कोरोना, वैज्ञानिक आणि ढिम्म सरकार!

एका पूर्णपणे दुर्लक्षित राहिलेल्या बातमीसंदर्भात मला तुम्हाला सांगायचं आहे. अगदी थोडे अपवाद वगळता कुठल्याच वर्तमानपत्रानं व वृत्तवाहिनीनं ही बातमी दिली नाही.
Vaccination Line
Vaccination LineSakal

एका पूर्णपणे दुर्लक्षित राहिलेल्या बातमीसंदर्भात मला तुम्हाला सांगायचं आहे. अगदी थोडे अपवाद वगळता कुठल्याच वर्तमानपत्रानं व वृत्तवाहिनीनं ही बातमी दिली नाही. मात्र, तरीही या बातमीनं कोरोनामहामारीच्या सरकारच्या हाताळणीसंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित केले. ही बातमी म्हणजे सरकारच्या बेजबाबदारपणाचे पुरावेच आहेत, असंही तुम्ही म्हणू शकता. त्यामुळेच ही बातमी काय आहे हे आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे व त्यातून काय धडा घ्यायचा हेही ठरवायला पाहिजे. हाच उद्देश बाळगून मी त्या बातमीविषयी आता तुम्हाला सांगतो...

‘रॉयटर्स’ची बातमी आणि दुर्लक्ष

‘रॉयटर्स’नं ता. एक मे रोजी एक बातमी प्रसिद्ध केली होती. तिचं शीर्षक होतं ‘संशोधकांच्या म्हणण्यानुसार, भारत सरकारनं कोरोनाची महामारी मोठ्या प्रमाणात वाढेल या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं.’ या बातमीतील दाव्यानुसार, सरकारनं निवडलेल्या राष्ट्रीय प्रयोगशाळांमधील पाच संशोधकांच्या जिनोम सिक्वेन्सिंगचं काम करणाऱ्या गटानं (इंडिया सार्स-कोव्ह-2 जिनोमिक्स कन्सॉर्शिअम, आयएनएसए-सीओजी) भारतीय अधिकाऱ्यांना इशारा दिला होता, ‘मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच एक नवा व मोठी संसर्गक्षमता असणारा कोरोनाविषाणूचा प्रकार देशभरात वेगानं पसरत आहे.’

या बातमीत पुढं नमूद करण्यात आलं होतं, ‘यातील चार संशोधकांनी असंही म्हटलं आहे की, केंद्र सरकार या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कोणतेही मोठे निर्बंध लादण्यास तयार नाही.’ या बातमीचा गर्भितार्थ, सरकारला कोरोनारुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणावर असल्याचा स्पष्ट संदेश मिळाला होता. मात्र, सरकारनं शब्दशः काहीच केलं नाही.

याच बातमीमध्ये ‘आयएनएसए-सीओजी’चे प्रमुख शाहीद जमील यांचं एक वक्तव्य आहे. त्यातून काही गोष्टी स्पष्ट होतात. ते म्हणतात, ‘मला माझं कार्यक्षेत्र कुठं संपतं हे समजतं. संशोधक म्हणून आम्ही पुरावे सादर करतो, ध्येय-धोरणं ठरवणं हे सरकारचं काम आहे.’ यातून असाच अर्थ निघतो की ‘आयएनएसए-सीओजी’नं आपलं काम केलं; पण सरकारनं पुढं काहीही केलं नाही.

मी पाच मे रोजी ‘आयएनएसए-सीओजी’च्या एका सदस्याची मुलाखत घेतली. ते तीनच दिवसांपूर्वी ‘सेंटर फॉर सेल्युलर आणि मॉलिक्युलर बायोलॉजी’च्या संचालकपदावरून निवृत्त झाले होते. त्यांचं नाव डॉ. राकेश मिश्रा. त्यांनी ‘रॉयटर्स’च्या बातमीला दुजोरा दिला. ते म्हणाले होते, ‘संसर्गाच्या धोक्याची कल्पना सरकारला दिली गेली होती. देश खूप धोक्याच्या स्थितीकडे जाणार असल्याचं सांगणारा हा इशारा होता. ही खूपच काळजीची गोष्ट होती आणि त्याबद्दल कोणतीही शंका नव्हती. आम्हाला खूप म्हणजे खूपच काळजी वाटत होती. काही तरी भयानक घडण्याचे ते संकेत होते.’

