‘बिमल’ पर्व (कृपाशंकर शर्मा)

‘बिमल’ पर्व (कृपाशंकर शर्मा)

प्रतिभावान दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या पन्नासाव्या स्मृतिवर्षाची आज (ता. आठ जानेवारी) सांगता होते आहे. ‘कलात्मक चित्रपट’ आणि ‘व्यावसायिक चित्रपट’ अशी विभागणी पूर्णतः मोडून काढणाऱ्या बिमलदांनी अनेक उत्तुंग कलाकृती तयार केल्या. वास्तववादी चित्रीकरण, काव्यात्म मांडणी, धाडसी विषय, रसिकांच्या थेट हृदयापर्यंत जाण्याचं सामर्थ्य अशा वैशिष्ट्यांनी नटलेले चित्रपट त्यांनी दिले. या महान दिग्दर्शकाच्या कारकिर्दीवर एक नजर.

भारतीय चित्रपटसृष्टीत बिमल रॉय यांची एकूण कामगिरी १९३२ ते १९६४ अशी साधारण तीन दशकांत विखुरलेली आहे. त्यापैकी १९३२ ते १९४४ या सुरवातीच्या काळात बिमल रॉय यांनी ‘न्यू थिएटर्स’च्या चित्रपटांसाठी छायाचित्रणाची जी कामगिरी केली, ती महत्त्वपूर्ण गणली जाते. तसंच ‘उदयेरपथे’ (१९४४) ते बेनजीर (१९६४) या दोन दशकांत, निर्मिती आणि दिग्दर्शनात बिमल रॉय यांनी जी कामगिरी केली, तिची दखल घेतल्याशिवाय भारतीय चित्रपटांच्या विकासाचा इतिहासच पूर्ण होऊ शकत नाही, ही जाण आजच्या पिढीला होणं आवश्‍यक आहे.

बिमल रॉय यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला, तो काळ होता मूक चित्रपटांनंतर उदयाला आलेल्या निर्माता-दिग्दर्शकांच्या पहिल्या पिढीचा. त्या काळात चित्रपट हे एका रात्रीत प्रसिद्धी मिळवण्याचं किंवा झटपट श्रीमंत होण्याचं साधन नव्हतं. या पिढीचं प्रतिनिधित्व करणारे निर्माता-दिग्दर्शक पी. सी. बरुआ, देवकी बोस, नितीन बोस, व्ही. शांताराम या निर्मात्यांनी सत्यजीत रॉय यांच्यापूर्वी खऱ्या अर्थानं ‘भारतीय’ असे चित्रपट निर्माण केले होते. खरं म्हणजे या सर्वच निर्मात्यांनी स्वतःच्या महत्त्वाकांक्षेसाठी, आपल्या स्वप्नांसाठी आणि या कलेवरच्या श्रद्धेसाठी चित्रपट निर्माण केले होते.
ही पिढी आपल्या कलेत निपुण होत असतानाच बिमल रॉय या होतकरू तरुणानं ‘न्यू थिएटर्स’मध्ये कॅमेरामन म्हणून उमेदवारी सुरू केली. त्या वयात बिमलदांची आकलनशक्ती जबरदस्त होती. लवकरच चित्रीकरणासाठीची अपवादात्मक अंतर्गत दृष्टी लाभलेला कॅमेरामन म्हणून त्यांनी बरुआ, देवकी बोस, नितीन बोस यांचा विश्‍वास संपादन केला. त्यातूनच चित्रपटांच्या चित्रणासाठी त्यांच्यावर प्रमुख कॅमेरामनची जबाबदारी देण्यात आली. यातूनच बरुआंच्या ‘देवदास’ (बंगाली, उर्दू, तमीळ), ‘मंझिल’, ‘मुक्ती’ आणि ‘बडी बहेन’ या चित्रपटांचं छायाचित्रण बिमल रॉय यांनी केलं. याच काळात पी. व्ही. राव यांच्या ‘नल्लथानगल’ या तमीळ चित्रपटाचं छायाचित्रणही त्यांनी केलं. या चित्रपटासाठी तर सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता. ही होती एका श्रेष्ठ कारकिर्दीची नांदी. बिमलदांनी स्वतंत्रपणे निर्मिती सुरू करण्यापूर्वीच कॅमेऱ्याशी अतूट असं नातं निर्माण केलं होतं. त्यामुळंच पुढच्या काळात त्यांच्या चित्रपटातून छायाचित्रणाची असामान्य अशी कामगिरी झालेली दिसते. बिमलदांच्या कारकिर्दीचे दोन प्रमुख भाग पडतात. कोलकत्याच्या न्यू थिएटर्समधली त्यांची कामगिरी आणि नंतर मुंबईत आल्यावर त्यांनी स्वतः निर्माण केलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांतली त्यांची कामगिरी.

