जातिअंतासाठी पुढं सरसावू या... (कुलभूषण बिरनाळे)

जातिअंतासाठी पुढं सरसावू या... (कुलभूषण बिरनाळे)

पूर्व आफ्रिकेतल्या रवांडा या देशातलं ‘सामूहिक हत्याकांड-स्मारक’ पाहून झाल्यावर ते उभारण्यामागची संकल्पना आणि अधिक संदर्भ मिळवण्यासाठी तिथल्या माहिती-केंद्रातल्या एका महिला-अधिकाऱ्याला भेटलो. हस्तांदोलन करताना माझी ओळख करून दिली आणि सहजच बोलून गेलो, की मी भारतातून आलोय...

त्यावर त्या आनंदानं म्हणाल्या ः ‘‘वा ! तुम्ही गांधीजींच्या भूमीतून आलाय तर!’’ त्यांच्या डोळ्यांतली विलक्षण चमक आणि स्पष्टपणे दिसणारा आदरभाव पाहत मी अभिमामानं ‘‘होय’’ म्हणालो. त्यांनी माझा हात गच्च पकडून ठेवला व मला प्रश्‍न विचारला ः ‘‘मग तुम्ही गांधीजींना का मारलंत?’’ मी निरुत्तर. काही क्षणांपूर्वीचे ते चमकदार डोळे आता भावुक झाले होते. कातर स्वरात त्या पुढं म्हणाल्या ः ‘‘गांधीजी त्या वेळी जर आफ्रिका सोडून भारतात परत गेले नसते, तर कदाचित मी अनाथ झाले नसते...मी आजही माझ्या वडिलांच्या सोबत असले असते.’’ हे ऐकून मी स्तंभित झालो. मात्र पुढच्या काही क्षणांतच मला त्यांच्या या म्हणण्यामागचा संदर्भ लागू शकला.

कॉफी घेताना त्या सांगू लागल्या ः ‘‘मी चार भावंडांत धाकटी म्हणून वडिलांची सगळ्यात लाडकी. एके रविवारी सकाळी आई किचनमध्ये न्याहारी तयार करत होती आणि आम्ही सगळे एकत्र बागेत बसून गप्पागोष्टी करत होतो. तेवढ्यात शस्त्रधारी २५-३० लोक घरात घुसले. त्यांनी पप्पांना खेचून बाहेर नेलं. धारदार शस्त्रांनी त्यांनी पप्पांच्या शरीराचे तुकडे करून रस्त्यावर फेकून दिले आणि ते निघून गेले. त्याच क्षणी आमचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं, अंधकारमय झालं आणि खरं तर पुढच्या १०० दिवसांत माझ्यासारख्या लाखो लोकांचंसुद्धा... कायमचंच! ही खरं तर नांदी होती वंशवादातल्या द्वेषातून जगातल्या सगळ्यात भयंकर नागरी हत्याकांडाची.’’

***
सन १९९४.
पूर्व आफ्रिकेतला सव्वा कोटी लोकसंख्येचा एक छोटा देश ः रवांडा. हुतू (बहुसंख्य) आणि तुत्सी (अल्पसंख्य) या तिथल्या दोन प्रमुख जाती. पाचशे वर्षांपासून त्या दोन्ही जातींमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. त्याचं कारण होतं वंशवाद आणि त्यातून आलेला वर्चस्ववाद! हुतूंचं नेहमीच सगळ्या क्षेत्रांत विशेष प्राबल्य राहिलं होतं; विशेषत: सरकारमध्ये आणि लष्करातही. तुत्सींना सरकारमध्ये सहभागी करून घ्यायला हुतूंची कधीच तयारी नसायची. त्यामुळं लहान-मोठे संघर्ष होत असत. संयुक्त राष्ट्रसंघानं या वादात तोडगा काढून तुत्सींना सत्तावाटपात सहभागी करून घ्यायला हुतूंना राजी केलं; पण प्रत्यक्षात असं घडलं नाही. त्यातच सहा एप्रिल १९९४ रोजी हुतू वंशाचे राष्ट्रपती जुवेनाल यांचं विमान पाडण्यात आलं. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

