जेम्स बाँड के पोते...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

James Bond movie bollywood shole movie music fight action

१९६३ साली ‘बाँड’ हा साहेबी थाटाचा करामती गडी भारतात अवतरला आणि आपले हिंदी सिनेमावाले कंप्लीट गारद झाले.

जेम्स बाँड के पोते...!

१९६३ साली ‘बाँड’ हा साहेबी थाटाचा करामती गडी भारतात अवतरला आणि आपले हिंदी सिनेमावाले कंप्लीट गारद झाले. येवढी मारामारी एकाच सिनेमात घेणं भारतीय निर्मात्यांना परवडणारं नव्हतं.

हॉलीवूडच्या बाँडपटाच्या एका मारधाड दृश्यात जेवढे डॉलर्स खर्ची पडत, तेवढ्या पैशात दहा-वीस हिंदी सिनेमे झाले असते; पण असा हिंदी अवतारही हवा, या कल्पनेनं काही निर्मात्यांना पछाडलं. छान छान गाणी, गोराचिट्टा हिरो, छान छान हिरॉइनी, खुंखार व्हिलन... सगळा आपलाच तर मसाला होता. मग बाँडनं आपलं साहेबी रूप सोडलं आणि तो भारतीय समाजात मिसळून गेला.

‘शोले’ नावाच्या महागाथेचं ज्यांनी आयुष्यात किमान तीनदा तरी पारायण केलं असेल, त्यांना त्यातले डायलॉग आठवत असतील. काही महाभागांनी साठ-साठ वेळा हा चित्रपट पाहिला आहे. त्यांच्यापैकी काही एकपाठी होते, तरीही त्यांनी डझनावारी वेळा ‘शोले’ बघितला, आणि त्यातील अक्षरवाङ्‍मयात समाविष्ट झालेले मनोज्ञ संवाद कंठगत केले.

त्यांजप्रति आदर बाळगोनच आपण पुढे गेलेले बरे. अशा विभूतीमत्त्वांपैकी एक प्रस्तुत लेखक होत. असो. ‘शोले’मधल्या एका दृश्यात वीरू किनई, बसंतीला बंदूक चालवायला शिकवत असतो. तेवढीच जरा जवळीक! तेव्हा जय नावाचा त्याचा खुसट मित्र मागून टोमणा मारतो : ‘‘हां, हां, जेम्स बाँड के पोते है ये!’’

कित्ती हा खवचटपणा... ना? पण बसंतीच्या प्रेमात पागल झालेल्या वीरूला तो टोमणा अजिबात लागत नाही. काही काही टोमणे असे वाया जातात आयुष्यात. चालायचंच. वीरूला काही फरक पडला नसला, तरी पब्लिक खीखी करून हसलं त्याचं काय? कारण हातात बंदूक न धरता सिनेमाचं तिकीट धरून ते आले होते. सगळेच त्या वीरूसारखे जेम्स बाँड के पोते...

टॅडाटॅडाऽऽ... ढिचक्यांव! गोल गोल गोलातून बाहेर आलेला सुटाबुटातला एक तरणाबांड इसम गोळी झाडतो, आणि मग धुंद गीताच्या पार्श्वभूमीवर वेधक चित्रदृश्ये उलगडत जातात. ही कुठल्याही जेम्स बाँडच्या चित्रपटाची सुरुवात. बाँडची धून तर आता जगभर परिचित झाली आहे.

ती माँटी नॉर्मन यांनी तयार केली, आणि संगीतरचनाकार जॉन बॅरी यांना दिली. माँटी नॉर्मन हे भारतीय संगीताचे बऱ्यापैकी जाणकार होते. सतार आणि तबल्याच्या मेळ्यानिशी त्यांनी ही धून पहिल्यांदा रचली. नोबेलविजेते साहित्यिक व्हीएस नायपॉल यांची एक गोष्ट होती.

‘हाऊस ऑफ मि. बिस्वास’ नावाची. मोहन बिस्वास हा भारतीय त्रिनिदादमध्ये स्थायिक होतो, त्याची कहाणी नायपॉल यांनी लिहिली होती. ती संगीतिका म्हणून मंचावर आणायची होती. तेव्हा माँटी नॉर्मन यांनी ‘डम डी-डी डम, डी-डी डम, डी-डी डम’ अशा लयीत भारतीय धून तयार केली; पण ते प्रोजेक्ट वाया गेलं. मग बाँडसाठी तीच धून बदलून त्यांनी जॉन बॅरी यांना दिली. पुढे पाश्चात्त्य वाद्यमेळात त्याचं भारतीयपण हरवलं. बाँडशी भारताचा पहिला संबंध इथं आला.