मुंबईत येण्यापूर्वी बिमल रॉय यांनी बंगाली भाषेत १९४४मध्ये ‘उदयेरपथे’ हा चित्रपट प्रथम दिग्दर्शित केला होता. त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट एवढीच या चित्रपटाची ओळख असली, तरी हा चित्रपट अनेक दृष्टीनं ऐतिहासिक महत्त्वाचा होता. भारतीय चित्रपटसृष्टीतला तो पहिला ‘प्रायोगिक’ आणि ‘लो बजेट’ बोलपट होता. चित्रपटाचे संगीतकार रायचंद बोगल सोडून यांत सहभागी झालेले सारे जण चित्रपट व्यवसायात अगदी नवीन होते. विशेष म्हणजे ‘न्यू थिएटर्स’च्या इतर भव्य निर्मितींमधून उरलेल्या फिल्म्सच्या कच्च्या तुकड्यांच्या आधारे या चित्रपटाचं चित्रण करण्यात आलं होतं. ‘स्टार्स’ असलेल्या संगीतप्रधान चित्रपटांना मोठी मागणी असताना ‘न्यू थिएटर्स’सारख्या नावाजलेल्या संस्थेकडून अशी प्रायोगिक चित्रपटाची निर्मिती हेच धाडसाचं होतं. साऱ्या देशभर या चित्रपटाची चर्चा झाली.

‘उदयेर पथे’च्या आश्‍चर्यकारक परिणामातून अनेक अर्थपूर्ण घटना घडल्या. त्यातली एक वैशिष्ट्यपूर्ण. ‘उदयेर पथे’च्या यशानंतर एका पत्रकार परिषदेत बिमलदांनी ‘अंजनगढ’ हा आपला दुसरा चित्रपट जाहीर केला होता. त्या वेळी तरुण असलेल्या आणि आज जगप्रसिद्ध असलेल्या सत्यजित राय यांनीही ‘फॉसिल्स’ कथेवर ‘अंजनगढ’साठी स्वतः पटकथा लिहिली होती आणि ती बिमलदांना दाखवलीही होती. आज बिमल रॉय यांचे चित्रपट निवडलेल्या विषयांसाठी आणि गाण्यांच्या कलात्मक वापरासाठी महत्त्वाचे गणले जातात. त्यांची चित्रपट मालिका म्हणजे भारतीय सामाजिक स्थित्यंतरांचा आलेखच म्हणता येईल. ‘उदयेर पथे’चा नायक राष्ट्रभक्त होता आणि त्यात स्वातंत्र्यपूर्व काळाचं चित्रण होतं. त्यांच्या ‘अंजनगढ’मध्ये साम्राज्यवादी पद्धतीचा ऱ्हास झाल्यानंतरच्या सामाजिक बदलाचं चित्रण होतं. ‘अमानत’ चित्रपटात रोजगार देणारे आणि रोजगार घेणारे यांचा माणूस म्हणून अभ्यास आढळतो, तर झपाट्यानं होणाऱ्या यांत्रिकीकरणानं ग्रामीण जीवनावरचा परिणाम त्यांच्या ‘दो बिघा जमीन’मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ‘नोकरी’ चित्रपटात बेरोजगारीच्या प्रश्‍नाशी हसतमुखाने झगडणाऱ्या आशावादी तरुणाचं चित्रण होतं, तर ‘परख’मध्ये ‘लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेले लोकांचे राज्य ती लोकशाही’ हा विषय निवडणुकीच्या संदर्भात बिमलदांनी उपहासात्मक पद्धतीनं हाताळला होता. अस्पृश्‍यतेचा विषय ‘सुजाता’मध्ये प्रेमकथेच्या आधारे त्यांनी सुरेखपणे मांडला होता. खरं म्हणजे बिमलदांनी आपल्या चित्रपटांतून ‘कलात्मक चित्रपट’ आणि ‘व्यावसायिक चित्रपट’ हा भेदच दूर करण्याचा प्रयत्न केला होता. ‘Persuation is the best part of wisdom’  ही विचारसरणी त्यांनी अंगिकारली होती. ते आपल्या चित्रपटांचा विषय नेहमीच ‘अवलोकन पद्धतीनं’ (Persuation method) ंडत. कला जीवनाच्या अधिकाधिक जवळ आणि जीवन कलेच्या अधिकाधिक जवळ नेण्याचा ते प्रयत्न करत. ‘सर्व कला म्हणजे जीवनाचा आभास आणि कलाकारांची प्रमुख जबाबदारी म्हणजे हा आभास अधिकाधिक वास्तवाच्या जवळ नेणं,’ असं ते मानत. एवढंच नव्हे, तर हा आभास अधिकाधिक वास्तवाच्या जवळ नेताना त्यानं वास्तवाचं स्वरूप समजावून घेऊन आदर्श वास्तवता मांडली पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे.

