कुछ गलत तो नही कहा...?

कुछ गलत तो नही कहा...?

दुर्दैवाचे दशावतार भोगलेला तो सिक्‍युरिटी...जगण्याच्या वाटा तुडवत उत्तर प्रदेशातून इथं आलेला...अगदी साधा माणूस...पण रोजच्या जगण्यातल्या असह्य ताण-तणावांचं त्याचं ‘व्यवस्थापन’ अफलातून होतं. त्याचं म्हणणं ः ‘जब टेन्शन आता है ना, तो वो खुल्ला मतलब खुला करनाही चाहिए।’ पुस्तकात कुठंही सांगितलं न गेलेलं असं साधं-सोपं तत्त्वज्ञान जगण्याचे टक्के-टोणपे खाणारा माणूसच तयार करू शकतो... ते अमलातही आणू शकतो...आणि सहवासात येणाऱ्या माणसांना ऊर्जाही देऊ शकतो...

टपरीवाल्यानं झाडाखालीच ठेवलेल्या दोन बाकांवर एक सुरक्षारक्षक बसला होता. त्याच्या गणवेशावरच ‘सिक्‍युरिटी’ असं मोठ्या अक्षरांत लिहिलेलं होतं. त्याच्यासमोर कॉलेजची चार पोरं बसलेली होती. त्यांच्याही अंगावर कॉलेजचा गणवेश होता. मी चहाची ऑर्डर देऊन सिक्‍युरिटीच्या मागं असलेल्या एकमेव खुर्चीत बसलो. माझ्यासाठीचा चहा तयार होऊ लागला.

समोर एक वेगळंच दृश्‍य तयार झालेलं. सिक्‍युरिटी मनापासून काहीतरी सांगतोय आणि मुलंही लक्ष देऊन ऐकत आहेत. खरंतर असं दृश्‍य दुर्मिळ होत चाललंय आणि ‘तरुणाई कुणाचंच ऐकत नाहीय’, असा निष्कर्ष काढून जुनी पिढी केव्हाच मोकळी झालीय. माझी स्वतःची मतं वेगळी आहेत. तरुणाई खूप ऐकते; पण कोण सांगतो आणि काय सांगतो, हेही महत्त्वाचं असतं. ...तर हा सिक्‍युरिटी काहीतरी गंभीर सांगत असावा आणि तरुणाईही तेवढ्याच गांभीर्यानं ऐकते आहे, असं चित्र त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर निर्माण झालं होतं.
बराच वेळ बोलणं झाल्यावर सिक्‍युरिटी बसल्या जागेवरून माझ्याकडं तोंड करून वळला. उंच, सडपातळ आणि कोणत्या तरी त्वचारोगानं, म्हणजे कोडामुळं, वरपासून खालपर्यंत पांढराफट्ट झालेला.

हसतच तो म्हणाला ः ‘‘आपने हमारी सुनी?’’
मी ः ‘‘थोडं ऐकलं; पण तुम्ही काय सांगितलं या पोरांना?’’
तो ः ‘‘हे की, आई-वडिलांनी तुम्हाला शिक्षणासाठी पाठवलंय. नीट अभ्यास करा...टेन्शन घेऊ नका वगैरे वगैरे.’’
मी ः ‘‘तुम्हाला असं का सांगावंसं वाटलं? तुम्ही पूर्वी काय करत होता?’’
तो ः ‘‘कुछ बडा काम किया नही । यूपी मे कॉन्स्टेबल था।’’
मी ः ‘‘फिर?’’
तो ः ‘‘नौकरी छोड दी।’’
खरंतर पोलिसाची नोकरी आणि तीही ‘यूपी’त लागलेली...पोलिसाची नोकरी सोडून देणारा आणि
नाशिकमध्ये सिक्‍युरिटी बनून येणारा तसा वेडाच म्हणावा लागेल. याबाबत काहीएक न बोलता मी त्याला म्हणालो ः ‘‘पण मुलांसोबत कशाला बोलत होता?’’
तो ः ‘‘अच्छा लगता है।’’
मी ः ‘‘क्‍यूं?’’
तो ः ‘‘किसी को हार्टॲटॅक ना आए।’’
यावर मात्र मी चक्रावलो आणि विचारलं ः ‘‘काहीतरीच काय? तुम्ही बोलल्यामुळं हार्टॲटॅक कसा थांबेल?’’
तो ः ‘‘ऐसे ही नही बोल रहा हूं... सच है। मेरा इकलौता बच्चा हॉर्ट ॲटॅक से मर गया । टेन्शन मे जीता था। कोई और टेन्शन ना ले इसलिये मेरे बच्चे जैसे कोई मिलता है तो मै बोलता रहता हूँ ।
आजकल के बच्चे बहोत टेन्शन मे होते है।’’
मग मी विचारलं ः ‘‘तुमच्या मुलाला कसलं टेन्शन होतं?’’
तो ः ‘‘बहोत था। मुझ से भी ज्यादा टेन्शन था उसे। घटना तर माझ्या जीवनात घडत होत्या.

कॉन्स्टेबल झाल्यानंतर माझं लग्न झालं. मुलगा झाला आणि बायको अंध झाली. तिची सेवा करता यावी, मुलगा सांभाळता यावा म्हणून मी १० वर्षांची नोकरी सोडून दिली; पण बायको मरण पावली. पोराला शिक्षणासाठी दिल्लीत नातेवाइकांकडं पाठवलं. टेन्शन न घेता मीही पोटासाठी असंच काही
काही करू लागलो. कोई गलत तो नही किया ना...? मग माझी आई आजारी पडली. ती मरण पावली. पाठोपाठ माझे वडील मरण पावले. मृत्यूची साखळी तयार झाली. नोकरी गेलेली. जवळचे सारे नातेवाईक मरण पावलेले...पोरगा दिल्लीत होता; पण शिक्षणात त्याचं लक्ष नव्हतं...तो पळून नाशिकला आला... त्याचं आयुष्य तो शोधत होता. मै ने कुछ नही कहा...। कुछ गलत तो नही किया ना...? पुढं नाशिकमध्ये इकडं-तिकडं हॉटेलात राबू लागला. छोटा व्यवसायही सुरू केला. १०-१२ बुकं शिकलेल्या मुलीबरोबर त्याचं लग्न लावलं...त्यालाही एक मुलगा झाला.’’

