Corona -19 Vaccine
Corona -19 Vaccine

लसीकरणात राष्ट्रवाद घातक

शाळेतल्या मुलांचे तंटे, दाम्पत्याची भांडणं आणि अगदी मच्छीबाजारातला भांडकुदळ मांजरांसारखा आरडाओरडा यांची आपल्याला सवय आहे; मात्र शास्त्रज्ञांनी एकमेकांचे गळे पकडण्याच्या प्रकारानं आश्चर्याचा जबर धक्का बसतो. दुर्दैवानं, मतभिन्नता तर समोर आलीच आहे; शिवाय विशेषतः ‘भारत बायोटेक’च्या कोव्हॅक्सिन लशीच्या निमित्तानं मतभिन्नतेचं रूपांतर विखारात आणि ओंगळ विभाजनात झालं आहे. शास्त्रज्ञांमध्ये एकवाक्यता नसण्याबद्दल मला काळजी नाही; तथापि त्याहून महत्त्वाच्या गोष्टीची मला भीती वाटते आहे. केवळ अपुरी माहिती मिळणाऱ्या सर्वसामन्यांनाच नव्हे; तर लशीकरणाची आवश्यकता माहिती असणाऱ्या लोकांमध्येही लशीकरणाबद्दल साशंकता वाढण्याचा धोका आहे.

लशीकरणाच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये सरासरी पन्नास टक्क्यांहून कमी सहभाग राहिल्याचं वृत्त आहे. एकूण ७,७०४ सत्रांमध्ये प्रत्येक सत्रात शंभर याप्रमाणे लशीकरण होणार होतं. प्रत्यक्षात ३,८१,३०५ लोकांनीच लशीकरणात भाग घेतला. सध्याच्या सत्रांमध्ये फक्त आरोग्यकर्मचाऱ्यांचं लसीकरण सुरू आहे. या लोकांना लसीकरणाचे महत्त्व ठाऊक आहे. इतर वेळी त्यांची समजूत काढावी लागली नसती. ज्याअर्थी हे कर्मचारी लसीकरणातून माघार घेत आहेत, त्याअर्थी प्रश्न अधिक गंभीर आहे.

मला आज याच प्रश्नाकडे लक्ष वेधायचे आहे. कोव्हॅक्सिन लशीच्या परिणामकारकतेबद्दलचा वाद या साशंकतेच्या मुळाशी आहे असं मला वाटतं. लशीच्या परिणामकारकतेबद्दल वैध प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर ४९ डॉक्टरांनी आणि संशोधकांनी तीव्र हल्ला केल्यामुळं वादाचं स्वरूप बिघडलं. लशीबद्दल विचारलेल्या वैध प्रश्नांची उत्तरं देण्याची गरज असताना या ४९ महाभागांनी अशा शंका उपस्थित करणंच राष्ट्रद्रोही असल्याचं आणि जणू हसत हसत लस घेणं हे आपलं राष्ट्रकर्तव्य असल्याचं भासवलं. हा आविर्भाव लोकांच्या मनात चीड उत्पन्न करणारा आहे आणि त्याचाच परिणाम डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉईज आणि अन्य आरोग्यकर्मचाऱ्यांवर होतो आहे.
माझा मुद्दा समजून घेण्याआधी कोव्हॅक्सिनबद्दलच्या शंकांकडे आणि त्या उपस्थित करणाऱ्यांविरुद्ध झालेल्या प्रक्षोभक टीकेकडं पाहू.

कोव्हॅक्सिनचा वापर ‘आपत्कालीन परिस्थितीत आणि क्लिनिकल ट्रायल’साठी करण्यास परवानगी दिली गेली आहे. या लशीच्या फेज-३ मधल्या परिणामकारकतेची आकडेवारी उपलब्ध नाही. गगनदीप कांग आणि शाहीद जमील या भारतातील दोन सर्वोत्तम विषाणुतज्ज्ञांनी याबद्दल प्रश्न उपस्थित केले. त्यामागची कारणं सोपी होती. सुरक्षित असेल; मात्र लशीची परिणामकारता आपल्याला माहीत नाही. परिणामकारकतेच्या विश्वासार्ह डेटाशिवाय कोव्हॅक्सिनचा उपयोग आहे किंवा नाही, तसंच लस काम करते आहे किंवा नाही याबद्दल काहीच समजू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. 

लशीचा उपयोग आहे, असं समजून ती दिली जात आहे. तसं होत नसेल तर लशीकरणाबद्दलची विश्वासार्हता धोक्यात येईल. शिवाय, लस घेतली म्हणजे सुरक्षित झालो असं समजून अनेक लोक सुरक्षेचे नियमित उपाय सोडून देतील आणि कदाचित अकारण बाधितही होऊ शकतील. असं घडलं तर आपल्यासमोरच्या प्रश्नांमध्ये वाढच होईल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र, कोव्हॅक्सिनबद्दलचं प्रकरण याही पुढं जातं. जागतिक साथ आहे म्हणून शॉर्टकट मान्य आहे, असं म्हणणं तज्ज्ञांना अमान्य आहे. सप्टेंबरच्या तुलनेत आजच्या कोरोनाबाधितांची आणि मृतांची संख्या अगदीच कमी आहे. म्हणजे आता आणीबाणीची परिस्थिती नाही. दुसरं म्हणजे, आपल्याकडं विश्वासार्ह परिणामकारकता असलेल्या आणखीही लशी उपलब्ध आहेत. त्या पुरेशा संख्येनं उपलब्ध आहेत. त्यामुळं, कांग यांनी नुकतंच एका मुलाखतीत मला सांगितलं की, अशा परिस्थितीत परिणामकारकता माहीत नसताना आपत्कालीन म्हणून लशीला आपण परवानगी का देत आहोत हा प्रश्न आहे.

