क्रेडिट कार्ड : वापर आणि उपयोग (कौस्तुभ केळकर)

kaustubh kelkar
kaustubh kelkar

"डिजिटल इंडिया'..."गो कॅशलेस'च्या आजच्या काळात क्रेडिट कार्ड ही जवळपास अपरिहार्य अशीच बाब बनली आहे. मात्र, क्रेडिट कार्डचा नेमका उपयोग काय असतो, त्याचा वापर कसा करायचा, त्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या दक्षता बाळगायच्या, याचंही भान बाळगण आवश्‍यक असतं. त्याविषयी...

आजच्या वाढत्या अपेक्षांच्या आणि आकांक्षांच्या काळात "डिजिटल इंडिया', "गो कॅशलेस' हे शब्द परवलीचे झाले आहेत... खरेदीसाठी रोख रकमेची जोखीम बाळगण्यापेक्षा खिशात क्रेडिट कार्ड बाळगणं सोईचं ठरतं. म्हणूनच सध्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डचा वापर वाढत चालला आहे. यात सोईचा भाग अधिक असला तरीही या कार्डांचा, विशेषतः क्रेडिट कार्डचा, वापर अधिक डोळसपणे करणं आवश्‍यक ठरतं.

क्रेडिट कार्ड म्हणजे काय ?
क्रेडिट कार्ड हे एखाद्या वित्तीय संस्थेकडून किंवा बॅंकेकडून दिलेलं एक प्लाटिकचं कार्ड असून याद्वारे एखाद्या व्यक्तीला ठराविक काळाकरता काही अटींवर दिलेलं विशिष्ट रकमेचं कर्ज असतं. हे कार्ड वापरून ग्राहक एखादी सेवा किंवा वस्तू खरेदी करू शकतो; परंतु ही रक्कम ठराविक मुदतीत परत न केल्यास जबर व्याज आणि दंड आकारला जाऊ शकतो. एखादी व्यक्ती क्रेडिट कार्ड वापरून सेवा घेताना, खरेदी करताना दुकानदाराकडच्या मशिनद्वारे किंवा इंटरनेटवर एखाद्या वेबसाईटवरून खरेदी करताना कार्डाची वैधता तपासली जाते आणि नंतर रक्कम मंजूर झाल्यावर व्यवहार पूर्ण होतो. या प्रक्रियेत सेवा किंवा वस्तू देणाऱ्या दुकानदाराला, कंपनीला कार्डच्या बॅंकेकडून 24 तास ते तीन दिवस या कालावधीत पैसे मिळतात, तर खरेदी करणाऱ्या व्यक्तीला हे पैसे बॅंकेला परत देण्यासाठी 45 दिवसांपर्यंतची मुदत मिळू शकते. खरेदी करताना रोख रक्कम बाळगावी लागत नाही, हा सर्वात मोठा फायदा यात असतो; परंतु जबाबदारीसुद्धा असते.

क्रेडिट कार्ड कसं मिळवाल?
आजच्या काळात जवळपास सर्व मोठ्या बॅंका क्रेडिट कार्ड देतात. यात "मास्टर कार्ड', "व्हिसा कार्ड', "रूपे कार्ड' असे अनेक पर्याय आहेत, तसंच अनेक को-ब्रॅंडेड क्रेडिट कार्डससुद्धा आहेत. उदाहरणार्थ ः आयसीआयसीआय-एचपीसीएल. कार्ड घेण्यासाठी बॅंकेनं दिलेल्या अर्जात सर्व माहिती भरून द्यावी लागते आणि यासोबत पॅनकार्ड, आधारकार्ड, रहिवासाचा दाखला, आपल्या उत्पन्नाचा पुरावा, बॅंकखात्याचा तपशील अशी विविध कागदपत्रं बॅंकेच्या मागणीप्रमाणे द्यावी लागतात. क्रेडिट कार्डसाठी अर्ज करताना सर्व अटी, नियम, कार्डाचं वार्षिक शुल्क, पैसे भरण्याची मुदत आणि कालावधी, पैसे मुदतीनंतर भरल्यास द्यावा लागणारा दंड, कर, व्याज यांची संपूर्ण माहिती करून घेणं आवश्‍यक असतं. नंतर बॅंकेकडून आपण दिलेल्या माहितीची सर्व खात्री करून घेतली जाते. आपण काम करत असलेल्या, व्यवसाय करत असलेल्या ठिकाणी येऊन चौकशी केली जाते आणि अर्ज करणारी व्यक्ती बॅंकेचे याबाबतचे निकष पूर्ण करत असेल तरच आणि सर्व खातरजमा झाल्यावरच कार्ड दिलं जातं. बॅंक क्रेडिट कार्डसाठी प्रथम वर्षाची फी आणि दर वर्षासाठी फी आकारते. प्रत्येक बॅंक आणि कार्डवर मिळणाऱ्या सुविधा यांनुसार यात फरक असू शकतो; परंतु काही वेळा या दोन्ही फी माफ केल्या जातात.