राष्ट्रपती जुवेनाल यांचं विमान कुणी पाडलं, हे आजवर स्पष्ट झालेलं नाही. मग अत्यंत क्रूर आणि राक्षसी महत्त्वाकांक्षेचा लष्करी अधिकारी कर्नल बोगोसरा यानं देशाची सगळी सूत्रं आपल्या हाती घेतली. लष्कर, पोलीस, सरकारी पाठबळ असलेल्या दहशतवादी संघटना आणि बहुसंख्य हुतू लोकांच्या एकत्रित संख्याबळाच्या जोरावर सुनियोजित पद्धतीनं अल्पसंख्य तुत्सींच्या हत्याकांडाला सुरवात झाली. त्यात पहिला बळी पडला तो देशाच्या पंतप्रधान विलीन्गिमाना आणि त्यांच्या पतीचा. त्या हुतू जातीच्या होत्या; पण मवाळ, प्रागतिक विचारांच्या होत्या. नंतर परकीय राष्ट्रांनी यात हस्तक्षेप करू नये वा आपली जरब बसावी म्हणून दहा बेल्जिअन सैनिकांचा छळ करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर क्रमानं इतर मवाळ राजकीय नेते, विरोधक, वकील, न्यायाधीश, अधिकारी यांच्या हत्या केल्या गेल्या. सर्वसामान्य तुत्सी लोक घाबरून जंगलात आणि शेजारच्या युगांडा देशात पलायन करू लागले. जे पळून जाऊ शकले नाहीत, त्यांच्या सार्वत्रिक कत्तलीला सुरवात झाली.
आपल्या तुत्सी शेजाऱ्यांना ठार मारण्यासाठी सरकारी रेडिओवरून हुतूंना जाहीररीत्या आदेश देण्यात आले. जे कुणी हा आदेश पळणार नाहीत, अशा हुतू लोकांनासुद्धा लष्कर ठार मारेल, असा दम भरला  गेला. हत्याकांडासाठी शस्त्रं पुरवली गेली आणि प्रशिक्षणसुद्धा दिलं गेलं. मग गावागावातून या आदेशाचं पालन करत सख्ख्या शेजाऱ्यांनी आजवरचा शेजारधर्म विसरून एकमेकांना सहकुटुंब संपवून टाकायला सुरवात केली. आंतरजातीय विवाह केलेल्या हुतू लोकांनासुद्धा वेचून मारलं गेलं. दोन महिन्यांच्या निरागस मुलांना आणि कित्येक असहाय्य वृद्धांना क्रूर पद्धतीनं मारलं गेलं. महिलांवर तर अनन्वित अत्याचार केले गेले. ‘बलात्काराचा व्यापक वापर’ हे तर त्या काळात ‘प्रभावी’ शस्त्र ठरलं होतं! Rape was the rule and its absence was the exception अशी परिस्थिती निर्माण केली गेली. तुलनेनं तरुणांना मारणं सोपं गेलं. कारण, त्यासाठी त्यांची डोकी व्यवस्थितरीत्या भडकवली गेली होती. एकंदरीत संपूर्ण तुत्सी जातीचा नायनाट करण्याच्या राक्षसी ध्येयाकडं ‘सुनियोजित’ वाटचाल सुरू होती.

इकडं सामान्य हुतू लोक वैयक्तिक हत्याकांड करत होते, तर तिकडं सरकार सामूहिक हत्याकांड! एका चर्चमध्ये पाच हजार तुत्सी निर्वासित आहेत याची खबर लागताच, बुलडोझर लावून चर्च पाडल गेलं. मशिनगन आणि हातगोळे वापरून सगळ्यांची एकाच वेळी हत्या करण्यात आली. एका रुग्णालयातल्या  तुत्सी रुग्णांना तिथंच संपवलं गेलं. शाळा, स्टेडियममध्ये आसरा घेतलेल्या हजारो निर्वासितांना अशाच पद्धतीनं मृत्यूला सामोरं जाव लागलं. या हत्याकांडानं असं काही रौद्र रूप धारण केलं होतं की मृतांची मोजदाद करणंही अशक्‍य होऊन गेलं होतं. ‘क्रियेला प्रतिक्रिया’ या नियमानं पॉल कगामे या तुत्सी नेत्याच्या नेतृत्वाखाली सगळे अल्पसंख्याक एकत्रित आले आणि त्यांनी प्रत्युत्तर देत देशावर ताबा मिळवला...तेव्हा कुठं या निर्घृण हत्याकांडाची समाप्ती झाली. तो दिवस होता चार जुलै १९९४.

