आता गरमागरम भजी खाण्याचा सीझन सुरू झाला.. या पाहा रेसिपी!

टीम ई सकाळ
Tuesday, 2 July 2019

पावसाळा सुरू झाला. बाहेर पाऊस पडतो आहे. हवेत गारवा आलाय. पावसातून घरात शिरलं की लगेच भज्यांची ऑर्डर होते. पाऊस आणि भजी यांचं काही अतूट असं नातं असावं. पाऊस म्हटला, की हमखास आठवतात ती भजी.

पावसाळा सुरू झाला. बाहेर पाऊस पडतो आहे. हवेत गारवा आलाय. पावसातून घरात शिरलं की लगेच भज्यांची ऑर्डर होते. पाऊस आणि भजी यांचं काही अतूट असं नातं असावं. पाऊस म्हटला, की हमखास आठवतात ती भजी.

पावसाळा सुरू झाला. बाहेर पाऊस पडतो आहे. हवेत गारवा आलाय. पावसातून घरात शिरलं की लगेच भज्यांची ऑर्डर दिली जाते. पाऊस आणि भजी यांचं काही अतूट असं नातं असावं. पाऊस म्हटला, की हमखास आठवतात ती भजी.

भजी करायला काही विशेष कारण, समारंभ वगैरे लागत नाही. घरात नेहमी भजी होतात; पण पावसाळ्यातील भजी काही वेगळीच. खरं तर आयुर्वेदशास्त्राप्रमाणे या ऋतूमध्ये पचन शक्ती कमी होत असते, म्हणून पचायला हलकाफुलका आहार हवा; तळकट- तेलकट नको. पण आपली खवय्येगिरी इतकी वाढली, की सगळं आहारशास्त्र वगैरे बाजूला ठेवून चमचमीत खाण्याकडे कल वाढलाय. भज्यांची खरी खुमारी पावसाळ्यातच.

भज्यांचे प्रकार तरी किती? घरात नेहमी असणारे कांदे, बटाटे तर आहेतच भजी करायला; पण परसातली घोसाळी, मायाळू, शिवाय कुंडीतील ओव्याची पाने, पालकाची पाने, मेथीची पाने, त्याचप्रमाणे कोकणातली सुरणाची, कच्च्या केळ्याची तांदळाच्या पिठात घोळवून तळलेली भजी आहेतच. याशिवाय मांसाहारी लोकांसाठी चिंगळा, कोळंबी भजी, कालवांची भजी आहेतच.

भारतात सर्वत्र भजी होतात. प्रत्येक प्रांतात वेगवेगळा प्रकार असतो. कांद्याला मीठ लावून, चुरून त्यात बेसन घालून केलेली आपली महाराष्ट्रीय खेकडा भजी, विदर्भातली कांदा कमी, बेसन पीठ घालून केलेली, गोळा भजी ही भातात मिसळून खातात. हरभराडाळ भिजत घालून किंवा सर्व डाळी भिजवून वाटून केलेली भजी खास कर्नाटकातली. काही ठिकाणी ओवा घालतात, तर काही ठिकाणी धणेपावडर घालून भज्यांचा पिठाचा घोल करून त्यात बुडवून भजी तळतात. सगळेच प्रकार तोंडाला पाणी सुटणारे. असेच काही प्रकार पुढीलप्रमाणे.

खेकडा भजी
साहित्य :
एक वाटी कांदा- उभा पातळ चिरून, त्याला एक चमचा मीठ चोळून ठेवा. साधारण पाऊण वाटी बेसनपीठ, लाल तिखट एक चमचा, ओवापूड अर्धा चमचा, तळणीला तेल.
कृती : कांद्याला मीठ लावून ठेवावे. नंतर कांदा चोळून घेऊन त्यात मावेल एवढे साधारण पाऊण वाटी पीठ घालून कांदा चुरून घ्यावा. त्यात ओवापूड टाकावी. तेल कडकडीत तापवून त्यात भजी सोडावीत. मंदाग्नीवर तळावीत. खेकड्याच्या पायासारखा कांदा दिसतो, म्हणून याला "खेकडा भजी' म्हणण्याची प्रथा पडली.

