उद्योगातल्या प्रेरणादायी कथा ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Book Tata Stories

टाटा उद्योगसमूहाबद्दल उत्सुकता नाही आणि तेथील दिग्गज व्यक्तिमत्त्वांबद्दल, त्यांनी जोपासलेल्या मूल्यांबद्दल आदर नाही असा माणूस भारतात शोधूनही सापडणार नाही.

उद्योगातल्या प्रेरणादायी कथा !

टाटा उद्योगसमूहाबद्दल उत्सुकता नाही आणि तेथील दिग्गज व्यक्तिमत्त्वांबद्दल, त्यांनी जोपासलेल्या मूल्यांबद्दल आदर नाही असा माणूस भारतात शोधूनही सापडणार नाही. आंतरराष्ट्रीय क्षितिजावर देशाला मानाचं स्थान मिळवून दिलेला हा जागतिक पातळीवरील उद्योगसमूह आपली दर्जेदार उत्पादनं आणि सामाजिक मूल्यांची जोपासना यांसाठी ओळखला जातो.

दीडशे वर्षांहून अधिक काळाची परंपरा लाभलेल्या टाटा समूहाने भारतीय उद्योगविश्वाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका साकारली. पोलादनिर्मिती, वाहन सेवा, हवाई सेवा, माहिती तंत्रज्ञान यांसारख्या अनेक मूलभूत उद्योगांची पायाभरणी केली. याच टाटा उद्योगसमूहातील उच्चपदस्थ व्यवस्थापक, टाटा सन्सचे ब्रँड कस्टोडियन हरीश भट यांनी चोखंदळपणे चाळीस कथांची निवड करून लिहिलेलं हृद्य पुस्तक म्हणजे, ‘टाटा स्टोरीज. टाटा उद्योगसमूहाचे विद्यमान अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी म्हटलं आहे, ‘टाटा समूहाचा समृद्ध इतिहास आणि वारसा हरीश भट यांनी या पुस्तकात वर्णन केलेल्या संस्मरणीय कथांमधून जिवंत होतो. राष्ट्र उभारणीच्या आणि नवीन पाया रचणाऱ्‍या या कथा आपल्या सर्वांसाठी आयुष्यातील महत्त्वाचे धडे देतात.’

जागतिक स्तरावर नानाविध उद्योगांत आघाडीवर असणारा टाटा समूह देशाच्या विकासाचा ध्यास घेऊन आरोग्य, शिक्षण, रोजगार, प्रशिक्षण, कला व संस्कृती अशा विविध माध्यमांतून सामाजिक कार्यातही भरघोस योगदान देण्यात सातत्याने अग्रेसर आहे. ‘जे भारतासाठी उत्तम तेच टाटांसाठी!’ ही उक्ती प्रत्यक्षात आणणाऱ्‍या टाटा समूहाचा भारतीयांना सार्थ अभिमान आहे.

कॉर्पोरेट जगताच्या चौकटीतील शिस्त पाळताना मानवतेच्या भावनांचा, मूल्यांच्या जोपासनेचा उत्सव साजरा करणाऱ्‍या या साध्या पण प्रभावी कथा आहेत. मानवी आत्म्याच्या, प्रेमाच्या, यशापयशाच्या, उत्कटतेच्या आणि उदात्त हेतूंचा गाभा असणाऱ्‍या या कथा वाचकांना मनोरंजक वाटतील आणि त्यांच्या मनावर कधीही न मिटणारी छाप पाडतील, त्यांचं जगणं अधिक समृद्ध करतील. जीवनात अडचणी, आव्हानं येणारच; परंतु आपली मूल्यं जपत त्यावर मात करून आयुष्यात यशस्वी कसं व्हायचं हे शिकवतील.

इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्ष सुधा मूर्ती पुस्तकाविषयी म्हणाल्या, ‘माझ्या तरुण वयातच टाटा समूहामध्ये कारकीर्द सुरू करण्याचं भाग्य मला लाभलं. माझ्या मनात नेहमीसाठी विशेष स्थान प्राप्त केलेल्या दिग्गज अशा टाटा जगताच्या स्मरणयात्रेवर घेऊन जाण्यास हे पुस्तक तुम्हाला निश्चितपणे मदत करेल.’

गुणवान व्यक्तींना सातत्याने संधी देऊन टाटा समूहाने व्यावसायिक जगतातले अनेक दिग्गज घडवले. वेळोवेळी समूहाची धुरा सांभाळणाऱ्‍या तत्कालीन नेतृत्वाचं योगदान आणि त्या मुशीतून घडणाऱ्‍या व्यक्तिमत्त्वांनी केलेलं अजोड कार्य यांचं वेधक चित्रण या पुस्तकात आहे. त्याचबरोबर यात आहेत टाटा समूहाने निर्माण केलेल्या कित्येक महत्त्वपूर्ण संस्थांच्या उभारणीच्या अनवट कथा. टाटा समूहाची नीतिमूल्यं, विचारसंस्कृती, देशप्रेम, व्यवसाय उभारणीच्या कार्यपद्धती, सामाजिक उत्तरदायित्व असे अनेक पैलू उलगडणारं हे पुस्तक महत्त्वाचं आहे. टाटा समूहाच्या जडणघडणीच्या या कथा म्हणजे अनेक पिढ्यांसाठी अनमोल ठेवा आहेत.

जाताजाता सहज मनात एक प्रश्न येऊन गेला की, आपण अशा प्रेरक कथा का वाचाव्यात? मला असं वाटतं, की प्रेरणादायी वाचन आपल्याला स्वप्नं बघायला शिकवतं, जगाची वेगळ्याप्रकारे ओळख करून देतं, त्यामुळे समानुभूती आणि समज स्पष्ट होतात. आपले विचार दृढ आणि परिपक्व होण्यास मदत होते. या वाचनाने आयुष्यात असे धडे शिकायला मिळतात की, अन्यथा आपण ते शिकलो नसतो. आपलं भवितव्य घडवताना या कथांमधील परिपक्व दृष्टिकोन आपल्याला उपयोगी ठरतो, त्यामुळे आपली दृष्टी व्यापक बनते.

या पुस्तकाचे अनुवादक व्यंकटेश अनंत उपाध्ये यांनी हा अनुवाद कौशल्याने केला आहे. टाटा उद्योगसमूहाची मूल्यं, भारताच्या विकासासाठी त्यांची तळमळ आणि योगदान यामुळे हे पुस्तक मराठी तरुण उद्योजक आणि व्यावसायिकांना नक्कीच प्रेरणा देईल याची खात्री वाटते.

पुस्तकाचं नाव : टाटा स्टोरीज

लेखक : हरीश भट

अनुवाद : व्यंकटेश अनंत उपाध्ये

प्रकाशक : साकेत प्रकाशन, पुणे, औरंगाबाद (०२०- २४४३८८९२,

०२४०- २४४३६६९२)

पृष्ठं : २२४, मूल्य : २९९ रुपये

Web Title: Jayprakash Zende Writes Book Tata Stories

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Booksaptarang
go to top