डॉ. मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, ‘आयएनएसए-सीओजीनं त्यांना वाटणारी भीती थेट ‘नॅशनल सेंटर फॉर डिसीज् कंट्रोल’चे संचालक सुजितकुमार सिंग यांना सांगितली होती.’ ते पुढं म्हणतात, ‘माझ्या मते ही बाब आरोग्य सचिवांपर्यंत पोहोचवली गेली असणार. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे, ही बाब पंतप्रधानांच्या निदर्शनास आणली गेली नाही असं होणं शक्यच नाही.’’ याचा अर्थ डॉ. मिश्रा ‘रॉयटर्स’च्या बातमीला दुजोरा देण्याव्यतिरिक्त आणखी खूप काही सांगून जातात. ते असं सुचवतात की ‘आयएनएसए-सीओजी’च्या धोक्याच्या इशाऱ्याला प्रतिसाद न देण्याची जबाबदारी थेट पंतप्रधानांवर जाऊन पडते. यात कोणतंही आश्चर्य नाही की हताश झालेल्या सरकारनं स्वतःचा बचाव करण्यासाठी आटापिटा केला. बायोटेक सचिव रेणू स्वरूप यांनी ‘इकॉनॉमिक्स टाइम्स’ला सांगितलं की, ‘मला कोणत्याही इशाऱ्याबद्दल काहीच माहीत नाही.’ मात्र, पुढं विचित्रपणे खुलासा करताना त्या म्हणतात, ‘मला ‘इशारा’ या शब्दाचा अर्थच समजत नाही.’ त्यांचा प्रयत्न ‘रॉयटर्स’ची बातमी खोडून काढण्याचा आणि डॉ. मिश्रांनी तिला दुजोरा देण्याला खोटं ठरवण्याचा असेल तर त्यात त्या पूर्णपणे अयशस्वी ठरल्या आहेत. ‘आयएनएसए-सीओजी’च्या अनेक सदस्यांनी ‘डॉ. मिश्रा खरं सांगत आहेत,’ असं ठामपणे सांगितलं आहे. अर्थात्, त्यांनी हे सार्वजनिकरीत्या सांगितलेलं नाही. मी त्यांना रेणू स्वरूप यांच्या प्रतिक्रियेबद्दल सांगितल्यावर त्यांना हसू आवरलं नाही. एकानं सांगितलं, ‘त्यांना दुसरं काही सांगणं शक्यही नव्हतं.’’ दरम्यान, डॉ. मिश्रा यांनी ‘द हिंदू’शी बोलताना आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे.

सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष

मी आता सरकारच्या प्रतिसादाकडे येतो. एक लक्षात घ्या, ‘आयएनएसए-सीओजी’ने मार्च महिन्याच्या सुरुवातीला इशारा दिला होता. मात्र, सात मार्चला आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिल्ली मेडिकल असोसिएशनला सांगितलं, ‘भारतामध्ये ‘कोविड १९’च्या महामारीचा अंत (एंडगेम) जवळ आला आहे.’ सरकार ‘आयएनएसए-सीओजी’च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा हा पहिला संकेत होता. त्यानंतर परिस्थिती अत्यंत बिकट झाली. संपूर्ण मार्च महिन्यात केरळ, तमिळनाडू, आसाम या राज्यांत हजारो-लाखोंची गर्दी असलेल्या राजकीय सभा झाल्या. पश्चिम बंगालमध्ये त्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू राहिल्या. त्याचबरोबर वीस ते तीस लाखांची गर्दी असलेलं शाही स्नानही मार्च आणि एप्रिल महिन्यात झालं. तुम्ही स्वतःला एक अगदी सोपा प्रश्न विचारा : ‘आयएनएसए-सीओजी’चा इशारा मिळाल्यानंतर अशा प्रकारे लोकांना एकत्र करणं योग्य होतं का?’

हे काहीच नाही. ‘आयएनएसए-सीओजी’च्या इशाऱ्यानंतर आसामच्या आरोग्यमंत्र्यांनी जाहीर कार्यक्रमात ‘नागरिकांनी मास्क घालण्याची काहीही गरज नाही’ असं सांगून टाकलं. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी ‘देवावरील श्रद्धा आणि माता गंगेची शक्ती शाही स्नानाच्या ठिकाणी लोकांचं रक्षण करेल,’ असं जाहीर केलं. आता आपण ज्या परिस्थितीतून जात आहोत, ती पाहता एका आरोग्यमंत्र्यांचं व मुख्यमंत्र्यांचे विधान हा योग्य प्रतिसाद होता असे तुम्हाला वाटतं का?