अखेर तुत्सींची सरशी होण्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे, सरकारी फौजा या हत्याकांडातच अडकलेल्या होत्या म्हणून त्या स्वतःच्या बचावासाठी प्रतिकारही करू शकल्या नाहीत. द्वेषातून हिंसा करताना आत्मघाताचीही नशा बाळगाली गेली...या दोहोंची संगती कशी लावायची ?
सात एप्रिल १९९४ ते चार जुलै १९९४ या १०० दिवसांच्या कालावधीत तब्बल दहा लाख लोक मारले गेले व तेही ‘दर दहा सेकंदांना एक हत्या’ या गतीनं! एकूण लोकसंखेच्या दहा टक्के लोक या हत्याकांडात संपवले गेले. देशातली आख्खी एक पिढीच यात नष्ट झाली. आर्थिक, सामाजिक, आरोग्य या व्यवस्था आणि इतर मूलभूत व्यवस्था पूर्णपणे मोडकळीला आल्या. पाच लाख महिलांवर बलात्कार झाल्याचे आकडे समोर आले. २० लाख लोक निर्वासित झाले, हजारो मुलं अनाथ झाली, हजारो महिला विधवा झाल्या. यातून देश सावरायला फार काळ लागला आणि त्यासाठी किंमतही मोठी मोजावी लागली.
हे सगळं कशामुळं घडलं? तर वंशवादाच्या द्वेषामुळं.

***
हे काही अंशी मी अनुभवलं ते रवांडा हत्याकांड-स्मारकाला भेट दिल्यावर, तसंच त्या देशातल्या - माझ्या काही मित्रांच्या आणि सहकाऱ्यांच्या वैयक्तिक अनुभवांद्वारे.
काल संध्याकाळपर्यंत एकत्र खेळणारा मित्र दुसऱ्या दिवशी आलेल्या मारेकऱ्यांना मित्राचं घर दाखवतो आणि त्या घरातले सगळे लोक संपवले जातात. असा प्रकारही तिथं त्या १०० दिवसांच्या काळात घडला. या मित्राच्या दोस्तीचा धर्म हा देवाच्या धर्मापेक्षा मोठा आणि घातकी का झाला?

चर्चमध्ये आश्रयाला आलेल्या पाच हजार लोकांची माहिती सरकारला देऊन त्या सगळ्यांना संपवण्यास मदत करणारा धर्मगुरू अथांसा सेरोम्बा याला प्रभू येशू माफ करतील काय? स्वतःच्या जिवाची आहुती देऊन हजारो निर्वासितांना वाचवणारे शांतिसेनेचे दिलेर कमांडर मेब दैगणे यांचा आत्मा खरंच आज शांततेत असेल काय? एका शिक्षकाच्या घरात बुरखेधारी मारेकऱ्यांची टोळी घुसली होती व शिक्षकाच्या पत्नीसमोर त्याला ठार मारलं गेलं. त्यातल्या एका मारेकऱ्याला शिक्षकाच्या पत्नीनं बुरख्याआडूनसुद्धा ओळखलं होतं.

तो त्या शिक्षकाचाच सातवीत शिकणारा विद्यार्थी होता, जो रोज त्यांच्या घरी शिकवणीला येत असे. या निष्पाप मुलामध्ये एवढं क्रौर्य आलं कुठून? हे क्रौर्य आलं द्वेषाच्या आणि जातिभेदाच्या अहंगंडाच्या शिकवणुकीतून. स्मारकाच्या शेवटच्या हॉलमध्ये गेलो तर माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. तिथं बंद कप्प्यांमध्ये हत्याकांडातल्या कित्येक मृतांचे अवशेष जतन करून ठेवलेले आहेत. तिथं बसून सुन्न मनानं विचार करताना मला काही प्रश्न पडले ः
आपल्या देशाचीही वाटचाल अशाच एका महाविनाशाकडं तर सुरू नाही ना? आपणसुद्धा वंशवाद आणि वर्चस्ववाद यातून उद्भवणारे पराकोटीचे संघर्ष रोजच अनुभवत असतो. दर वेळी नावं फक्त वेगवेगळी असतात. उदाहरणार्थ ः हिंदू-मुस्लिम, दलित-सवर्ण, ब्राह्मण-मराठा इत्यादी...आपला देश १३० कोटी लोकसंख्येचा आहे. असाच भडका आपल्या देशात उडाला तर आणि असलं क्रौर्य घडलं तर? किती लोकांचा बळी यात जाईल? त्या यादीत आपण, आपले आप्त-स्वकीय असले तर? आणि त्यानंतर जर असलंच स्मारक भारतात बांधायचं ठरलं, तर ते किती प्रचंड मोठं बांधावं लागेल? आणि महत्त्वाचं म्हणजे ते स्मारक कुठल्या जातीचं असेल? आणि आपण अशा हत्याकांडातून सावरू शकू का? त्याला किती काळ आणि किंमत द्यावी लागेल?
असे अनेक अवघड प्रश्न मनात घेऊन जड पावलांनी मी हॉलच्या बाहेर पडलो. त्याच वेळी तिथं दर्शनी भागात लावलेल्या पाटीकडं माझं लक्ष गेलं. तीवर इंग्लिशमध्ये पुढील ओळी लिहिलेल्या होत्या ः
There will be no humanity without forgiveness
There will be no forgiveness without justice
But justice will be impossible without humanity !