सुप्रसिद्ध गुप्तहेर ००७ जेम्स बाँड... उमर सदोतीस! (मूनरेकर चित्रपटात बाँडच्या तोंडी ‘आता निवृत्तीला आठ वर्ष बाकी आहेत,’ असा डायलॉग आहे. लष्करी गुप्तचर संस्थेत निवृत्तीचं वय ४५ धरलं, तर बाँड ३७ वर्षाचा ठरतो!

ओपन अँड शट केस मायलॉर्ड!) कायम सुटाबुटात, आणि कवेत एखादी लावण्यखनी. आसुरी ताकदीच्या जबरदस्त व्हिलन लोकांच्या अड्ड्यावर जाऊन पठ्ठ्या कचाकच मुडदे पाडतो. सुसाट मोटार चालवतो. त्याच्या मोटारीवर क्षेपणास्त्र बसवलेली असतात. व्हटांवर पाचुंदाभर मिश्या न्हाईत, समदा गुळगुळीत मामला! पण गडी लई चलाख.

त्याला जमिनीवर मोटार, मोटारसायकल, बर्फातली स्कूटर, वाळवंटातला उंट, रेल्वेचं इंजिन ही वाहनं सहजी चालवता येतात. आभाळात विमान म्हणू नका, हेलिकॉप्टर म्हणू नका, रॉकेट म्हणू नका, जेटपॅक म्हणू नका... काहीही उडवतो.

पाण्यात पाणबुडी, टोर्पेडो, जहाज आणि होडी वगैरे डाव्या वल्ह्याचा मळ! एका चित्रपटात तर त्यानं सुसर, शार्क वगैरे जलचर चालवून दाखवले होते. बरं, येवढं करून त्याचा भांगसुद्धा कधी विस्कटत नाही. गडी अस्सा तालेवार की व्हिलनच्या जनान्यातली अव्वल पोरगी पिक्चर संपेपर्यंत कायम याच्याच कुशीत! आता कसं करता?

जेम्स बाँड पहिल्यांदा भारतात आला तो बहुधा पुस्तकरूपात आला असणार. १९५३मध्ये इयान फ्लेमिंगसाहेबांनी ही व्यक्तिरेखा जन्माला घातली. दुसऱ्या महायुद्धानंतर सारं जग सावरत होतं. शीतयुद्धाचा काळ सुरू झाला होता.

अशा काळात फ्लेमिंगसाहेबांचा हा ब्रिटिश एजंट खलनायकांचं निर्दालन करत पृथ्वी आणि मनुष्यजमात वाचवत होता. तो देखणा होता. मदनाचा पुतळाच जणू. स्त्रीसुखाची त्याला कमतरता नव्हती. तो युद्धकलेत पारंगत होता.

त्याला नीतिमत्तेची फारशी पर्वा नव्हती; पण तो देशप्रेमी होता. पुस्तकातला बाँड भारतात फार थोड्यांना माहीत झाला. कोण वाचतंय इंग्रजी? पण त्याचं सिनेमातलं रूप भारतीय पडद्यावर आलं ते १९६३ साली. म्हणजे बॉण्डची आणि आपली वळख यंदा साठ वर्षांची झाली.

३ जून १९६३ रोजी जेम्स बाँडचा पहिला चित्रपट भारतात रिलीज झाला. त्याचं नाव होतं.- डॉ. नो! हा ‘डॉ. नो’ नावाचा टकल्या व्हिलन बेफाट होता. बाँडची व्यक्तिरेखा साकारली होती, शॉन कॉनरी यांनी.

इयन फ्लेमिंगचा बाँड हा एमआय-६ या ब्रिटिश गुप्तचर संस्थेत गुप्तहेराची नोकरी करतो. तिथं ‘मि. एम’ हे त्याचे बॉस आहेत. दरवेळी ते त्याची सुट्टी खलास करून नव्या मोहिमेवर पाठवतात. मिस मनीपेनी ही त्यांची सेक्रेटरी बाँडला नेहमी आवडते.

