भविष्याचा ठेवा (कौस्तुभ केळकर)

कौस्तुभ केळकर kmkelkar@rediffmail.com
रविवार, 18 मार्च 2018

आवर्ती ठेव असा शब्द आपण अनेकदा ऐकतो. आवर्ती ठेव म्हणजे नक्की काय, आपल्या भविष्यातल्या खर्चासाठी ती कशा प्रकारे मदत करू शकते आणि तिची वैशिष्ट्यं काय आदी गोष्टींवर एक नजर.

आवर्ती ठेव असा शब्द आपण अनेकदा ऐकतो. आवर्ती ठेव म्हणजे नक्की काय, आपल्या भविष्यातल्या खर्चासाठी ती कशा प्रकारे मदत करू शकते आणि तिची वैशिष्ट्यं काय आदी गोष्टींवर एक नजर.

बॅंकिंग हा आज प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलं आहे. बॅंकेत उपलब्ध असलेल्या विविध खात्यांच्या पर्यायातून आपले आर्थिक व्यवहार करता येतात; दैनंदिन, अल्प काळासाठीचं आणि दीर्घकाळातलं आर्थिक नियोजन करता येतं. आजच्या वाढत्या आकांक्षाच्या आणि अपेक्षांच्या काळात खर्चाचं प्रमाण आणि त्याचे प्रकार वाढत चालले आहेत. या पार्श्वभूमीवर भविष्यातले खर्च ओळखून, त्यांचा अंदाज घेऊन त्यांचं नियोजन करण्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. तसं केलं नाही, तर इतर कुठल्या तरी कारणांकरता पैसे खर्च होऊन भविष्यातल्या महत्त्वाच्या बाबींकरता रक्कम उभी करणं दुरापास्त होऊ शकतं. भविष्यातील खर्चाच्या नियोजनासाठी अनेक पर्यायांबद्दल आपण वाचतो. त्यात आवर्ती ठेव किंवा रिकरिंग डिपॉझिट असाही शब्द आपण ऐकत असतो. ही आवर्ती ठेव म्हणजे नक्की काय हे आपण बघू.

आवर्ती ठेव योजना ही एक खास बचत ठेव योजना असते. आवर्ती किंवा रिकरिंगचा अर्थ असतो पुनःपुन्हा. थोडक्‍यात सांगायचं तर नियमित. या प्रकारच्या योजनेत आपल्याला ठराविक काळानं-शक्‍यतो महिन्यातून एकदा विशिष्ट रक्कम भरावी लागते. अशी रक्कम पुनःपुन्हा भरली, की तुमची रक्कम हळूहळू वाढत जाते. तिच्यावर व्याजसुद्धा हळूहळू जमा होत जातं आणि मग तुम्ही ठरवलेल्या काळाच्या शेवटी एक मोठी रक्कम तुमच्या हातात पडते. नेहमीच्या ठेव योजनेत एक मोठी रक्कम आपण आधीच भरतो आणि तिचं व्याज पाहिजे त्या प्रकारे घेतो किंवा शेवटी घेतो. आवर्ती ठेव योजनेत मात्र छोट्याछोट्या रकमा भरत तुम्ही स्वतःची मोठी रक्कम तयार करू शकता. स्वतःचं भविष्य सुकर करण्यासाठी हा उत्तम मार्ग असतो.

भारतामध्ये जवळपास सर्वच बॅंका, पोस्ट ऑफिस या प्रकारची ठेव स्वीकारतात. या योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम जमा केली जाते. यामध्ये शंभर रुपयांपासून ते काही लाखापर्यंत रक्कम स्वीकारली जाते. यावर मिळणारं व्याज हे प्रत्येक बॅंकेनुसार वेगळं असतं. सध्या सहा टक्‍क्‍यांपासून ते आठ टक्‍क्‍यांपर्यंत वेगवेगळ्या बॅंका व्याज देतात. दीर्घ मुदतीमध्ये या योजनेअंतर्गत चांगला परतावा मिळू शकतो. काही बॅंका त्रैमासिक किंवा मासिक चक्रवाढ गतीनं व्याज देतात.

