
सांगली जिल्ह्यात कडेपूर नावाचं गाव आहे. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे कधीकाळी ते देशपातळीवरच्या मल्लांसाठी प्रसिद्ध होतं.
गोडवा कडेपूरच्या कॉफीचा!
सांगली जिल्ह्यात कडेपूर नावाचं गाव आहे. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे कधीकाळी ते देशपातळीवरच्या मल्लांसाठी प्रसिद्ध होतं. तिथे देशपातळीवर लढणारे मल्ल निर्माण झाले. स्वातंत्र्य चळवळ सुरू असताना साहेबराव यादव नावाचे मोठे पैलवान होते.
देशभरातील अनेक मोठ्या शहरांत त्यांच्या कुस्त्या झाल्या होत्या. भारताचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्यावरसुद्धा त्यांचा प्रभाव होता. त्यांच्या कुस्तीबद्दल ‘कृष्णाकाठ’ या आत्मचरित्रात त्यांनी लिहिले आहे.
३१ ऑक्टोबर १९२४ रोजी कराड तालुक्यातील ‘काले’ या गावात गुणे इनामदार यांच्या वाड्यात तिकिटावर कुस्ती मैदान झाले होते. त्या मैदानात साहेबराव यादव आणि रामा कडेपूरकर या कडेपूरच्या दोन मल्लांनी कुस्त्या जिंकत मानाचे फेटे मिळवून आपल्या गावाचे नाव सर्वदूर पोहोचवले होते.
कुस्तीसोबत राजकारणातसुद्धा या गावाने तालुका, जिल्हास्तरावर नेतृत्व केले. संपतराव देशमुख यांनी पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद शिक्षण सभापती आणि आमदार म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला. बबनराव यादव यांनी सहकारी चळवळीत योगदान दिले, सह्याद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून काम केले.
लालासाहेब यादव यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणून काम केले. जनता पक्षाचा प्रयोग झाला तेव्हा त्यांना भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.
कडेपूरचा इतिहास असा समजून घेत असताना या गावातल्या विस्मृतीत गेलेल्या एका गोष्टीची लोकांना आठवण येते. विजापूर-चिपळूण रस्त्यावरच कडेपूर गाव आहे. ४० वर्षांपूर्वी हे गाव कॉफीसाठी प्रसिद्ध होतं.
अण्णा बाळा यादव यांचं ते हॉटेल. त्यांच्या हॉटेलमधील कॉफीला चव होती. आता राष्ट्रीय महामार्गावर जशा चहापानासाठी गाड्या थांबतात, तशा या गावात थांबत. अगदी साताऱ्यातून निघालेला चालक कराडसारख्या शहरात चहासाठी थांबायचा नाही.
कारण त्याला कडेपूरची कॉफी प्यायची असे. रात्री पुण्या-मुंबईला जाणाऱ्या गाड्याही या गावात थांबत. प्रवासी लोकांचाही कडेपूरला जाऊन कॉफी पिऊ या, असा आग्रह असायचा. तेव्हा कडेपुरात दिवसा आणि रात्री एसटी बस, तसेच खाजगी वाहने थांबलेली असायची.
एकदा वसंतदादा पाटील खानापूर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही कॉफी पाजली. त्यांना खूप आवडली. वसंतदादांनी, ‘‘असली कॉफी मुंबईतल्या हॉटेलमध्येसुद्धा मिळत नाही,’’ असं म्हणत अण्णा बाळा यादव यांचे कौतुक केले.
पुन्हा दादांचा या भागात दौरा असला की ते कडेपूरची कॉफी प्यायला जात. दादांना जशी ही कॉफी आवडत असे, तसे यशवंतराव चव्हाण यांनाही ही कॉफी आवडायची. तेसुद्धा दोन-तीन वेळा अण्णा बाळा यादव यांच्याकडे आवर्जून कॉफी प्यायला आले होते, अशी आठवण गावकरी सांगतात. राज्याच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांनी कॉफीबद्दल त्यांचे कौतुक केले होते. त्यांच्या कॉफीमुळे कडेपूरची कीर्ती सर्वदूर पसरली होती.
