
जगातील पाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ऑस्ट्रेलियातील एक महिला मिना गुली जगभरात ‘रन ब्ल्यू’ या मोहिमेअंतर्गत मॅरेथॉन करीत आहेत.
पाण्यासाठी धावा!
जगातील पाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ऑस्ट्रेलियातील एक महिला मिना गुली जगभरात ‘रन ब्ल्यू’ या मोहिमेअंतर्गत मॅरेथॉन करीत आहेत. २२ मार्चला अर्थात जागतिक जलदिनी त्यांची २०० वी मॅरेथॉन न्यूयॉर्क येथे होणार आहे. संयुक्त राष्ट्रांची पाणी परिषद त्याच दिवशी तिथे होत आहे. जगभरात पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे, हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या समस्या मिना गुली तिथे मांडणार आहेत. सुमारे ४५ वर्षांनंतर पाणी या विषयावर ही परिषद होत आहे. त्यानिमित्त मिना गुली यांनी त्यांच्या जगभरच्या मॅरेथॉन मोहिमेविषयी खास ‘सकाळ’शी संवाद साधला...
उझबेकिस्तानातील अरल समुद्र आता नामशेष झाला आहे. वैराण पसरलेल्या वाळूमध्ये आता केवळ जहाजांचे जुनेपुराणे, गंजलेले सांगाडे दिसून येतात. याच्या आजूबाजूच्या वस्तीतल्या लोकांच्या आता केवळ आठवणी उरल्या आहेत. सुमारे ४५-५० वर्षांपूर्वी हे लोक समुद्रात मासेमारी करीत असत. आज इथे केवळ वाळवंट उरले आहे. पाण्याअभावी इथल्या लोकांच्या जीवनावर अनेक विपरीत परिणाम झाले आहेत. येथील जलचरसृष्टीही संपुष्टात आली. या परिसरातील पाणी धोकादायक बनले आहे, लोकांना किडनीचे, फुप्फुसाचे विकारही मोठ्या प्रमाणावर दिसून येतात...
मेक्सिको शहर आता खचत चालले आहे... पाण्याचा अति उपसा केल्यामुळे हे होत आहे. भूजल साठ्याचा जास्त प्रमाणात वापर केल्यामुळे भूजैविक परिमंडळाचा तोल ढळला आहे आणि आता तिथली घरेच्या घरे, इमारती खचत चालल्या आहेत. सुमारे १०० मीटरपेक्षा जास्त खोल जमिनीतील पाण्याचा उपसा केल्यामुळे ही स्थिती ओढवली आहे. भूकंपाप्रमाणे इथली घरे, रस्ते, पायाभूत सुविधा मोडकळीस येत आहेत. डोळ्यासमोर एक शहर असे वैराण होत आहे...
बोलिव्हियातील सर्वात मोठा पोपो तलाव आता पूर्णपणे सुकून गेला आहे. १९८६ मध्ये तो तेथील सर्वात मोठा मानला जात होता. सुमारे १३५० चौरस मैल जमीन व्यापलेल्या या तलावात आता केवळ बोटींचे अवशेष दिसतात. या तलावाशेजारी असलेले समाजजीवन, जलजीवन आता उद्ध्वस्त झाले आहे...
जगप्रसिद्ध मृत समुद्राची पातळी गेल्या काही वर्षांत कमी कमी होत चालली आहे. १९६० पासून याला सुरुवात झाली असावी. दर वर्षी सुमारे चार फूट त्याची पातळी कमी होते. हवामान बदलाने ही धोक्याची घंटा दिली आहे...
अॅमेझॉन हे जगातील सर्वात मोठे जंगल आता कमी कमी होत चालले आहे. सुमारे तीन लाख मैल व्यापलेले हे वनक्षेत्र आता जंगलतोड, वणवे आणि तापमान वाढीमुळे संपत चालले आहे. २०२१ मध्ये यापैकी ५,११० मैल वनक्षेत्र नामशेष झाले आहे. जगाच्या पर्यावरणावर गंभीर परिणाम करणारी ही बाब आहे...
