राजर्षी शाहूंच्या विचारांचा कृतिशील वारसा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जानेवारी 2018

शाहू छत्रपती महाराज यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त...

एखाद्या व्यक्तीला समाजकार्याचा आणि विचारांचा वारसा प्राप्त झाल्यानंतर तो तितक्‍याच आत्मियतेने जोपासण्याबरोबर तो पुढच्या पिढीपर्यंत समर्थपणे पोचविणे आणि या आदर्श समाजकार्यात स्वतःला झोकून देणे हे अतिशय अवघड कार्य आहे; परंतु कोल्हापूरच्या शाहू छत्रपती महाराज यांनी हा समाजकार्याचा तसेच विचारांचा वारसा पदोपदी जपण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. शंभर वर्षांपूर्वी आपले पणजोबा राजर्षी शाहू महाराज यांनी हाती घेतलेले शैक्षणिक कार्य आजच्या काळात एखाद्या व्रतस्थाप्रमाणे पुढे अखंडितपणे सुरू ठेवण्याचे शिवधनुष्य त्यांनी उचलले आहे आणि ते या कार्यात यशस्वीही ठरले आहेत.    

भूतपूर्व कोल्हापूर संस्थानचे भाग्यविधाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पणतू आणि मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराज यांचे पुत्र होत. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९४८ ला मुंबईत झाला. शाहू छत्रपती महाराजांचे शिक्षण बंगळूर येथील बिशप कॉटन स्कूलमध्ये झाले, तर १९६७ मध्ये इंदोरच्या ख्रिश्‍चन कॉलेजमधून त्यांनी इतिहास, अर्थशास्त्र व इंग्रजी अशा तीन विषयांतील पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पदवी घेतल्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे ९ मार्च १९७० मध्ये मंगसुळी (अथणी) येथील पवार परिवारातील याज्ञसेनीराजे यांच्याशी शाहू महाराजांचा विवाह झाला. शाहू महाराजांना खेळामध्ये विशेषतः फुटबॉल आणि कुस्ती यांची विशेष आवड आहे. फुटबॉलवर तर त्यांचे निस्सीम प्रेम आहे. या प्रेमाखातर त्यांनी जर्मनीला भेट देऊन तेथील विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेचे काही सामने पाहिले.  
शाहू छत्रपती महाराज यांना शेतीमध्ये विशेष आवड असून, या कामात त्यांनी वैयक्तिक सहभाग घेतला आहे. त्यांना निसर्गाचे आणि प्राण्यांचे आकर्षण आहे. प्राण्यांमध्ये विशेषतः वेगवेगळ्या जातींचे श्‍वान व अश्‍व पाळण्याचा शौक आहे. फोटोग्राफी, अश्‍वारोहण यामध्ये त्यांना विशेष अभिरुची आहे. निसर्गावर असलेल्या प्रेमाखातर त्यांनी केनियाला भेट देऊन वाईल्ड लाईफ फोटोग्राफी केलेली आहे.  

अलीकडेच नोव्हेंबर २०११ मध्ये शाहू महाराज आणि याज्ञसेनीराजे यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती शाहू विद्यालयाचे एक शिष्टमंडळ सिंगापूरला जाऊन आले. या दौऱ्यानंतर शाहू महाराजांनी सिंगापूरसारख्या सुविधा आपल्या कोल्हापूर शहरात विकसित करण्याबाबत राज्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे शाहू छत्रपती महाराज प्रेसिडेंट आहेत. पुण्यातीलच डेक्कन एज्युकेशन सोसायटीचेसुद्धा ते प्रेसिडेंट आहेत. कोल्हापुरातही राजाराम छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे छत्रपती शाहू विद्यालय चालवले जाते. इंग्रजी माध्यमाची शाळा ख्रिश्‍चन मिशनरीनंतर प्रथमच सुरू करण्याचा मान या ट्रस्टला जातो. मुलींसाठी तारा कमांडो फोर्स ही संस्था स्थापन करून सैन्यदलाचे प्रशिक्षण दिले जाते.

शाहू छत्रपती महाराजांना खेळाची प्रचंड आवड आहे. कोल्हापूरमधील फुटबॉलचा खऱ्या अर्थाने विकास कोणामुळे झाला असेल तर तो शाहू महाराज यांच्या प्रयत्नांमुळे! कोल्हापूर स्पोर्टस्‌ असोसिएशनचे ‘पेट्रन इन चिफ’ म्हणून काम करणाऱ्या शाहू महाराज यांनी भव्य अशा शाहू स्टेडियमची उभारणी केली. महाराजांनी फुटबॉलवाढीसाठी नुसतेच प्रयत्न केले नाहीत, तर खेळातील दर्जा सुधारण्यावरही अधिक जोर दिला.
कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच आयलीग सेकंड डिव्हिजन फुटबॉल स्पर्धा त्यांच्याच प्रेरणेने आणि प्रयत्नांतून यशस्वीपणे पार पडली. त्यानंतर भारत विरुद्ध हॉलंड हा आंतरराष्ट्रीय महिलांचा फुटबॉल सामना कोल्हापुरात आयोजित करण्यात शाहू महाराजांनी पुढाकार घेतला.   

शाहू महाराज हे शहाजी छत्रपती म्युझियम ट्रस्ट आणि महाराजा शहाजी छत्रपती झू ट्रस्टचे चेअरमन आहेत. महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीचे ‘पेट्रन इन चिफ’, शहाजी छत्रपती फिजिकल एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन, माजी सैनिक प्रतिष्ठानचे चिफ पेट्रन, तसेच रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्‍लब, मुंबई, नॅशनल हॉर्स ब्रिडिंग सोसायटी ऑफ पुणे, नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (नवी दिल्ली), आर्मी ऑफिसर्स इन्स्टिट्यूट, मुंबई, रेसिडेन्सी क्‍लब, कोल्हापूर, इक्विस्ट्रेन फेडरेशन ऑफ इंडिया (नवी दिल्ली), क्‍लब महिंद्रा, चेन्नई आदी संस्थांचे आजीव सदस्य आहेत.

कारगिलमधील हुतात्मा जवानांसाठी उभारलेल्या आर्मी सेंट्रल वेल्फेअर फंडास तसेच २००८ मधील बिहारच्या कोसी महापूर रिलीफ फंडासाठी शाहू महाराज यांनी मोठी मदत केली आहे. मागासवर्गीय आणि समाजातील उपेक्षित वर्गासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या 
हस्ते ‘आंबेडकर रत्न पुरस्कार’ देऊन शाहू महाराजांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला आहे. राजर्षी शाहू महाराजांचा समतेचा विचार पुढे चालू ठेवत आजही त्यांनी आपल्यासोबत सर्वच जाती-धर्मांच्या लोकांना नेले आहे. तसेच सर्वच जाती-धर्मांचे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत.

Web Title: Kolhapur News Shahu Chhatrapati Maharaj Birthday Speical