मैफलीतून शांत रस झरायला हवा (केशव गिंडे)

केशव गिंडे
रविवार, 25 मार्च 2018

तालवाद्यांच्या अनाठायी आणि अनिर्बंध वापरानं राग-स्वरशिल्पाचा डोलारा कोसळतो. अतिद्रुत लयीतल्या गोंगाटानं मैफलीची सांगता झाल्यावर श्रोत्यांची भावना ही कारखान्यात काम करून शिणलेल्या कामगाराच्या मनःस्थितीशी जुळणारी असते! ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत सांगितलेल्या शांतरसाची निर्मिती मैफलीतून होणं गरजेचं असतं. 

मी कोणती तरी कला शिकावी, असं माझ्या आईला वाटत असे. मी लहान असताना आईनं मला एक उभी बासरी आणून दिली. ('देवकी कृष्ण' हे आमच्या कुटुंबाचं कुलदैवत आहे). लहानपणी अहेतुकपणे माझ्या हातात आलेली ही बासरीच पुढं जगण्याचा हेतू बनली. कारण, ती माझ्या आयुष्याचं ध्येय, ध्यास आणि स्वप्न बनली. आम्ही मूळचे बेळगावचे. मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि बालगंधर्व यांच्या नाटकांत ऑर्गनची साथ करणारे नारायणराव बोरकर ऊर्फ बाबी यांच्याकडं मी संगीताचे प्राथमिक धडे गिरवण्यास सुरवात केली. आपल्या देशाच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेत बासरीवर मी 'राष्ट्रगीत' वाजवलं होतं. त्यानंतर मुख्याध्यापकांनी मला गुलाबाचं फूल दिलं. हीच माझ्या बासरीवादनाची सुरवात म्हणावी लागेल. गुरुवर्य बोरकर यांनी प्रथम माझ्याकडून उभ्या बासरीतले अलंकार व साधारणतः 25 रागांची तयारी करवून घेतली. नाट्यसंगीत बासरीवर कसं वाजवावं, याची दृष्टी त्या काळात त्यांनी मला दिली. वारकरी पंथाच्या घरात माझा जन्म झाल्यामुळं लहानपणापासूनच भजन-कीर्तनाचे संस्कार माझ्यावर झाले होते. माझे आजोबा दामोदरपंत गिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी मृदंग शिकलो. मी मृदंगाची व तबल्याची साथही करत असे. सन 1952 मधली गोष्ट. रेडिओवर रात्री साडेनऊ वाजता होणारं पंडित पन्नालाल घोष यांचं बासरीवादन ऐकण्यासाठी माझ्या मामानं (गोविंद नाईक) मला त्याच्या घरी बोलावलं. मी रात्री सायकलवरून त्याच्या घरी गेलो. प्रारंभी सलग दीड मिनिट चाललेला पन्नाबाबू यांचा भरदार प्रदीर्घ षड्‌ज ऐकून मी अंतर्बाह्य रोमांचित झालो. 'यापुढं यांचंच वादन आपण आत्मसात करायचं,' अशी मी मनात खूणगाठच बांधली. याच काळात पन्नाबाबू यांचा बेळगावच्या 'आर्ट सर्कल'अंतर्गत एक सांगीतिक कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. ही मैफल चिरस्मरणीय ठरली. पन्नाबाबूंनी यमन राग वाजवताना अतिविलंबित झुमरा तालातली संथ आलापी सुरू केली. ज्या क्षणी त्यांनी वादी स्वर गंधारावर न्यास केला तेव्हा रसिकश्रोत्यांनी मोठी उत्स्फूर्त दाद दिली. पंडित निखिल घोष यांची हळुवार तबलासाथ बासरीच्या नाजूक स्वरपुष्पांना जणू अलगद गोंजारत होती! 