क्रेडिट कार्डवरचा तपशील व त्याचं महत्त्व
बॅंकेनं दिलेल्या क्रेडिट कार्डवरचा सर्व तपशील नीट समजून घेणं महत्त्वाचं असतं. कार्डवर पुढील बाजूला आपलं नाव, कार्ड नंबर, कोणत्या महिन्यात दिलं गेलं, कधीपर्यंत ते वैध आहे याचा महिना आणि वर्ष, होलोग्राम, काही पर्यायांमध्ये आपला फोटो, तर मागच्या बाजूला मॅग्नेटिक स्ट्रिप (ज्याद्वारे दुकानातलं मशिन आपलं कार्ड वाचू शकतं), कार्ड व्हेरिफिकेशन नंबर, बॅंकेचा हेल्पलाईन नंबर, आपली सही असे तपशील असतात. बॅंक कार्ड पाठवताना सोबत एक पुस्तिका देते. तीमध्ये हे सर्व दिलेलं असतं. ही पुस्तिका - म्हणजे कार्ड आणि ते वापरण्याचं "बायबल' - नीट वाचावी, जपून ठेवावी आणि वेळोवेळी तिचा वापर करावा. कार्ड मिळाल्यावर लगेच सही करावी; तसंच याबरोबर एक पिन नंबर दिला जातो, कार्ड वापरताना याचा उपयोग करावा लागतो.

डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डमधला फरक
आजच्या जमान्यात डेबिट कार्डससुद्धा लोकप्रिय होत असून, क्रेडिट कार्डसबरोबर डेबिट कार्डसचाही वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे; परंतु या दोन्हींमध्ये मूलभूत फरक आहे. डेबिट कार्ड म्हणजे आपल्या बॅंक खात्याच्या चेकबुकचं डिजिटल स्वरूप आहे. ते आपल्या बॅंक खात्याशी जोडलं गेलेलं असतं आणि याद्वारे खरेदी केल्यावर बॅंक खात्यातून पैसे काढले जातात. खरेदीदाराच्या खात्यातून खरेदीच्या रकमेची कपात होत असल्यानं डेबिट कार्ड वापरताना आपण आपल्या खात्यात उपलब्ध रकमेएवढीच खरेदी करू शकतो. क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठीच्या अर्जाबरोबर अनेक कागदपत्रं, उत्पन्नाचा तपशील इत्यादी द्यावं लागतं, तर डेबिट कार्ड मिळवण्यास तसं सोपं असतं. आपण बॅंकेत खातं उघडल्यावर डेबिट कार्ड मिळतं. क्रेडिट कार्डची देय रक्कम मुदतीत भरली नाही तर थकबाकीवर व्याज घेतलं जातं. व्याजदर बराच जास्त असतो; परंतु डेबिट कार्ड वापरल्यावर व्याज घेतलं जात नाही. कारण, आपल्याच बॅंक खात्यामधून पैसे घेतले जातात.

डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड यांच्यातले नमूद केलेले फरक सोडल्यास डेबिट कार्डचं स्वरूप क्रेडिट कार्डसारखंच असतं. डेबिट कार्ड मिळाल्यावर सही करावी, तसंच याबरोबर एक पिन नंबर दिला जातो, कार्ड वापरताना त्याचा उपयोग करावा लागतो. हा पिन नंबर कुणालाही सांगू नये. डेबिट कार्ड हे एटीएम कार्डसारखं वापरून आपल्या बॅंक खात्यातून पैसे काढता येतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, डेबिट कार्ड वापरताना बॅंक खात्यातून थेट पैसे वजा होत असल्यानं खर्चावर नियंत्रण ठेवता येतं आणि हे आर्थिकदृष्ट्या शहाणपणाचं असतं. क्रेडिट कार्ड वापरताना आणि वापरल्यानंतर दुकानात किंवा इंटरनेटवर एखाद्या वेबसाईटवरून क्रेडिट कार्ड वापरून खरेदी करताना सावधानता बाळगावी. कुणीही प्रत्यक्ष किंवा फोनवरून आपल्या कार्डची माहिती - कार्ड नंबर , कार्ड व्हेरिफिकेशन नंबर, पिन नंबर मागितल्यास तो कोणत्याही परिस्थितीत देऊ नये. बॅंका कधीही ही माहिती विचारत नाहीत. ही माहिती आपण कुणाला दिल्यास आपली फसगत होऊन आपल्या कार्डवर खरेदी केली जाऊ शकते, तसंच कोणत्याही लॉटरीसाठी, बक्षीस, स्पर्धा यांसाठी क्रेडिट कार्डचा कधी वापर करू नये. कार्डवर खरेदी केल्यावर आपल्याला एसएमएस आणि ई-मेल येतो, याची दखल घ्यावी. लोकांना कार्डचा तपशील विचारून खरेदी करून फसवणूक केल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये जवळपास रोज येत असतात. फसवणूक कशा प्रकारे होऊ शकते, केली जाऊ शकते हे कळण्यासाठी आणि ती टाळण्यासाठी अशा बातम्या नीट वाचाव्यात. यातून सावधानतेचा धडा घ्यावा. ही सर्व सावधानता डेबिट कार्डचा वापर करतानासुद्धा घ्यावी.
क्रेडिट कार्ड वापरताना आपल्याला देय असलेल्या (आउटस्टॅंडिंग) रकमेचं वेळच्या वेळी पेमेंट केल्यास अतिरिक्त शुल्क लावलं जात नाही. त्यासाठी देय तारखेच्या आत बॅंकेकडं पैसे जमा करावे लागतात. बॅंक दर महिन्याला कार्डचं स्टेटमेंट पाठवते, त्यात आपण कोणती, कधी आणि किती रकमेची खरेदी केली आहे, सेवा घेतली आहे, पैसे भरण्याचा अंतिम दिनांक (देय तारीख) हे दिलेलं असतं.

कार्डचं स्टेटमेंट नीट वाचावं आणि ते जपून ठेवावं. वास्तविक, शक्‍य असल्यास संपूर्ण देय रक्कम भरणं फायद्याचं ठरतं. किमान देय रक्कम भरल्यास उर्वरित देय रकमेवर व्याज भरावं लागतं. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, क्रेडिट कार्ड वापरून एटीएममधून पैसे काढल्यास त्या क्षणापासून त्यावर व्याज सुरू होतं, तसंच त्यासाठी व्यवहारशुल्क आकारण्यात येतं. हे सर्व पाहता क्रेडिट कार्ड उपयुक्त असलं तरी अनेकदा नेमका खर्च किती करायचा आहे, याकडं लक्ष दिलं जात नाही आणि खर्च होत राहतो. त्यातला काही खर्च खरोखरच अनावश्‍यक, म्हणजेच "आहे ना क्रेडिट कार्ड, मग होऊ देत खर्च' म्हणून केलेला असतो. हा अनावश्‍यक खर्च आणि त्यावरच्या व्याजाचा भुर्दंड टाळण्यासाठी स्वतःवर खर्चाची विशिष्ट मर्यादा घालून घेणं अत्यावश्‍यक आहे. भरमसाट व्याजाचा भुर्दंड टाळण्यासाठी आपल्या क्रेडिट कार्डच्या क्रेडिट-मर्यादेतच व्यवहार करावेत, हे कधीही चांगलं!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com