‘एकट्या’ची दुर्गभ्रमंती !

कविता जांभळे
सोमवार, 15 जानेवारी 2018

जाता-येता १०-१५ माणसं भेटली आणि प्रश्न एकच, ‘एकटा’च? पण खरं तर मी ‘एकटाच’ नव्हते. ही रस्ता दाखवणारी माणसं, कास पठारासारखी फुलं, क्षमतांचा कस पाहणारे कातळ कडे आणि पायात ढीगभर सरडे मला ‘एकटं’ ठेवतच नव्हते.

‘‘एकटाच आलंईस व्हय?’’
 ‘‘व्हय’’ मी.

 ‘‘आरं कोणतर सोबती आणायचा. एकाला दोन असलं की बरं असतं.’’

 ‘‘व्हय पुन्हाच्याला घेऊन येतो. आता गडाच्या पायथ्याशी सोडा ना.’’ 

‘‘बस सोडतो.’’ सातारा स्टॅंडपासून सुरू झालेला प्रवास कडेगावच्या फाट्यापर्यंत नीट झाला आणि तिथून पुढे एकतर ‘वडाप’ची वाट बघायची (तीपण सकाळी दहा वाजल्यानंतर सुरू होते.) नाहीतर काका, मामा करत लिफ्टचा पर्याय निवडायचा (मला दुसरा पर्याय कायम आवडतो. त्यात पैसे वाचतात आणि ओळखी होतात!) पहिल्या दोन काकांनी तोच प्रश्न विचारला, पुढं भेटेल त्या प्रत्येकानं तोच प्रश्‍न परत विचारला. आता या सगळ्यांना किती सांगू, की मी ‘एकटा’ नसून ‘एकटी’ आहे आणि होय, पुण्यावरून बोंबलत गड बघायला आली आहे कोणाला सोबत न घेता!

गडाच्या पायथ्याशी काका लोकांनी वाटा दाखवल्या आणि ‘एकटा’ आहे म्हणून थोडं भीतीपण दाखवली. शेवटी न राहून मी विचारलं, ‘‘बिबट्या वगैरे आहे का?’’ (आदल्या दिवशी ‘अजिंक्‍यतारा’ला वाटेवर होता असे कळलं होतं म्हणून आपलं विचारलं!) ‘नाही पण एकाला दोघं असलं की बरं असतं’ उत्तर तेच. सकाळी आठला गड चढायला सुरवात केली. अर्धा तासात एक झेंडा दिसला, लगेच सेल्फी हाणली. वाटलं जवळ आलं, अर्ध्या तासात गड सर करू. पण कुठलं काय...एक तास झाला, दीड तास झाला तरी फक्त धुकं, कातळ कडे, पायात ४-५ सरडे आणि मी. सो मी ‘एकटा’ नव्हतोच. गडावर जाताना रॉक पॅचेस भरपूर आहेत. त्यामुळे नव्या ट्रेकरने जाण्यात अर्थ नाही (previous experience must.) शेवटी दोन तासांनी दोन छोटे, पण haunted jungle area पार केल्यावर गडाचा खरा पायथा दिसला. जाताना १०-१५ पायऱ्या लागतात, मग मोठी तटबंदी. आजही तटबंदी भक्कम आहे. वर गेल्यावर वैराटेश्‍वरच मंदिर, चार पाण्याची तळी आणि हनुमान मंदिर दिसते. सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे चोर दरवाजा. कदाचित त्या रस्त्याने पण गडावर जाता येत असेल. गड मोठा असल्याने नीट निरखून बघून घ्यायला दोन तास तरी लागतील. कास पठारावर फुले आहेत तशीच भरपूर ठिकाणी आहेत.

गडावरून उतरताना पूर्ण घसरण आहे. मी तर घसरगुंडी खेळतच आले. उतारावर एक आजीच्या घरी पाणी प्यायला गेले. तिथपण तोच प्रश्न. आजीने जेवायला पण बोलावलं. (मी उगीच नको म्हटलं.) मग पुन्हा गावाची वाट पडकली. पुढच्या वेळी लागला तर म्हणून सरपंचाचा नंबर पण घेतला. जाताना एक दादा भेटला. त्याला आधीच सांगितलं, ‘‘होय एकटाच हाय.. फाट्यावर सोड की’ मग त्याने जाताना टोमॅटो, हळद, सोयाबीन आणि ऊस हे इथलं मुख्य पीक असतं वगैरे माहिती दिली तसेच गडाचा थोडाफार इतिहासपण सांगितला. जाता-येता १०-१५ माणसं भेटली आणि प्रश्न एकच, ‘एकटा’च? पण खरं तर मी ‘एकटाच’ नव्हते. ही रस्ता दाखवणारी माणसं, कास पठारासारखी फुलं, क्षमतांचा कस पाहणारे कातळ कडे आणि पायात ढीगभर सरडे मला ‘एकटं’ ठेवतच नव्हते. मज्जा आली आणि या गडाला मी ‘मध्यम तरीही अवघड’च म्हणेन.

Web Title: kavita jambhale article fort