तळ्यात-मळ्यात (कीर्ती गुंडावार)

kirti gundawar
kirti gundawar

दोघी शांतपणे घरी आल्या. पूर्ण रस्ताभर प्रिया विचार करत होती. घरी आल्या आल्या तिनं चिऊला जवळ घेऊन विचारलं ः ""तुला काही मदत हवीय का बेटा? काय झालं? तू हुशार मुलगी आहेस...मग या वर्षी काय बिनसलं?''

प्रियाला आज जरा उशीरच झाला ऑफिसमधून निघायला. एक तातडीची "प्रोजेक्‍ट डिलिव्हरी' होती आज. कामाच्या रगाड्यात घरी फोन करायला वेळच मिळाला नव्हता तिला. रोज पाच वाजता निघणारी प्रिया आज साडेसहाला ऑफिसमधून निघाली तरी बॉसची नापसंतीची नजर तिच्या लक्षात आली होती. मात्र, चिऊची उद्या महत्त्वाची परीक्षा आहे, हेही ती विसरू शकत नव्हती.

प्रियानं आज सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. सकाळी गडबडीत ब्रेडच्या दोन स्लाईस पोटात ढकलल्या होत्या तेवढ्याच. सगळा लंच टाइम तर मीटिंगमध्येच गेला; पण तिला आता भुकेची चिंता नव्हती. तिला लवकरात लवकर घरी पोचायचं होतं. जिन्यानं धावतच उतरून ती पार्किंगकडं पळाली. तिची गाडी आज जरा जास्तच वेगात होती; पण तिचं गाडीवरचं नियंत्रणही जबरदस्त होतं. एका तासाचं अंतर चाळीस मिनिटांत कापून ती घरी पोचली. किल्लीनं दार उघडत असतानाच तिला टीव्हीचा जोरात आवाज आला.

"अगं, उद्या तुझा सायन्सचा पेपर आहे नं, बेटा? टीव्ही काय बघतेस मग? अभ्यास झाला का पूर्ण तुझा? आठवीत आहेस तू आता...पेपर काही सोपे नसणार नक्कीच...'' प्रियानं एका दमात चिऊला विचारलं
""झाला गं मम्मा माझा अभ्यास. तू नको काळजी करूस. मस्तपैकी चहा घे आणि माझ्यासोबत टीव्ही बघायला ये,'' टीव्हीवरचं लक्ष जराही ढळू न देता चिऊ म्हणाली.
चिऊच्या बोलण्यानं प्रियाला जरा बरं वाटलं. फ्रेश होऊन तिनं काही खाऊन घेतलं आणि चहाचा कप घेऊन ती चिऊजवळ जाऊन बसली.
"उद्यापासून चिऊची आठवीची फायनल परीक्षा सुरू होतेय आणि ही तर अगदी रिलॅक्‍स दिसतेय, मघापासून मूव्ही बघतेय...' प्रियाच्या मनात विचार आला...
""नक्की झाला नं तुझा अभ्यास, चिऊ ?'' प्रियानं खातरजमा करून घेण्यासाठी पुन्हा एकदा विचारलं.
""हो ऽ ऽ य'' या वेळी सूर लांबलेलं आणि तुटक उत्तर मिळालं.
प्रिया किचनमध्ये जाताच कामवाल्या मावशी म्हणाल्या ः ""शाळेतून आल्यापासून टीव्ही सुरूच आहे, ताई.''
प्रियाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिनं चिऊला प्रेमानं सांगून टीव्ही बंद केला आणि तिला अभ्यास करायला सांगून प्रिया संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली.
तो आठवडा खूपच गडबडीत गेला. चिऊची परीक्षा एकदाची संपली आणि प्रियानं निःश्वास सोडला; पण लगेच तिला उन्हाळ्याच्या सुटीची चिंता वाटायला लागली. सुट्या म्हणजे दिवसभर टीव्ही आणि मोबाईल गेम्स! तिनं चिऊला टेनिसचा आणि गिटारचा क्‍लास लावला होता; पण क्‍लासचा वेळ वगळता बाकी सगळा वेळ टीव्ही आणि मोबाईलमध्येच ती गर्क असायची. प्रियानं खूप समजावून सांगितलं...वेळ घालवण्याचे वेगवेगळे पर्याय दिले...चित्रं काढण्याची सामग्रीही आणून दिली; पण दोन दिवसांत पुन्हा दिवसभरचा टीव्ही सुरूच.

