क्षण युरेकाचा

it's time to eureka
it's time to eureka

क्षण एक पुरे ‘देण्याचा’

तो   वर्षाचा शेवटचा दिवस होता. येणाऱ्या नव्या वर्षाचा उत्साह साहजिकच वातावरणात भरून राहिला होता. रस्ता तर वाहनांनी तुडुंब वाहत होता. तिथंच रस्त्याच्या कडेला फूटपाथवर असाच एक संसार थाटलेला दिसत होता. अवतीभवती तीन-चार कच्ची-बच्ची पोरं हुंदडत होती. शेजारीच त्यांची आई आणखी एक लेकरू कडेवर घेऊन उभी होती. फाटके नि मळके कपडे, तेलाचा स्पर्श न झाल्यामुळं पिंजारलेले केस, अंगं धुळीनं माखलेली असा त्यांचा अवतार होता. नववर्ष साजरं करण्याचा आनंद त्यांच्या गावीही नव्हता. 

मनात विचार आला, सगळं जग उद्या नवीन वर्ष साजरं करणार आहे; पण यांच्या दृष्टीनं नववर्षाची व्याख्या काय? आजच्याहीपेक्षा त्यांचा उद्याचा दिवस चांगला आहे, की वाईट? उद्याच्या नववर्षाचे त्यांचे भवितव्य काय?...अशा विचारांनी मी अस्वस्थ झाले. खरंच यांच्यासाठी मी काय करू शकते? ज्यांचा आगापिछा माहिती नाही, जी आज समोर आहेत; पण उद्या असतीलच असं नाही- अशांसाठी मी काय करू शकते? नववर्षाच्या आनंदानं झपाटलेल्या जगाबरोबरच या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरही आनंद फुलला पाहिजे, नव्हे तो त्यांचा हक्कच आहे, या विचारांनी मी झपाटून गेले आणि माझे पाय जवळच असलेल्या बेकरीकडं वळले. 

सर्वांत मोठ्ठा केक मी खरेदी केला आणि तो घेऊन त्या चिमुकल्यांपाशी येऊन पोचले. मी तो केक त्यांच्या हाती दिला. ‘‘तुम्हाला नवीन वर्ष सुखाचे....?’’ वगैरे वगैरे म्हणण्याचं काही धैर्य मला झालं नाही. ‘‘आये, ह्ये बघ काय दिलं त्यांनी?’’ एवढेच शब्द मी ऐकले आणि पुढं चालू लागले. आपल्या आनंदातला एक क्षण इतरांनीसुद्धा अनुभवावा, हा विचार मनात आला, तो क्षण मला ‘युरेका’सारखा वाटला. तो क्षण मला निराळंच समाधान देऊन गेला. या एका प्रसंगानं मला दिशा मिळाली. आपल्या परीनं आपली ओंजळ लहान असली, तरी इतरांसाठी ती मोठी असते, याचा अनुभव घेतला. नाना तऱ्हेनं या गोष्टी मी अनुभवू लागले. कुणाची फी द्यावी, कुणाला अन्न-धान्य द्यावे, कुणाला वस्त्रदान करावं, वृद्धांना काठीचा आधार देऊन त्यांचा मार्ग सुलभ करावा, तर कुणाचं वैद्यकीय बिल भरावं. असे हे क्षण इतर आनंदापेक्षा निश्‍चितच मोठे आहेत, असं मला वाटतं. 

- तारा अकोलकर, पुणे

--------

प्रयत्ने कणीक रगडिता...

गेल्या दहा-बारा वर्षांपासून रात्री माझ्या दोन्ही हातांच्या पंजांना खूप मुंग्या यायच्या. मुंग्या म्हणजे त्या भागात रक्ताभिसरण होत नसल्यामुळं हात गार पडायचे. विशेष करून मनगटापासूनचा भाग गार पडायचा, हात जडही होत असे. खाजवलं किंवा टोचलं तरी जाणीव होत नव्हती. 

मग मी टाळ्या वाजवून त्यात उष्णता निर्माण करत असे; पण भलत्या वेळी टाळ्यांचा आवाजही भयावह वाटत असे. मग कधी हातावर हात घासून उष्णता निर्माण केली, की त्याचं तापमान पूर्ववत होई; पण परत थोडी झोप झाली, की पुन्हा हात गार पडायचे. असं रात्रीतून दोन-तीन वेळा होई. त्यामुळं रात्री शांत झोप होत नसे. 

यावर वैद्यकीय सल्ल्यानुसार अनेक उपाय झाले. विविध प्रकारची औषधं घेतली. सगळ्या दवाखान्यांना भेटी देऊन झाल्या; पण व्यर्थ! मग सल्ले सुरू झाले. कोणी म्हणे- ‘हृदयाशी संबंधित आहे; हृदयतपासणी करून घ्या.’ कोणी म्हणे- ‘स्माईल बॉल हातात घेऊन बोटांचा व्यायाम करा.’ म्हणजे हातात चेंडू घेऊन बोटांनी दाबायचा. हातासंबंधी असलेले विविध व्यायाम केले. ‘क्‍लॅपिंग थेरपी’ करून बघितली; पण काहीच फरक नाही. एके दिवशी मात्र गंमत झाली. गुरुवार असल्यामुळं वीज गेलेली होती. लाइट रात्री सातपर्यंतसुद्धा येण्याची शक्‍यता नव्हती आणि त्या दिवशी जेवणासाठी आमच्या घरी पाहुणे येणार होते. 

