रंगमंच माझा प्राणवायू - लीना भागवत

leena bhagwat
leena bhagwat

सेलिब्रिटी टॉक - लीना भागवत, अभिनेत्री 
माझ्या करिअरची सुरुवातच नाटकांपासून झाली. गोवा हिंदू असोसिएशन या उत्तम संस्थेमधून मी माझं पहिलं नाटक केलं. त्यानंतर मला कधीच मागे वळून पाहावं लागलं नाही. नाटक करत असतानाच मला मालिकांमध्ये कामं मिळत गेली. त्यामुळे सुरुवातीच्या काळात मला स्ट्रगल करावा लागला नाही. स्वतःशी करावा लागणारा स्ट्रगल या सगळ्या गोष्टींपेक्षा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही कलाकार म्हणून कितीही यशस्वी झालात आणि तिथेच थांबलात तर तो कलाकार पूर्णपणे संपून जातो.

मी एखादी भूमिका प्रेक्षकांसमोर आणल्यास त्यात अजून काय करता येईल, याचा सतत विचार माझ्या मनात असतो. मी कलाकार म्हणून असमाधानी आहे आणि म्हणूनच उत्तमोत्तम कलाकृती मी प्रेक्षकांपर्यंत पोचवते. मी माझ्या प्रत्येक सहकलाकाराकडून शिकत असते आणि आयुष्यभर मी नवनवीन गोष्टी शिकत राहणार आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन करणं माझं कर्तव्य नव्हे तर जबाबदारी आहे. आजवर मी बऱ्याच भूमिका केल्या आणि माझ्या प्रत्येक कामाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला, याचा मला खरंच आनंद आहे.

‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘होणार सून मी ह्या घरची’ यांसारख्या लोकप्रिय मालिका मी केल्या. ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमधील माझी भूमिका खूप लोकप्रिय ठरली. या मालिकेनंतर मी चार वर्ष मालिकांकडे फिरकलेच नाही. या चार वर्षांच्या काळात मी दोन लोकप्रिय नाटकं केली. अधिकाधिक वाचन करून मी स्वतःला प्रगल्भ केलं. याकाळात बरंच लिखाणही केलं. मी स्वतःला नव्याने जाणून, समजून घेतलं. मालिका करायची की नाही हा माझा वैयक्तिक प्रश्‍न होता. पण माध्यम कोणतंही असो अभिनय ही माझी आवड आहे. मी अभिनयातून कधीच ब्रेक घेतला नाही. मी नाटक करतच होते. कारण नाटक हे माझं पहिलं प्रेम आहे. रंगमंच हा माझा प्राणवायू आहे.

‘गोष्ट तशी गमतीची’ नाटकाचे मी चारशे ते साडेचारशे प्रयोग केले. ‘दिल अभी भरा नहीं’ या नाटकाचे २५४ प्रयोग केले. आता माझं ‘आमनेसामने’ हे नवं नाटकही सुरू झालं आहे. त्याचे प्रयोगही चांगले सुरू आहेत. नाटक करत असताना मालिका करणं हे कधीतरी अवघड होऊन बसतं; पण आता चार वर्षांनंतर मी पुन्हा एका छोट्या पडद्यावर काम करण्यास सज्ज झाले आहे.

सोनी मराठी वाहिनीवरील ‘आनंदी हे जग सारे’ या मालिकेमधून मी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेमध्ये आनंदी या पात्राच्या आजीची भूमिका मी साकारत आहे. आजी ही भूमिका आपल्याला करायची आहे, हे ऐकताच मी थोडी आश्‍चर्यचकित झाले. कारण यापूर्वी मी काकू, आई यांसारख्या भूमिका केल्या आहेत. पण मला मालिकेच्या संपूर्ण टीमने माझ्या भूमिकेबाबत समजावून सांगितले आणि मी मालिका करण्यास होकार दिला. या मालिकेमधील आनंदी ही लहान मुलगी इतर मुलांपेक्षा थोडी वेगळी आहे. ती स्वतःमध्येच रमलेली असते. अशा मुलांकडे समाजही वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. या मालिकेमधून समाजाचा दृष्टिकोन बदलावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. चार वर्षांनंतर मी पुन्हा मालिका करत आहे, त्यामुळे मी फारच उत्सुक आहे.

(शब्दांकन - काजल डांगे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com