संगीतविद्या कणाकणानं मिळवत गेले (कुमुदिनी काटदरे)

कुमुदिनी काटदरे
रविवार, 19 ऑगस्ट 2018

कमलताई तांबे यांच्याकडं मी जवळजवळ दहा वर्षं शिकले. नंतर त्या पुण्याला गेल्या म्हणून मी कौसल्याबाई मंजेश्वर यांना पत्र पाठवलं व "मला शिकवावं' अशी विनंती त्यांना केली. माझं पत्र मिळाल्यावर त्यांनी त्यांच्या गुरू मोगूबाई कुर्डीकर अर्थात माईंना परवानगी विचारली. माई त्यांना म्हणाल्या ः "शिकय, शिकय तिला. बारी असां ती.' पुढं काही वर्षांनी हे मला कौसल्याबाईंनी सांगितलं!

कमलताई तांबे यांच्याकडं मी जवळजवळ दहा वर्षं शिकले. नंतर त्या पुण्याला गेल्या म्हणून मी कौसल्याबाई मंजेश्वर यांना पत्र पाठवलं व "मला शिकवावं' अशी विनंती त्यांना केली. माझं पत्र मिळाल्यावर त्यांनी त्यांच्या गुरू मोगूबाई कुर्डीकर अर्थात माईंना परवानगी विचारली. माई त्यांना म्हणाल्या ः "शिकय, शिकय तिला. बारी असां ती.' पुढं काही वर्षांनी हे मला कौसल्याबाईंनी सांगितलं!

सातारा जिल्ह्यातलं कऱ्हाड हे माझं मूळ गाव. माझं बालपण तिथंच गेलं. शालेय-महाविद्यालयीन शिक्षणही तिथंच झालं. तिथल्या गांधर्व महाविद्यालयात मी गाण्याचं प्राथमिक शिक्षण घेतलं. द. म. मारुलकर हे माझे प्रथम गुरू. त्यांचा गळा सुरेल, गोड होता; त्यामुळे "आपणही गाणं करायचंच' असं मी पक्कं ठरवलं.
माझ्या आईचा आवाजही गोड होता. ती तिच्या लहानपणी पुण्याचे श्रुतिपेटीतज्ज्ञ गं. भी. आचरेकर यांच्याकडं गाणं शिकली होती. तिच्या गाण्याच्या वहीवरून मी "आईची गाणी' ही सीडी तयार केली आहे.

कऱ्हाडच्या गुरुजींनी मला "तू पुण्याला जाऊन गाणं शिक' अशी प्रेरणा दिली. माझा थोरला भाऊ पुण्यातच होता. भाऊ-वहिनींच्या प्रोत्साहनानं मी पुण्यात त्यांच्याकडं आले.
पुण्यात डॉ. ना. र. मारुलकर यांच्याकडं माझं गाण्याचं शिक्षण सुरू झालं. फक्त गाणंच करत असल्यामुळे मी भरपूर वेळ देऊ शकत होते. सरांच्या घरी त्या काळात रोज तीन-चार तास शिकणं व शिकवण्या ऐकणं असं माझं चाले. त्यात साह्य करण्याचं आश्‍वासन माझ्या भावी यजमानांनी मला दिलं. मारुलकर यांच्या प्रेरणेनं मी जिथून मिळेल तिथून विद्या मिळवणं सुरू ठेवलं.
लग्नानंतर मी रसायनी इथं आले. पनवेलजवळचं हे गाव त्या वेळी जंगलातच वसलेलं होतं. जवळपास ओसाडच. दिवसा तिथून एसटीच्या फक्त सहा गाड्या पनवेलला जा-ये करत.

माझ्या गुरूंनी मला सांगितलं होतं : ""बाह्य परिस्थिती काहीही असली तरी मनाला मरगळ येऊ देऊ नका. रियाज सुरूच ठेवा. पाण्याचा प्रवाह थांबला तर ते डबकं होतं.''
मी रियाज सुरू ठेवला व ते डबकं होऊ दिलं नाही.
विनायकबुवा घांग्रेकर हे मुंबई आकाशवाणीवरून निवृत्त होऊन जवळच्याच पेण या गावात स्थायिक झाले होते. माझे यजमान ठेका धरण्याइतपत त्यांच्याकडून तबला शिकले. आठवड्यातून एक दिवस याप्रमाणे ते सुमारे दोन वर्षं शिकले. सुदैवानं त्यांना लय व ताल यांची बऱ्यापैकी समज आली (त्या वेळी इलेक्‍ट्रॉनिक वाद्यं नव्हती); त्यामुळे रियाज सुरू राहिला. नंतर तिथल्या कंपनीतले वसंतराव लागू हे मला साथ करण्यासाठी येत.