थोड्याच दिवसांत निकालासाठी शाळेत बोलावण्यात आलं. "मला यायला आज उशीर होईल,' असं ऑफिसात सांगून प्रिया चिऊच्या शाळेत गेली. वर्गात गेल्या गेल्या तिच्या वर्गशिक्षिकेनं प्रियाला प्रिन्सिपॉल मॅडमचा निरोप दिला. "ऑफिसमध्ये येऊन भेटावं' असा तो निरोप होता.
विचार करत करतच प्रिया ऑफिसकडं निघाली. प्रिन्सिपॉल मॅडमच्या ऑफिससमोर आणखी तीन-चार पालक उभे होते. बोलावणं आलं आणि सगळे पालक एकत्रच आत गेले.
प्रिन्सिपॉल मॅडम शांतपणे एकेका पालकाशी बोलू लागल्या.
आपल्याला का बोलावण्यात आलं असावं, याचा काहीच अंदाज प्रियाला लावता येत नव्हता.
ती विचारात असतानाच मॅडमनी तिला "गुड मॉर्निंग' म्हटलं. गडबडून प्रियानं हसून प्रतिसाद दिला. प्रिन्सिपॉल मॅडमना ती आधीपासूनच ओळखत होती. त्या शांतपणे तिला म्हणाल्या ः ""चिऊ दोन पेपरमध्ये नापास झाली आहे, म्हणून तुम्हाला आज इथं बोलावलंय...''
प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकली. ती मॅडमकडं अविश्वासानं बघायला लागली. लहानपणी अतिशय हुशार असलेली चिऊ अचानक दोन विषयांमधे नापास झाली! कशी काय?
एका क्षणात तिच्या डोळ्यांसमोरून चिऊचा शालेय प्रवास तरळून गेला. पहिली-दुसरीत अतिशय हुशार असलेली चिऊ हळूहळू मागं पडू लागली. आता तर ती चक्क दोन विषयांमध्ये नापास झालीय...! चिऊ जर सामान्य गुणवत्तेची असती तर प्रियानं ही गोष्ट वेगळ्या पद्धतीनं हाताळली असती; पण चिऊची बुद्धिमत्ता तिला माहीत होती आणि म्हणूनच तिला धक्का बसला होता. काहीतरी चुकतंय...नक्कीच.
दोघी शांतपणे घरी आल्या. पूर्ण रस्ताभर प्रिया विचार करत होती. घरी आल्या आल्या तिनं चिऊला जवळ घेऊन विचारलं ः ""तुला काही मदत हवीय का, बेटा? काय झालं? तू हुशार मुलगी आहेस...मग या वर्षी काय बिनसलं?''
चिऊ काहीच बोलली नाही. ती खिडकीबाहेर शांतपणे बघत राहिली. तिच्या डोळ्यांतली उदासी मात्र प्रियाला लगेच कळली. थोड्या वेळानं चिऊ म्हणाली ः ""तुझा वेळ आणि प्रेम कमी पडतंय गं मला...