फ्लॉवरची भजी
साहित्य : दहा-बारा इंचांचे फ्लॉवरचे तुकडे (देठासकट), मीठ, डाळीचे पीठ एक मोठी वाटी, एक चमचा कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाचे पीठ, तिखट-मीठ चवीनुसार. आलं-लसूण पेस्ट 2 चमचे, तळणीसाठी तेल.
कृती : फ्लॉवरचे तुरे (तुकडे) काढून किंचित मीठ घालून वाफवून घ्यावेत. पाणी निथळून घ्यावे. त्याला आलं-लसूण पेस्ट चोळून ठेवावी. डाळीच्या पिठात मीठ, तिखट, दोन चमचे कडकडीत तेल घालून सरबरीत भिजवावे. फार पातळ नको. भज्यांच्या घोलप्रमाणे भिजवावे. तेल कडकडीत करावे. फ्लॉवरचा एक एक तुरा (तुकडा) घेऊन या बेसनघोलमध्ये बुडवून तळून घ्यावा. हिरवी चटणी किंवा सॉसबरोबर गरमागरम भजी खावीत.

पानांची भजी
साहित्य : मायाळूची किंवा पालकाची किंवा ओव्याची पाने धुऊन, पुसून कोरडी करून घ्यावीत. भज्याप्रमाणे डाळीचे पीठ भिजवून त्यात किंचित ओव्याची पूड घालावी व त्यात पाने बुडवून भजी तळावीत. पाने कोरडी असली तर भजी कुरकुरीत होतात. नाहीतर मऊ पडतात.

डाळीची भजी
साहित्य : हरभराडाळ एक वाटी भिजत घालावी. चार तासांनंतर ती निथळून जाडसर वाटावी. कोथिंबीर चिरून अर्धी वाटी, मीठ, तिखट, एक चमचा ओवापूड किंवा धणे-जिरे पूड, तेल.
कृती : जाडसर वाटलेली डाळ, त्यात कोथिंबीर, धणे-जिरे पूड किंवा ओवापूड घालून मीठ, तिखट घालून मिक्‍स करा. चमच्याने फेटून घ्या. खायचा सोडा चिमूटभर घालून फेटा. पाण्याचा हात लावून चपटी भजी करून कडकडीत तेलात तळा. हरभराडाळीत दोन चमचे मुगाची डाळ मिसळून मिक्‍स डाळींची भजीसुद्धा छान होतात. ओवा न घालता थोडी आलं, लसूण पेस्ट घातली तर वेगळी चव येते.

ढबू मिरचीची भजी
साहित्य : पोपटी रंगाच्या चार ढबू मिरच्या, एक वाटी ओले खोबरे, भाजलेले तीळ एक चमचा, मीठ, बेसनपीठ दीड वाटी. 
कृती : मिरच्या चिरून प्रत्येकाचे दोन किंवा चार उभे भाग करावेत. त्यातल्या बिया काढून टाकाव्यात. पोकळी तयार होईल. ओले खोबरे, मीठ व भाजलेले तीळ एकत्र मिसळून सारण करावे. डाळीच्या पिठात पाव चमचा बेकिंग पावडर घाला. एक चमचा तांदळाचं पीठ घाला. ढवळून कडकडीत तेलाचं मोहन घालून सरबरीत भिजवा. हा घोल पातळ नसावा किंवा घट्ट नसावा. ढबू मिरचीच्या पोकळीमध्ये खोबरे, मीठ, तीळ घातलेले सारण घट्ट दाबून भरावे आणि पिठाच्या घोलमध्ये (बेसनमध्ये) बुडवून कडकडीत तेलात भजी तळून घ्यावीत. ही भजी चटणीशिवाय नुसतीही चांगली लागतात.

कांदा भजी 
साहित्य - अर्धा किलो कांदे, तीन वाट्या हरभरा डाळीचे पीठ, चवीपुरते मीठ, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, उडदाची डाळ पाऊण वाटी, तांदळाची पीठी दोन चमचे, आठ हिरव्या मिरच्या, तळण्यासाठी तेल
कृती - प्रथम उडदाची डाळ दोन तास भिजत ठेऊन वाटून घ्या. मिरचीचे बारीक तुकडे करा. कांदा लांबट चिरा. कांदा, मिर्चीचे तुकडे मीठ, वाटलेली डाळ, असे (हरभरा डाळीचे पीठ) सर्व जिन्नस एकत्र करून चांगला घट्टसर गोळा तयार करा. वरून तांदळाची पिठी चिकटवा. तापलेल्या तेलात हाताने भजीचे पीठ घालून भजी तळून घ्या. हाताला गॅसची झळ लागू नये म्हणून रुमाल बांधा. गुलाबी थंडीत चहा भजींची मैफल उत्तम रंगेल. आणि खवय्यांच्या जिभेला झणझणीत खाद्य मिळेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kanda bhaji and khekada bhaji recipe in Marathi