बिमलदांनी सर्वप्रथम स्टुडियोनिर्मित वास्तवता नाकारली आणि खुल्या रस्त्यावर येऊन वास्तवता चित्रीत करण्याचं धाडस केलं. त्यांच्या चित्रपटांतून पहिल्यांदाच दैनंदिन जीवनाचं चित्रण प्रेक्षकांना पाहायला मिळालं. माणसांचा ‘हवं नको’चा संघर्षही प्रेक्षकांनी त्यांच्या चित्रपटांतून प्रथम पाहिला. वास्तवतेचं चित्रण करून बिमलदांनी आपल्याकडच्या चित्रपटांची संकल्पनाच बदलली.
‘दो बिघा जमीन’द्वारा (१९५३) बिमलदांनी इतिहास घडवला. कौटुंबिक गरजांसाठी खेड्यातून शहराकडं धाव घेणाऱ्या शेतकऱ्यांची कहाणी त्यांनी या चित्रपटात मांडली होती. विषय आणि तंत्रदृष्ट्या हा चित्रपट मैलाचा दगड ठरला. ‘दो बिघा जमीन’नं सामाजिक अन्यायाचा विरोध दर्शवणाऱ्या चित्रपटांचा प्रघात पाडला. ‘दो बिघा जमीन’नंतर पडद्यावर भावनिक प्रकटीकरणाला वाव देणाऱ्या कौटुंबिक कथांकडे बिमल रॉय वळले. आपल्या ‘बिराज बहू’, ‘परिणिता’; तसंच ‘सुजाता’ आणि ‘बंदिनी’ या चित्रपटांतून त्यांनी स्त्री-जगताविषयी अशी काही सखोल आणि आंतरिक जाण प्रकट केलीय, की त्यांच्या या नायिका पडद्यावरचं लघुकाव्य बनून राहिल्या आहेत.

