गाणं मधुराभक्तीचं - कृष्णाचंही

प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा या चित्रपटात बघायला मिळाल्या. आई आणि मुलाचं प्रेम, नवरा आणि बायकोचं बेगडी प्रेम आणि समदुःखी नायक आणि नायिकेचं प्रेम आम्हाला अनुभवायला मिळालं.
Kiran Fatak writes about amar prem movie 1972 song of Madhura Bhakti of lord  Krishna
Kiran Fatak writes about amar prem movie 1972 song of Madhura Bhakti of lord Krishnasakal
Summary

प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा या चित्रपटात बघायला मिळाल्या. आई आणि मुलाचं प्रेम, नवरा आणि बायकोचं बेगडी प्रेम आणि समदुःखी नायक आणि नायिकेचं प्रेम आम्हाला अनुभवायला मिळालं.

- किरण फाटक

रैना बीती जाये

रैना बीती जाये

रैना बीती जाये, श्याम ना आये

निंदिया ना आये, निंदिया ना आये

रैना बीती जाये...

श्‍याम तो भूला, शाम का वादा

संग दिये के, जागे राधा

निंदिया ना आये, निंदिया ना आये

रैना बीती जाये...

किस सौतन ने रोकी डगरिया

किस बैरन से लागी नज़रिया

निंदिया ना आये, निंदिया ना आये

रैना बीती जाये...

बिरहा की मारी, प्रेम दीवानी

तन मन प्यासा, अंखियों में पानी

निंदिया ना आये, निंदिया ना आये

रैना बीती जाये...

‘अमर प्रेम’ हा चित्रपट १९७२ मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट आला तेव्हा मी फक्त १७ वर्षांचा होतो. हा चित्रपट म्हणजे एक दीर्घ कविताच होती. तरुणांसाठी हा चित्रपट म्हणजे आदर्श अशा प्रेमाचं उदाहरण होतं.

‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना’ या गाण्यातून समाजातील ढोंगी लोकांचा पुरेपूर समाचार घेतलेला आढळतो. ‘पुष्पा आय हेट टिअर्स हे राजेश खन्ना यांचं वाक्य त्या वेळी प्रत्येकाच्या तोंडी होतं. हा चित्रपट तुफान चालला.

या चित्रपटातील नायक हा वेगवान जीवनशैलीला आणि रोजरोजच्या कंटाळवाण्या जीवनशैलीला दूर सारून कुठंतरी प्रेमाचा शोध घेत असतो. तो नायक कलासक्त आहे, प्रेमाचा भुकेला आहे आणि तो सौंदर्याचा चाहताही आहे. तो हे सर्व शोधत शोधत एका कोठीवर जातो, तिथं त्याला ‘रैना बीती जाये’ हे गाणं ऐकू येतं.

जिन्याच्या प्रत्येक पायरीवर तो या गाण्याच्या स्वरांनी घायाळ होत जातो आणि कोठीवर पोहोचल्यावर तो एका सुंदर अशा कलावंतीणीला बघतो. त्या स्वरांच्या आणि तिच्या सौंदर्याच्या प्रेमातच पडतो.

नायक आणि नायिका यांची कामं अनुक्रमे राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांनी केलेली आहेत. सशक्त अभिनय, बोलके डोळे आणि संयत देहबोली, यामुळे नायक आणि नायिका यांच्यातील प्रत्येक प्रसंग प्रेक्षकांच्या मनावर प्रभाव टाकणारा झाला आहे. हे गीत आनंद बक्षी यांनी लिहिलं असून आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलं आहे.

या गाण्यात राधा कृष्णाची डोळ्यांत प्राण आणून वाट पाहते, असं वर्णन आहे. कृष्णाने तिला भेटण्याचं वचन दिलं असून, ते तो विसरून गेला असावा, असं तिला वाटतं. दिव्याच्या साक्षीने ही राधा पूर्ण रात्र कृष्णाची वाट बघत आहे.

रात्र सुरू झाली आहे तरीही कृष्णाची काही चाहूल लागत नाही, असा अर्थ या गाण्यातून अत्यंत समर्पक अशा शब्दांमध्ये व्यक्त केलेला आहे. हे गाणं चित्रपटातील प्रसंगाशी अनुरूप असं लिहिलेलं आहे. कारण चित्रपटाचा नायक हा हळूहळू जिन्याच्या पायऱ्या चढत, तिच्या गाण्यावर लुब्ध होत, तिच्याकडे आकर्षित होताना दिसतो.

जगात प्रेम आणि आनंद या दोन गोष्टी अतिशय दुर्मीळ आहेत, त्या मिळण्यासाठी माणसाची पूर्वजन्माची पुण्याई असावी लागते, असं जाणकार म्हणतात. या चित्रपटातील नायिकेच्या पदरी प्रेमभावना ही कधीच येत नाही,

तिला खरं प्रेम कधीच प्राप्त होत नाही; परंतु त्याऐवजी तिच्या नशिबी हेटाळणी, निंदा अशा गोष्टी येतात. प्रेमासाठी माणूस जंग जंग पछाडतो; पण त्याला ते नशिबात नसेल तर प्राप्त होणं अशक्य असतं. त्याचप्रमाणे माणसाला आनंद मिळवण्यासाठीसुद्धा बरेच कष्ट घ्यावे लागतात.

