांपर्यंत विनासायास पोचावं, आपल्या पुस्तकांचा, ध्वनिफितींचा व्यापार होऊ नये, अशी ओशोंची भावना होती. कमीत कमी किंमतीत हे साहित्य उपलब्ध व्हावं, अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या विचारांना धक्का लावणारी कृत्यं काही व्यक्ती आता करीत आहेत. ओशोंच्या साहित्यविक्रीसाठी पेटंट घेतल्याचा त्यांचा दावा आहे. भरमसाट दरात ते हे साहित्य देश-परदेशात विकत आहेत. ओशोंचे विचार म्हणजे काही मूठभर लोकांची मक्तेदारी नाही आणि संतांच्या विचारांचे पेटंट असे कोणी घेऊ शकतो का..?'' पूर्वाश्रमीच्या स्वामी विनोद भारतींचा सवाल विचार करायला लावणारा होता. 

वयोमानानुसार विनोदचे व्यक्तिमत्व अधिक विविधांगी व परिपक्व झाल्याचे या संभाषणातून जाणवलं. त्यातून कसलेल्या अभिनेत्याबरोबरच राजकारणातही मुरू लागलेल्या खासदार विनोद खन्नाचे जवळून दर्शन झाले. विनोदमधील जोश, उत्साह, आत्मविश्‍वास आजही कायम आहे. प्रकृती ठणठणीत आहे. आवाज दमदार आहे. या सर्वांचे श्रेय तो ध्यानधारणेला व नियमित व्यायामाला देतो. अर्थात, त्याची मनोभावे काळजी घेणारी अर्धांगिनी-पूर्वाश्रमीची कविता दफ्तरी यांचेही यामध्ये तितकेच श्रेय आहे. एक सर्वगुणसंपन्न अभिनेता, काही काळचा स्वामी विनोद भारती, खासदार विनोद खन्ना हा माणूस म्हणूनही उमदा व सुसंस्कृत असल्याचे जाणवले. पाहुण्यांना निरोप देण्यासाठी दारापर्यंत येण्याच्या त्याच्या छोट्या कृतीने त्यावर शिक्कामोर्तब केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com