माझी मुलं थोडी मोठी झाल्यावर गाणं पुढं सुरू ठेवावं असं मी ठरवलं. अशा वेळी माझी मैत्रीण हेमा गुर्जर हिच्या मोलाच्या साह्यामुळे मी "संगीतविशारद' केलं. परत पंधरा दिवसांतून एकदा असं माझं डॉ. मारुलकर यांच्याकडं पुण्याला शिक्षण सुरू झालं. मध्यंतरी एक-दीड वर्ष मी न फिरकल्यामुळे ते नाराज झाले होते व नंतर दोन-तीन वेळा मी त्यांना भेटायला जाऊनही त्यांनी मला टाळलं. मी खनपटीला बसून त्यांची नाराजी दूर केली. "आधीचं काहीतरी गाऊन दाखवा' असं त्यांनी मला सांगितलं व मी त्यांना राग "मुलतानी' पंधरा-वीस मिनिटं गाऊन दाखवला. त्यांचं समाधान झालं व शिकवणी पुन्हा सुरू झाली.

पंधरा दिवसांतून एकदा गेले तरी माझे दोन दिवस असे जायचे : सकाळी सहा ते साडेदहा एसटीनं रसायनी-खोपोली-पुणे असा प्रवास, तिथं थेट गुरुजींच्या घरी अकरा ते साडेबारापर्यंत शिकवणी व परत दुपारी तीन ते सहा शिकवणी; दुसऱ्या दिवशी परत तीन तास शिकवणी व अडीच वाजता शिवाजीनगर ते पनवेल या बसनं दांड फाट्यावर (त्या वेळचा पुणे-मुंबई राजमार्ग) उतरायचं...तिथं माझे यजमान स्कूटर घेऊन येत व आम्ही सहा किलोमीटरवर असलेल्या आमच्या घरी रात्री आठच्या सुमारास पोचत असू. या प्रवासादरम्यान मी साधारणतः पाचशे ते सहाशे वेळा विलंबित ठेक्‍यांचा रियाज (गुरुजींच्या सांगण्यावरून) करत असे. या सर्व दगदगीमुळे आवाज पूर्ण बसून जाई.

मारुलकर गुरुजी अतिशय हळू आवाजात बोलत. ते मृदू व मितभाषी होते; पण तालमीच्या बाबतीत अतिशय कडक. त्यांच्याच सांगण्यावरून सन 1977 मध्यो माझं शिक्षण कमलताई तांबे यांच्याकडं सुरू झालं. त्यांनी प्रथम राग "भूप' सुरू केला. त्या बंदिश सुरेल, सुडौल बसवून घेऊन मगच तबलजीला बोलावून पक्की करून घेत. गायकी शिकण्यावर त्यांचा भर असे.
तिथं सुरळीत तालीम सुरू असताना नवीनच विघ्न आलं. माझ्या यजमानांची बदली गोव्याला झाली. जीव हळहळला; पण नाइलाज होता. मारुलकरांनी धीर दिला. त्यांच्या मध्यस्थीनं मी पणजीमध्ये कला अकादमीत रत्नकांत रामनाथकर यांच्याकडं शिकू लागले.
गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर पाच-सहा महिन्यांसाठी त्या वेळी गोव्याला आल्या होत्या.
"माझी अशी अशी विद्यार्थिनी फोंड्याला राहते' असं कमलताईंनी त्यांना आवर्जून सांगितलं. मडगावचे माधव पंडित यांना सांगून मोगूबाईंनी अर्थात माईंनी मला उत्सवात बोलावून घेतलं. उत्सवाच्या वेळी आम्ही तिथं पोचलो तेव्हा माई रवळनाथाच्या गाभाऱ्यात होत्या. पहिला नमस्कार मी माईंना केला व दुसरा देवाला केला. त्यांनी माझी चौकशी करून सभामंडपात जिथं किशोरीताई आमोणकर बसल्या होत्या, तिथं मला बसवलं.

नंतर त्यांनी मला लगेच गायला सांगितलं. मला तिथं माईंचं व किशोरीताईंचं गाणं ऐकण्याची अपेक्षा होती. मला गाण्याची आज्ञा अनपेक्षित होती. थोड्या दडपणाखालीच मी राग "पूरियाधनाश्री' आणि नंतर राग "केदार' गायले. त्यांच्या मुक्कामात किशोरीताईंचे गोव्यात दोन-तीन कार्यक्रम झाले. त्यासाठी मला त्यांनी साथीला घेतलं. मला शिकवलं. किशोरीताईंच्या प्रेरणेमुळं काही वर्षांनी मीही रचना करू लागले. "राग पुष्पांजली' ही माझी स्वरचित बंदिशींची सीडी प्रकाशित झालेली आहे.