आता सरकारी डॉक्टरांनी कोव्हॅक्सिन अपरिपक्वपणे पुढं घुसडण्यासाठी तिसरं कारण पुढं केलं आहे. कोरोनाचा नवा प्रकार रोखण्यात कोव्हॅक्सिन उपयोगी ठरेल असा त्यांचा दावा आहे. प्रश्न असा आहे की या अशा दाव्याला कोणताही संख्यात्मक आधार नाही. हे केवळ ‘गृहीतक’ आहे, असं कांग आणि जमील यांचं म्हणणं आहे. इथं, ‘भारत बायोटेक’चे अध्यक्ष आणि कोव्हॅक्सिनचे जनक डॉ. कृष्णा इला सहमती दर्शवतात. चार जानेवारीला त्यांनी  जाहीरपणे मान्य केलं, की ‘हे अजून गृहीतक आहे.’ 

आता, सरकारनं मात्र वेगळा विचार करावा, हे विचित्र नाही का?
चार जानेवारीलाच डॉ. इला यांनी एक पाऊल पुढं जात आणखी एक महत्त्वाचं विधान केलं, जे कदाचित लोकांच्या विस्मरणात जाऊ शकतं. ते विधान असं, ‘मला एका आठवड्याचा वेळ द्या. मी पुरेसा डेटा सादर करतो.’  आता यालाही दोन-तीन आठवडे होऊन गेले आहेत आणि त्यांनी कुठलाही डेटा दिलेला नाही. ते या विषयावर गप्प झाले आहेत.

ज्यांनी सुरुवातीला पाठिंबा दिला त्यांच्यावरच द्वेषपूर्ण टिप्पणी ४९ डॉक्टर आणि शास्त्रज्ञ करत आहेत ही बाब चिंताजनक आहे. आरोग्य मंत्रालयानं १४ तारखेला केलेल्या ट्विटनंतर एका तासातच यासंदर्भातलं निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं. ‘भारतीय शास्त्रज्ञांची बदनामी करणारं अत्यंत बेजबाबदार असं हे विधान हितसंबंध जपणारं आहे, तसंच राजकीय हेतूनं प्रेरित अशा या वक्त्यव्यानं कोरोना लशीसंदर्भातल्या सध्याच्या संशोधनाबाबतच्या प्रामाणिकपणावर शिंतोडे उडवले गेले आहेत,’ अशी टीका त्यात करण्यात आली आहे.  

कोव्हॅक्सिनवर शंका घेणं हे निंदनीय असल्याचं मत व्यक्त करत आणि देशभक्तीचा राग आळवत या ४९ जणांनी ‘वैज्ञानिक संशोधनात भारत हा जागतिक नेतृत्वाची क्षमता निर्माण करण्याची दृष्टी असणारा देश आहे,’ असा दावा केला आहे. नरेंद्र मोदींच्या कृपादृष्टीसाठी ‘आत्मनिर्भरते’ची शालही त्यांनी पांघरली घेतली आहे .

कोव्हॅक्सिनच्या परिणामकारतेविषयीचे मतभेद राष्ट्रीय अस्मितेच्या चौकटीत बसवणं किंवा भारताच्या कामगिरीला धक्का लावण्याचा प्रयत्न करणं हे विचित्र; पण दुःखदायक आहे. तरीही या ४९ जणांनी तेच केलं. त्यांनी देशप्रेमाचे जे ढोल वाजवले आहेत ते त्यांच्या कानांना मधुर वाटत असले तरी डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्यसेवकांसाठी ते कर्णकटू आणि त्रासदायक ठरतील यात शंका नाही. मी पूर्वी म्हटल्यानुसार, त्यांनी हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं केलं. लशीच्या वैधतेबद्दल शंका घेणाऱ्यांना ‘देशविरोधी’ म्हणून त्यांच्यावर हल्ला चढवण्यापेक्षा हजारो भारतीयांनी स्वतःहून लस घ्यायला पुढं यावं असं आपल्याला वाटत असेल तर लस व तिच्या प्रभावाबद्दल पारदर्शी असणं आवश्‍यक आहे; पण वाढत्या शंकांचं समाधान करणं शक्य नसेल तर कोव्हॅक्सिन लशीची परिणामकारता आणि विश्र्वासार्हतेची खात्री पटेपर्यंत ती तात्पुरती मागं घेण्याचा विचार आपण करायला हवा. कोणती लस वापरली जाते यापेक्षा मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणं हे महत्त्वाचं ध्येय आहे हे लक्षात ठेवावं.

(सदराचे लेखक दिल्लीस्थित ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com