प्रेमपटांचा रसिला वेध...

प्रेम ही अगदी मनाच्या कोपऱ्यातून उमलणारी हळूवार भावना असली, तरी त्याचे प्रगटीकरण वेगवेगळ्या पद्धतीने होत असते.
jayant marathe writes about love Anita Padhye Book Pyaar Zindagi Hai
jayant marathe writes about love Anita Padhye Book Pyaar Zindagi Haisakal

- जयंत रघुनाथ मराठे

प्रेम ही अगदी मनाच्या कोपऱ्यातून उमलणारी हळूवार भावना असली, तरी त्याचे प्रगटीकरण वेगवेगळ्या पद्धतीने होत असते. प्रेमाचे रंग जितके मनोहारी असतात तितकेच काही वेळा अत्यंत हिंसक आणि थरकाप उडावा अशा पद्धतीने व्यक्त होतात.

अर्थात, एकतर्फी प्रेमात असे घडते मात्र खऱ्या प्रेमात जोडीदाराची जाण राखली जाते. चित्रपटसृष्टीला गुन्हेगारी, विनोदी, कौटुंबिक विषय सतत प्रिय असतात; पण या सगळ्यांमध्ये प्रेमाचा विषय हिंदी चित्रपटसृष्टीला अगदी ऑक्सिजन वाटावा इतका जिव्हाळ्याचा असतो.

साधारणपणे हिंदी चित्रपटसृष्टीत दर दहा वर्षांनी एकतरी ट्रेंड सेट करणारा प्रेमपट येतोच येतो आणि तो सुपरडुपर हिट होत असतो. ‘एक दुजे के लिए’सारखा शोकांतिका असणारा प्रेमपट असो किंवा ‘मैने प्यार किया’सारखा वेगळे रेकॉर्ड नोंदविणारा चित्रपट असो, प्रेमपटाची मोहिनी त्याच्या निर्मात्याला आणि अर्थातच प्रेक्षकांना नक्कीच असते.

अनिता पाध्ये या चित्रपटविषयक लेखन करणाऱ्या प्रख्यात स्तंभलेखिका. त्यांनी ४० वर्षांतल्या प्रेमपटाचा अत्यंत सविस्तर असा वेध ‘प्यार जिंदगी है’ या पुस्तकात घेतला आहे. या पुस्तकाची प्रस्तावना हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कथा पटकथालेखक कमलेश पांडे यांनी लिहिली आहे.

‘तेजाब’, ‘चालबाज’, ‘सौदागर’, ‘खलनायक’ यांसारख्या चित्रपटांचे लेखन करणाऱ्या कमलेश पांडे यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत प्रेमपटाची खोली इथं अत्यंत मोजक्या शब्दांत समजावून सांगितली आहे आणि हे सांगताना पाध्ये यांचे पुस्तक किती वेगळे आहे आणि का महत्त्वाचे आहे हे सांगितले आहे.

हे सांगताना व पुस्तकातल्या मजकुराची स्तुती करताना कुठेही हात राखलेला नाही. ‘देवदास’ (१९५५) या प्रेमपटापासून ‘हम दिल दे चुके सनम’ (१९९९) या चित्रपटापर्यंत १२ चित्रपट पाध्ये यांनी या पुस्तकातून मांडले आहेत.

१९५० ते २००० या ५० वर्षांच्या कालखंडात समाज बदलला त्याचबरोबर प्रेमाची रीतही बदलली. मात्र प्रेमाची भावना आणि प्रेमात पडलेल्या नायक - नायिकांमधील एकमेकांमधील असोशी बदलली नाही. पाध्ये यांनी चित्रपटांची निवड करतानाच पहिली बाजी मारली आहे. पुस्तक गुणवत्तापूर्ण होण्याच्या कामातले पन्नास टक्के काम त्यांनी निवड करतानाच केले आहे.

त्यानंतर त्या प्रेमपटांची केवळ कथा न सांगता त्या चित्रपटाच्या निर्मितीची माहिती सांगून त्या चित्रपटात काय आहे, यावर केवळ भर न देता, त्यातील नेमकं काय आणि कसं साकारलं गेलं आणि प्रेक्षकांपर्यंत त्यातलं किती पोचलं यावर सगळा भर दिला आहे.

