माझे बाबा (लता मंगेशकर)

लता मंगेशकर
रविवार, 23 एप्रिल 2017

मराठी संगीत रंगभूमीवरचे दिग्गज गायक-अभिनेते पं. दीनानाथ मंगेशकर यांचा उद्या (२४ एप्रिल) पंचाहत्तरावा स्मृतिदिन. त्यानिमित्त गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी जागवलेल्या वडिलांच्या हृद्य आठवणी...

मराठी संगीत रंगभूमीवरचे दिग्गज गायक-अभिनेते पं. दीनानाथ मंगेशकर यांचा उद्या (२४ एप्रिल) पंचाहत्तरावा स्मृतिदिन. त्यानिमित्त गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी जागवलेल्या वडिलांच्या हृद्य आठवणी...

बाबा गेले तेव्हा मी फक्त साडेतेरा वर्षांची होते. ते वय खेळण्या-बागडण्याचं, नटण्या-मुरडण्याचं होतं; पण अकाली मोठेपण आलं. विश्व 
अंधारल्यासारखं वाटलं. माईनं- म्हणजेच आमच्या आईनं- आम्हा पाचही भावंडांना आधार दिला. ‘तुम्हाला तुमच्या बाबांचं फक्त गाणं आणि गाणंच पुढं न्यायचं आहे,’ हे अतिशय धीरोदात्तपणे आणि खंबीरपणे तिनं आम्हाला बजावलं. ...आणि मला अचानक दिसला ‘साधुपुरुष.’
मला बाबांनी एकदा सांगितलं होतं : ‘तुझ्यासाठी मी कोणतीही संपत्ती ठेवणार नाही; पण हा साधुपुरुष आणि ही बंदिशींची वही तुझ्यासाठी ठेवली आहे. तीवर कधीही धूळ बसू देऊ नकोस.’
‘साधुपुरुष’ म्हणजे बाबांचा तानपुरा! त्या तानपुऱ्याचे स्वर अजूनही माझ्या हृदयात, मनात झंकारत आहेत. त्याची मला सदैव सोबत आहे. अगदी या क्षणापर्यंत.
अंधारलेलं विश्‍व हळूहळू प्रकाशमान झालं. तो ‘साधुपुरुष’ म्हणजे जणू बाबाच मला पुढचा मार्ग दाखवत गेले. वहीत बंदिस्त झालेल्या बंदिशी ऐकू येऊ लागल्या. आणि मग मी ठरवलं, की संगीत हाच आता आपला धर्म. याच मार्गानं पुढं जायचं. माईची शिकवण आणि बाबांचे स्वर सोबतीला होतेच. अकाली आलेलं मोठेपण विरलं. वाटलं, यामध्ये नियतीची काहीतरी योजना असणार. मी लहानच राहणार आहे... आणि जगण्याच्या या वाटचालीत बाबा आपल्याबरोबरच आहेत असंच मला वाटत राहिलं. अगदी या क्षणापर्यंत...
आम्हा पाचही भावंडांमध्ये बाबांचा स्वरांश आहे, त्यांचं गाणं आहे; पण त्यांच्यासारखं गाणं आम्हाला कुणालाही जमत नाही. मला तर वाटतं, की बाबांसारखं गाणं कुणीही गाऊच शकत नाही.

