शुभ्र कपड्यातले नरकासुर

एका साध्या निम्नमध्यमवर्गीय व्यक्तीमध्ये आणि आपल्यामध्ये अंतर असते ते फक्त एका जबाबदारीचे, लोकप्रतिनिधींनी ते जोखायला हवे
Rahul Gadpale writes Sakal Article
Rahul Gadpale writes Sakal Article

सत्तेच्या सारीपाटावर सर्वसामान्यांच्या सुखस्वप्नांची धोरणे राबविणाऱ्या लोकप्रतिनिधींना सार्वजनिक ठिकाणी आपल्यासोबत मतदारही असतात, याचे भान नसते. आपणच बनवलेले नियम पायदळी तुडवताना त्यांना काहीही वाटत नाही. याचाच प्रत्यय अलीकडेच एका रेल्वे प्रवासात आला. वस्त्रे शुभ्र असली तरी कृतीतून करंटेपणाच प्रतीत होत असेल तर काय करायचे त्या पांढऱ्या पोशाखाचे? एका साध्या निम्नमध्यमवर्गीय व्यक्तीमध्ये आणि आपल्यामध्ये अंतर असते ते फक्त एका जबाबदारीचे, लोकप्रतिनिधींनी ते जोखायला हवे. पुन:पुन्हा तपासून पाहायला हवे. नाहीतर रेल्वेच्या त्या कोंदट डब्यात घर करून बसलेला कुबट दुर्गंध राजसत्तेच्या बुद्धिकोशात शिरेल आणि शेवटी उरेल तो केवळ राजकीय बुभुक्षितपणाचा नरकातला कोंडवाडा...

धारण दहा-बारा वर्षांपूर्वी मुंबईत बातमीदारीच्या निमित्ताने दररोज प्रवास करावा लागायचा. एक दिवस मी आणि माझ्या कार्यालयातील सहकारी पूजा नाईक चर्चगेटहून वांद्र्याकडे जात होतो. मुंबई लोकलच्या द्वितीय श्रेणीच्या डब्यातून आम्ही प्रवास करीत होतो. रोजची बातम्यांची धावपळ, त्यात टॅब्लॉईट वर्तमानपत्रामधील चवीचे विषय चघळत होतो. आमच्या अगदी समोरच्या बाकावर साधारणपणे चाळिशीतील एक महिला आपल्या दोन लहान मुलांसोबत प्रवास करत होती. तिची दोन्ही मुले पाकिटांमधला खाऊ खात होती. तेवढ्यात एका मुलाच्या पाकिटातील खाऊ संपला आणि त्याने ते पाकीट रेल्वेच्या डब्यातच भिरकावून दिले. सोबत असलेल्या पूजाने अगदी सहजतेने ते पाकीट उचलले आणि तिच्या बॅगेत बाटली ठेवायची जागा असते तिथे कोंबले. पूजाच्या या अॅक्शनमुळे समोरची महिला चांगलीच गोंधळात पडली. यातून या बाईंनी नेमके काय साधले, असे प्रश्नार्थक भाव तिच्या चेहऱ्यावर दिसत होते. तोपर्यंत त्या महिलेच्या दुस ऱ्या मुलीच्या हातातला खाऊ मात्र संपलेला नव्हता. त्यामुळे ती महिला चांगलीच गोंधळली आहे, हे माझ्या लक्षात आले. आमच्या दृष्टीने ही सहज कृती होती.

याआधीसुद्धा आमच्यातल्याच एका सहकाऱ्याला आमच्याच मित्राने धूम्रपान केल्यानंतर चॉकलेट खाऊन त्याचे रॅपर फेकताना पाहिले. तेव्हा या पठ्ठ्याने ते रॅपर उचलून आपल्या खिशात घातले आणि पुढे चालू लागला. नंतर तो मित्र त्याच्या मागे जात त्याची माफी मागत होता. त्यामुळे आमच्यासाठी तरी ही गोष्ट फारशी नवलाईची नव्हती. पूजाच्या वागण्याने ती महिला मात्र पुरती बुचकळ्यात पडली होती. दरम्यान तिच्या मुलीनेही पाकिटातल्या खाऊचा फडशा पाडला आणि ते रिकामे पाकीट तिच्या आईच्या हातात दिले. आता काय करावे, ते त्या महिलेला कळेना. दोन-चार क्षण विचार केल्यावर अगदी कोमेजल्या चेहऱ्याने तिने पूजाला विचारले, तुम्हाला हे पण हवंय का?