मी रोजचा स्वयंपाक घरीच करते. त्यामुळं बाईचा प्रश्‍न नव्हता. तशी पूर्वीपासून मी कणीक फूड प्रोसेसरवरच भिजवत असे. लाइट नसल्यामुळं त्या दिवशी मी परातीत कणीक भिजवली. चांगली मळली. सगळा स्वयंपाक झाला. दमल्यामुळं रात्री झोप चांगली लागली. सकाळी लक्षात आलं, की काल रात्री हाताला मुंग्या आल्या नाहीत. त्यामुळं झोप विस्कळित झाली नाही; पण दमल्यामुळं झोप गाढ लागली असेल, असा माझ्या मनाचा तर्क. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा कणीक हातांनीच भिजवली. दुसऱ्या दिवशीही हाताला मुंग्या आल्या नाहीत.

मग माझ्या लक्षात आलं, की कणीक तिंबल्यामुळंच हा चमत्कार झाला. तेव्हापासून फूड प्रोसेसरला सुटी दिली आणि माझी हाताला येणाऱ्या मुंग्यांच्या त्रासापासूनही सुटका झाली. मला माझ्या आजीच्या बोलण्याची आठवण झाली. ‘‘अगं वाटण-घाटण, कपडे धुणं-वाळत घालणं, फरशी पुसणं, ताक घुसळणं, पाट्यावर वाटणं, खलबत्यात चटणी कुटणं अशी घरगुती कामं घरीच करावी. मशिन वापरून परावलंबी होऊ नये. या घरगुती कामामुळं हाताला, कमरेला चांगला व्यायाम होतो. शरीर चांगलं निरोगी राहतं,’’ असं ती सांगायची; पण मी त्याकडं फारसं लक्ष दिलं नाही. अनुभवामुळं आज मला ते पटलं आहे. कष्टाची कामं केल्यामुळं आलेल्या घामातून एक वेगळीच ऊर्जा मिळते. शरीराबरोबर मनदेखील प्रसन्न होतं स्वकष्टातून झालेल्या आनंदामुळं! 
- विनया तिखे, आकुर्डी, पुणे.

-----

सर्जनतेचा ‘स्पार्क’ 
 

दैनंदिन जीवनात अनेक समस्या आपला पिच्छा सोडत नाहीत. बॅंक, पोस्ट अथवा तत्सम सार्वजनिक किंवा सरकारी संस्थांमध्ये गेलात आणि आपला नंबर आता ‘लागला रे लागला’ म्हणून ‘विंबल्डन’ जिंकल्याच्या आविर्भावात पुढं जावं, तोच समोरच्या खुर्चीवर बसलेली व्यक्ती अतिशय निर्विकारपणे कोणत्या तरी कागदपत्रांची, कार्डची फोटो कॉपी आणि आपल्या फोटोची मागणी करते. त्या गोष्टी त्यावेळी आपल्याकडं नसल्यामुळं आपण स्पर्धेतून बाद ठरतो. मनातल्या मनात यंत्रणेला शिव्या घालत किंवा स्वतःवर चरफड करत आपण रांगेतून बाहेर पडतो. दुसऱ्या वेळी फोटो कॉपीच्या प्रती आणि फोटो घेऊन ‘नवं राज्य’ निमूटपणे स्वीकारून पुन्हा रांगेला लागावं लागतं. असे अनेक धक्के पचवल्यानंतर मात्र मी हुशार झालो. आता दैनंदिन जीवनाशी संबंधित डॉक्‍युमेंटच्या फोटो कॉपी आणि पन्नास रुपयांत काढलेल्या ४२ फोटोंचा संच असलेला एक फोल्डर तयार करून ठेवला आहे. कोणत्याही कार्यालयात किंवा संस्थेमध्ये गेलो, की काउंटरवरच्या कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याला मी विचारतो, ‘‘कोणती फोटो कॉपी पाहिजे सर?’’ त्याच्या सुहास्य वदनानं माझं काम पूर्ण होतं. 
असाच मागं मी एका चांगल्या कंपनीचा गॅस लायटर विकत आणला. एका वर्षाच्या आत आमच्या सौभाग्यवतींनी त्याच्या कार्याचा ‘निकाल’ जाहीर केला, ‘‘अहो, गॅस लायटर चालत नाही. नुसताच फटफट्‌ आवाज करतोय.’’ चष्मा लावून बघितला, तर त्यातून स्पार्क येत होता; पण स्पार्क म्हणजे त्या ठिणग्या बाहेर पडण्यासाठीच्या साऱ्या छिद्रांची जागा तेल, तूप, पीठ इत्यादी सामग्रींनी काबीज केल्यामुळं तो गुदमरला होता. मग छिद्रांकडची बाजू पेटत्या गॅसवर धरून छिद्रातलं सारं ‘फॉरेन मटेरियल’ जाळून टाकलं आणि थंड झाल्यावर फडक्‍यानं पुसून घेऊन सारी छिद्रं मोकळी केली आणि लायटर नव्या दमानं कार्यरत झाला. आताही लायटरचं कार्य मंदावतं, त्या प्रत्येक वेळी मी ही कामगिरी पार पाडतो; परंतु माझी पत्नी सर्वांना अभिमानानं सांगत असते- ‘‘गेली वीस वर्षं मी एकच लायटर वापरतेय.’’ 
मानवी मेंदूमध्ये सर्जनतेचा अद्वितीय ‘स्पार्क’ असतोच. मेंदूतल्या या प्रचंड ‘प्रकाशशक्ती’चा प्रत्येकानं जीवनात जाणीवपूर्वक उपयोग करून घेतला, तर मोठा शास्त्रज्ञ जरी नाही, तरी छोटा मार्गदर्शक होऊ शकतो. त्यामुळं वेळ वाचतो, आर्थिक बचत होते. स्वानंदाचं अवर्णनीय बक्षीस प्राप्त होतं...क्वचित पत्नीदेवीची कौतुकाची थाप पाठीवर पडते ती वेगळीच! 

- विनायक नंदे, पुणे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com