आवर्ती ठेव योजनेची वैशिष्ट्यं :
यामध्ये प्रत्येक महिन्याला ठरविक विशिष्ट रक्कम जमा करावी लागते. यामुळं बचतीची सवय लागते. अगदी शंभर रुपयांपासूनसुद्धा आवर्ती ठेव स्वीकारली जाते, त्यामुळं "पैशांची अडचण होती' असं कारण सांगून बचत करणं तुम्ही टाळू शकत नाही. बॅंकांमध्ये हे खातं सर्वसाधारणपणे सहा महिने ते दहा वर्षं मुदतीकरता उघडता येतं. एखादी व्यक्ती तिच्या रकमेच्या आणि वेळेच्या गरजेनुसार ही मुदत ठरवू शकते. यामध्ये परतावा चांगला मिळतो आणि कुठल्याही प्रकारचा धोका नाही (मुद्दल म्हणजे मूळ रक्कम घटत नाही. तसंच काही बॅंका आवर्ती ठेव योजनेवर कर्जही देतात, परंतु चांगल्या आर्थिक नियोजनासाठी असं कर्ज घेऊ नये.) एका आर्थिक वर्षांमध्ये दहा हजार रुपयांपर्यंतच्या व्याजावर कर आकारला जात नाही. त्यावरच्या रकमेवर मात्र कर कापला जातो. आवर्ती ठेव योजनेचं खातं मुदतपूर्व बंद करता येतं; पण त्यासाठी कमी व्याजदर मिळतो. शिवाय खातं मुदतीपूर्वीच बंद केल्यानं आर्थिक नियोजनाचा उद्देश साध्य होत नाही. त्यामुळं ते शक्‍यतो मुदतीपूर्वी बंद करू नये. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या योजनेचा संपूर्ण लाभ घेण्यासाठी, कुठल्याही कॅलेंडर महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या कामकाजी दिवशी वा तत्पूर्वी भरणं आवश्‍यक आहे. (तुमच्या बचत खात्यातून रक्कम वळती करून घेण्याचा पर्यायही तुम्ही निवडू शकता). तसं न झाल्यास थकीत हप्त्यांवर दंड आकारला जाऊ शकतो. प्रत्येक बॅंकेनुसार त्यांची आकारणी वेगळी असते आणि काही अपवादांमध्ये तो दंड माफही होऊ शकतो.

भविष्यातल्या खर्चाचं नियोजन
आजच्या काळात शिक्षणासाठी आणि त्या अनुषंगानं कराव्या लागणाऱ्या खर्चाच्या रकमेमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. उदाहरणार्थ, क्‍लासेसची फी, कॉलेजची फी इत्यादी. एखाद्या व्यक्तीचा मुलगा/ मुलगी आज समजा पाचवीमध्ये शिकत आहे आणि पुढं दहावी, बारावी; तसेच कॉलेजमध्ये कराव्या लागणाऱ्या शैक्षणिक खर्चाच्या तरतुदीसाठी आवर्ती ठेव योजना उघडण्याचं ठरवलं, तर तेव्हाच्या खर्चाचं नियोजन अगदी व्यवस्थित पद्धतीनं करता येतं. उद्दिष्ट आधीच ठरवून खूप आधी बचत सुरू केली, तर खिशावर ताण येत नाही. थोडक्‍यात सांगायचं तर "आनंदाचा ठेवा' जमा करायचा असेल, तर "आवर्ती ठेव' हा खूप चांगला पर्याय आहे.

वरील सर्व पार्श्वभूमी आणि उदाहरणे लक्षात घेता भविष्यातील खर्चाच्या नियोजनासाठी आवर्ती ठेव योजना एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Web Title: kaustubh kelkar write article in editorial