पूजाला काय व्यक्त व्हावे ते कळेना. शेवटी तिने ते दुसरे पाकीटही घेतले आणि आपल्या बॅगेत ठेवून दिले. आम्ही दोघंही एकमेकांकडे पाहत होतो. पण व्यक्त होता येत नव्हते, कारण त्या महिलेच्या वागण्यात कमालीचा निरागसपणा होता. सार्वजनिक वाहतूक सेवा आपली सर्वांची असते. सर्वसामान्य नागरिक म्हणून ती स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपलीदेखील असते, आदी गोष्टींचा तिला गंधही नव्हता. त्यामुळे आम्ही तेथे काहीच व्यक्त झालो नाही. गाडीतून उतरल्यानंतर मात्र आम्ही दोघंही मनमुराद हसलो… पूजा ही त्यावेळी नुकतीच पत्रकारितेचे शिक्षण घेऊन वर्तमानपत्राच्या कार्यालयात रुजू झालेली एक नवखी तरुणी होती. पत्रकारितेसोबतच तिच्यातल्या सामाजिक संवेदनाही जागृत होत्या. त्यामुळे तिच्या हातून सहजपणे अशी कृती होत असावी. त्या तुलनेत वयाच्या चाळिशीपर्यंत आलेल्या त्या महिलेला मात्र त्या विषयाचा गंधही नव्हता. कदाचित तो येण्यासाठी आपल्या आजूबाजूची सामाजिक शिक्षण प्रणाली असावी लागते, तेवढी तिच्या आजूबाजूची परिस्थिती सजग नसावी.

म्हणूनच कदाचित तिला तो विषय कळलाही नाही. तसे ते कळण्याचे कारणही नाही. पण ही घटना आमच्यासाठी एक किस्सा म्हणून कायम स्मरणात राहिली. पण तरीदेखील त्या महिलेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करावे, असे मला कधी मनातल्या मनातही वाटले नाही. कारण त्याला ती नाही तर समाज म्हणून आपण स्वतः जबाबदार आहोत. मूल्यशिक्षण, समाजशास्त्र या गोष्टींना आपल्याकडे केवळ पुस्तकात जागा आहे. खऱ्या आयुष्यात मात्र सर्वत्र फक्त कचराच कचरा आहे, असे मला कायम वाटते, जाणवत राहते.

आज इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच या प्रसंगाबद्दल लिहावेसे वाटले त्याला कारण आहे…हीच नव्हे अशा स्वरूपाच्या अनेक घटना पुन्हा एकदा मी रेल्वे प्रवासात पाहिल्या, अनुभवल्या. तुम्हीही त्या पाहिल्या असतील; कदाचित केल्याही असतील, कारण त्यात वेगळं काही आहे, असे आपल्याला वाटत नाही. पण मी परवा अनुभवलेल्या घटनांमधील पात्रांमुळे मला त्याची दखल घ्यावीशी वाटते. कारण त्या चाळिशीतल्या सर्वसामान्य बाईंइतकी ही पात्रं निरागस नव्हती. ते तुमचे आमचे प्रतिबिंब होते. त्यात मला मी दिसलो, तुम्ही दिसलात, आपण सगळे दिसलो. आपले भूत, भविष्य आणि वर्तमानही दिसले. आपला समाजही दिसला… पण त्यातले समाजभान दिसले नाही. कारण ती पात्रं आपले प्रतिनिधित्व करणारी होती. त्यामुळे त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभंही करायला हवंय आणि शब्दांचे आसूडही ओढायला हवेत. त्याचा त्यांच्यावर कितपत परिणाम होईल माहीत नाही. पण आत्मसमाधानाचे राक्षसी म्हणा हवे तर ते सुख मिळवायलाच हवे…