जागतिक तापमान वाढीचे हे सर्व परिणाम आहेत. मिना गुली यांनी या सर्व परिणामांचे मूळ पाण्यात आहे आणि तेच वाचवले पाहिजे, त्याला जपले पाहिजे, हा संदेश देण्यासाठी जगभरात मॅरेथॉन सुरू केली आहे. येत्या २२ मार्चला अर्थात जागतिक जलदिनी त्यांना २०० वी मॅरेथॉन पूर्ण करायची आहे. आपल्या धावण्यातून त्यांना जगाला ‘पाणी वाचवा’ हा संदेश द्यायचा आहे. पाणी हे केवळ जीवन नाही, ती एक अर्थव्यवस्था आहे, समाज आहे, शेती आहे, असे मिना गुली म्हणतात. मिना गुली या मूळच्या ऑस्ट्रेलियातल्या. मेलबर्नच्या एका उपनगरात सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
सुमारे दहा वर्षांच्या दुष्काळ त्यांनी तेव्हा अनुभवला होता. त्यामुळेच पाणी वाचवण्याच्या अनेक उपायांवर चर्चा ऐकल्या होत्या. तेव्हापासून पाणी हा गंभीर विषय आहे, हे त्यांना समजले होते. १९९३ मध्ये त्या विद्यापीठात विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या. तिथूनच त्यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली. पदवीनंतर त्यांनी काही काळ वकील म्हणून काम केले. १९९९मध्ये त्या सिडनी फ्युचर एक्स्चेंजमध्ये रुजू झाल्या. तिथे त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या कार्बन उत्सर्जन प्रकल्पावर काम केले. जागतिक बॅंकेत गुली यांना चीन, भारत, नेपाळ, इंडोनेशियातील कार्बन व्यापारावर काम करण्याची संधी मिळाली. नंतर पुन्हा त्यांनी चीनमधील अक्षय ऊर्जा आणि हवामान बदल यावर काम सुरू केले.
याच विषयात काम करताना त्यांना त्यातील गांभीर्य लक्षात आले आणि मग जलसंवर्धनावर काम करणारी थर्स्ट ही संस्था स्थापन केली. यात त्यांचा भर प्रामुख्याने तरुणांवर होता. त्यांच्यात पाण्याबाबत जागृती निर्माण करण्याचे त्यांनी ठरवले होते. जगातील पाण्याची समस्या ही दिसत नाही. त्यामुळेच ती कोणाच्या प्राधान्यक्रमावर नाही. ना राजकीय नेत्यांच्या, ना सरकारांच्या, ना नागरिकांच्या. लोकांना वाटते की पाणी नळातून येते. पण नदी, पाणथळ जमिनी, तलाव यात त्याचा उगम आहे आणि तेच राखले पाहिजे, त्याचे संरक्षण केले पाहिजे. भविष्यातील पिढ्यांसाठी तरी जलसंवर्धनाने गांभीर्य ओळखा, असे मिना सांगतात. दक्षिण आफ्रिकेतील ऑरेंज नदीच्या वाळवंटात मिना उभ्या असताना त्यांना या जलसंवर्धनाची गरज जास्तच प्रकर्षाने जाणवली. ऑरेंज नदी कधीकाळी दुथडी वाहत होती. आता तिची पातळी वेगाने कमी होत आहे. आता ती चालतही ओलांडता येते. हा सर्व हवामान बदल आणि पाण्याच्या अतिउपशाचा परिणाम असल्याचे मिना अधोरेखित करतात.
पाणीसमस्येबाबत त्यांनी शेतकरी, महिला, मुली अशा अनेकांशी संवाद साधला आणि त्यांच्याकडून माहिती घेतली. तरुणाईपर्यंत पोचण्यासाठी त्यांना मॅरेथॉनची कल्पना सुचली. पाणीटंचाईबाबत जागृतीसाठी त्यांनी एकदा १०० दिवस १०० मॅरेथॉन करण्याचे ठरवले; पण ६३ व्या दिवशी पाय दुखावल्यामुळे त्यांना हा संकल्प अर्धवट सोडावा लागला. मुळात लहानपणीच त्यांना पोहताना दुखापत झाल्यामुळे आता धावणे शक्य नाही, असे डॉक्टरांनी सांगितले होते; पण मिना यांचा विश्वास दुर्दम्य असल्यामुळे त्यांनी हे शक्य केले आहे.
जगभरात कोट्यवधी लोक अजूनही स्वच्छता, पाण्यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यात दुष्काळ, पूर आणि प्रदूषणाच्या समस्येने भर घातली आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार येत्या दहा वर्षांत सध्या असलेल्या मागणीपेक्षा ४० टक्के पाण्याची मागणी वाढेल. त्यामुळे जगभरात भीतीदायक स्थिती निर्माण होईल. सध्याच अनेक शहरे, गावे निर्मनुष्य होत आहेत. पाण्याअभावी रखरखीत शेते, जमिनी दिसतात. हवामान बदलाचे भीषण परिणाम आहेत हे आणि ही स्थिती आपण बदलू शकतो, किमान तसे प्रयत्न करू शकतो, असे मिना सांगतात.
