यंत्रमानव (कृपादान आवळे)

कृपादान आवळे
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात रोबो म्हणजे यंत्रमानवांचा वापर कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतो आहे. हा वापर कशा प्रकारचा आहे, वेगवेगळ्या देशांमध्ये काय स्थिती आहे आदी गोष्टींवर एक नजर.

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात रोबो म्हणजे यंत्रमानवांचा वापर कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतो आहे. हा वापर कशा प्रकारचा आहे, वेगवेगळ्या देशांमध्ये काय स्थिती आहे आदी गोष्टींवर एक नजर.

रोबो म्हणजे यंत्रमानव. या रोबोच्या माध्यमातून एकापेक्षा जास्त व्यक्तीचं काम करून घेतलं जातं. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात रोबोचं महत्त्व झपाट्यानं वाढत आहे. कोरिया, सिंगापूर, जर्मनी, जपान, स्वीडन, डेन्मार्क आणि अमेरिका यांसारख्या देशांत इंडस्ट्रियल रोबोचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. इंड्रस्ट्रिअल रोबो म्हणजे मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कामासाठी वापरला जाणारा रोबो. कोरिया, सिंगापूर, जर्मनी, जपान, स्विडन, डेन्मार्क आणि अमेरिका या देशांमध्ये रोबो वापराचं प्रमाण इतकं मोठं आहे, की या देशांत मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची जागा इंडस्ट्रिअल रोबोनं घेतली आहे. एकापेक्षा अधिक व्यक्ती जे काम करू शकतात, ते काम रोबोच्या माध्यमातून अगदी सहजपणे केलं जातं. फक्त त्याला गरज असते, ती "कमांड'ची.

एखाद्या रोबोला कमांड दिल्यास त्यानुसार तो रोबो कार्य करतो आणि हे काम अनेकदा बिनचूक असं असतं. त्यामुळं रोबोच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. "इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रोबो'नुसार, सरासरी दहा हजार कर्मचाऱ्यांमागं 74 इंडस्ट्रिअल रोबोंचा वापर केला जात असल्याचं समोर आलं आहे. आपल्या औद्योगिक गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक कंपन्या इंडस्ट्रिअल रोबांचा वापर वाढताना दिसत आहेत.

या देशांत इंडस्ट्रिअल रोबोच्या मागणीत आहे वाढ :
कोरिया : कोरियामध्ये 2015 मध्ये इंडस्ट्रिअल रोबोची संख्या 531 होती. मात्र, नोव्हेंबर 2015 पासून यात वाढ होत आहे. 2016 ला यामध्ये वाढ होऊन ती संख्या 631 वर गेली आहे. कोरिया हा देश 2010 पासून इंडस्ट्रिअल रोबोनिर्मितीच्या दृष्टीनं मोठा देश ठरत आहे. या देशात रोबोंची निर्मिती जास्त प्रमाणात केली जाते. कोरियामध्ये प्रत्येकी दहा हजार कर्मचाऱ्यांमागं 631 रोबो कार्यरत आहेत.

सिंगापूर : इंडस्ट्रिअल रोबो निर्मितीच्या बाबतीत कोरियानंतर येतो तो सिंगापूर. सिंगापूरमध्येही इंडस्ट्रिअल रोबोंना मोठी मागणी आहे. या देशात प्रत्येकी दहा हजार कर्मचाऱ्यांमागं 488 रोबो कार्यरत आहेत. सिंगापूरमधल्या या सर्व रोबोंचा वापर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उद्योगात मोठ्या प्रमाणात केला जात आहे. सिंगापूरमध्ये 2015 मध्ये रोबोंची संख्या 398 होती. मात्र, आता यामध्ये वाढ झाली आहे. सिंगापूरमधल्या जवळपास नव्वद टक्के कंपन्यांमध्ये इंडस्ट्रियल रोबो इन्स्टॉल करण्यात आले आहेत.

जर्मनी : जर्मनी हा देश युरोपातला सर्वांत प्रसिद्ध देश. आयएफआरच्या मते, या देशात दहा हजार कर्मचाऱ्यांच्या मागं 309 रोबो कार्यरत आहेत. यातल्या रोबो वापराची संख्या 2016 नंतर वाढली आहे. 2018 आणि 2020 च्या दरम्यान जर्मनीत पाच टक्‍क्‍यांनी वाढ होण्याची शक्‍यता आहे.

जपान : जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात. जपान हा देश तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं महत्त्वाचा देश बनत आहे. मात्र, रोबो वापराच्या क्रमवारीनुसार जपानचा चौथा क्रमांक लागतो. जपानमध्ये 2016 ला एक लाख 53 हजार रोबोंची निर्मिती करण्यात आली. तसंच आयएफआरच्या माहितीनुसार, जागतिक क्रमवारीनुसार, 52 टक्के रोबोंची निर्मिती एकट्या जपानमध्ये केली जाते.

स्वीडन : आयएफआरच्या आकडेवारीनुसार, रोबोंच्या निर्मितीसाठी स्वीडनचा जगात पाचवा क्रमांक लागतो. या देशात प्रत्येकी दहा हजार कर्मचाऱ्यांमागं 223 रोबो कार्यरत आहेत.

डेन्मार्क : डेन्मार्कमधील कंपन्यांमध्ये इंडस्ट्रिअल रोबोंच्या वापराचं प्रमाण स्वीडनच्या तुलनेनं कमी आहे. डेन्मार्कमध्ये प्रत्येक दहा हजार कर्मचाऱ्यांमागं 211 रोबो कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. 2015 मध्ये याची संख्या 188 होती. त्यानंतर आता यामध्ये वाढ झाली आहे.

अमेरिका : अमेरिकेत रोबोंचा वापरही झपाट्यानं केला जात आहे. अमेरिकेतल्या कंपन्यांमध्ये 2015 मध्ये 176 इंडस्ट्रिअल रोबो कार्यरत होते. त्यानंतर आता यामध्ये वाढ झाली असून, 2016 मध्ये 189 संख्या झाली आहे. अमेरिकेत प्रत्येक दहा हजार कर्मचाऱ्यांमागं 189 रोबो कार्यरत आहेत. अमेरिकेतल्या ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये रोबोंच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

भारत : कोरिया, सिंगापूर, जर्मनी, जपान, स्वीडन, डेन्मार्क आणि अमेरिका या देशांच्या तुलनेत भारतामध्ये अजून इंडस्ट्रिअल रोबोंचा वापर तुलनेनं कमी प्रमाणात केला जात आहे.

Web Title: krupadan awle write robo technodost article in saptarang