पत्रकारांच्या एका कार्यशाळेच्या निमित्ताने अमरावतीमधील पत्रकार संघटना आणि अमरावती विद्यापीठाकडून बोलावणे आले होते. त्या कार्यशाळेकरिता गेल्या शनिवारी मी मुंबईहून अमरावतीला गेलो होतो. दुसऱ्या दिवशी रविवारी सायंकाळच्या अमरावती-मुंबई गाडीने परत जाण्याचे नियोजन होते. मात्र अधिवेशनामुळे गाडीत आमदार आणि मंत्र्यांची गर्दी होती. शिवाय त्याच दिवशी अमरावतीतील राणा दाम्पत्याने दहीहंडीचे आयोजन केले होते. एका आमदाराचे लग्न होते. सोमवारी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन असल्यामुळे आमदार आणि मंत्र्यांना तातडीने मुंबईला पोहोचणे गरजेचे होते. त्यांच्यासाठी म्हणून गाडीला अतिरिक्त डबाही जोडलेला होता. प्रवासात आम्ही दोघे होतो, तिकीट मात्र एकच कन्फर्म झाले होते. दुसरे आरएसी असल्यामुळे बेभरवशाचे होते. गाडी येण्याच्या अर्धा तास आधीच आम्ही स्थानकात पोहोचलो. अमरावती जन्मगाव असल्यामुळे साहजिकच सोबत मित्रमंडळींचा गोतावळा होता (सारे पत्रकार). एकेक आमदार येत होते. त्यांच्या सोईसाठी त्यांच्या सहायकांची धावपळ चालली होती.

त्यांच्या बॅगा उचलणारे, पुष्पगुच्छ घेऊन भेटायला येणारे अशा लोकांची गर्दी होती. ही सगळी घाईगडबड पाहत आम्ही फलाटावर उभे होतो. तेवढ्यात समोरून एका माणसाला पोलिस धरून आणताहेत, असे दिसले. फलाटावर आमचा डबा थोडा दूर असल्यामुळे फारसा प्रकाश नव्हता. प्रथमदर्शनी कुणीतरी आरोपी गाडीत येतोय की काय असे वाटले. कोण असेल याचा अंदाज घेण्यासाठी माझ्यासोबतचे एक स्थानिक पत्रकार पुढे गेले. ती व्यक्ती कोण आहे ते कळले. त्याच्या पुढे जाऊन चित्रीकरण करतील तेवढ्यात सोबतच्या पोलिसाने त्यांना हटकले. चित्रीकरण करू नका अशी विनंती केली. नाईलाजाने त्यांना बाजूला व्हावे लागले. तोवर दुसऱ्या बाजूने डब्यात शिरलेल्या एकाने चित्रीकरण केलेच. एक पोलिस आणि एक सहायक ज्या व्यक्तीला पकडून नेत होते ते होते अमरावती जिल्ह्यातील आमदार. त्यांनी कुठलाही गुन्हा केला नव्हता, फक्त त्यांना जास्त झाली होती. त्यामुळे त्यांना चालताही येत नव्हते. हे एक दुर्गम भागातून निवडून आलेले अपक्ष आमदार होते. गाडीत शिरताच ते थेट आडवे झाले आणि निवांत झोपी गेले.

याच गडबड गोंधळात अखेर गाडीने अमरावती स्टेशन सोडले. आम्ही आमच्या जागेवर जाऊन बसलो. आत इकडे तिकडे चोहीकडे पांढऱ्या कपड्यांमधली माणसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची गडबड सुरू होती. काही जण आपली तिकिटे कन्फर्म करण्यासाठी तिकीट तपासनीसांच्या मागेपुढे करत होती. मीदेखील माझे तिकीट दाखवले. ते म्हणाले, ‘‘जागा झाली की सांगतो. तोवर बसा; मात्र आज फार कठीण परिस्थिती आहे.’’ मी बसलो होतो तेवढ्यात आणखी एक महाशय झोकांड्या देत माझ्या बाजूने शौचालयाकडे गेले. ते परतले तेव्हा कळले, हे कायम इच्छुकांच्या यादीत असलेले शिवसेनेतले एक नाव. मध्यंतरी ते दुसरीकडे गेल्याचेही कळले होते. आता ते कुठे आहेत, माहीत नाही; पण त्या डब्यातील तीन-चार तासांत ते किमान पाच ते सात वेळा शौचालयाकडे गेले. त्यांनाही पाय उचलणे कठीण होत होते. जेव्हा ते त्यांच्या जागेवर असायचे तेव्हा त्यांच्या डब्यात केवळ त्यांचाच आवाज असायचा. बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला करत गाडी पुढे जात होती आणि गाडीतले आमदार आणि त्यांच्या चेलेचपाट्यांची गर्दी वाढत होती.