येताजाता तिचा अनुनय करणं, हादेखील बाँडच्या नोकरीचा भाग आहे. त्रेसष्ट साली हा साहेबी थाटाचा करामती गडी अवतरला आणि आपले हिंदी सिनेमावाले कंप्लीट गारद झाले. येवढी मारामारी एकाच सिनेमात घेणं भारतीय निर्मात्यांना परवडणारं नव्हतं.

हॉलीवूडच्या बाँडपटाच्या एका मारधाडदृश्यात जेवढे डॉलर्स खर्ची पडत, तेवढ्या पैशात दहा-वीस हिंदी सिनेमे झाले असते; पण असा हिंदी अवतारही हवा, या कल्पनेनं काही निर्मात्यांना पछाडलं. छान छान गाणी, गोराचिट्टा हिरो, छान छान हिरॉइनी, खुंखार व्हिलन... सगळा आपलाच तर मसाला होता. मग बाँडनं आपलं साहेबी रूप सोडलं आणि तो भारतीय समाजात मिसळून गेला.

जेम्स बाँडला भारतीयांनी दिलेला प्रतिसाद संमिश्र स्वरूपाचा होता. त्याला आहे तसा स्वीकारणं सुरुवातीला थोडं जड गेलं असणार. ‘डॉ. नो’ हा बाँडपट भारतात आला, तेव्हा हिंदी चित्रपटातला नायक, बेरोजगारीशी लढत होता. प्रेमात आकंठ बुडाला होता. क्वचित मारधाडपट यायचे, अगदीच नाही असं नाही, पण बिनीची मंडळी प्रेमालापात गुंग होती, हे खरं. ‘डॉ. नो’नं या सगळ्याला नोनो म्हटलं नाही, उलट त्यात देशप्रेमाचा तडका घालण्याची संधी दिली.

मग हिंदी चित्रसृष्टी पुढे सरसावली. ‘पुरस्कार’, ‘इन्स्पेक्टर’, ‘स्पाय इन गोवा’ टाइपचे सिनेमे येऊ लागले. ‘सीआयडी ९०९’ नावाचाही एक चित्रपट होता, असं आठवतंय. हे सगळे लो बजेट सिनेमे असत. त्यात महेद्र संधू, आयएस जोहर, आशा सचदेव अशी मंडळी चमकायची. ‘एजंट विनोद’ हा एक त्या काळचा सरप्राइज हिट होता. धर्मेंद्र, माला सिन्हाचा ‘आंखे’ याच बाँडपटांच्या जातकुळीतला होता. पण सरसकट बाँडपटाची कॉपी नव्हती ती. तोही सुपरहिट होता.

सत्तरीच्या उत्तरार्धात सुरक्षा, वारदात, रक्षा वगैरे चित्रपट आले. दिग्दर्शक-निर्माते रविकांत नागाइच यांचे हे धमाल चित्रपट काही जिंदादिल रसिकांना अजूनही आठवत असतील. क्योंकी उनमे अपुनका मिथुन चक्रवर्ती था!

काय डॅन्स करायचा, भाई! ‘गनमास्टर जी-नाइन’ होता तो. त्याची ती बेलबॉटम, लांब मानेवर येणारे केस, आणि हात-पाय इच्छेबरहुकूम इत्रतत्र फेकत चाललेला त्याचा तो डिस्को डान्स... एक आख्खी पिढी त्याच्यावर बेहद्द लट्टू होती दोस्तो... हसो मत!

हा जेम्स बाँडचा असली हिंदी अवतार होता. अपने ढंग से बनाया हुआ! रविकांत नागाइच यांना अणुशक्ती कायम मोहात पाडायची. त्यामुळे मिथुनदा कायम अण्वस्त्रांशी मुकाबला करायचा. पब्लिकला काहीच प्रॉब्लेम नव्हता.

रिक्षावालेसुद्धा रिक्षा चालवताना मिथुनच्या स्टायलीत तिरके बसायचे, कुरळ्या वाढवलेल्या केसांच्या बटा आरशात बघून सारख्या करायचे. त्याच्यासारखं जाकिटबिकिट घालायचे. तो एक वेडा जमाना होता.