संयुक्त राष्ट्रांचे शाश्वत विकासाचे उद्दिष्ट २०३० पर्यंत गाठायचे आहे. त्याअंतर्गत सर्वांना पाणी मिळणे यावर सर्व लक्ष केंद्रित केले पाहिजे. जगभरात मॅरेथॉन केल्यानंतर मिना यांना अनेक अनुभव आले. अनेक ठिकाणी भीषण स्थिती पाहायला मिळाली. कॅलिफोर्निया, मेक्सिकोमध्ये भूजलाचा अतिउपसा केल्याचे परिणाम दिसत आहेत. कोलोराडो, दानुबे, ऱ्हाईन नद्यांची पातळी ऐतिहासिक घटली आहे. अरल समुद्र, तूझ तलाव सुकत चालले आहेत. ओकावांगो, पॅंटानल येथील पाणथळ जमिनी धोक्यात आल्या आहेत. अनेक देशात महिला आजही स्वच्छ पाण्यासाठी वणवण करीत आहेत.
भारतात गंगा नदीचे प्रदूषण ही धोक्याची घंटा आहे, असे मिना गुली सांगतात. भारतभेटीत त्यांनी गंगेच्या किनारी मॅरेथॉन केली आणि तेथील अनेक लोकांशी चर्चा केली. स्वच्छ पाणीपुरवठा आणि नदीप्रदूषण या मुद्द्यांवर सरकारने तातडीने पावले उचलली पाहिजेत. राजकीय अजेंड्यावर हा मुद्दा घ्यायला हवा. शेती, उद्योग आणि घरगुती वापर या सर्वांनीच पाण्याचा वापर जपून करायला हवा. शिवाय दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळेच पाण्यासाठी पायाभूत सुविधा, जल व्यवस्थापन आणि नदी-तलाव-पाणथळ जागांचे संवर्धन या बाबींकडे तातडीने लक्ष देण्याची गरज मिना गुली व्यक्त करतात.
दुष्काळाचे प्रश्न फार काळ लोकांच्या लक्षात राहत नाहीत. पाऊस पडला की ते मागे पडतात. गेल्या वर्षी युरोपात दुष्काळ होता; पण पाऊस झाल्यानंतर लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. भविष्यात दुष्काळी स्थिती येऊ नये, यावरही काही झाले नाही. हवामान बदल हा जलसंकट आणणारा आहे, वातावरणाला धोका म्हणजे पाण्याला धोका, हे लक्षात घेऊन जगभरातील सरकारांनी पावले उचलायला हवीत, त्या समस्येसाठी तयार राहायला हवे. शेवटी पाणीच आपल्याला खाद्य पुरवणार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. काळाची गंभीर पावले ओळखा, असे गुली कळकळीने सांगतात.
केवळ प्रश्न मांडून उपयोग होत नाही, त्यावर काही उपाययोजनाही कराव्या लागतात. मॅरेथॉनदरम्यान मिना अनेक तज्ज्ञांना, संशोधकांना भेटल्या. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कमी पाण्यात घेता येतील, अशी पिके शोधणारे भेटले. काही तरुणांचे गट स्वतःहून नदी, तलावांचे संवर्धन करीत आहेत. काही उद्योजक, राजकीय नेते यात पुढाकार घेताना दिसले. ते त्यांच्या पातळीवर काम करत आहेत. जगभरात लोक उपाययोजना करीत आहेत; पण त्याबाबत मोठ्या प्रमाणावर जागृती करणे गरजेचे आहे आणि महत्त्वाचे म्हणजे वेळ कमी आहे, त्यामुळे घाई करणे आवश्यक आहे, हे प्रयत्न वाढविले पाहिजेत, त्यांची व्यापकता वाढवली पाहिजे, असे मिना सांगतात.
जगभरातील सरकारांनी वेगाने पावले उचलावीत, अशी मिना यांची अपेक्षा आहे. किमान तीन मुद्द्यांचा अभ्यास करून कामाला सुरुवात करावी. पहिला मुद्दा, पाण्याचा धोका किती आहे, त्याची कारणे काय आहेत. दुसरा मुद्दा, आपण सध्या कुठे आहोत आणि आपल्याला कोणते उद्दिष्ट गाठायचे आहे. तिसरा मुद्दा, सद्यस्थिती आणि उद्दिष्ट यांच्यातील दरी मिटवण्यासाठीची धोरणे आखणे. याद्वारे आपण या पाणीप्रश्नाच्या उपाययोजनेला सुरुवात करू शकतो, असे मिना यांना वाटते.
मिना यांच्या मॅरेथॉनला ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद मिळाला, तो उत्स्फूर्त होता. ताजिकिस्तानमध्ये संपूर्ण गावच्या गाव मिना यांना भेटण्यासाठी लोटले. अनेक ठिकाणी लोक स्वतःहून त्यांच्याबरोबर धावायला सुरुवात करतात; पण केवळ इथेच त्यांना थांबायचे नाही. पाणीसमस्येवर जगभरात काम सुरू झाले, तरी पुढील पाच-दहा वर्षांत आपण काही तरी चांगले करण्याच्या मार्गावर पोचलेले असू, असा विश्वास मिना गुली यांना वाटतो.