हत्तींचे राजकारण

सध्या गडचिरोली जिल्ह्यातील हत्ती राज्यभर चर्चेत आहेत. येथील काही हत्तींना गुजरातमधील जामनगर येथील प्राणिसंग्रहालयात नेण्यात येणार आहे.
Elephant
Elephantफोटो क्रेडीट परमानंद अलोकार, वनसरंक्षक
Summary

सध्या गडचिरोली जिल्ह्यातील हत्ती राज्यभर चर्चेत आहेत. येथील काही हत्तींना गुजरातमधील जामनगर येथील प्राणिसंग्रहालयात नेण्यात येणार आहे.

- किशोर रिठे

सध्या गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli District) हत्ती (Elephant) राज्यभर चर्चेत आहेत. येथील काही हत्तींना गुजरातमधील जामनगर (Jamnagar) येथील प्राणिसंग्रहालयात (Zoo) नेण्यात येणार आहे. त्याला विरोध होत असून, या प्रश्नात जिल्ह्याचे खासदार, मंत्री व काही राजकीय पक्षांनीही उडी घेतली आहे. या हत्तींना आता गडचिरोली जिल्ह्याच्या अस्मितेचा प्रश्नही बनविण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातील निसर्गप्रेमींमध्ये या विषयाबद्दल थोडा संभ्रम निर्माण झाला आहे, त्याविषयी...

गडचिरोलीत दोन प्रकारचे हत्ती आहेत. पहिले म्हणजे ओडिशा राज्यातून आलेले रान हत्ती. २०२१च्या ऑक्टोबर महिन्यात १८ ते २२ रानहत्तींचा एक मोठा कळप ओडिशा राज्यातून छत्तीसगढ जंगलमार्गे गडचिरोलीतील धानोरा, मुरूमगावच्या दक्षिण भागातील जंगलात आला. तेव्हापासून हे हत्ती जिल्ह्याच्या वनक्षेत्रात फिरत आहेत. यामध्ये अनेक गावांच्या परिसरातील पिकांचेही नुकसान झाले आहे. या हत्तींचे काय करायचे, हा प्रश्न सध्या राज्याच्या वन विभागासमोर आहे. या हत्तींवर निगराणी ठेवणे, त्यांचा अभ्यास करणे, यासाठी वन विभागाने वन्यजीव अभ्यासकांना कामी लावले आहे.

दुसरीकडे याच गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे पाळीव कामकरी हत्तींची एक राहुटी (कॅम्प) आहे. हे हत्ती गुजरात राज्यातील जामनगर येथे उभारण्यात येत असलेल्या एका खासगी प्राणिसंग्रहालयात नेण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्याने येथील निसर्गप्रेमी, माध्यमे व राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

गडचिरोलीत हत्तींचे आगमण

५६ वर्षांपूर्वी १९६५ मध्ये रान हत्तींचा एक कळप ओरिसामधून गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात आला होता. तेव्हा चांद्याला (चंद्रपूर व गडचिरोली एकत्रित जिल्हा) असणारे वनाधिकारी डॉ. आनंद मसलेकर यांनी आपल्या ‘जंगलची वाट’ या पुस्तकात त्याबाबत लिहिले आहे. ‘‘मी चांद्याला असताना आलापल्लीला सात हत्तींचा एक कळप ओरिसाकडून मध्य प्रदेश पार करून (तेव्हा छत्तीसगढ राज्य नव्हते) इंद्रावती नदी ओलांडून आला. त्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यात पाच माद्या होत्या. एक लहान नर होता. एक प्रचंड आणि उन्मत्त नर हत्ती होता. तो कळपाचा म्होरक्या होता. आमच्या दोन नर हत्तींना त्याने जखमी केले. एक माहूत जखमी झाला. हा हत्ती मारण्याचे मला आदेश आलेत. एकदा त्याने माझ्या कारवर धाव घेतली. त्याला एका कॅम्पवर खड्ड्यात पकडण्याचा माहुतांनी प्रयत्न केला. तो खड्ड्यात पडला; पण थोड्या वेळात आपल्या दोन मोठ्या सुळ्यांच्या साह्याने जमीन उकरून तो खड्ड्याबाहेर पडला. अशाच प्रयत्नानंतर तो हत्ती नंतर पकडला व त्याचे नाव आम्ही गजेंद्रगढ ठेवले.’ सध्या सिंधुदुर्गातील तिल्लारी व विदर्भातील गडचिरोली हे अपवाद वगळता महाराष्ट्रामध्ये तसे रानहत्ती आढळत नाहीत; मात्र विदर्भातील जंगलांमध्ये आज पाळीव हत्तीही आहेत. आता ते विदर्भात कसे आले व कसे वाढले, त्यांच्या काय समस्या आहेत, हेही पाहणे आवश्यक आहे.

