केंब्रिजमधले ‘प्रॉक्‍टर’ आणि त्यांचे ‘बुलडॉग’ (जयंत नारळीकर)

‘प्रॉक्‍टर’ आणि त्यांचे ‘बुलडॉग’
‘प्रॉक्‍टर’ आणि त्यांचे ‘बुलडॉग’

पूर्वीच्या काळात ‘टाऊन’ म्हणजे केंब्रिज गाव आणि ‘गाऊन’ म्हणजे विद्यापीठातले गुरू-शिष्य यांच्यांत भांडणं, दंगे होत, तेव्हा स्वतःचे पोलिस नेमण्यास विद्यापीठांना राजाचं अनुमोदन मिळालं. विद्यापीठातल्या या पोलिस अधिकाऱ्यांना ‘प्रॉक्‍टर’ असं म्हटलं जातं आणि त्यांच्या सहायक कॉन्स्टेबलला ‘बुलडॉग’ म्हणून संबोधलं जातं. विद्यापीठात शिस्त राहावी, यासाठी केलेले नियम पाळले जात आहेत की नाही, याच्यावर लक्ष ठेवणं हे ‘प्रॉक्‍टर’ आणि ‘बुलडॉग’ यांचं काम.

१९६३ मधली गोष्ट. फेब्रुवारीत, म्हणजे ऐन हिवाळ्यात सूर्यास्त लवकर होऊन जाई. माझी नुकतीच केंब्रिजच्या प्रख्यात किंग्ज कॉलेजच्या फेलोशिपसाठी निवड झाली होती आणि त्यानुसार मी कॉलेजच्या आवारात राहायला सुरवात केली होती. हे कॉलेज १४४६ मध्ये इंग्लंडच्या राजानं, सहाव्या हेन्‍रीनं स्थापन केलं होतं. राजाश्रयानं बांधलेलं, केंब्रिज विद्यापीठाशी संलग्न असलेलं हे पहिलं कॉलेज. त्यासाठी निवडलेली जागा म्हणजे केंब्रिज शहराचा केंद्रबिंदू म्हणायला हरकत नाही. कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारापुढून जाणारा किंग्ज परेड नावानं ओळखला जाणारा लहानसा रस्ता देश-विदेशातल्या पर्यटकांना आकर्षित करतो. कॉलेजचं विशाल चॅपल केंब्रिजचं लॅंडमार्क समजलं जातं. हे बांधायला सहाव्या हेन्‍रीनं सुरवात केली; पण ते बांधून पूर्ण व्हायला आठव्या हेन्‍रीची राजवट उजाडली! आज सिनेट हाउस, युनिव्हर्सिटी चर्च आदींच्या इमारती या रस्त्याची शोभा वाढवतात... तर, अशा या प्रसिद्ध रस्त्यावर फावल्यावेळी चकरा मारायला मला आवडायचं.

त्या १९६३ च्या सायंकाळी किंग्ज परेडवर शतपावली करत असताना मला जाणवलं, की आसपास पळापळ सुरू झालीय! काही तरुण मुलं एका विशिष्ट जागेपासून दूर पळत आहेत. आपत्कालीन असं तिथं काय घडत आहे, हे जाणून घ्यायला मी तिकडं पाहिलं. तेव्हा मला जे दृश्‍य दिसलं ते केंब्रिज (आणि ऑक्‍स्फर्ड) वगळता इतरत्र दिसलं नसतं.
...टॉप हॅट घातलेले दोन तगडे पुरुष माझ्या दिशेनं पळत येत आहेत, असं मला दिसलं.
त्या वेळी एकूणच ब्रिटनमध्ये हॅट घालणं-पुरुषांच्या बाबतीत-कमी होत चाललं होतं. त्यातून टॉप हॅट घालणारे क्वचितच दिसत. मग हे लोक कोण होते? मी पण त्यांच्यापासून पळायला हवं होतं का?
सुदैवानं मी हा प्रसंग पहिल्यांदाच अनुभवत असलो, तरी तो मला अपरिचित नव्हता! त्यामागं केंब्रिज विद्यापीठाची दीर्घ परंपरा होती... सात शतकाहून लांबचा इतिहास होता...
***

ऑक्‍स्फर्ड-केंब्रिज विद्यापीठाची स्थापना बाराव्या-तेराव्या शतकात झाली. तो काळ ब्रिटनच्या इतिहासात मोठ्या लढायांचा नसला, तरी सामाजिक शांततेचाही नव्हता. ब्रिटनचा राजा आणि धार्मिक नेता पोप यांच्यात कुरबुरी किंवा वादावादी चालू असत; पण शाब्दिक वादांचं पर्यावसान हिंसाचारातदेखील होत असे, ही चिंतेची बाब होती.
खुद्द केंब्रिज विद्यापीठाची स्थापना अशा भांडणातून झाली. ऑक्‍स्फर्ड विद्यापीठातल्या अनेक विद्वानांना त्या विद्यापीठात असुरक्षित वाटल्यानं त्यांनी तिथून पलायन केलं आणि पूर्वेकडं कॅम नदीच्या काठी केंब्रिज विद्यापीठाची स्थापना केली.