राधा आणि कृष्ण ही जरी दोन रूपं दिसत असली, तरी त्यांचा जीव एकच आहे, असं सर्व विद्वान सांगतात. ज्याप्रमाणे पार्वती आणि शंकर यांना शिव आणि शक्ती मानतात, त्याप्रमाणे राधा आणि कृष्ण ही एकाच परमात्म्याची दोन रूपं आहेत, असं मानलं जातं.

राधा ही प्रेमदिवाणी आहे, प्रेमासाठी ती तळमळत असते. या गाण्यातील राधा ही विरहरसात चिंब भिजून कृष्णाची वाट बघण्यात स्वतःला हरवून गेलेली आहे. तिचं शरीर आणि मन कृष्णाच्या भेटीसाठी अतिशय आतुर आणि व्याकूळ झालेलं आहे. या व्याकुळतेमुळे तिचे डोळे पाण्याने भरले आहेत, डोळ्यांतून अश्रू ओघळत आहेत, असं वर्णन या गाण्यात कवीने यथार्थपणे केलेलं दिसतं.

या चित्रपटाच्या नायिकेचीसुद्धा साधारण अशीच अवस्था आहे. घरदार, संसार हरवलेली आणि काही दूषित बुद्धीच्या लोकांची शिकार झालेली ही नायिका शहरात कोठीवर आणून बसविली जाते. परिस्थितीपुढे हताश झालेली आणि प्रेमाच्या शोधात भटकणारी अशी ही प्रेमवेडी नायिका राधेच्या स्वरूपात कवीला दिसून येते आणि हे काव्य त्याच्या प्रतिभाशक्तीतून जन्माला येतं.

चित्रपटाचा नायक आणि नायिका यांची ही पहिली भेट राधा व कृष्णाच्या भेटीप्रमाणे अत्यंत उत्कट अशा प्रेमभावनेतून रंगविलेली आहे. यात दिग्दर्शक आणि कवी यांचे समयोचित विचार प्रदर्शित होताना दिसतात. हा चित्रपट म्हणजे पूर्णपणे प्रेमाची, त्यागाची, वात्सल्याची आणि वियोगाची भावना व्यक्त करणारा आहे. अभिनयाने अतिशय सशक्त अशा यातील सर्वच भूमिका आहेत. यात ओम प्रकाश, मदन पुरी, विनोद मेहरा यांच्याही तितक्याच सुंदर भूमिका आपणास पाहावयास मिळतात.

या चित्रपटातलं हे गाणं अतिशय सुरेल आणि भावपूर्ण आवाजात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेलं आहे. यातील तोडी आणि खमाज या दोन रागांचं मनोज्ञ आणि कल्पनापूर्ण मिश्रण आपणास आनंद देऊन जातं.

दोन राग जरी वेगवेगळे असले, तरीही त्यांचं अतिशय सुंदर असं मिलन या गाण्यामधून केलेलं आहे. पुरातनकाळापासून श्रीकृष्ण हे संपूर्ण भारताचं आराध्य दैवत आहे. भारतातील सर्व प्रांतांमध्ये श्रीकृष्णाची वेगवेगळ्या स्वरूपांत पूजा केली जाते. श्रीकृष्ण म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे, त्याचप्रमाणे श्रीकृष्णाचं तत्त्वज्ञान आज भगवद्‍गीतेच्या रूपाने जगात अभ्यासलं जात आहे. या श्रीकृष्णाला आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतात,

तसंच हिंदी चित्रपट संगीतामध्ये मानाचं स्थान आहे. शास्त्रीय संगीतात श्रीकृष्णावरच्या अनेक बंदिशी आपल्याला सापडतात. श्रीकृष्णाच्या विविध लीला वर्णन करणारी गाणी आपण जवळजवळ सर्वच भाषांत ऐकू शकतो. मारझोड, हिंसा, कटकारस्थानं असलेल्या अनेक चित्रपटांच्या पार्श्वभूमीवर हा प्रेमाने भरलेला, भावना व्यक्त करणारा चित्रपट श्रोत्यांना सुखावून जातो.

हिंदी चित्रपटसृष्टीतसुद्धा आपल्याला श्रीकृष्णावरची बरीच गाणी ऐकावयास मिळतात, त्यातीलच एक अतिशय लोकप्रिय गाणं म्हणजे ‘रैना बीती जाये’ हे गाणं ‘अमर प्रेम’ या सुपरहिट चित्रपटात घेण्यात आलं आहे. आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताचा सुरुवातीला राजदरबारात प्रतिपाळ केला जायचा. राजदरबारातून हे संगीत ब्रिटिशांच्या काळात कोठीवर गेलं. कोठीवरसुद्धा अतिशय प्रतिभावंत अशा कलावंतीणी मधुराभक्तीने भिजलेली राधा-कृष्णाच्या प्रेमाची खूप सुंदर अशी गाणी गात असत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com