सन 1959 मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर इंटरपर्यंतचं माझं शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालं. कॉलेजच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त एक कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. माझ्या बासरीवादनानं या कार्यक्रमाची सुरवात झाली. समोर तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद, तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख, महर्षी धोंडो केशव कर्वे, यशवंतराव चव्हाण असे अनेक मान्यवर उपस्थित होते. सगळ्यांनी माझ्या वादनाला दाद देऊन शाबासकी दिली. अशा उत्कट आनंदातून माझे बासरीशी ऋणानुबंध जुळत गेले. सन 1964 मध्ये मी वालचंद कॉलेजातून बीई उत्तीर्ण झालो आणि नोकरीला लागलो. नोकरी सुरू ठेवून गुरूच्या शोधात मी मुंबईला गेलो. पन्नाबाबू यांचे मित्र व शिष्य पंडित हरिपद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली माझं बासरीवादन नव्यानं सुरू झालं. 'शहनाईपद्धती'ऐवजी 'घोषपद्धती'नं मी बासरीवादन शिकू लागलो. या पद्धतीत वादन करताना बोटांच्या रचनेच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला. मात्र, यामुळं रागरचनेप्रमाणे स्वरांचा सूक्ष्मतम आविष्कार (कोमल, अतिकोमल, चढा कोमल, शुद्ध) करणं लीलया शक्‍य होतं. चौधरी यांच्या सल्ल्यानं मी पंडित देवेंद्र मुर्डेश्वर यांच्याकडंही तालीम घ्यायला सुरवात केली. मुर्डेश्वर म्हणजे पन्नाबाबूंचे पट्टशिष्य आणि जावई. दोन्ही गुरुवर्यांचं मला दोन तपांहून अधिक काळ मार्गदर्शन मिळालं. 

सन 1970 मध्ये मी पुण्यात आलो. याचदरम्यान पुणे आकाशवाणीवर माझी निवड झाली होती. दरम्यानच्या काळात पंडित अरविंद गजेंद्रगडकर आणि अन्य पाच-सहाजण मिळून आम्ही बासरीवादनाचा स्वतंत्र कार्यक्रम सुरू केला. काही राग एकत्र करून 'वेणू-वाद्यवृंदां'ची रचना केली. त्यातून 'मल्हार-सागर', 'ऋतुरंग'मध्ये सहा ऋतूंचे बारा राग, 'कल्याण-नवरंग' ('कल्याण'सहित नऊ प्रकार), कल्याण नवरंगसागर ('कल्याण'सहित 25 प्रकार ), 'वेणू-नाट्यरंग', 'वेणू-अभंगरंग', 'वेणू-सारंग' असे वेगवेगळे राग निर्माण केले. त्या काळात बासरीवादनाला स्वतंत्र व्यासपीठदेखील उपलब्ध नव्हतं. 

'रियाजाची बैठक', 'प्राणायाम', 'प्रत्याहार', 'धारणा' (चित्ताची स्थिरता), 'स्वरसमाधी' या वादकाच्या दृष्टीनं अतिमहत्त्वाच्या बाबी असतात. 'चालिसा' नावाचा रियाजाचा एक अनोखा प्रकार आहे. त्यात 40 दिवस स्वतःला घरात कोंडून घ्यायचं असतं. गरजेची विश्रांती वगळता संगीताचा सतत अभ्यास, रियाज, चिंतन, मनन करायचं. असा रियाज मी दोनदा केला. शास्त्रीय संगीतात 'समयचक्रा'चंही मोठं महत्त्व आहे. यासंदर्भात एक प्रसंग सांगावासा वाटतो. समुद्रकिनारी सूर्यबिंब क्षितिजावर अर्धं बुडाल्यानंतरच षड्‌ज लावून स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण वझेबुवांना 'श्री' रागाची संथा दिली होती. 