सन 1981 मध्ये आमचा गोव्यातला शेर संपला. आम्ही गुजरातमध्ये बिलिमोरा इथं आलो. बलसाडच्या जवळचं हे गाव मुंबईपासून साडेचार तासांच्या अंतरावर होतं.
आता मी परत कमलताईंकडं पंधरा दिवसांतून एकदा अशी जाऊ लागले. रेडिओवर गाण्यासाठी मला बडोद्याला जावं लागे. बडोदा-अहमदाबादला माझ्या बऱ्याच मैफली झाल्या. विशेष म्हणजे शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी गुजरात सरकारतर्फे दरवर्षी विविध गावांमध्ये लहान प्रमाणात शास्त्रीय संगीताची संमेलनं भरवली जात असत. आमच्या पाच वर्षांच्या तिथल्या मुक्कामात दरवर्षी माझा त्यांत सहभाग असे. गुजरातमध्ये डभोई, गोध्रा, सिहोर, वडनगर, विसनगर, बार्डोली-गोंडल, इडर आदी ठिकाणी माझ्या मैफली झाल्या. याव्यतिरिक्त बलसाड, सुरत, नवसारी, अतुल या ठिकाणीही माझ्या मैफिली झाल्या.

आता आम्ही गोवा सोडून गुजरातमधल्या बिलिमोरा इथं आलो होतो. दरवेळी नवीन जागी तबलजी मिळवण्याची पंचाईत होत असे. यजमान त्यांच्या कामात व्यग्र असत. त्यामुळे साथीसाठी त्यांचा उपयोग होत नसे. हा प्रश्‍न गोव्यात आला नव्हता; पण बिलिमोरा इथं अडचण आली; पण त्यावरही उपाय सापडला. बिलिमोरा इथं "गायकवाड मिल्स' नावाची कापडगिरणी होती व ती बंद पडली होती. तिथले बरेचसे कामगार मराठी होते व त्यांचं एक भजनी मंडळ होतं. बहुतेक जण सातारा जिल्ह्यातले होते. मी कऱ्हाडची, म्हणजे सातारा जिल्ह्यातलीच, म्हणून त्यांना माझ्याविषयी विशेष आपुलकी! ते माझ्याबरोबर साथीला यायला तयार झाले. भजनी, केरवा, दादरा आदी ठेके ते वाजवत असत. त्या मंडळींना त्रितालही येत होता; पण तो जलद. त्यांना विलंबित ठेके कुठलेच येत नव्हते. त्यामुळे
जवळजवळ दोन महिने जुजबी गायचं व विलंबित ठेके त्यांच्याकडून बसवून घ्यायचे हेच काम माझ्यावर पडलं.

पुढं बोईसरला आल्यावरही हीच वेळ आली. पंधरा मिनिटं गाणं व पाऊण तास ठेके बसवून घेणं! मी हातानं ठेके धरत असे व ते तबल्यावर ताल धरत असत. असं झालं तरी तबलजींनी शिकण्याची तयारी दाखवली, ही माझ्यावर देवाची कृपाची म्हणायची.
बडोद्याला "म्युझिक कॉलेज'मध्ये ना. वि. पटवर्धन हे प्रमुख होते. त्यांनी गांधर्व महाविद्यालयाचं संमेलन भरवलं होतं. त्यासाठी त्यांनी मला आमंत्रित केलं होतं. माझं गाणं त्यांना आवडलं. "तुम्ही आलात तर मला शिकवायला आवडेल,' असं ते म्हणाले. तोही योग पुढं आला.

एकदा मुंबई रेडिओवर मी "चेन बुकिंग'च्या निमित्तानं गेले होते. कॉन्सर्ट व रेकॉर्डिंग दोन्ही व्यवस्थित पार पडलं. तेव्हाचे संगीत विभागप्रमुख माधव डोंगरे यांच्याशी बोलताना "मी लवकरच बडोदा सोडून मुंबईला येणार आहे,' असं सांगितलं. ते म्हणाले : "अवश्‍य या पण ए ग्रेड मिळवून या.' सुदैवानं मला बडोदा इथंच ए ग्रेड मिळाली. त्यानंतर काही वर्षांनी पुणे आकाशवाणीतर्फे टॉप ग्रेड (ए+) ही सर्वोच्च ग्रेडदेखील मिळाली.

