खचता रे पाया, कसे कोसळते घर...

मारोती चवरे
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

आठवितात ते दिवस आणि एकमेकांसाठी घेतलेल्या जीवनमरणाच्या शपथा. तो अलगद आयुष्यात आला आणि मी सर्वस्व झुगारून त्याच्या प्रेमात पडले. म्हणतात प्रेम आंधळं असतं. मीही गेली त्या प्रवाहात वाहून आणि बघता बघता आयुष्याच्या अशा वळणावर येऊन पोहोचलो की रक्ताच्या नात्यातून आणि प्रेमाच्या धाग्यातून मला एकाची निवड करायची होती. एका बाजूला जन्म देणारे आईवडील आणि दुसऱ्या बाजूला माझं भविष्य. भविष्याचा विचार केला तर माहेर संपणार होतं आणि रक्ताच्या नात्याचा विचार केला तर प्रेम आयुष्यातून उठणार होतं. इकडं पहाड आणि तिकडं विहीर... मी दोन्ही गमावू इच्छित नव्हती; पण आयुष्यात केलेल्या प्रेमाचा गुन्हाच हा होता की मी कोणताही निर्णय घेतला तरी माझ्या निर्णयाच्या गणितात वजाबाकीच होणार होती.
मनाला नको असताना छातीवर गोटा ठेवून त्याला दिलेलं वचन निभविण्याचा मी निर्णय घेतला आणि मी लग्नाला तयार झाली. माझ्या या निर्णयानं रक्ताचे नाते दुरावले; पण वडिलांनी माझ्या चुका पदरात घालून आईला माझ्या लग्नाचा साक्षीदार केलं. एका मंदिरात आम्ही लग्न केलं आणि आम्ही नव्या आयुष्याला सुरवात केली. माझे आईवडील सर्वसामान्य मजूरदार होते. दोघे भाऊ. एक मेसमध्ये काम करायचा आणि एक ऑटो चालवायचा. मी एकटी असल्यानं सर्वांच्या लाडाची होती. मी बारावीला शिकत होते. अशात माझी व विशालची भेट झाली. भेटीचं रूपांतर प्रेमात झालं आणि आम्ही लग्नाच्या निर्णयापर्यंत आलो.
विशालसुद्धा आईवडिलांना एकुलता एक होता. त्यामुळं त्याचंही संगोपन लाडात झालं. परिस्थिती सामान्य होती. त्याचे आईवडील शेती करायचे. घरी पाच एकर कोरडवाहू शेती होती. तोही शेतीचं काम करायचा आणि सोबत ड्रायव्हर म्हणून रोजमजुरीही करायचा. तो माझ्यापेक्षा वयानं मोठा होता व उच्चकुळाचाही. आम्ही जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडलो तेव्हा ना जात बघितली ना परिस्थिती. मी त्याच्यावर मोहित झाले आणि तो माझ्यावर. मी त्याला जीवनाचा साथीदार मानलं. विशालसोबत लग्न झालं. माझ्या वडिलांचं नाव बदलून त्याचं नाव माझ्या नावासमोर लागलं. माझं आडनावही बदललं. आता माझ्यासाठी सर्वस्व सासरच होतं. त्याच्याशिवाय मला समजून घेणारं दुसरं कोणी नव्हतेच. त्याच्या निर्णयामुळे सासरच्यांनी मला स्वीकारलं. मनासारखे घडलं याचा आनंद व काही गमावल्याचं दु:ख विसरून मी माझ्या संसाराची सुरवात केली.
मी त्याच्यासोबत खूष होती. पण तो जेव्हा गाडीवर निघून जात होता तेव्हा, तो दिवस माझ्यासाठी खूप कठीण जात होता. सासू-सासरे छान होते. त्यानी मला आपलंसं केलं, सून म्हणून स्वीकारलं; पण मला कधी अपराधी असल्याचा भास व्हायचा आणि मीच एकांती मनोमन रडायची. बघता बघता दिवसामागून दिवस गेले. आमच्या राजा-राणीच्या प्रेमाचा अंकुर माझ्या गर्भात वाढायला लागला आणि मी आई होण्याचा आनंद अनुभवू लागली. आता जुन्या गोष्टी माझ्या भूतकाळात जमा झाल्या आणि भविष्याचे वेध लागले. तोही खूष होता. माझा आनंद गगनी मावेना. एकाकी काढलेलं आयुष्य आता बाळाच्या आगमनानं आनंदी झालं. मी एका बाळाला जन्म दिला. सासर आनंदानं बहरून गेलं. लग्नाची उणीव पोराच्या बारशात भरून निघाली आणि घरात पाळणा झुलला. चारचोघांच्या उपस्थितीत बाळाचं नामकरण झालं आणि मोठ्या प्रेमानं त्याचं नाव तन्मय ठेवलं.