***
कोणत्याही मुलीला आपले बाबा जसे प्रिय असतात, तसेच मलाही माझे बाबा प्रिय आहेत. मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. भावंडांमध्ये मी थोरली असल्यानं मला बाबा खूप आठवतात, ठळकपणे आठवतात. गौरवर्ण कांती, मोहक मुद्रा, हरणासारखे चंचल डोळे, विशाल भालप्रदेश, कुरळे केस, उंच-धिप्पाड देहयष्टी... आणि या सौंदर्याला साजेल असा गोड आवाज. असे अत्यंत देखणे होते बाबा.
त्यांना अलौकिक असा स्वर लाभला होता. त्यांची सुरेल, ठसठशीत गाण्याची पद्धत, ताल-लयीचा पक्केपणा, निर्दोष-दाणेदार तानांची फिरत, बेछूट खटके, मुरके, आलापीत अकल्पितपणे एकदम समेवर येणं आणि त्यांचा गाण्यातला पूर्ण आत्मविश्‍वास यामुळं त्यांची शास्त्रीय गायनाची मैफलही अपूर्व अशी रंगत असे. त्यांचा आवाज निकोप, निर्दोष, स्पष्ट, शुद्ध, धारदार, मोकळा, प्रसन्न, वरच्या पट्टीतला चढा, पहाडी होता. त्यांच्या आवाजात भिंगरीसारखी फिरत आणि विलक्षण माधुर्य होतं.
ते तबला, सारंगी, कथक नृत्य शिकले होते. ज्योतिषशास्त्राचाही त्यांचा अभ्यास होता.
मंगेश आणि मारुती ही त्यांची दैवतं. ते नित्य पूजा-अर्चा करत. रियाज आणि सतत होणारे प्रयोग यामुळं ते कायम व्यग्रच असत. त्यांची वृत्ती धार्मिक, सात्त्विक, पापभीरू होती. ते देशाभिमानी होते. खूप उदार होते. गरिबांबद्दल त्यांच्या मनात कणव असे. बऱ्याचदा ते पैसे, कपडे आणि अन्न यांचं दान करायचे.
बाबा म्हणायचे ः ‘सुरांचं एक भावतत्त्व असतं.’ बाबांच्या नाट्यपदांमध्ये त्यांच्या या म्हणण्याचा प्रत्यय येतो. त्यांचं गाणं स्वरांच्या, लयीच्या अंगानं, कर्नाटकी पद्धतीत, पंजाबी ढंगात, राजस्थानी मांडच्या सुरावटीतून, गझलपद्धतीनं, तमाशातल्या लावणीतून, तर कधी फटका अशा वैविध्यपूर्ण संगीतानं सादर होई.

***
आम्ही लहान असतानाच्या काळातल्या बाबांविषयीच्या अनेक आठवणी आहेत. आम्ही भावंडं फार दंगा-मस्ती करायचो. घरभर धावाधाव, खेळणं-बागडणं, याबरोबरच मी मांडणीवर बसून सैगलची गाणी म्हणायची. मीना, आशा, उषा, बाळ (हृदयनाथ) हे समोर श्रोते-प्रेक्षक म्हणून असायचे. एकीकडं माई स्वयंपाक करत असायची. टायरमध्ये बसायचं आणि कुणीतरी ढकलायचं हा आमचा एक आवडता खेळ असायचा. दुपारी १२ वाजता तोफेचा आवाज ऐकला, की आम्हाला फार धन्य वाटायचं. आमची दंगा-मस्ती फार वाढली, की माई ओरडायची. ‘मालकांना (बाबांना) सांगेन’ म्हणायची; पण बाबा आम्हाला कधीही रागावले नाहीत किंवा त्यांनी कधीही आमच्यावर साधा हातही उगारला नाही. ते खूप प्रेमळ, हळवे होते.
आमच्याकडं पै-पाहुणे खूप असे. घर कायम भरलेलं असायचं. कोल्हापुरे कुटुंबीय, श्रीपाद जोशी, गणूमामा (अभिनेते गणपतराव मोहिते), अभिनेते चंद्रकांत गोखले, त्यांच्या आई कमलाबाई, आजी दुर्गाबाई कामत, लालजी गोखले, नातेवाईक, याशिवाय मोठमोठ्या साहित्यिकांचं-गायकांचं येणं-जाणंही असायचं. स्वातंत्र्यवीर सावरकर आमच्या घरी यायचे.
बाबा आम्हाला सगळ्यांना घेऊन एकत्र जेवायला बसायचे. खूप लाड करायचे. रात्री झोपण्यापूर्वी ‘हरिविजय’, ‘रामविजय’ या ग्रंथांमधला काही भाग वाचून दाखवायचे. एखादा दृष्टान्त वाचल्यावर बाबांचे डोळे भरून येत असत. त्यांच्या त्या वाचनाचे, बोलण्याचे, समजावण्याचे अस्पष्ट संस्कार अजाण वयातही माझ्या मनावर झाले. त्यांच्या संग्रहात संस्कृत, फारसी काव्याची पुस्तकं असत. त्यातली काही पुस्तकं माझ्याकडं आजही आहेत.