पाच वर्षं बिलिमोरा इथं राहून आम्ही सन 1986 मध्ये बोईसरला आलो; म्हणजे महाराष्ट्रात. कमलताईंकडं जाण्याचं अंतर निम्म्यानं कमी झालं म्हणून मला आनंद झाला. मुंबईला वरचे वर येणं आता मला शक्‍य होणार होतं. मुंबई रेडिओवर गायलासुद्धा मजा येत होती. हा आनंद मला दहा-बारा वर्षं लाभला. कमलताईंकडं मी जवळजवळ दहा वर्षं शिकले. नंतर त्या पुण्याला गेल्या म्हणून मी कौसल्याबाई मंजेश्वर यांना पत्र पाठवलं व "मला शिकवावं' अशी विनंती त्यांना केली. "दादर-माटुंगा सर्कल'च्या कार्यक्रमात मी गायले व ते ऐकायला - मी कमलताईंची शिष्या आहे म्हणून - त्या आल्या होत्या. माझं पत्र मिळाल्यावर त्यांनी माईंना (त्यांच्या गुरू) परवानगी विचारली. माईंनीसुद्धा "शिकय, शिकय तिला. बारी असां ती' असं सांगितलं. (पुढं काही वर्षांनी हे मला कौसल्याबाईंनी सांगितलं). कौसल्याबाई यांनी मला मनापासून शिकवलं. कमलताईंकडं अर्धवट राहिलेले राग "कौशी कानडा', "काफी कानडा', "भूपनट' आदी राग त्यांनी मला शिकवले. -माझे यजमान निवृत्त झाल्यावर सन 2000 मध्ये आम्ही पुण्याला आलो. तोपर्यंत मी कौसल्याबाईंकडं शिकत होते.
सन 1990 मध्ये मी चेंबूर इथं अल्लादियाखॉंसाहेबांच्या पुण्यतिथीच्या समारोहात गायले होते. माझं गाणं सुरू झाल्यावर आधी उठून गेलेले बाबा अजीजुद्दीनखॉंसाहेब परत येऊन पुढं बसले. तिथं मी राग "भूपनट' व "केदार' गायले. बाबांना माझं गाणं खूप आवडलं. "अरे! ही तर आपलंच गाणं गातेय', असं ते म्हणाले. चांगलं गाणं शिकण्याच्या उद्देशानं निघालेल्या मला, हे वाक्‍य ऐकून, "आपण "जयपूर'चं गाणं गात आहोत,' याचा साक्षात्कार झाला. माझ्यासाठी तो बहुमान होता. त्यांनी मला कोल्हापूरला अल्लादियाखॉंसाहेबांच्या पुण्यतिथीला देवल क्‍लबमध्ये गायला आवर्जून बोलावलं. मधुसूदन ऊर्फ अप्पा कानेटकर हे बाबांना गुरुस्थानी मानत असत. त्यामुळे सन 2000 मध्ये पुण्यात आल्यावर त्यांनी मला बोलावलं व सलग सुमारे चार वर्षं मनापासून शिकवलं. बाबांनीसुद्धा कोल्हापूरला माझ्या भावाच्या घरी येऊन मला वेळोवेळी बंदिशी शिकवल्या. पंधरा दिवसांतून एकदा असं मी वीसेक वर्षं शिक्षण घेतलं. मात्र, यामुळे गाण्याला मर्यादा पडतात म्हणून मारुलकर गुरुजींनी मला एक कानमंत्र दिला होता व तो म्हणजे "जिथून मिळेल तिथून विद्या कणाकणानं ग्रहण करावी'. त्यामुळे रसायनी इथं वयोवृद्ध संगीततज्ज्ञ शंकरराव करमरकर हे मारुलकर यांच्या सांगण्यावरून घरी शिकवायला येत असत.

"अलंकार'साठी मी बडोदा इथले ना. वि. पटवर्धन यांच्याकडं शिकायला जात असे. गोव्याला पणजी रेडिओचे व्यकंटेश गोडखिंडी (आजचे प्रसिद्ध बासरीवादक प्रवीण गोडखिंडी यांचे वडील) यांच्याकडून काही कानडी भजनंही मी शिकले.
पुण्यात दाजी करंदीकर यांनी ठुमरी, दादरा, गझल यांचं पंधरा दिवसांचं शिबिर आयोजित केलं होतं; त्यातही मी दोन वर्षं शिक्षणाचा लाभ घेतला.
एखादी चांगली गोष्ट घडायची झाली तर किती तरी गोष्टी जुळून याव्या लागतात. घरी सासूबाई होत्या; त्यामुळे मुलांची काळजी करावी लागली नाही. थोडक्‍यात म्हणजे "इच्छा असेल तर मार्ग दिसेल' या म्हणीचा प्रत्यय मला आयुष्यात वेळोवेळी आला.

Web Title: kumudini katdare write article in saptarang