संस्कृत केवळ ब्राह्मणी भाषा नाही

संकेत कुलकर्णी 
शुक्रवार, 3 मार्च 2017

संस्कृत केवळ धार्मिक आहे, असे समजू नका. "अहं ब्रह्मास्मि- मनुष्य हाच परब्रह्म आहे' या वेदान्त विचारापासून "तुच्छमिदम्‌- मनुष्य सर्वात तुच्छ आहे', या चार्वाकविचारापर्यंत सर्व विचार या भाषेत आहेत

तुम्हाला जे वंदनीय आहे, ते जरूर उपासा; पण त्याहूनही अधिक निष्ठेने जे विरुद्ध आहे, ते जाणून घ्या. संस्कृत शिकल्याने संकुचितपणा जाऊन व्यापक दृष्टी येते, असे सांगत आहेत प्रसिद्ध संस्कृत अभ्यासक डॉ. दा. वि. गर्गे. वयाची शंभर वर्षे पूर्ण करणाऱ्या डॉ. गर्गे यांचा गौरवसोहळा औरंगाबादेत नुकताच पार पडला. त्यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद. 

संस्कृत भाषेच्या अभ्यासाची प्रेरणा कुठून मिळाली? 

लहानपणापासून आजोबांनी काही संस्कार केले. श्‍लोक शिकवले. धर्मग्रंथ, स्तोत्रे यांच्याच सदैव चर्चा होत असल्याने संस्कृतविषयी गोडी वाढली. शाळेतही प्रोत्साहन मिळत गेल्याने संस्कृत हाच जीवनविषय होऊन बसला. कॉलेजला असताना संस्कृत विद्यामंडळ स्थापन केले. पुण्यातील शिक्षण संपल्यावर मी बागलकोटला एक वर्ष आणि त्यानंतर 32 वर्षे अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयात संस्कृत शिकवले. निवृत्तीनंतर मात्र डेक्कन कॉलेजच्या संस्कृत विश्‍वकोश प्रकल्पात भरपूर काम केले. 

संस्कृत का अभ्यासावी? 

संस्कृत केवळ धार्मिक आहे, असे समजू नका. "अहं ब्रह्मास्मि- मनुष्य हाच परब्रह्म आहे' या वेदान्त विचारापासून "तुच्छमिदम्‌- मनुष्य सर्वात तुच्छ आहे', या चार्वाकविचारापर्यंत सर्व विचार या भाषेत आहेत. संस्कृतच्या अभ्यासाने मनुष्य संकुचित न होता व्यापक होतो. भाषेचा दुस्वास करून उपयोग नाही. अभ्यास हाच मार्ग आहे. उलट फार जुनी भाषा असल्यामुळे अभ्यासाला फार मोठा आधार आहे, असे समजावे. 

संस्कृतच्या संदर्भाची असली, तरी ती व्यवहाराची भाषा नाही. तिच्या पुनरुज्जीवनासाठी अनेक प्रयत्न होत असतात. संस्कृत खरेच लोप पावत चालली आहे? 

संस्कृत कधीच लुप्त होणार नाही. कारण कोणताही शब्द घ्या. त्याची व्युत्पत्ती शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाला संस्कृतकडेच यावे लागेल. कालिदासाचे काव्य कधी नष्ट होऊ शकते का? ती भले समाजाची भाषा नसेल, पण समाजाच्या भाषेचे सगळे शब्द संस्कृतचीच देण आहेत. मुळात जीवनाच्या सर्व अंगांवर या भाषेत लिहिले गेले आहे. त्यामुळे मारूनही ती मरणार नाही. तिचा प्रचार कमी होतो, हे खरे आहे. पण अपप्रचार कधीच होणार नाही. 

संस्कृत केवळ ब्राह्मणी भाषा आहे, असा आक्षेप कितपत खरा आहे? 

आज नसली, तरी कधीकाळी संस्कृत समाजभाषाही होती. मंत्र, धर्मग्रंथ या भाषेत निर्मिले गेले. ते ब्राह्मणांनी म्हटले म्हणून संस्कृत ब्राह्मणांच्या तोंडी शिल्लक राहिली. पण तिला केवळ ब्राह्मणी म्हणणंही योग्य नाही. स्वीकारणे वा न स्वीकारणे हा दुय्यम भाग आहे. ज्ञान हा पहिला भाग आणि ते घेणे आद्यकर्तव्य. संस्कृतने कुणाचा द्वेष शिकवला नाही. "तुम्हाला जे जे वंदनीय, उपास्य आहे, ते जरूर उपासा. पण त्याहीपेक्षा अधिक निष्ठेने जे विरूद्ध आहे, ते जाणून घ्या,' असे संस्कृतात वचन आहे. त्यामुळे कायम ज्ञानाचे भुकेले रहा. 

विश्‍वकोश प्रकल्पावर तुम्ही काम केले. ते फार किचकट आणि वेळखाऊ असते, असे ऐकले आहे. ते खरे आहे का? 

हो. संस्कृत विश्‍वकोशाचे काम फार मोठे आहे. डॉ. कत्रे यांनी ते काम 70 वर्षांपूर्वी सुरु केले. शब्दशोध म्हटल्यावर एखादा शब्द घेतला, की तो पहिल्यांदा कधी वापरला गेला? कुठे, कुणी वापरला हे शोधून तिथपासून लिहावे लागते. प्रत्येक शब्दाच्या आणि अर्थाच्या चिठ्ठ्या तयार कराव्या लागत. नंतर त्याचा अनुक्रम लावून गठ्ठे रचायचे. प्रत्येक शब्दार्थावर चर्चा व्हायची. पण डॉ. म. अ. मेहेंदळे यांच्यासारखे प्रामाणिक आणि निष्ठावान संपादक तिथे होते. अजून दोन पिढ्या चालेल एवढे ते काम आहे. 

शरीराने थकला असाल, तरी अजूनही तुम्ही उत्साही दिसता. याचे रहस्य काय? 

ज्यांना संदर्भ शोधावे वाटतात, अशी माणसे आजही आहेत, याचा आनंद वाटतो. त्यांच्याशी चांगली चर्चा करतो. आवडीच्या विषयाची चर्चा करत राहिले की आयुष्य वाढते, असे म्हणतात. संस्कृतचा अर्थच मुळी "अधिक चांगले करणे' असा आहे. याच श्रद्धेने मी माझ्या परीने अभ्यासाचा प्रयत्न केला. माझ्याही काही अडचणी आहेत, मर्यादा आहेत. काही चुकले, तर चुकले असे मान्य करतो. मी अपुरा पडेन. पण अभ्यासवृत्ती सोडणार नाही. 

Web Title: Interviewing sanskrit scholer d v garge