***
चाडेचार किंवा पाच वर्षांची असतानाची एक आठवण आहे. संध्याकाळची वेळ होती. चंद्रकांत गोखले या आपल्या शिष्याला बाबा शिकवत होते. ‘सदारंग नित उठकर देत दुहाई...’ बाबा त्यांना म्हणाले ः ‘‘तू गाणं सुरू ठेव... मी एक काम करून येतो.’’- मी तिथं जवळच खेळत होते. चंद्रकांत गोखले यांचं गाणं ऐकून मी एकदम म्हणाले: ‘‘बाबांनी जसं सांगितलं आहे, तसं तू गात नाहीयेस.’’ त्यावर ते म्हणाले: ‘‘मग तू गाऊन दाखव की!’’ त्यानुसार मी गाऊन दाखवत असतानाच बाबा तिथं आले. - माझं गाणं ऐकून म्हणाले ः ‘‘घरातच ‘गवई’ असताना मी दुसऱ्या कुणाला कशाला शिकवू?’’ आणि मग माईला म्हणाले ः ‘‘ही माझी मुलगी - लता - फार मोठी गायिका होणार आणि सारं जग हलवून टाकणार.’’
मग दुसऱ्या दिवशी पहाटे बाबांनी मला उठवलं. मला तानपुरा लावायला शिकवला. आरोह-अवरोह शिकवले. बाबांचं आणि माझं नातं दिव्य स्वरात दृढ झालं. ही शिकवणी त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत सुरू राहिली. ती आजही अदृश्‍यपणे आहेच!

***
बाबांनी १९१८ च्या जानेवारी महिन्यात चिंतामणराव कोल्हटकर आणि कृष्णराव कोल्हापुरे यांच्यासह तिघांच्या मालकीची ‘बलवंत संगीत मंडळी’ ही नाट्यसंस्था स्थापन केली. तेव्हा बाबांचं वय होतं १७ वर्षं.
‘शाकुंतल’, ‘सौभद्र’, ‘वीर विडंबन’, ‘मूकनायक’, ‘जन्मरहस्य’, ‘भावबंधन’, ‘रणदुंदुभी’, ‘उग्रमंगल’, देशकंटक’, ‘पुण्यप्रभाव’ अशी एकाहून एक सरस नाटकं या संस्थेनं रंगभूमीवर आणली. सगळीच नाटकं गाजली. रसिकांनी त्यांना त्या वेळी अक्षरशः डोक्‍यावर घेतलं होतं. बाबांची ‘मानापमान’ या नाटकातली धैर्यधराची भूमिका सर्वोत्तम ठरली.
रंगमंचावर ते विलक्षण गायचे. ‘धिःकार मन साहिना’ या गाण्याला मुंबईच्या ग्रॅंड थिएटरमध्ये १४ वन्स मोअर बाबांनी घेतले होते! त्या प्रसंगाची मी साक्षीदार आहे. मला आठवतंय, की वन्स मोअर मिळाला, की राग बदलून बाबा गाणं गात. ते राग इतका चटकन बदलत, की कमाल वाटे. बाबा ‘सफेद चार-पाच’च्या सुरांमध्ये गात. त्याच्याही वर जात. माईक नसत; पण बाबांचा आवाज पिटापर्यंत जाई.
बाबांकडून माझ्याकडं आलेलं गाणं ही माझी फार मोठी पुण्याई आहे.
सगळं छान चाललं होतं. बाबांनी नाटक कंपनीची सिनेमा कंपनी केली. दोन चित्रपट काढले. त्यात अपयश आलं. आर्थिक फटका बसला. लक्ष्मीनं पाठ फिरवली. अखेर २४ एप्रिल १९४२ रोजी विपन्नावस्थेतच बाबांनी या जगाचा निरोप घेतला.
बाबा... १९४३ पासून दरवर्षी तुमची पुण्यतिथी गायन-वादनानं होते.

***
बाबा!
उद्या तुमचा ७५ वा स्मृतिदिन.
या दिवशी तुम्ही मला अचानक
सोडून गेलात
आणि माझं विश्व अंधारलं
पण...
तुमच्या स्वरांच्या सावलीत
आणि सुरांच्या दिव्य तेजःकणांच्या
झोतात मी सतत प्रकाशात राहिले
तरीही असं वाटतं की...

‘दिमाखात तारे नटोनी थटोनी
शिरी टाकती दिव्य उल्काफुले
परंतु तुझ्या मूर्तिवाचून देवा
मला वाटते विश्व अंधारले’
 

Web Title: lata mangeshkar writes about her father