एकेक करत आमदार गाडीत चढत होते, काही फोनवर बोलत होते. काही एकत्र चर्चा करीत होते. त्यातले काही नव्यानेच मंत्रिपदाच्या बोहल्यावर चढलेले होते. एकंदरीतच सर्व वातावरण राजकारणाइतके लख्ख, शुभ्र दिसत होते. भुसावळच्या जवळ मला एक बोगी सोडून असलेल्या बोगीत जागा मिळाली. मी तपासनीसांना विनंती करून माझ्या सहप्रवाशासाठीही तिकडेच जागा केली. त्या बोगीत गेलो तेव्हा कळले तो अतिरिक्त लावलेला डबा होता आणि त्यात मोठ्या संख्येने शुभ्र व्यक्तिमत्त्वे होती. त्यात अनेक सहायकही होते. तो डबा खचाखच भरलेला होता. बहुतेक अचानक डबा लावावा लागल्यामुळे असेल कदाचित, त्या डब्यात पडदे नव्हते. साधारण साडेअकरा-बारा वाजलेले असतील. बहुतेक प्रवासी झोपलेले होते. काही झोपण्याच्या तयारीत होते. माझा साइड बर्थ होता. समोरच्या एका जागेवर एक सुखाचा सदरा पांघरलेली व्यक्ती आपल्या झोपेच्या बेधुंद घोषणा देत (घोरत) झोपली होती. दुसरी जागा अंथरुण घातलेली होती, त्यावर आमदारांचे सहायक मोबाईलमध्ये व्यग्र होते. दुसरा सहायक मध्येमध्ये येऊन त्याच्याशी बोलत होता. बोलण्याच्या ओघात त्यांनी गाडीचे नाव घेत विदर्भातील एक कचकचीत शिवी घातली आणि गाडी लेट असल्याचे त्याला सांगितले.

डब्याच्या अगदी मध्यभागी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची बैठक सुरू होती. त्यांच्या चर्चेचा आणि हसण्याचा आवाज वारंवार कानावर पडत होता. मध्येच ते मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही बोलत होते. सहायक मंडळी यांची बैठक कधी संपणार आणि आपण कधी झोपणार या चिंतेत होती. आमदार मात्र चर्चा सोडायला तयार नव्हते. शिवाय डब्याच्या अगदी मधोमध सर्व लाईट सुरू असल्यामुळे इतरांना झोपण्याची अडचण होत होती. मात्र बोलायला कुणीही धजावत नव्हते. मी डब्यातल्या सहायकाला त्याबद्दल हटकले. तो म्हणाला, साहेबलोक आहेत. मी नाही काही बोलू शकत. त्यामुळे वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांच्या गप्पांचा सूर मात्र वाढतच होता. तेवढ्यात माझ्या समोरच्या सीटवर जो सहायक बसला होता, त्याच्या आमदाराने खिशातून एक कागदाची पुडी काढली. त्यातून तंबाखू काढला, मळला आणि तो कागद त्यांची बैठक सुरू होती त्याच ठिकाणी भिरकावून दिला. तोबरा भरला आणि बैठक सुरूच राहिली. त्यानंतर अर्ध्या तासाने त्यांना जेवणाची आठवण झाली. ते सर्व सोबत जेवले. त्यानंतर एकेक आमदार शौचालयाच्या दिशेने जात होते. त्यात अलिकडच्या सत्तासंघर्षातील एक महत्त्वाची जबाबदारी असलेले महाशय होते. त्यांनाही फारसा तोल सांभाळता येत नव्हता. अखेर त्यांनी सहायकदेखील जेवल्याची खात्री केली आणि एक इशारा केला.

