गुजरात टायटन्सची तोफ!

इंडियन प्रीमियर लीग अर्थातच ‘आयपीएल’च्या यावेळच्या मोसमात गुजरात टायटन्स संघाने पदार्पणातच अंतिम सामन्यात धडक मारली
ipl 2022 Gujarat Titans team Rashid Khan Mohammad Shami David Miller
ipl 2022 Gujarat Titans team Rashid Khan Mohammad Shami David Miller sakal
Summary

सामना बघताना बऱ्‍याच लोकांना टी-२० क्रिकेट प्रकार सोपा सहज वाटतो; पण दिसतं तसं नसतं ना?

इंडियन प्रीमियर लीग अर्थातच ‘आयपीएल’च्या यावेळच्या मोसमात गुजरात टायटन्स संघाने पदार्पणातच अंतिम सामन्यात धडक मारली आहे. गोलंदाजीत राशिद खान - मोहंमद शमीची गोलंदाजी आणि फलंदाजीत डेव्हिड मिलरची फलंदाजी संघाचा आधार बनली. काय मजा आहे बघा. २०२२च्या आयपीएल मोसमाकरिता खेळाडू निवडीचा लिलाव झाला तेव्हा पहिल्या सत्रात डेव्हिड मिलरला कोणी बोली लावली नव्हती. दुसऱ्‍या टप्प्यात गुजरात टायटन्स संघाने मिलरला संघात दाखल करून घेतलं होतं. मिलर नवखा खेळाडू नक्कीच नव्हता. अगोदर पंजाब संघाकडून आणि नंतर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला होता. मंगळवारी, म्हणजे २४ मे रोजी मध्यरात्री डेव्हिड मिलरने ट्विटरवरून राजस्थान रॉयल्स संघाची माफी मागितली. त्याचं कारण असं होतं की, अगोदरच्या दोन मोसमांत ज्या राजस्थान संघाकडून मिलर खेळला होता, त्याच संघाला पराभवाचा जबरदस्त दणका देताना मिलरने घणाघाती खेळी ईडन गार्डन मैदानावर सादर केली. २९ मे रोजी, म्हणजे आज रात्री आयपीएलचा अंतिम सामना रंगणार असताना सगळ्यांचं लक्ष डेव्हिड मिलरकडे असणार आहे. त्याच मिलरशी ‘सकाळ ’ ने बातचीत केली...

सामना बघताना बऱ्‍याच लोकांना टी-२० क्रिकेट प्रकार सोपा सहज वाटतो; पण दिसतं तसं नसतं ना?

मिलर : ज्या कोणाला वाटतं की, टी-२० क्रिकेट प्रकार सोपा आहे, त्यांचा अंदाज साफ चुकीचा आहे असंच मी म्हणेन. दिसताना हा फक्त २० षटकांचा सामना वाटतो; पण त्या १२० चेंडूंत काय नाट्य घडतं, काय दडपण सहन करावं लागतं आणि प्रत्येक क्षणाला काय एकाग्रता राखावी लागते, हे खेळाडूंनाच कळतं. प्रत्येक चेंडू म्हणजे मला एक वेगळा सामना वाटतो. खेळाडूला आपलं कौशल्य पणाला लावावं लागतं. तसंच, खेळ प्रचंड वेगाने पुढे सरकत असल्याने सतर्क रहावं लागतं. धावांचा पाठलाग करताना एखादं षटक कमी धावांचं गेलं तरी धावगती झपकन वाढते. सरावादरम्यानच नव्हे, तर खेळाडूला सामन्यादरम्यान बऱ्‍याच गोष्टींत बदल करायची तयारी ठेवावी लागते. टी-२० क्रिकेट सर्वोच्च स्तरावर खेळायचं असेल, तर खेळाडूला शारीरिक तंदुरुस्तीत आमूलाग्र सुधारणा करावी लागते, कारण सामन्यादरम्यान क्षणाक्षणाला शरीराला हिसके बसत असतात. ताकदीबरोबरीने लवचिकता असली तरच निभाव लागू शकतो. या सगळ्याचा शांतपणे विचार करून बघा, म्हणजे टी-२० क्रिकेट प्रकार किती कठीण आहे, याचा पुसटसा अंदाज तुम्हाला येईल.

अनोखे पुस्तकाबाहेरचे फटके खेळण्यात तरबेज असलेल्या ए. बी. डिव्हिलियर्सबरोबर खूप क्रिकेट खेळूनही तू जास्तकरून क्रिकेटचे पुस्तकातले फटके मारणेच पसंत करतोस, असं का?