व्यक्तिचित्रणातली एकनिष्ठा आणि मानवी व्यवहाराचं त्यांनी चित्रपटातून घडवलेलं दर्शन, ही त्यांची कामगिरी आज ‘चित्रपट माध्यमात’ साकारलेली उत्कृष्ट कामगिरी गणली जाते.
पुढे ‘दो बिघा जमीन’नंतरच्या काळात चित्रपटांतल्या प्रमुख व्यक्तिरेखांचा अन्वयार्थ लावून सामाजिक वास्तवता पडद्यावर साकार करण्याचे बिमलदांना जणू वेडच लागलं. यातूनच १९५५मधली ‘देवदास’ ही पडद्यावरची श्रेष्ठ कलाकृती जन्माला आली. मानवी मनांतल्या विविध आंदोलनांचं दर्शनच त्यांनी ‘देवदास’ चित्रपटातून घडवलं. ‘देवदास’ ही प्रेमकथा बिमलदांनी इतक्‍या निपुणतेनं पडद्यावर साकार केली, की जणू ही कथा पडद्यावर साकार करण्यासाठीच लिहिली असावी. देवदासच्या प्रेमातली गहिऱ्या भावना, त्यातली प्रक्षोभक शक्ती बिमलदांनी अशा प्रकारे पडद्यावर साकार केली, की प्रेक्षक देवदासच्या आत्म्याचे क्‍लेश, त्याचं दुःख, त्याचं एकटेपण, त्याचं पतन सारं काही अनुभवतात. देवदासच्या जीवनाचा शेवटचा प्रवास तर बिमलदांनी पडद्यावर विलक्षण काव्यमय, संगीतमय आणि नाट्यपूर्ण पद्धतीनं साकार केलाय. भारतीय चित्रपटांतले हे सारे अविस्मरणीय क्षण आहेत. बिमलदांच्या ‘देवदास’चा प्रभाव इतका विलक्षण होता, की त्यातून प्रेरणा घेऊन हृषीकेश मुखर्जी यांनी ‘मुसाफिर’ (१९५७) आणि गुरुदत्त यांनी ‘प्यासा’ (१९५७) या मानवी वेदनांचं चित्रण करणाऱ्या चित्रपटांची निर्मिती केली. ‘देवदास’सह या चित्रपटांनी भारतीय चित्रपटसृष्टीत नवे अध्याय तयार केले.

बिमल रॉय निर्मित आणि दिग्दर्शित एकूण चित्रपटांपैकी किमान बारा चित्रपट ‘उदयेर पथे’, ‘हमराही’, ‘दो बिघा जमीन’, ‘बिराज बहू’, ‘परिणिता’, ‘देवदास’, ‘मधुमती’, ‘उसने कहा था’, ‘काबुलीवाला’, ‘सुजाता’, ‘परख’ आणि ‘बंदिनी’ यांची दखल घेतल्याखेरीज भारतीय चित्रपटसृष्टीच्या विकासाचा इतिहासच पूर्ण होऊ शकत नाही. त्यांच्या अनेक चित्रपटांतून बिमल रॉय यांचा एक कवी ते तत्त्वज्ञ असा प्रवास दिसतो आणि भावनांच्या स्पंदनांतून संगीतात्मकता साकार करणं अशी परिपक्वताही त्यांनी प्राप्त केल्याचं पाहता येतं.

खरं तर ‘देवदास’नंतर बिमल रॉय यांच्यात क्रांतिकारक बदल घडला. पडद्यावर काव्य निर्माण करणाऱ्या बिमल रॉयनं तत्त्वज्ञ बिमल रॉयला मागं सारलं आणि अविस्मरणीय अशा काव्यमय शैलीच्या चित्रपटांची मालिका पुढे त्यांनी सादर केली. ‘मधुमती’, ‘सुजाता’, ‘परख’ ही त्यातलीच काही उदाहरणं. अशा चित्रपटांतील महत्त्वाचे असे प्रसंग सूक्ष्म गुंतागुंत असलेल्या ‘पॉलिपोनीक मोंटाज’द्वारा त्यांनी पडद्यावर साकार केले. ही त्यांची कामगिरी चित्रपटकलेत उल्लेखनीय मानली जाते.

‘मधुमती’मध्ये नायक आनंदला पूर्वस्मृती आठवतात ती सारी दृश्‍यं, ‘सुजाता’मध्ये बर्मनदांच्या गाण्याच्या पार्श्‍वभूमीवर गांधी घाटावर नायक अधीरनं सुजाताजवळ प्रकट केलेला आपल्या प्रेमाच्या कबुलीचा प्रसंग, ‘परख’मधल्या कळीच्या प्रसंगातलं ‘मेरे मनके दिये’ या गाण्याचं चित्रण, ‘बंदिनी’मध्ये नायिका कल्याणीचा रुग्णालयातल्या रुग्णाला विष देण्याचा प्रसंग या साऱ्या दृश्‍य मालिका बिमलदांनी साकारलेल्या असामान्य कलात्मकतेची साक्ष आहेत. प्रतिमा, ध्वनी आणि संगीताच्या वापरातून परिणाम घडविण्याची परिसीमाच त्यांनी गाठली. या श्रेष्ठ प्रतिभावान दिग्दर्शकाचा ८ जानेवारी १९६६ रोजी अकाली मृत्यू झाला. त्यांच्या स्मृतीला आदरांजली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com