सहवासातलं जीवन... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gunj uthi shehnai movie

माणसाला जन्मतःच कोणाची तरी साथ मिळत असते, हवी असते. अगदी कोणाची नाही म्हटली, तरी त्याची स्वतःची आई ही त्याला, त्याची स्वतःची ओळख पटेपर्यंत वाढवते, त्याचं पालन-पोषण करते.

सहवासातलं जीवन...

- किरण फाटक, Kiranphatak55@gmail.com

जीवन में पिया तेरा साथ रहे

हाथों में तेरे मेरा हाथ रहे

जीवन में पिया तेरा साथ रहे ।।

हे गाणं १९५९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुंज उठी शहनाई’ या चित्रपटातलं आहे. भरत व्यास यांनी हे गाणं लिहिलं असून, याला वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. यात अमृता आणि राजेंद्रकुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यातील आलाप अतिशय श्रवणीय झाले असून, याला शास्त्रीय संगीताचा बाज आहे. हे शृंगाररसाचं गाणं ऐकून कोणाचेही पाय थिरकतील असा याचा प्रभाव आहे. गाण्याचे शब्द अत्यंत सुंदर असून, त्यातील भावार्थही मनाची पकड घेणारा असा आहे. अत्यंत तरल अवस्थेतील प्रियकर आणि प्रेयसीचं निस्सीम प्रेम यातून प्रकट झालंय. याला अतिशय कर्णमधुर अशी उडती चाल आणि ठेका लाभल्यामुळे हे गाणं मनाची पकड घेतल्याशिवाय राहत नाही.

हे गाणं जयजयवंती रागातील असून, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी ते अतिशय गोड आणि सुंदर अशा आवाजात तयारीने गायलं आहे. यात बिस्मिल्ला खाँ साहेबांनी शहनाईवादन केलेलं आहे. यातील बिस्मिल्ला खाँ साहेब आणि अब्दुल हलीम जाफर खान यांच्यातील शहनाई आणि सतारीची जुगलबंदी लोकप्रिय आहे. जीवनातील सुख-दुःखांना तोंड देता देता जर आयुष्य आपल्याला सुखमय आणि आनंदमय करायचं असेल, तर जीवनात कोणाची तरी आपल्याला समर्थ अशी साथ लागते. ‘मांग के साथ तुम्हारा, मैने मांग लिया संसार’ असं कुठल्याशा हिंदी चित्रपट गीतात म्हटलं आहे आणि ते सार्थही आहे. ‘एक तेरा साथ हमको दो जहाँ से प्यारा है, तू है तो हर सहारा है’ हे गाणं एका हिंदी चित्रपटातलं असून, अत्यंत अर्थपूर्ण असं असून वरील गीताला पोषक असं आहे.

माणसाला जन्मतःच कोणाची तरी साथ मिळत असते, हवी असते. अगदी कोणाची नाही म्हटली, तरी त्याची स्वतःची आई ही त्याला, त्याची स्वतःची ओळख पटेपर्यंत वाढवते, त्याचं पालन-पोषण करते. त्याला आईबरोबरच जवळचे नातेवाईक साथ देतात. त्याला वडील, मामा-मामी, काका-काकू, दूरची भावंडं साथ देतात, त्याला आजोळ असतं आणि या सगळ्यांमध्ये तो संस्कारित होत असतो.

जशी परिस्थिती असेल, त्याप्रमाणे त्याला मित्र, दोस्त मिळत जातात. यांच्या संगतीत त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा चांगला किंवा वाईट विकास होत जातो. तो आपलं जीवन स्वतः जगायला शिकतो. साथीशिवाय जसं गाणं रंगत नाही, वादन रंगत नाही, तसंच जीवनाचं संगीतही साथीशिवाय रंगत नाही. साथ ही आयुष्याला एक वेगळा अर्थ आणि गती मिळवून देते.

तारुण्याची सुरुवात झाली की, त्याच्यात तारुण्यसुलभ भावना तयार होतात आणि त्याला त्याच्या स्वभावाशी मिळत्याजुळत्या अशा स्त्रीची साथ मिळावी लागते. योग्य अशा स्त्रीची साथ मिळणं हे नशिबात असावं लागतं. स्त्री आणि पुरुष ही साक्षात शिव आणि शक्तीची रूपं आहेत. ज्याप्रमाणे राधा आणि कृष्ण हे जरी शरीराने वेगळे दिसत असले, तरी मनाने एकरूप झालेले असतात, त्याप्रमाणे सामान्य माणसाच्या जीवनात आलेली स्त्री ही त्याच्या जीवनाशी एकरूप झालेली असावी लागते.

याला अनुसरूनच सर्व धर्मांत लग्नसंस्था निर्माण झाली. लग्न झाल्यावर स्त्री आणि पुरुष यांचे स्वभाव, आवडीनिवडी, सवयी, विचार करण्याची पद्धत हे सर्व जुळावं लागतं, अन्यथा ही लग्नं यशस्वी होतातच असं नाही. जर साथीदार हा मन मारून जगणारा असला किंवा त्यागमूर्ती असला, तर मात्र अशा विरोधी परिस्थितीतसुद्धा लग्नं यशस्वी होतात, बराच काळ टिकतात. लग्नात धरलेला हात हा जर शेवटपर्यंत एकमेकांच्या हातात प्रेमाने राहिला, तर ते जीवन सुखमय, आनंदमय आणि कृतार्थ असं होतं.

जगात सुख आणि आनंद या दुर्मीळ गोष्टी आहेत, त्या मिळवण्यासाठी जन्मभर कोणाची तरी योग्य अशी साथ मिळावी लागते. ही साथ वरील गाण्यात म्हटल्याप्रमाणे, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आकाशात तळपत आहेत तोपर्यंत, किंवा गंगा आणि यमुनेमध्ये पाणी आहे तोपर्यंत कायम राहिली, तर जीवनामध्ये प्रकाश निर्माण होतो आणि जीवन हे नदीप्रमाणे, न थांबता वाहत वाहत स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनामध्ये आनंद आणि स्थैर्य निर्माण करतं.

स्त्री आणि पुरुष यांचे स्वभाव न जुळण्याची अनेक कारणं असतात. त्यात संस्कार, परिस्थिती आणि माणसाच्या न आवरता येणाऱ्या भावना या मुख्य असतात. या भावनांमध्ये राग, लोभ, मोह आणि अहंकार हे प्रमुख असतात. अहंकारामुळे द्वेष, असूया आणि क्रोध निर्माण होतो; आणि हे सर्व घटक स्त्री आणि पुरुषाच्या एकत्रित जीवनावर फार मोठा प्रभाव टाकतात.

‘सौ बार जनम लेंगे, ऐ जाने वफा फिर भी, हम तुम ना जुदा होंगे’ (उस्तादोंके उस्ताद, १९६३) किंवा ‘जनम जनम का साथ है, निभाने को, सौ सौ बार हमने जनम लिये’ (तुमसे अच्छा कौन है, १९६९) ही गाणीदेखील जन्मोजन्मी त्याच व्यक्तीची साथ मिळावी अशी इच्छा प्रकट करतात.