मोबाईलमध्ये सेंट केलेले फोटो बोलता बोलता कॉन्स्टेबलनं दाखवायला सुरवात केली. पत्नीचा, मुलाचा, नातवाचा वगैरे वगैरे...
‘‘...तर पुढं सांगायचं म्हणजे,’’ असं म्हणत त्यानं दीर्घ श्‍वास सोडला. म्हणाला ः ‘‘मीही सिक्‍युरिटीची नोकरी कुठं कुठं करू लागलो; पण कंत्राटी नोकरीचं काही खरं नाही...माझ्या पोराला सतत टेन्शन यायचं... मध्यंतरी ‘यूपी-बिहार हटाव’, असं आंदोलनही झालेलं...आणि एक दिन बच्चा हार्ट ॲटॅक से गुजर गया। बहोत बुरा हुआ...। आता सुनेचं आणि नातवाचं काय करायचं...? सुनेनं जगण्यासाठी पुन्हा शिक्षणाचा मार्ग पत्करला. हॉटेल मॅनेजमेंटसाठी तिला दिल्लीत प्रवेश मिळाला. पोर कडेला लावून ती दिल्लीत नातेवाइकांकडं गेली. शिक्षण घेतेय. मलाही ती तिकडंच बोलावतेय; पण मी इथंच स्वावलंबी जगायचं ठरवलंय...तिनं लग्न केलं तरी पाठिंबा द्यायचं ठरवलंय... कुछ गलत तो नही किया ना?’’
सिक्‍युरिटी आता खूप बोलू लागला. टपरीवर जमा झालेल्या अन्य ग्राहकांकडंही त्याचं लक्ष नव्हतं
आणि काही जण त्याचं ऐकू लागले होते...
...तर हा म्हणाला ः ‘‘सुनेचा फोन येतो अनेकदा...रस्त्यावर गेल्यावर लोक चांगल्या नजरेनं पाहत नाहीत... काहीबाही विचारत राहतात...प्रत्येक प्रश्‍न घायाळ करणारा असतो... डंख मारतो...मग मी तिला सांगतो...‘देखो बहुरानी, आपण रस्त्यावर चालताना फक्त स्वतःकडं बघत राहायचं...
कोण कसा बघतो, काय विचारतो, याचा विचार केला तर आपल्याला चालताच येणार नाही...
लोकांसाठी चालू नको; स्वतःसाठी चाल... लोकांचं ऐकू नको; आपला आतला आवाज ऐक... सब अच्छा होनेवाला है...।’ साहब मै ने कुछ गलत तो नही कहा ना...?’’

सिक्‍युरिटी थोडं बोलायचा आणि असा प्रश्‍न विचारायचा. मी ‘नही’ असं उत्तर दिलं, की तो पुढं बोलत राहायचा... समाजात वेगवेगळ्या कारणांनी तयार झालेले ताण-तणाव, माणूस खाणारे किंवा त्याचं हृदय हादरवून सोडणारे ताण-तणाव यावर तो एखाद्या तत्त्ववेत्त्याप्रमाणं भाष्य करत होता आणि शेवटी तोच प्रश्‍न विचारायचा ः ‘कुछ गलत तो नहीं किया ना?’
‘‘टेन्शन घेऊन काहीच होत नाही...होतं ते वाईटच... चौघांना खांदे द्यायची वेळ माझ्यावर खूप कमी वेळात आली. नोकरी गेली. झोपडीत आलो. सिक्‍युरिटी झालो, पण टेन्शन येऊ दिलं नाही. मार्ग शोधत राहिलो,’’ असं सांगत मला त्यानं पुन्हा विचारलं ः ‘‘कुछ गलत तो नही किया ना?’’
पुन्हा मी ‘नाही’ म्हणालो.

ेतो सांगायला लागला ः ‘‘इन कॉलेज के बच्चों मे मुझे मेरा खुद का बच्चा दिखाई देता है।... मुझे मेरे होटल मे भी चाय मिल सकती है। फिर भी मै इधर टपरी पे आता हूँ।... इधर चाय भी मिलती है और बच्चे भी दिखाई पडते है।... कुछ गलत तो नही हो रहा है ना साहब...?’’
थोडा भावनाविवश होत तो थांबला...उठून त्यानं माझ्यासाठीही चहा सांगितला. पुन्हा त्यानं तेच विचारलं ः ‘‘माफ करना साहब, कुछ गलत तो नही किया ना... ? एक बात और है... जब टेन्शन आता है ना, तो वो खुल्ला मतलब खुला करनाही चाहिए। आत राहिलं की ते धडका मारतं...
टेन्शनचं तत्त्वज्ञान आणि ते दूर करण्याचे मार्ग त्याला त्याच्या जगण्यातच सापडले असावेत. मलाही वाटलं, की आपलं टेन्शन वाढलं की त्याच्याकडंच जावं...आयुष्य तुडवत काही सूत्रांपर्यंत पोचलेला एखादा सिक्‍युरिटी दहा-दहा मानसोपचारतज्ज्ञांना भारी पडतो की काय, असं वाटायला लागलं... हा आपल्याला ऊर्जा देतोय असंही वाटायला लागलं...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com