सागवान वाहतुकीसाठी हत्तीचा वापर

भारतात हत्तीचा युद्धामध्ये तसेच शिकार खेळण्यासाठी पुरातन काळापासून वापर व्हायचा. ते हत्ती जंगलांमधून पकडून त्यांना प्रशिक्षित करून पाळीव बनविलेले असायचे. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात कॅप्टन हॉकिन्स हे मेळघाटमध्ये वनसंरक्षक असतांना त्यांनी सर्वप्रथम हत्तींचा कामासाठी वापर करणे सुरू केले. त्या काळात मेळघाटसारख्या पर्वतीय वनप्रदेशात रस्ते नव्हते. त्यामुळे येथे कापलेल्या सागवान वृक्षांच्या लाकडाची वाहतूक करणे फार कठीण होते. हॉकिन्स यांनी अशी जड कामे करण्यासाठी हत्ती वापरणे सुरू केले. स्वातंत्र्यानंतरच्या काळात मेळघाटमध्ये त्यांचा वापर घाणेरी (रायमुनिया) उपटण्यासाठी तसेच जंगलावर शेतीसाठी केलेली अतिक्रमणे काढण्यासाठी (बुलडोझरप्रमाणे) केला जात होता.

महाराष्ट्रात वन विभागात नंतरच्या काळात हत्ती कसे आलेत याचे उत्तर १९५६ च्या पहिल्या तुकडीतील भारतीय वनसेवेतील अधिकारी सी. एस. किरपेकर यांनी दिले आहे. ‘मला लाकूड वाहतुकीचे काम करण्यासाठी १४ हत्ती कर्नाटकातील कुर्ग येथून रेल्वेद्वारे तसेच रस्त्याने आणण्यास सांगितले होते. त्यांची वाहतूक करणे तसेच प्रवासादरम्यान त्यांचे चारा-पाणी करणे, यासाठी दोन वनपरिक्षेत्र अधिकारीसुद्धा दिले होते’, असे वनाधिकारी किरपेकर यांनी नोंदविले आहे. यानंतर हत्तींची संख्या जशी वाढू लागली तसे त्यांना महाराष्ट्रातील इतर जंगलांमध्ये विशेषतः पूर्वीच्या चांदा (चंद्रपूर व गडचिरोली) जिल्ह्यात पाठविण्यात आले.

वृद्ध हत्तींचा प्रश्न

हत्ती वयोवृद्ध झाल्यानंतर त्यांचे नैसर्गिक मृत्यूही होतात. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात अनेक वर्षांपासून सेवेत असणाऱ्या चंद्रीकाप्यारी या हत्तीणीचे २८ डिसेंबर २०१५ रोजी वृद्धापकाळामुळे निधन झाले.

या हत्तींचे शासकीय सेवेतील वय ६० वर्षे इतके आहे. यानंतर या हत्तींचे आयुष्य मोठे विराण असते. सेवानिवृत्त झाल्यानंतरही ताडोबातील हत्तींकडून काम करून घेतल्यामुळे २००६ मध्ये याबाबत वर्तमानपत्रांनी आवाज उठविला होता. नागझिराची रूपा हत्तीण ८५ वर्षांची झाली होती. वयाचा ६० वर्षांचा टप्पा गाठल्यानंतर तिला १९९५ मध्ये निवृत्त करण्यात आले. तिला २० हजार रुपये निवृत्तिवेतन दिले जायचे. या पैशांमधूनच तिच्या आहाराचा खर्च भागविण्यात यायचा.

जंगलात ठेवलेले हे पाळीव हत्ती जंगलाची खूप नासधूस करतात. त्यामुळे ते कमी संख्येत ठेवण्यात येतात. दररोज दहा किलो गव्हाच्या कणिकेच्या जाड्या पोळ्या, एक किलो गूळ व पाव भर तेल व एक पाव मीठ असा त्यांचा दैनंदिन आहार असतो.