त्याच क्षणी मला गौतम बुद्ध आणि महावीर आठवले, ज्यांनी दया-क्षमा-शांती या शाश्वत मानवी मूल्यांची शिकवण जगाला दिली. ती मूल्यं किती वैश्विक आणि कालातीत आहेत, याची जाणीवसुद्धा प्रकर्षानं झाली. आफ्रिकेच्या मातीत आपले पहिले सत्याचे प्रयोग प्रत्यक्षात साकारणारे आणि ज्यांच्या मानवतेचा सुगंध आजही आफ्रिकन लोकांच्या मनात दरवळत आहे ते महात्मा गांधीजी आठवले.

***

हत्याकांड संपल्यावर नवीन आलेल्या सरकारनं आणि लोकांनीसुद्धा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. तो म्हणजे मानवतेच्या, क्षमेच्या आणि सामाजिक न्यायाच्या वाटेवर चालण्याचा. नवीन सरकारला सत्तेच्या बळावर बहुसंख्य हुतूंचा सूड उगवायची संधी असताना ते त्या वाटेवर गेले नाहीत, तर त्यांनी हुतूंना जवळ केलं आणि त्यांनी देश पुन्हा एकसंधपणे बांधायला सुरवात केली. हत्याकांडामागच्या सूत्रधारांना न्यायालयात उभं करून न्याय्य मार्गानं त्यांना शिक्षा सुनावली गेली. बऱ्याच आरोपींना पश्‍चात्ताप झाल्यानं त्यांना पुन्हा मूळ प्रवाहात येण्याची संधी देण्यात आली. पीडितांचं पुनर्वसन करण्यात आलं. जुने दाहक अनुभव विसरून देश प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी सगळ्यांना बरोबर घेऊन सर्वंकष प्रयत्न सुरू करण्यात आले आणि त्यात सरकारला बऱ्यापैकी यशही आलं.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या विनाशाचं मूळ असलेली जात नावाची विषवल्ली कायमची उखडून टाकण्यात आली...कायद्यातून, कागदावरून आणि मनातूनसुद्धा! आता तिथं एकच जात आहेः रवांडन. आणि या हत्याकांडातून घेतलेल्या धड्याचा आपल्याला आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना कधीच विसर पडू नये यासाठी त्यांनी त्या हत्याकांडाचं स्मारक उभं केलं आहे...अगदी राजधानीतल्या शहरात.
आता प्रश्न असा पडला आहे, की आपण भारतीय आपल्यातल्या सदैव ठसठसणाऱ्या, उफाळून वर येणाऱ्या धोकादायक जातिभेदाच्या ज्वालामुखीवर बसलेले आहोत, त्या ज्वालामुखीचं आपण काय करणार आहोत? आपण वेळीच जागे होऊन त्याला गाडणार आहोत की त्याला कुरवाळत बसून तो फुटल्यावर मोठी किंमत मोजणार आहोत? कवी नामदेव ढसाळ यांनी म्हटल्यानुसार, प्रत्येकानं स्वतःच्या देहाच्या मशाली पेटवून अंधारलेल्या गुहांच्या दाराशी प्रकाशपर्वाचा जाळ शिलगावल्याशिवाय जातिअंताचं स्वप्न प्रत्यक्षात उतरणार नाही का? खरंतर या प्रश्नाचं उत्तरदायित्व काळाच्या खांद्यावर ठेवण्याऐवजी आपणच पुढं झालं पाहिजे...नाही का ?

(कुलभूषण बिरनाळे kkbirnale@gmail.com)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com