आता माझा दिवस मुलाच्या सहवासात जात होता. तन्मयच्या हसण्यानं माझं एकाकीपण दूर होत होतं. त्याला बघून मी हसायची आणि मायलेक आम्ही दोघेच गप्पा मारत बसायचो. तो आता तीन महिन्यांचा झाला आणि घर आनंदी झालं. कुटुंब शेतीवर निर्भर होतं. शेतीच्या कामाशी माझा फारसा संबध आला नाही. वयाच्या वीस वर्षांपर्यंत मी शिकतच होते. त्यामुळे शेतीच्या समस्यांविषयी मी अनभिज्ञ होते. शेतीवर असणारे कर्ज आणि शेतीमधील नापिकी यांच्याबाबत मला फार कळत नव्हतं. ते आणि आईवडील याबाबत ठरवत असत. पण विशाल मात्र संकटात पडला. तो आपल्या मनाचं गुपित खोलत नव्हता. कामावरूनही त्याचं लक्ष हळूहळू कमी झालं. असाच एक दिवस उजाडला. शनिवार दिवस होता. त्यानं दोन वाजेपर्यंत घरी आराम केला आणि गावातून फिरून येतो म्हणून घराबाहेर पडला तो घरी आलाच नाही. मी त्याची वाट पाहत होते. शोधाशोध चालू झाली. दुसरा दिवस उगवला आणि बातमी आली... त्याने गावाशेजारी शेतात फाशी घेतल्याची. माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि माझं जग संपलं असं वाटलं... माझा पाया खचला आणि संसार एकाएकी कायमचा कोसळला...
मी जिवाच्या आकांताने त्याचा चेहरा पाहायला बेभान झाली... त्याला बघून माझं सर्व बळ गळून पडलं. आता त्याच्याशिवाय जगायचं नाही हा मनोमन विचार केला. काय करावं सुचत नव्हतं आणि मी कोणाचाही विचार न करता घरातील फिनाइल बाथरूममध्ये जाऊन प्राशन केलं. वाटलं, ज्याच्यासाठी मी सर्व सोडलं तोच नाही तर जगायचं कुणासाठी? सोबत जगता आलं नाही पण सोबत मरता तर येईल. त्या क्षणी मी एका बाळाची आई आहे हेही विसरले होते. पण हातून काचेची बाटली पडली आणि त्या आवाजाने लोक धावत आले. त्यांनी दरवाजा तोडून मला बाहेर काढलं आणि दवाखान्याची धावपळ चालू झाली. उपचार करून पोटातील फिनाइल काढलं. माझं दु:ख विशाल चितेवरून मुकाट्याने पाहत होता. त्याची शेवटची भेट व्हावी म्हणून दवाखान्यातून सुट्टी घेऊन विशालच्या भेटीला माझ्या आईवडिलांनी आणलं. तेव्हा हाताला सलाइन लागूनच होत्या. मी खाटेवर आणि तो चितेवर अशी आमची दोघांची शेवटची भेट झाली आणि तो कायमचा माझ्यापासून दूर झाला.
लग्नानंतर दीड वर्षाचा माझा संसार भातुकलीच्या खेळासारखा कायमचा मोडला. प्रेमाचा झरा पहिल्यासारखा वाहत नाही. घरटं कोसल्यावर पाखरं दानोफान होतात तसं माझं झालं. तन्मय तीन महिन्यांचा आहे. त्याचं बापाचं छप्पर हरवलं. सासरी चार दिवस आणि चार दिवस माहेर. पण ज्याला संसार म्हणतात असं माझं आता काहीच राहिलं नाही. जटायूचे पंख कापल्यागत. उंच भरारी घेण्याचं सामर्थ्यच मी गमावून बसले, पण संकटात पुन्हा बाप आणि भाऊ हिंमत देण्यास उभे झाले. आता माझ्यासाठी उरला तो एकाकी जीवनाचा प्रवास आणि मातृत्वाचा संघर्ष, आठवितात ते दिवस आणि उरल्या त्या आठवणी...

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: khachata re paya kase kosalate ghar