(स्वामी विवेकानंद यांचा 'संगीत कल्पतरू' हा सांगीतिक ग्रंथ नरेंद्र दत्त या नावानं बंगाली भाषेत उपलब्ध आहे). संगीतमैफलीतून गायक-वादक कलाकारांच्या गुरुपरंपरेचं सर्वांगीण प्रकटीकरण, रागानुषंगानं श्रुतिमनोहर स्वरांचं सादरीकरण अपेक्षित असतं. मिंड, घसीट, गमक, खटका, मुरकी, सूंथ रागानुसार तीन सप्तकांतला स्वरसंचार, विविध तानक्रिया, मिश्र-संकीर्ण रागांचं गायन-वादन अशा भारतीय अभिजात संगीताच्या विविध पैलूंचं दर्शन अपेक्षित असतं. तालवाद्यांच्या अनाठायी आणि अनिर्बंध वापरानं राग-स्वरशिल्पाचा डोलारा कोसळतो. अतिद्रुत लयीतल्या गोंगाटानं मैफलीची सांगता झाल्यावर श्रोत्यांची भावना ही कारखान्यात काम करून शिणलेल्या कामगाराच्या मनःस्थितीशी जुळणारी असते! ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत सांगितलेल्या शांतरसाची निर्मिती मैफलीतून होणं गरजेचं असतं. 

बासरीवर काही राग वाजवताना मर्यादा पडते, ही गोष्ट मला सतत अस्वस्थ करत होती. यावर अनेक वर्षं चिंतन-मनन केल्यावर ही मर्यादा पार करण्याचे मार्ग मला सापडले. मंद्र, अतिमंद्र, मध्य, तार, अतितार अशा कुठल्याही सप्तकात लीलया फिरता येऊ शकेल, अशा बासरीची गरज होती. सध्याही अनेक बासरीवादक सहा छिद्रांच्या बासरीचा वापर करतात. या बासरीतल्या काही अंगभूत उणिवांवर मात करण्याच्या दृष्टीनं पन्नाबाबूंनी सहाऐवजी सात स्वररंध्रांची (फुंकण्याचं मुखरंध्र धरून आठ) बासरी रूढ केली. हा पल्ला मी अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न केला. 14 वर्षं सातत्यानं संशोधन करून रागवादनातल्या तांत्रिक परिपूर्णतेसाठी मी 'केशववेणू' नावाची अनोखी बासरी बनवली. या बासरीला मुखरंध्रासह बारा स्वररंध्रं आहेत. या बासरीला खुबीनं कळ बसवण्याचं 'इंजिनिअरिंग'सुद्धा मी केलं. या बासरीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी मला चार वर्षं साधना करावी लागली. या बासरीची दखल 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस' आणि 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस'नं घेतली. सन 1988 मध्ये आकाशवाणी केंद्रावर या बासरीचं माझं पहिलं वादन झालं. पारंपरिक बासरीत नि, ध, प हे तीनच स्वर खर्ज अर्धसप्तकात वाजू शकतात. स्वरांची सूंथ एक सप्तकाहून कमी आहे. स्वरांची सलगता 'मध्यम' आणि 'पंचम' स्वरांकडं तुटते; यामुळं 'मियॉं मल्हार', 'दरबारी', 'मालकंस' हे राग शास्त्रीयदृष्ट्या परिपूर्ण वाजू शकत नाहीत, तसंच ज्या रागात 'ग प-प ग', 'म प-प म' अशा स्वरांत मिंड-घसीट आहे असे 'शंकरा', 'कलावती', 'भूप' हे राग वाजवल्यास त्यांची शास्त्रीय अपेक्षा पूर्ण होत नाही. या त्रुटी 'केशववेणू'मध्ये दूर झाल्या. माझे शिष्य अझरुद्दीन शेख यांच्या मदतीनं मी 'अतिखर्ज', 'अनाहतवेणू', 'चैतन्यवेणू' अशा अतिप्रगत बासऱ्यांची रचना केली. 