मी शाळेतून घरी येते नं तेव्हा तू समोर असावीस असं मला फार फार वाटत असतं. दिवसभराच्या गमतीजमती सांगत सांगत तुझ्यासोबत जेवायची इच्छा असते; पण घरात मी एकटीच असते. कामवाल्या मावशी असतात; पण मला त्यांच्याशी बोलावंसं वाटत नाही, मग मी टीव्ही लावून जेवण करते. कधी मी उदास असले की तेव्हाच त्याच क्षणी मला तुझ्या कुशीत शिरावंसं वाटतं; पण तेव्हा तू असतेस ऑफिसमध्ये! तुला फोन करायचा विचार करते; पण तू मीटिंगमध्ये असशील तर तुला डिस्टर्ब होईल,
असं वाटून नाही करत मी फोन. तुझ्यासाठी करिअर किती महत्त्वाचं आहे, हे माहीत आहे मला. आजकाल अभ्यास करायची किंवा दुसरं काहीही करायची माझी इच्छाच होत नाही गं...''
प्रियाचे डोळे भरून आले. चिऊला कुशीत घेऊन तिनं आसवांना मोकळी वाट करून दिली.
आजपर्यंत प्रिया करिअर आणि फॅमिली दोन्ही सांभाळत होती. कधी तळ्यात, तर कधी मळ्यात...पण बहुतेक आता तिला असं करता येणार नव्हतं...तिच्या मळ्यातली फुलं कोमेजत होती. आता तळं सोडून मळ्यातच राहण्याची वेळ आलेली आहे, याची तिला तीव्रतेनं जाणीव झाली. तशी परिस्थितीचीच गरज होती. तळ्यात तिच्या आवडीची फुलं होती; पण मळ्यात तिनं लावलेली फुलं होती...आता तिला स्वतः फुलवलेल्या बागेकडं जास्त लक्ष देण्याची गरज वाटत होती...तळ्यातल्या फुलांकडं पाठ फिरवून.

त्या दिवशी रात्री प्रिया बराच वेळ जागी होती. बेडरूमच्या खिडकीतून तिच्या आवडीचा चाफा दिसत होता. त्या सुंदर पांढऱ्या फुलांकडं ती कितीतरी वेळ तशीच बघत बसली. मग तिच्या मनानं एक निर्णय घेतला. बऱ्याच उशिरा कधीतरी तिचा डोळा लागला.
दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला गेल्या गेल्या ती लगेच तिच्या कंपनीच्या डायरेक्‍टरना भेटायला गेली. तिचे डायरेक्‍टर हे अतिशय हुशार आणि कामाला वाहून घेतलेलं असं व्यक्तिमत्त्व होतं. ते सकाळी सगळ्यांच्या आधी येत आणि रात्री सगळ्यांच्या नंतर घरी जात. बऱ्याच वेळा रात्री त्यांच्या मेल असायच्या. अशी व्यक्ती आपली व्यथा समजून घेईल का, असा प्रश्न प्रियाला पडला होता; पण तिनं हिंमत करून बोलायचं ठरवलं.
""मे आय कम इन, सर?'' प्रियानं सरांच्या केबिनच्या दारातून विचारलं.
""ओह, येस्‌ येस्‌...'' सरांचा भारदस्त आवाज प्रियाच्या मनातली शंका अजूनच वाढवून गेला.
""सर, एक महत्त्वाचं बोलायचं होतं,'' प्रियानं सुरवात केली.
""त्याआधी मी तुला एक गुड न्यूज देणार आहे, प्रिया. मी तुला थोड्या वेळानं बोलावणारच होतो.
आय हॅव अ बिग न्यूज फॉर यू...! आजच आम्ही प्रमोशनची यादी फायनल केली आहे अँड नाऊ, यू विल बी चीफ टेक्‍नॉलॉजी ऑफिसर...! अ बिग कॉंग्रॅच्युलेशन्स, प्रिया...!''
प्रियाच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता...या प्रमोशनचं तिनं आयुष्यभर स्वप्न बघितलं होतं आणि आज तिला ते मिळालं होतं. तिची इतक्‍या वर्षांची तपस्या आज फळाला आली होती...तिचं मन भरून आलं. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
""प्रिया, तू या प्रमोशनसाठी अतिशय योग्य व्यक्ती आहेस. रडू नकोस...पार्टी ची तयारी कर...!''
प्रियानं डोळे पुसले आणि सरांना जड आवाजात "थॅंक यू' म्हटलं.
""सर, मी हे प्रमोशन घेऊ शकणार नाही. मी आज इथं माझा राजीनामा द्यायला आले आहे.''
""काय म्हणतेस तू हे प्रिया? तब्येत ठीक आहे ना तुझी?'' सरांनी काहीशा आश्‍चर्याच्या, काहीशा रागाच्या सुरात विचारलं.