चित्रपटाकडे आपल्याकडे फार गांभिर्याने पाहिले जात नाही. चित्रपटविषयक लेखन म्हणजे फार संशोधन करावे लागत नाही. चुरचुरीत शैली किंवा दोन-चार किस्से, काही चुटके सांगून लेख उरकता येतो, असा काहींचा समज असतो. अशीच भावना वाचकांचीही काही वेळा असतो. मात्र या सगळ्यांच समज आणि गैरसमजाला हे पुस्तक तडा देते.

प्रेमाची भाषा म्हणजे प्रेमपटांची निर्मिती सांगताना अत्यंत अभ्यासपूर्ण आणि जास्तीत जास्त संदर्भ मिळवून येथे माहिती दिली आहे. मात्र ही माहिती देताना प्रेमभावनेतला गोडवा तसाच कायम राहतो. प्रेमातील वेदना आणि प्रेम साध्य होण्यासाठीचा संघर्ष म्हणजे काय, अर्थात प्रेमकथेतला हे भाव नेमके पडद्यावर कसे साकारले गेले आहेत याबद्दलची माहिती या पुस्तकातून मिळते.

प्रेमपटांची माहिती घेताना त्या चित्रपटांमधील वेगळे असे फोटो वेगळ्या विश्वात तर नेतातच; पण प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला काढलेली रेखाचित्रे खरोखरच चित्रपट पाहतानाच्या सुरुवातीच्या वेळेची आणि त्या वातावरणाची आठवण करून देतात. यातले फोटो पाहणे त्याच्या कॅप्शनमधून मिळणारी माहिती ही त्या चित्रपटांची आगळीवेगळी रंजक सफर ठरते.

चित्रपटाच्या निर्मितीबाबत किस्से सांगताना ‘बॉबी’ मध्ये नवा गायक शैलेंद्रसिंग याची निवड कशी झाली त्याची निवड होण्यापासून ते त्याच्या आवाजात ते गाणे रेकॉर्ड होईपर्यंतचा सगळा काळ त्यातल्या बारकाव्यानिशी त्या उभ्या करतात.

त्याच चित्रपटाची माहिती देताना या चित्रपटासंबंधीच्या पार्टीत शम्मीकपूर आणि फिरोझखान याचे दारुच्या अंमलाखाली कसे भांडण होते. त्या भांडणामुळे सगळ्या पार्टीवर कसा परिणाम होतो तेही कळते. चंदेरी पडद्यावरच्या या दुनियेतल्या अंधाऱ्या जगात काय आणि किती विचित्र गोष्टी घडतात याची कल्पना येते.

तिच बाब. महेश भट्ट दिग्दर्शित ‘आशिकी’ या चित्रपटाची. निर्माते गुलशनकुमार आणि भट्ट यांच्यात झाला वाद, संगीतकार नदीम- श्रवण यांची नाराजी अशी अनेक वळणं घेत हा चित्रपट पूर्ण झाला. प्रदर्शित झाल्यावर या चित्रपटानं काय आणि कसा इतिहास घडवला ते रसिक जाणतातच पण त्यामागचा रोचक इतिहास या पुस्तकातून कळतो.

हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेमपटांची वानवा मुळीच नाही; पण प्रत्येक दिग्दर्शक आपापल्या पद्धतीने प्रेमपटाची हाताळणी करीत असतो. अनिता पाध्ये यांनी त्या दिग्दर्शकाची शैली नेमकी ओळखून त्या चित्रपटाच्या निर्मिती संदर्भातले किस्से, तसेच त्या चित्रपटांची त्या काळात समाजात काय प्रतिक्रीया उमटली याचीही नोंद घेतली आहे.

प्रेमपटांचा महत्त्वाचा भाग म्हणजे रिपीट रन अर्थात चित्रपट दुसऱ्यांदा लागल्यावरही तितक्याच उत्साहाने प्रेक्षकांनी त्याला गर्दी करणे. या पुस्तकाच्या बाबतीत तसेच झाले आहे. वाचक या प्रेमपटाचा वेध घेणाऱ्या पुस्तकाच्या प्रेमात पडून पुन्हा-पुन्हा पुस्तक वाचत जाईल आणि तसतसा त्याला प्रेमाचा, प्रेमपटाचा अर्थ नव्याने गवसत जाईल.

पुस्तकाचं नाव : प्यार जिंदगी है

लेखिका : अनिता पाध्ये

प्रकाशक : देवप्रिया पब्लिकेशन्स, मुंबई (९९३०३६०००६)

ई-मेल : devpriyapublications@gmail.com

पृष्ठं : ३३० मूल्य : ६०० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com