मी आता वयाची पंचाहत्तरी जरी ओलांडली असली तरी अजून मला खूप काम करायचं आहे. अठरा फूट बासरी करण्याची माझी इच्छा आहे, जिथं वादन 'लरज' सप्तकाखाली एक सप्तक (अतिअतिमंद्र) करणं शक्‍य होईल आणि एकूण बासरीची वादनक्षमता आठ सप्तकांहून अधिक सप्तकांपर्यंत वाढेल (30 हर्टझपासून 6000+ हर्टझ ). पियानो हे एकमेव वाद्य साडेसात सप्तकांत वाजतं. 

भारतीय शास्त्रीय संगीत हा आपल्या परंपरेचा फार मोठा ठेवा आहे. पुढील पिढीपर्यंत हा वसा लिखित स्वरूपात गेला पाहिजे, या उद्देशानं मी लेखन सुरू केलं. बासरी या वाद्याची शास्त्रीय माहिती देणारा 'वेणू-विज्ञान' हा ग्रंथ मी लिहिला आहे.'वेणू-विज्ञान' हा अशा प्रकारचा पहिलाच ग्रंथ असून त्यामुळं बासरीवादकांची आणि रसिकांचीही मोठी सोय झाली. बासरीच्या सर्व पैलूंना चिकित्सक पद्धतीनं स्पर्श करण्याचा प्रयत्न मी त्यातून केला आहे. गायनातल्या व्याकरणाचा बासरीच्या अंगानं परामर्श घेऊन तो वाचकांपुढं मी ठेवला आहे. 'संगीतातून समाधी' हा 'वेणू-विज्ञान'विवेचनाचा प्रमुख उद्देश आहे. द्वापारयुगात या मधुर वाद्याला 'मुखवीणा' असं म्हणत असत. बासरीचा रंजक इतिहास समजायलाही या ग्रंथातून मदत होते. बासरी या वाद्याचं ध्वनिशास्त्र, वेणूवादनाची सप्तपदी, मूर्च्छना, रागभूमिका, रागवादन, रागाभ्यास यांविषयी संगीतव्याकरणाच्या अंगानं तपशीलवार विवेचन या ग्रंथात आहे. 

पन्नाबाबू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सन 1990 मध्ये 'अमूल्यज्योती' न्यासाची स्थापना करण्यात आली आहे. (पंडित पन्नालाल घोष अर्थात पन्नाबाबू यांचं मूळ नाव अमूल्यज्योती हे आहे). याद्वारे आजवर असंख्य गायक-वादकांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. या न्यासाद्वारे शिष्यवृत्त्यांसारखे अनेक स्तुत्य उपक्रम राबवले जातात. 

नोकरी, रियाज, अनेक शिष्यांची शिकवणी, विदेशदौरे या सगळ्या गडबडीत आमच्या प्रपंचाचा रामरगाडा माझी सुविद्य पत्नी वीणा हिनं अगत्यानं आणि निगुतीनं सांभाळला. याची तुलना वीणेच्या अचल षड्‌जाशीच होऊ शकेल! 

कौतुकाचा तो 'प्रसन्न' क्षण! 
दिल्ली इथं सन 1991 मध्ये एक राष्ट्रीय कार्यक्रम होता. त्यात मला बासरी वाजवायची होती. माझ्यानंतर पंडित भीमसेन जोशी यांचा कार्यक्रम होता. समोर प्रेक्षकांमध्ये पंडित रघुनाथ प्रसन्न (पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या गुरूंचे गुरू) बसलेले होते. या कार्यक्रमात खर्ज, ऋषभ ते अतितार मध्यम अशी तान मी घेतली. माझं वादन झाल्यावर मी भीमसेनजींना अभिवादन करून जात असताना रघुनाथजींची हाक आली. मी घेतलेल्या तानेबद्दल त्यांनी माझं विशेष कौतुक केलं आणि माझ्याकडून पुन्हा मेघमल्हार वाजवून घेतला. हा माझ्या जीवनातला संस्मरणीय प्रसंग होय. 

(शब्दांकन : रवींद्र मिराशी) 

'सप्तरंग'मधील लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Keshav Ginde writes about Classical Music