पुढं परिस्थिती सुधारली, तरी ‘टाऊन’ आणि ‘गाऊन’ असे वाद चालू राहिले. ‘टाऊन’ म्हणजे केंब्रिज गाव आणि ‘गाऊन’ म्हणजे विद्यापीठातले गुरू-शिष्य यांच्यांत भांडणं, दंगे चालू राहिले. तेव्हा आत्मरक्षणासाठी स्वतःचे पोलिस नेमण्यास विद्यापीठांना राजाचं अनुमोदन मिळालं. वास्तविक बाहेरच्या समाजात शांती टिकवण्यासाठी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस नेमायची पद्धत नंतर अस्तित्वात आली. तरीसुद्धा पुष्कळ काळ असा गेला, जेव्हा विद्यापीठातल्या पोलिसांना गावातल्या लोकांनाही ताब्यात घेण्याचे, शिक्षा करण्याचे खास अधिकार दिले होते.

पण पुढं विद्यापीठाबाहेर सर्व नागरिकांसाठी पोलिस-न्यायाधीश यंत्रणा काम करू लागल्यावर विद्यापीठ पोलिसांचे अधिकार विद्यापीठापुरते मर्यादित केले गेले. तिचंच १९६३ मधलं स्वरूप म्हणजे विद्यापीठातले अधिकारी ‘प्रॉक्‍टर’ आणि त्यांचे सहायक कॉन्स्टेबल- ज्यांना पुष्कळदा ‘बुलडॉग’ म्हणून संबोधलं जातं. विद्यापीठात शिस्त राहावी, यासाठी केलेले नियम पाळले जात आहेत का नाही, याच्यावर लक्ष ठेवणं हे ‘प्रॉक्‍टर’ आणि ‘बुलडॉग’ यांचं काम!
***

विद्यापीठाचा एक नियम असा, की विद्यार्थ्यांनी सूर्यास्तानंतर रस्त्यावरून जाताना कपड्यांवर गाऊन परिधान केला पाहिजे. तसा ते करतात की नाही, हे पाहायला ‘प्रॉक्‍टर’ दोन ‘बुलडॉग’सह रस्त्यांवर फेऱ्या मारत असे. एखादा तरुण गाऊन न घालता सूर्यास्तानंतर रस्त्यावर फिरताना दिसला, तर त्याला थांबवून प्रश्‍न विचारायचा ‘प्रॉक्‍टर’ला  अधिकार होता. प्रश्‍न सोपाच. ‘‘तुम्ही विद्यापीठात विद्यार्थी आहात का?’’ उत्तर नकारार्थी असेल, तर तो तरुण गावातला किंवा बाहेरगावचा समजून ‘प्रॉक्‍टर’ त्याला सोडून देई. उत्तर होकारार्थी असेल, तर ‘प्रॉक्‍टर’ त्याला दुसऱ्या (कामाच्या) दिवशी आपल्या ऑफिसमध्ये अमुक वेळी हजर राहायला सांगे आणि सहा शिलिंग आठ पेंस (पौंडाचा तृतीयांश) हा दंड त्यानं त्या वेळी भरायचा हे पण ठरलेलं!
त्या सायंकाळी ‘प्रॉक्‍टर’च्या ‘बुलडॉग’नी मला थांबवलं आणि ‘प्रॉक्‍टर’ना पाचारण केलं. मी विद्यार्थी नसून एका कॉलेजचा ‘फेलो’ आहे हे कळल्यावर ‘प्रॉक्‍टर’नं मला थांबवल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि तो प्रसंग तिथंच संपला.

पण एखाद्या विद्यार्थ्याला दंड चुकवायचा असेल, तर तो पळत जाऊन एखाद्या कॉलेजच्या आवारात शिरत असे. ‘प्रॉक्‍टर’च्या ‘बुलडॉग’ना कॉलेजात शिरण्याची मनाई असे. अशा वेळी पळून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा पाठलाग करून त्याला पकडून आणण्याचा प्रयत्न ‘प्रॉक्‍टर’चे ‘बुलडॉग’ करत. त्यासाठी त्यांची नेमणूक करताना ते उत्तम पळणारे आहेत, याची खात्री केली जाई.

आता हा गाऊनचा नियम काढून टाकला आहे. पण त्यालादेखील अपवाद असतो. मला आठवतं, हा नियम काढल्यानंतर एक दिवस इंग्लंडची राणी एका समारंभासाठी केंब्रिजला भेट देणार होती. त्या दिवशी कुलगुरूंनी फतवा काढला. त्यात शिक्षक मंडळींना रस्त्यात फिरताना गाऊन घालायची ‘विनंती’ केली होती, तर विद्यार्थ्यांना रस्त्यात फिरताना गाऊन घालायची ‘आज्ञा’ केली होती. म्हणजे त्या दिवसापुरतं ‘प्रॉक्‍टर’ लोकांचं काम वाढलं!

याशिवाय ‘प्रॉक्‍टर’ विद्यापीठाच्या औपचारिक समारंभात भाग घेतात. ‘डिग्री’ देताना ‘प्रोसेशन’ असतं- त्याची योजना त्यांच्याच हाती असते. परीक्षेत कोणी फसवाफसवी (कॉपी करणं, परीक्षेत पुस्तक बाळगणं आदी) केली, तर अशा गोष्टींची दखल घेणं ‘प्रॉक्‍टर’ लोकांच्या हाती असतं. अशा कामासाठी प्रत्येक कॉलेज क्रमाक्रमानं आपल्या स्टाफवरच्या शिक्षकांना वर्षाच्या ‘डेप्युटेशन’वर पाठवतं. थोडक्‍यात विद्यापीठ सुरळीतपणे चालावं, यासाठी ‘प्रॉक्‍टर’ आणि त्यांचे ‘बुलडॉग’ महत्त्वाची भूमिका बजावतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com