गडचिरोली जिल्ह्यातील कोलामार्का येथे तसेच आलापल्ली वन विभागातील पातानील येथे या हत्तींचा तळ आहे. १९६२ मध्ये लाकडाच्या वाहतुकीसाठी बसंती आणि महालींगा या दोन हत्तींना कोलामार्का कॅम्पवर आणले होते. पातानील येथे तर फार पूर्वीपासून हत्तींना कामाचे प्रशिक्षण दिले जात होते. त्यांच्याकडून आलापल्ली, घोट आणि पेडीगुडम वनपरिक्षेत्रात कामे करवून घेतली जात. २०११ मध्ये या हत्तींकडून लाकूड वाहतुकीसारखी जड कामे करवून घेणे बंद करण्यात आले. तेव्हापासून या दोन्ही तळांवर हत्ती फक्त आराम करीत आहेत. कोलामार्का हत्ती कॅम्पवर पाण्याचे दुर्भिक्ष होते. त्यामुळे येथील हत्तींना मध्यंतरी कमलापूर येथे हलविण्यात आले. तेव्हापासून त्यांना पाहण्यासाठी जवळील तेलंगणा, छत्तीसगड राज्यातून पर्यटक येतात. त्यामुळे स्थानिकांना थोड्या फार प्रमाणात रोजगार मिळतो. मेळघाट व गडचिरोली सोडले; तर महाराष्ट्रात वनखात्याकडे इतरत्र फारसे पाळीव हत्ती नाहीत.

कामकरी हत्तींचा वापर कमी

सातपुड्यातील महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांच्या वन विभागात ‘कामकरी हत्तींचा’ वापर आता दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. तरुण हत्तींना काम मिळत असले तरी म्हाताऱ्या हत्तींचा प्रश्न वन विभागासमोर आहे. अशातच राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांनी कमलापूर येथील चार हत्ती व ताडोबा येथील सहा व अन्य तीन अशा एकूण तेरा वयोवृद्ध हत्तींना इतरत्र पाठविण्याची तयारी केली. यामागे या हत्तींचे म्हतारपणात चांगले संगोपन व्हावे व वन्यप्राण्यांचे जंगलात चांगले संवर्धन व्हावे, यासाठी पैसा, श्रम वाचावे हा उदात्त हेतू आहे. योगायोग असा की याचवेळी रिलायन्स कंपनीच्या राधाकृष्ण एलिफंट वेल्फेअर ट्रस्टतर्फे गुजरातमधील जामनगर येथे एक भव्य प्राणिसंग्रहालय उभारणे सुरू आहे. त्यासाठी या ट्रस्टने आधीच देशभरातून प्राण्यांची मागणी नोंदविलेली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील १३ हत्ती तेथे नेण्यास प्राधिकरणांनी परवानगी दिली आहे; पण रिलायन्सचा प्रकल्प व त्यातही गुजरातला जाणार या बातमीने एकच वादंग उठले.

गुजरातच्या सिहांना यापूर्वी राज्याच्या अस्मितेचा मुद्दा बनवून मध्य प्रदेशातील जंगलात सोडण्यास गुजरात सरकारने नकार दिला होता. खरे तर अशी भूमिका कोणत्याही राज्याने घेणे योग्य नाही. त्यामुळे या प्रकरणास केवळ राजकीय दृष्टिकोनातून महत्त्व मिळाले. आतादेखील राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी कमलापूर हत्ती कॅम्प बंद होणार नाही. तेथे मादी हत्ती. त्यांची पिल्ले व काही तरुण नर राहतीलच, हे वारंवार त्यांनी स्पष्ट केले आहे. तरीही माध्यमांनी विविध प्रकारे माहिती दिल्याने विविध पक्षांच्या नेत्यांच्या उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या आणि त्याने या मुद्यासही राजकीय वळण दिले गेले. आता कमलापूर येथेच भव्य एलिफंट पार्क तयार करण्याचे मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवल्याचे काँग्रेसचे नेते व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. सोबतच जिल्ह्याचे खासदारही मैदानात उतरले आहेत. दुसरीकडे ‘हत्ती वाचवा’ ही मोहीम समाज माध्यमांसह सर्वत्र सुरू झाली आहे. त्यामुळे राज्य सरकार आता काय भूमिका घेते, याची सर्वत्र उत्सुकता लागली आहे.

(लेखक प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक असून, केंद्रीय वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य आणि राज्याच्या वन्यजीव मंडळाचे सदस्य आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com