- होय होय मी स्वतःला भाग्यवान समजतो की, मी ए. बी. डिव्हिलियर्सबरोबर भरपूर क्रिकेट खेळलो. बऱ्‍याच वेळेला तो फलंदाजी करत असताना मी समोर होतो, विकेटवर. त्याचं नवनवे फटके मारायचं कौशल्य मला वेड लावून जायचं. क्रिकेटच्या मूळ तंत्राला छेद देणारे ते फटके मारणं किती कठीण आहे, याची मला वेळोवेळी कल्पना आली. विचारांती मी माझ्या सरावादरम्यान आणि विविध सामने खेळताना घासून घासून तयार केलेल्या फटक्यांवर विश्वास ठेवणं पसंत करतो. हे खरं आहे की, टी-२० क्रिकेट खेळताना परिस्थिती सतत बदलत असल्याने खेळात बदल करावा लागतो. खेळाचं वारं कधी आणि कुठे सरकत आहे याचा अंदाज घेत क्षणार्धात बदल करावे लागतात, तरीही जेव्हा नाजूक अवस्था असते, तेव्हा ट्रिक शॉट्स खेळण्यापेक्षा मी मूलभूत फटके मारण्याचा पर्याय निवडतो. दडपणाच्या क्षणी मला पुस्तकी वाटणाऱ्‍या पारंपरिक फटक्यांवर विश्वास ठेवणं बरं वाटतं.

राशिद खान आणि शमी काय खाणं खात आहेत की, ते इतकी चांगली गोलंदाजी सातत्याने करत आहेत?

मोहंमद शमी अत्यंत शांत माणूस आहे; पण त्याची भूक मस्त आहे. रोज पद्धतशीर पूर्ण जेवण करणं शमी पसंत करतो. त्याच्या उलट राशिद खान आहे. तुझा विश्वास नाही बसणार; पण राशिद जवळपास रोज जेवण बनवतो. त्याला त्याच्या आवडीचं, खास चवीचं खाणंच आवडतं म्हणून तो किचनमध्ये घुसलेला दिसतो. बायो बबलमध्ये राहून आयपीएलसारखी स्पर्धा खेळणं कठीण काम आहे. अशा वेळेला स्वयंपाक बनवणं मनाला शांत करण्याचा मार्गही ठरतं. त्यातून राशिद खान जेव्हा जेवण बनवतो, तेव्हा ते चवदार असतं, तसंच भरपूरही असतं. त्याचमुळे आम्हालाही त्याने बनवलेले वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात. मी इतकंच सांगेन की, जे काही शमी आणि राशिद खात आहेत, त्याचा अत्यंत चांगला परिणाम त्यांच्या गोलंदाजीवर होतोय, ज्याचा फायदा गुजरात टायटन्स संघाला नक्कीच होतोय.

गुजरात टायटन्स संघाचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराबद्दल काय सांगशील?

नेहरा एक क्रिकेट जाणकार विचारी प्रशिक्षक वाटतो मला. एकीकडे तो करायचं ते काम चोख करायला प्रचंड शिस्त पाळतो, दुसरीकडे तो बऱ्‍याचवेळा क्रिकेटपेक्षा गोल्फवर जास्त बोलतो. त्याला गोल्फ खेळायचं वेड लागलं आहे. एक नक्की आहे, तो खेळाडूंना आपलासा वाटतो... मित्र वाटतो. संघात सगळ्या खेळाडूंनी आपले विचार मोकळेपणाने मांडायला तो प्रोत्साहन देतो. संघातील नवख्या खेळाडूंना व्यक्त व्हायला तो वातावरण चांगलं ठेवतो. संघ व्यवस्थापन खेळाडूंची सर्वतोपरी काळजी घेताना शक्य ते सर्व करतात. चांगला खेळ करायला सगळे तयारी करतात; पण त्याचं दडपण नसतं. आम्ही दोन सामने पाठोपाठ हरलो तरीही संघ व्यवस्थापन शांत होतं. त्यांचा आमच्यावर विश्वास असल्याचा तो दाखला होता.

डेव्हिड तुझी फलंदाजी या मोसमात खरंच बहरली आहे आणि संघ पदार्पणातच अंतिम सामन्यात पोहोचला आहे, या दोन गोष्टींबद्दल काय म्हणशील?

खूप काही बदल मी फलंदाजीत केलेला नाही. मला आयपीएल स्पर्धेत खेळायचा पुरेसा अनुभव आहे. विचार इतकाच केलाय की, मी माझ्या विकेटवर एक किंमत लावणार. कोणालाही सहजी माझी विकेट बहाल करणार नाही. संघाने मला एक भूमिका दिली आहे, ती निभावण्याकरिता माझ्या कौशल्यावर विश्वास ठेवून थोडी विचारी खेळी रचण्याचा प्रयत्न करणार. याच विचारांचा फायदा होतोय असे आकडे बोलत आहेत. १५ सामन्यांत ४४९ धावा मला करता आल्या आहेत. दोन सामन्यांत मी संघाला विजयी करूनच तंबूत परतलो आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, मी ८ वेळा नाबाद राहताना मला दिलेली जबाबदारी पार पाडायचा प्रयत्न केलाय.

अंतिम सामन्यात पोहोचण्याचा आनंद मोठा आहे. त्यातून सामना संघाच्या घरच्या मैदानावर, म्हणजे अहमदाबादला होतोय; जगातील सर्वांत भव्य क्रिकेट मैदानावर. गुजरात टायटन्स संघाला अहमदाबादचे प्रेक्षक प्रचंड पाठिंबा देणार आहेत यात कोणतीही शंका नाही. सगळेजण पहिल्यांदाच १ लाख प्रेक्षकांसमोर सामना खेळणार असल्याने अर्थातच सगळे खेळाडू जाम उत्साहात आहेत. आता फक्त एक धक्का अजून द्यायचा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com