ज्याच्या हातची कॉफी पिण्याचा मोह भल्याभल्यांना झाला, त्या अण्णा बाळा यादव यांनी कडेपूरसारख्या छोट्याशा खेड्यात कॉफीचा व्यवसाय सुरू केला तेव्हा त्यांना अनेकांनी कुठेतरी शहरात जाऊन हा व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला होता. सांगणाऱ्या लोकांचं बरोबर होतं, कारण त्यांना वाटत होतं या गावात कॉफी कोण पिणार?
थोड्याच दिवसांत त्यांचा धंदा बंद पडेल, या भीतीपोटी तसा सल्ला दिला होता; पण घडले वेगळेच! अण्णांनी त्यांची सगळी कौशल्य पणाला लावत त्याच गावात थांबून कॉफीची एक नवी ओळख निर्माण केली.
या व्यवसायावर त्यांच्या एकट्याची तरी गुजराण होईल काय, अशी शंका उपस्थित होत होती, त्या कॉफीचा एवढा बोलबाला झाला की तो व्यवसाय एका माणसाच्या पलीकडे गेला. त्यांनी स्टॉलवर आसपासच्या खेड्यातील चार तरुणांना रोजगार दिला. रोजगारासाठी शहरात जाण्यापेक्षा गावातच रोजगार निर्माण करण्याचा हा त्यांचा प्रयत्न होता.
कडेपूरची कॉफी अनेक वर्षे लोकांना प्यायला मिळाली. ज्या काळात माध्यमं गावागावांत पोहचली नव्हती, त्या काळातही केवळ माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर या कॉफीने तिचा गोडवा दूरवर पोहोचवला होता. या गावावरून जाणारा माणूस कॉफी पिऊनच जायचा. कडेपूर आणि कॉफी या एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या होत्या. गावाचं नाव सर्वदूर पोहोचवलेल्या अण्णा बाळा यादव यांचा कॉफीचा व्यवसाय अनेक वर्षे सुरू होता.
एक दिवस ते गेले आणि त्यांचे हॉटेलही बंद झाले. प्रवाशी थांबायचे; पण हॉटेल बंद असायचे. चौकशी केल्यावर गावकरी सांगायचे ‘तो कॉफीवाला माणूस वारला.’ प्रवाशी हळहळ व्यक्त करायचे. शेकडो प्रवाशांना चवदार कॉफी पाजणारे अण्णा यादव गेले; पण आजही लोकांना कडेपूर म्हटलं की त्या कॉफीचीच आठवण येते.
आता त्यांची मुलगी कडेपूरच्या एसटी स्टँडवर हॉटेल चालवते. त्या हॉटेलात यादव यांचा फोटो आहे. त्यांच्या हातची कॉफी पिलेला म्हातारा माणूस कधी या ठिकाणी आला तर फोटोकडे पाहत ‘त्या’ दिवसांच्या आठवणी जागवतो.
अण्णा बाळा यादव हे कॉफी व्यवसायात येण्यापूर्वी स्वातंत्र्य चळवळीत होते. तरुण वयात त्यांनी सातारा मुलखात ब्रिटिश सरकारच्या विरोधात जी चळवळ उभी राहिली होती, त्यात योगदान दिले होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी त्यावेळी तरुणाईला प्रतिसरकारमध्ये येण्याचे आवाहन केले होते, त्या आवाहनाला प्रतिसाद देत अण्णा यादव त्या लढ्यात गेले. नंतरच्या काळात कॉफी व्यवसायाकडे त्यांनी लक्ष दिले, त्यामुळे त्यांची तीच ओळख पुढे कायम राहिली. स्वातंत्र्य चळवळीत लढलेला सैनिक ही ओळख मात्र पुढे आली नाही.
गावोगावी असे हरहुन्नरी आणि वेगळं आयुष्य जगलेली, जगण्याच्या वाटा शोधतच प्रसिद्धी पावलेली माणसं असतात. अशा लोकांना किंवा त्यांच्या जवळच्या लोकांना भेटणं आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य समजून घेणं महत्त्वाचं आहे... अशी विविधांगी आयुष्य जगलेली माणसं खूप दुर्मिळ असतात. त्यांचं प्रेरणादायी जगणं लोकांसमोर आणणं आपलं काम आहे.
(लेखक ‘मुलुखमाती’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक असून, ग्रामसंस्कृतीवर भाष्य करणारे भाष्यकार आहेत.)