मनाशी संवाद साधणारा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kiran fatak writes about asha bhosale singing Darbari Kanada rag music

मनाशी संवाद साधणारा...

- किरण फाटक

तोरा मन दर्पण कहलाये ॥

तोरा मन दर्पण कहलाये ॥

भले बुरे सारे कर्मों को, देखे और दिखाये

तोरा मन दर्पण कहलाये ॥

हे गीत ‘काजल’ चित्रपटातील असून संगीतकार रवी, तर गीतकार साहिर लुधियानवी आहेत. हे गीत आशा भोसले यांनी गायलंय. हे गाणं दरबारी कानडा या रागातील आहे. दरबारी कानडा हा सर्व संगीतकारांचा आवडता असा राग होता आणि अजूनही आहे.

या रागात अनेक गाणी संगीतकारांनी स्वरबद्ध केली. यात ‘दिल जलता है तो जलने दे’, ‘ओ दुनिया के रखवाले’, ‘तू प्यार का सागर है’, ‘मोहब्बत की झुठी कहानी पे रोये’, ‘गुजारे है आज इश्क मे’, ‘चांदी की दिवार ना तोडी’, ‘हम तुझसे मोहब्बत करके सनम’, ‘तेरी दुनिया में दिल लगता नही’, ‘सत्यम् शिवम् सुंदरम’, ‘कोई मतवाला आया मोरे द्वारे’, ‘याद मे तेरी जाग जाग के हम’...

अशी अनेक गाणी संगीतकारांनी या रागात बांधली आणि ही गाणी आजही रसिकांच्या हृदयसिंहासनावर आरूढ झालेली आपल्याला दिसतात. या रागाचा स्वभाव गंभीर असून, याची चाल संथ अशी आहे. या रागाचा विस्तार हा मंद्र आणि मध्य सप्तकात जास्त होतो. या रागात कोमल गंधाराच्या शिडीवरून, षडजाचा आधार घेत जेव्हा एखादी स्वररचना स्थिर होते, तेव्हा एखाद्या खोल डोहात प्रवेश केल्यासारखं वाटतं.

स्वतःशी संवाद साधण्यासाठी हा राग विशेष उपयोगी पडतो. मनाच्या खोल डोहात डोकावून बघितल्यावर आपल्या अंतःकरणातील चांगले आणि वाईट भाव आपल्या मनःचक्षूंना अत्यंत स्पष्टपणे दिसून येतात. अशा अर्थाची गाणी या रागात संगीतबद्ध केल्यास जास्त चांगल्या प्रकारे रसिकांवर प्रभाव टाकू शकतात.

संगीतोपचाराच्या अंतर्गत हा राग मनाच्या गंभीर समस्यांवर एक औषध म्हणून उपयोगी पडू शकतो. जीवन जर आपल्याला सुखी बनवायचं असेल, तर आपल्या मनाशी आपला संवाद होणं अत्यंत आवश्यक असतं.

अहंकार आपल्याला अनेक बंधनांत अडकवून ठेवतो. आपल्याला स्वतःकडे बघण्यास जीवनात फार कमी वेळ मिळतो. म्हणून आपलं मन अहंकारापासून जर दूर ठेवलं, तर ते प्रसन्न राहतं आणि आपण आपल्या अस्तित्वानेच आपल्या सभोवती आनंदनिर्मिती करू शकतो. म्हणून संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात,

मन करा रे प्रसन्‍न । सर्व सिद्धींचे कारण ।

मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥१॥

मनें प्रतिमा स्थापिली । मनें मना पूजा केली ।

मनें इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥२॥

मन गुरू आणि शिष्य । करी आपुलें चि दास्य ।

प्रसन्‍न आपआपणांस । गति अथवा अधोगति ॥३॥

साधक वाचक पंडित । श्रोते वक्तें ऐका मात ।

नाहीं नाहीं आनुदैवत । तुका म्हणे दुसरें ॥४॥

आपलं मन आपल्या प्रत्येक चांगल्या-वाईट कृत्याचं साक्षीदार असतं. जसं आरशात डोकावून बघितलं की, आपल्याला आपलं खरं रूप कळतं, त्याप्रमाणे मनात डोकावून बघितलं की, आपल्याला आपलं व्यक्तिमत्त्व कसं आहे ते कळून येतं. आपलं मन हे आपल्या प्रत्येक कृत्याला साक्षीदार असतं, मग ते कृत्य चांगलं असो वा वाईट असो.