त्याच सुमारास, ‘शोले’ आला, आणि इथं मुक्कामच टाकला त्यानं. लेखाच्या सुरवातीला दिलेल्या ‘शोले’तल्या संवादाची एक गंमत होती. खरा संवाद होता- ‘‘हां, तात्या टोपे के पोते है ये!’’ ऐनवेळी लेखक सलीम-जावेदनं हा संवाद बदलून जेम्स बाँडचा उल्लेख आणला. ती पिढी आणि त्याच्यानंतर आलेले वारसदार हे जेम्स बाँडचे पुत्रपौत्रच आहेत.

साठी-सत्तरीच्या दशकात डिटेक्टिव स्टोऱ्यांची पुस्तकं मिळायची. छोटी छोटी. बाबुराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक, माया सामंत वगैरे जबरी लेखक होते. बाबुरावांचे काळापहाड, झुंजार वगैरे मानसपुत्र तर तुफान होते.

गिरगावात एका चष्म्याच्या दुकानात बाबुराव बसायचे. तिथंच लिहायचे; पण वाचक मंडळी त्यांना बघायला यायची. काळापहाड खरंच आहे का? विचारायची. ते कंटाळून जायचे. आकारानं छोटी असलेली ही पुस्तकं एका बैठकीत वाचून काढायची प्रथा असे.

या कहाण्यांमध्ये जेम्स बाँडची रूपं दिसू लागली. मराठी साहित्यात खराखुरा थेट प्रतिसाद जेम्स बाँडला दिला तो विनोदी लेखक रमेश मंत्री यांनी. १९७१च्या सुमारास त्यांनी मराठी गुप्तहेर नायक जन्माला घातला.

त्याचं नाव होतं, ०००५ जनू बांडे! या जनू बांडेनं फिरंगी जेम्स बाँडची अशी काही फिरकी घेतली की विचारता सोय नाही. ‘ताजमहालवर बाँब ’, ‘कंबक्ती देशातली राज्यक्रांती’, ‘जनू बांडेचा नवा सहायक छबकड्या’, ‘पंतप्रधान अशीतशीचा जनूशी सामना’ अशा त्यांच्या काही मजेदार कथा जुन्या वाचकांच्या लक्षात आहेत.

जेम्स बाँडचा भारताशी थेट संबंध आला तो १९८३ साली. तेव्हा रॉजर मूर बाँड साकारायचा. ‘ऑक्टोपसी’चं शूटिंग जयपूर आणि राजस्थानात झालं होतं. आपला कबीर बेदी, टेनिसपटू विजय अमृतराज वगैरे मंडळी त्यात होती. आजही राजस्थानातील ऐतिहासिक वास्तू दाखवताना तिथले गाइड अभिमानानं सांगतात, ‘‘यहां पर ऑक्टोपसी की शूटिंग हुई थी’’ कर्म!!

काही वर्षांपूर्वी ‘स्कायफॉल’ नावाच्या बाँडपटाचं शूटिंग भारतात होणार होतं. केंद्रीय रेल्वे खात्याशी चर्चा सुरू झाल्या. दिनेश त्रिवेदी नावाचे रेल्वेमंत्री भारतभूमीला लाभले होते. त्यांनी धडाधड तीन अटी घातल्या.

एक- गाडीच्या टपावर बसून भारतीय प्रवास करतात, असलं दाखवायचं नाही! त्यामुळे भारताची प्रतिमा खराब होते. दोन- सुरक्षिततेचे सर्व निर्बंध काटेकोरपणाने पाळले पाहिजेत. आणि तीन- जेम्स बाँड हा भारतीय रेल्वेचा ब्रँड अम्बॅसेडर राहील. ‘बाँडपेक्षा भारतीय रेल्वे टफ आहे’ हे वाक्य त्यानं उच्चारलं पाहिजे!

बाँडनिर्मात्यांनी शेवटच्या दोन्ही अटी मान्य केल्या; पण टपावरच्या प्रवाशांचं कलम काही जमलं नाही. हे दाखवायचं म्हणून तर भारतात शूटिंग करायचं आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. शेवटी मामला बारगळला. आपल्या रेल्वे मंत्र्यांनी बाँडला बाहेरचा रस्ता दाखवला. हेही एकप्रकारे जेम्स बाँडचे पोतेच म्हणायचे.

...असे ‘जेम्स बाँड के पोते’ आपल्या भारतात पोत्यानं मिळतात. त्याची ओळख होऊन आता साठ वर्ष झाली. गेली साठ वर्ष हा आपला आजोबा परमनंट सदोतीस वर्षांचा आहे. कमी नाही, जास्त नाही.