इशारा समजताच सहायक वायूवेगाने त्यांच्या बिछान्याची तयारी करायला लागले. बेडशीटचे सर्व कोपरे एकत्र करून, नीटशी घडी घालून, काही लोकांनी सोबत आणलेल्या उशा आणि बिछाना घातला गेला. त्यातले एक आमदार वर जाऊन झोपले. दुसरे थोडा वेळ गप्पा मारत बसले. शेवटी सगळे पेंगायला लागले आणि माझ्यासमोरच्या आमदारांनीही आपले स्थान ग्रहण केले. लाईट न घालवल्यामुळे मला झोप येत नव्हती. त्यामुळे मी मोबाईलशी चाळा करीत बसलो होतो. आमच्या दोघांची नजरानजर झाली. शेवटी मी परत मोबाईमध्ये मान घातली. पण मी त्यांच्याकडेच पाहत होतो. त्यांना वाटले मी मोबाईलमध्ये गुंतलोय. त्यांनी नजरचुकीची संधी घेत तोंडात बोट घातले, दातांमध्ये मघाशी घातलेली तंबाखूवजा सामग्री बोटांवर लीलया पेलली आणि स्वत:च्याच सीटखाली फेकून दिली. त्यानंतर ते निद्रिस्त झाले.

मला वाटलं जाऊ देत, लाईट बंद झालेत, झोपूया आता. मी झोपतच होतो तेवढ्यात त्यांच्या बाजूच्या सीटवर झोपलेली ती सुखी सदरा पांघरलेली व्यक्ती उठली. त्यांच्याच डोक्यावर त्यांचा सहायक झोपला होता. त्यांनी त्याला हाक मारली. त्याला विचारले ‘खाना है क्या रे?’ तो बिच्चारा डोळे चोळत खाली उतरला. साखळीजवळ अडकवलेली पिशवी काढली. आमदारांना जेवण वाढले, तोंडाचा चापटचूपट आवाज करीत आमदार महोदय जेवत होते. मी हळूच मान वर करून पाहिले. हे तेच होते ज्यांना दोन लोकांनी आधार देत निद्रादेवीच्या स्वाधीन केले होते. शुद्धीत येताच त्यांना भूक लागली होती. ते जेवले, परत झोपले... लाईट बंद झाले. तेव्हा कुठे आम्हाला झोपता आले.

दहा वर्षांपूर्वी मुंबईच्या लोकलमध्ये भेटलेली सर्वसामान्य महिला आणि सत्तेच्या सारीपाटावर सर्वसामान्यांच्या सुखस्वप्नांची धोरणे राबविणारी नेतेमंडळी वागण्या-बोलण्यात दोघेही सारखेच. पण शुभ्र वस्त्रांमध्ये ‘ये जुबाँ केसरी’च्या निशाण्या उधळत यांची सफर सुरू असते. आपल्या प्रवासात आपल्या सोबतीला आपले मतदारही असतात, याचे त्यांना भान नसते. आपल्या श्रद्धास्थानांची बूज राखण्यात, त्यांच्या मागेपुढे करण्यात जन्म घालवणाऱ्यांना आपणच बनवलेले नियम, धोरणे पायदळी तुडवताना काहीही वाटत नाही. त्यांच्या वागण्या-बोलण्यात आणि चेहऱ्यांवर तसे कुठलेही भाव दिसत नाहीत. वस्त्रे शुभ्र असली, तरी कृतीतून करंटेपणाच प्रतीत होत असेल, तर काय करायचे त्या पांढऱ्या पोशाखाचे. एका साध्या निम्नमध्यमवर्गीय व्यक्तीमध्ये आणि आपल्यामध्ये एका जबाबदारीचे अंतर असते. ते प्रत्येकाने जोखायला हवे, पारखायला हवे. पुन:पुन्हा तपासून पाहायला हवे. नाहीतर रेल्वेच्या त्या कोंदट डब्यात घर करून बसलेला कुबट दुर्गंध राजसत्तेच्या बुद्धिकोषात शिरेल आणि शेवटी उरेल तो केवळ राजकीय बुभुक्षितपणाचा नरकातला कोंडवाडा... तुमच्या आमच्या लोकशाही नावाच्या बिरुदाला कायमचे बंदिस्त करण्यासाठी...

-राहुल गडपाले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com