""सर, मला एक मुलगी आहे हे कदाचित तुम्हाला माहीत असेल. आजपर्यंत मी घर आणि ऑफिस अशा दोन्ही आघाड्या सांभाळत होते; पण आता माझ्या मुलीला माझी खूप गरज आहे. इतके दिवस तिनं मला माझं करिअर करण्यासाठी तिच्या वयानुरूप तिला जेवढी जमेल त्यापेक्षा कितीतरी जास्त मदत केली आहे. कधीही हट्ट केला नाही की कधी माझ्यावर रुसली नाही ती. कित्येकदा ऑफिसच्या कामामुळं तिच्या शाळेतल्या कार्यक्रमांना मी जाऊ शकायची नाही.. कधी "प्रोजेक्‍ट डेडलाईन' असेल तर तिला तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला - मी बरोबर जाऊ शकत नसल्यानं- एकटीला जाता यायचं नाही... अनेकदा तिला माझ्या कुशीत शिरायची इच्छा असायची; पण नेमका तेव्हा माझा "क्‍लायंट कॉल' सुरू असायचा. मनाचा मोठेपणा दाखवत वयापेक्षा खूप परिपक्वतेनं, प्रगल्भतेनं वागत आली आहे ती आजपर्यंत. आता तिला माझी गरज आहे. आता मन मोठं करायची माझी पाळी आहे.''
""अगं, पण हे प्रमोशन हे तुझं स्वप्न होतं ना?'' सरांचा आवाज आता मवाळ झाला होता.
""हो सर. खूप मेहनत घेतली मी या प्रमोशनसाठी; पण सर, चिऊ माझी "फर्स्ट प्रायॉरिटी' आहे आणि नेहमीच असेल. माझ्या स्वप्नांच्या मागं लागून मी आता माझ्या चिऊला कोमेजताना नाही बघू शकणार.''
""एक आठवडा सुटी घे...मुलीसोबत वेळ घालव आणि पुन्हा ऑफिसला ये,'' सरांनी शेवटचा प्रयत्न केला; पण त्यांनाही आता कळून चुकलं, की प्रियानं जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घेतलेला आहे.

""सर, मी आता काही वर्षं चिऊसोबत पूर्ण वेळ राहणार आहे. जर माझ्यात बुद्धिमत्ता आणि क्षमता असेल तर मला काही वर्षांनी पुन्हा नोकरी मिळेल. त्रास होईल; पण मिळेल. मात्र, माझ्या मुलीचं कोमेजलेलं हसू पुन्हा तिच्या चेहऱ्यावर दिसायलाच हवं.''
""सर, मला तळ्यात विहार करायला खूप आवडतं; पण माझ्या स्वतःच्या हातांनी लावलेल्या मळ्यातली फुलं कोमेजत आहेत, म्हणून मी आता या तळ्यातून बाहेर निघून माझ्या मळ्यात जाणार आहे! जेव्हा मळ्यातली रोपं चांगलं मूळ धरतील आणि बहरतील तेव्हा मी पुन्हा माझ्या आवडीच्या तळ्यात परत येईन...एका आईला तळ्यात आणि मळ्यात दोन्हीकडं लक्ष द्यावं लागतं... कधी तळ्यात, तर कधी मळ्यात...!''
""येते सर...''असं म्हणून प्रिया केबिनमधून बाहेर पडली. सर आश्‍चर्यचकित होऊन प्रियाच्या पाठमोऱ्या आकृतीकडं बघत राहिले. त्यांच्याही चेहऱ्यावर कौतुक ओसंडून वाहत होतं.
"तू नक्की परत ये, प्रिया. आम्ही सगळे तुझी वाट बघू आणि हे प्रमोशनसुद्धा तुझी वाट बघत असेल,' सर मनातल्या मनात म्हणाले.
प्रिया कधीची निघून गेली होती. आपल्या चिऊकडं...आपल्या बागेची मनापासून मशागत करायला... आनंदानं...!
महिन्याभरात तिची बाग पुन्हा फुलायला लागली...
कधीतरी तळ्यातली फुलं प्रियाला खुणावतात...पण ती त्यांना हळूच सांगते ः "मी नक्की येईन तुमच्याकडं परत...फक्त थोडा वेळ लागेल...'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com