म्हणून समर्थ रामदासांनी म्हटलंच आहे की,

‘अचपळ मन माझे, नावरे आवरिता,

तुजविण शिण होतो, धाव रे धाव आता.’

आपल्या मनाचा वेग हा कल्पनातीत आहे, क्षणात इकडे तर क्षणात तिकडे, असं आपलं मन धावत असतं. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी मनाला वेगवेगळ्या प्रकारे समजावण्याचा आपल्या मनाच्या श्लोकातून प्रयत्न केला आहे.

लहानपणापासून मनावर जसे संस्कार होतात, त्याप्रमाणे माणसाचं व्यक्तिमत्त्व घडत जातं. मनाची घडी विस्कटली, तर माणूस सैरभैर होतो, त्याला काही सुचत नाही, तो कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. महत्त्वाकांक्षा, संयम, तोल सुटणं, राग, लोभ, मोह, मत्सर, दंभ हे सगळे शब्द मनाशी संबंधित असे आहेत.

सुख आणि दुःख या कल्पना मनाशी निगडित आहेत. काही विद्वान म्हणतात की, सुख आणि दुःख या मनाच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. सुख आणि दुःख असं काहीच नसतं. जे मनाविरुद्ध होतं त्याला दुःख म्हणतात आणि मनाप्रमाणे जे होतं, त्यातून उद्भवलेल्या परिस्थितीला सुख असं म्हणतात, त्यामुळे सुख आणि दुःखामध्ये सम राहणारा माणूस हा नेहमी आनंदी असतो.

दुसऱ्याला दुःख देणं हे माणसाला नेहमीच अपराधी बनवत असतं; परंतु माणसाच्या अहंकारामुळे तो सतत दुसऱ्याला दुःख देऊन आपलं स्वतःचं सुख शोधत असतो. परंतु, मनामध्ये मात्र तो जाणून असतो की, आपण जे वागत आहोत ते चुकीचं असून त्यातून शेवटी आपल्याला दुःखच प्राप्त होणार आहे.

देवाने माणसाला जरी दोनच डोळे दिलेले असले, तरी मनाचे डोळे मात्र हजारो असतात. माणूस जगापासून जरी दूर पळून गेला आणि आपली दुष्कृत्यं लपवण्याचा प्रयत्न केला, तरी तो मनाच्या कचाट्यातून मात्र सहजासहजी सुटू शकत नाही.

देवाने माणसाला जरी शरीराचा अमूल्य असा ठेवा दिलेला असला, तरीसुद्धा या शरीराचं सर्व चलनवलन मनाच्या प्रसन्नतेवर अवलंबून असतं. मन प्रसन्न नसलं किंवा निराशेच्या अंधारात बुडून गेलेलं असलं, तर त्या माणसाचं शरीरसुद्धा रोगांनी ग्रस्त होऊ लागतं. शरीराचं आरोग्य हे मनाच्या आरोग्यावर बरंचसं अवलंबून असतं, असं अनेक संशोधकांनी आपल्या संशोधनातून सिद्ध केलेलं आहे.

माणूस पैसा खूप कमावतो आणि ऐहिक उपभोगांवर खर्च करीत राहतो; परंतु मन प्रसन्न असणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. किंबहुना सगळ्यात अमूल्य असं धन जर कोणतं असेल, तर ते म्हणजे मनाची प्रसन्नता आणि आनंदी असणं. म्हणून जगद्‍गरू तुकाराम महाराज म्हणतात,

मन करा रे प्रसन्‍न । सर्व सिद्धींचे कारण ।

मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥१॥

टॅग्स :musicsaptarang