अशी बोलते माझी कविता (जयश्री हरी जोशी)

जयश्री हरी जोशी, मुंबई, snehjayam@gmail.com, ९८६९०८००७३
रविवार, 18 डिसेंबर 2016

समई गे माये!

समई गे माये!

समई गे माये तुझे स्निग्ध डोळे
वातींच्या देठांना प्रकाशाचे कळे
पापणीच्या तळी काजळी धरते
भिजलेली माया ज्योतीत झरते  
 
चंदनाचे खोड झिजू झिजू झाले
सहाणेच्या पोटी गंध निजू आले
गंधगर्भ थेंब एक एक तारा
रात्रीच्या ओटीत उगाळला पारा
 
हळदीच्या डोई कुंकवाची छाया
अक्षतांची रंगे ताम्हनात काया
रांगोळीची कथा रंगे वृंदावनी   
तुळस शोधते सावळासा धनी
 
खुलभर दूध नैवेद्याची वाटी
जन्माची तहान नदीतीराकाठी
अज्ञातशा वाटा मनात चालाव्या
ओठातल्या गोष्टी पोटात घालाव्या
 
रेशमाचा कद काठाशी विरला
दारातून कुणी माघारा फिरला
त्याच्याकडे स्तब्ध बघतात भोळे
समई गे माये, तुझे स्निग्ध डोळे

Web Title: jayashree joshi's poem in saptarang

टॅग्स