दुर्लक्षाची मोठी किंमत

खरं तर, हे मुद्दाम केलेलं दुर्लक्ष केवळ ‘आयएनएसए-सीओजी’च्या इशाऱ्याकडेच नव्हे, तर विज्ञानाकडेही होतं व ते थेट शीर्षस्थ नेत्यांपर्यंत गेलं. देशाच्या गृहमंत्र्यांना राजकीय सभांविषयी विचारल्यावर ते म्हणाले होते, ‘कोरोनाच्या संसर्गासाठी राजकीय सभांना जबाबदार धरता येणार नाही. कारण, कोणत्याही राजकीय सभा होत नसलेल्या महाराष्ट्रात रुग्ण वाढत आहेत. मात्र, सभा सुरू असलेल्या पश्चिम बंगालमध्ये तसं चित्र नाही.’ त्यांनी आजची परिस्थिती पाहिल्यास त्यांना दिसेल की महाराष्ट्रातील रुग्णांच्या आलेखाचं सपाटीकरण होत आहे किंवा तो खूप खाली येत आहे, तर दुसरीकडे पश्चिम बंगालमधील आकडे गगनाला भिडत आहेत. खरं तर आपल्या सरकारनं विज्ञानाकडे आणि ‘आयएनएसए-सीओजी’च्या इशाऱ्याकडे कसं गंभीर दुर्लक्ष केलं याचा पुरावा थेट पंतप्रधानांकडूनच मिळतो. एप्रिल महिन्याच्या १७ तारखेला जेव्हा कोरोनाची रुग्णसंख्या दिवसाला दोन लाख ६० हजारांवर पोचली होती, तेव्हा ते आसनसोलमध्ये मोठ्या सभेमध्ये टाळ्या मिळवण्यात मश्गुल होते. त्यांच्या समोरचा हजारो-लाखोंचा जमाव ‘करू नयेत’ असं पंतप्रधानांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी करत होता. म्हणजे असं की त्या गर्दीतल्यांपैकी कुणीही मास्क घातलेले नव्हते आणि ‘दो गज की दूरी’ राखली जात नव्हती.

मात्र, ‘आयएनएसए-सीओजी’च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणं हे केवळ, मंत्री काय म्हणाले किंवा त्यांनी कशाला परवानगी दिली, एवढ्यापुरतंच मर्यादित नाही. हे दुर्लक्ष सरकारच्या नियोजनामध्येही दिसून आलं आहे. आज आपला देश याची किंमत मोजतो आहे. कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढतील असा इशारा ‘आयएनएसए-सीओजी’ देत होतं, याचाच दुसरा अर्थ, गंभीर रुग्ण, रुग्णालयांतील भरती आणि मृत्यूही वेगानं वाढतील असंही ते सरकारला सांगत होते. यावर तत्परतेनं कार्यवाही करत सरकारनं रुग्णालयांतील बेड, आयसीयू सुविधा, व्हेंटिलेटर आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ऑक्सिजनचं उत्पादन वाढवणं गरजेचं होतं. हे अजिबात केलं गेलं नाही. उलट, पहिली लाट थोपवण्यासाठी उभारण्यात आलेल्या सुविधा काढून टाकल्या गेल्या.

दोष माध्यमांचाही...

आता मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारतो. या सर्व घटनाक्रमावरून हेच सिद्ध होत नाही का, की सरकारला भावी संकटाची कल्पना दिली गेली होती, मात्र सरकारनं वैज्ञानिकांनी दिलेला सल्ला धुडकावला? त्यापेक्षा वाईट म्हणजे, सरकारनं सर्व चुकीच्याच गोष्टी केल्या. हा बेजबाबदारपणाचा कळसच नाही का? पूर्वग्रहदूषित मत व्यक्त केल्याचा आरोप होऊ नये म्हणून हे प्रश्न मी जागतिक आरोग्य क्षेत्रातील सर्वांत मोठं नाव व ‘ब्राऊन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’चे डीन प्रोफेसर आशिष झा यांना विचारला. ते म्हणाले : ‘मिळालेल्या माहितीवरून परिस्थितीचं गांभीर्य स्पष्ट होत असूनही सरकार त्याला प्रतिसाद देण्यात अयशस्वी ठरलं यात कोणतीही शंका नाही.’

याबरोबरच झा असंही म्हणाले होते : ‘कुंभमेळा हा महामारीच्या इतिहासातील सर्वांत मोठा सुपरस्प्रेडर ठरणार आहे.’

त्यांनी आपली टीका आणखी पुढच्या पातळीवर नेली आणि म्हणाले, ‘या अपयशाचा खुलासा ‘सत्तेत असलेल्या’ लोकांनाच करावा लागेल. भारतातील जनतेला हा खुलासा देण्यास सरकार बांधील आहे.’

आता तुमच्या लक्षात आलं का, ही बातमी किती महत्त्वाची आहे आणि तुम्हाला ती माहिती असणं का गरजेचं आहे? तुमचं उत्तर ‘होय’ असल्यास, बहुसंख्य माध्यमांनी यावर मौन का बाळगलं आणि ही माहिती तुमच्यापर्यंत का पोहोचवली गेली नाही? ज्याप्रमाणे सरकार त्याच्या बेजबाबदार वर्तणुकीचा खुलासा करण्यास बांधील आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला अंधारात ठेवल्याचा खुलासा करण्यास माध्यमेही बांधील नाहीत का?

(सदराचे लेखक दिल्लीस्थित ज्येष्ठ पत्रकार आहेत)

(अनुवाद : महेश बर्दापूरकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com