esakal | कमिपण गुणवंता काय मौनांत मोठें ?
sakal

बोलून बातमी शोधा

life-lessons-in-sanskrit-subhashit

कमिपण गुणवंता काय मौनांत मोठें ?

sakal_logo
By
सकाळ वृत्त सेवा

रसिका, कृष्णाशास्त्री चिपळूणकरांनी (१८२४-१८७८) आपल्या पद्य रत्नावली (१८६२) या छोट्याशा काव्यग्रंथात अनेक अन्योक्ती केल्या आहेत. त्या आजही लोभस वाटतात. त्यातील काही आपण पाहूयात. अन्योक्तीचा अर्थ ज्याच्याविषयी बोलायचे त्याच्याविषयी न बोलता, दुसऱ्या विषयी बोलून आपला मनोभाव प्रकट करणे होय, म्हणून अन्य उक्ती. ‘लेकी बोले सुने लागे’ अशी जी म्हण आपण वापरतो तसाच काहीसा हा प्रकार.

शुकान्योक्ती अर्थात, पोपटावरील अन्योक्तीत कवी म्हणतो-

फळें मधुर खावया असति नित्य मेवे तसे।

हिरेजडित सुंदरी कनकपंजरीही वसे।

अहर्निश तथापि तो शुक मनांत दुःखे झुरे।

स्वतंत्र वनवृत्तिच्या घडि घडी सुखाते स्मरें ।।

राहण्यासाठी सोनेरी-रत्नजडित पिंजरा, खाण्यासाठी विनासायास मिळणारी मधुर फळे, लाड करायला मालक-मालकीण; पण असे असतानाही तो पोपट सतत मनात झुरतोय, सारखा वाळतच चाललाय. कारण त्याला सारखी वनाची आठवण येतेय. खरंतर वनात वणवण भटकून त्याला फळे मिळवावी लागतात, पाण्यासाठी इकडे-तिकडे फिरावे लागते. जीव सारखा धोक्यात असतो. तरीही त्याला त्या वनवृत्तीचे सुख का बरे वाटावे? त्याचे कारण हेच की, स्वातंत्र्यात कष्ट असले, संघर्ष असला तरी जे सुख असते, ते परतंत्र, परस्वाधीन जगण्यात नक्कीच नसते. त्यामुळेच सुखासीन; पण पराधीन जगण्याचा त्या पोपटाला तिटकारा वाटतो. मग माणसासारख्या माणसाला का बरं वाटू नये? मूलतः प्रत्येक जिवाचा स्वातंत्र्य हाच जन्मजात अधिकार असतो, हेच येथे कवीला सुचवायचे आहे. रसिका, ज्याकाळी (१८६२) येथील विद्वानांना इंग्रजी राज्य ‘देवाचे वरदान’ वाटत होते, इंग्रज ‘पृथ्वीपती’ वाटत होते. त्याकाळात कवीने पोपटाच्या रुपकातून झणझणीत अंजनच घातलेय, असे म्हणणे वावगे ठरू नये.

हेही वाचा: वाटे निर्धनता मला खचित हें साध्वें महापातक ।।

आज कधी कधी आपणही म्हणतोच ना या निकृष्ट दर्जाच्या आणि भ्रष्टाचाराने बरबटलेल्या स्वराज्यापेक्षा इंग्रजांचे राज्य परवडले. त्या वेळी आपण हे विसरतो, की उत्कृष्ट दर्जाच्या पारतंत्र्यापेक्षा निकृष्टातील निकृष्ट दर्जाचे स्वातंत्र्य केव्हाही श्रेयस्करच. याचे कारण म्हणजे, एक तर स्वराज्यात सारे काही आपल्याच हाती असते आणि दुसरे म्हणजे या स्वातंत्र्यासाठी कितीतरी पिढ्यांना कष्ट उपसावे लागलेले असतात, हे आपण विसरत असतो.

पुढच्या श्‍लोकात कवी म्हणतो, ‘‘जोवर उपवनात कावळा काव काव करून कटकट करीत आहे, तोवर हे पोपटा तूं शांत बैस. अरे, मौन बसलास तर त्यात तुला कमीपणा कसला?’’ तात्पर्य हेच की मूर्खाचे अनर्गल प्रलाप चालू असताना शहाण्याने शांत बसणेच हितावह ठरते. त्याने फुकाचा वादही टळतो अन् स्वतःचा मनःस्तापही कमी होतो. बरं आपल्या बोलण्याने समोरचा शहाणा होण्याची तर सोडूनच द्या; पण समजून घेण्याचीही शक्यता कमीच असते. अशावेळी गुणवंताने क्षणिक मौन बाळगणे, संयम बाळगणे हिताचेच ठरते. घरोघरी चालणारे वाद हा नियम पाळला, तर निश्‍चितच कमी होताना दिसतील.

रसिका, मी असे ऐकले होते, की आणीबाणीच्या काळांत काही वृत्तपत्रांनी अग्रलेखाच्या जागी कोरे स्तंभ सोडले होते. मला वाटते ते शब्दशून्य अग्रलेख मदांध सत्ताधीशांना जनतेची नापसंती दाखवायला पुरेसे होते. बकान्योक्तीत कवी म्हणतो,

उभा राहे एकें चरणिं धरणीतें धरुनियां ।

तपश्‍चर्या वाटे करित जणु डोळे मिटुनियां ।

बका ऐशा ढोंगे तुज अमति मासेचि ठकती ।

परि ज्ञाते तूझें कपट लवलाही उमजती ।।

माशांच्या शिकारीसाठी बगळा डोळे मिटून एका पायावर उभा राहतो. त्याचे ते रूप पाहणाऱ्याला तपस्व्यासारखे भासते. त्याच्या या रूपाला अमती म्हणजे मूर्ख मासे फसतात. म्हणून त्याला वाटते, आपल्या या रूपाला सगळेच फसतील. त्याला कवी सांगतो, तुझे हे ढोंग माशांना फसवायला पुरेसे असले, तरी शहाण्याला चटकन कळते. रसिका, आज राजकारण, धर्मकारण, समाजकारण अरे इतकेच कशाला शिक्षण संस्था, सर्वत्र चाललेली सोंगढोंग बघितली, की ही अन्योक्ती हटकून आठवते आणि दुर्दैवाने या ढोंगांना फसणारे पाहिले की मन कोठेन् कोठे पोळतेच. त्याहीपेक्षा दुर्दैव हे, की कळत असूनही काही जण या सोंगाढोंगांना फसतात.

हेही वाचा: || नित्य साधनेचे महत्त्व ||

सूर्यान्योक्तीत कवी म्हणतो, ‘हे सूर्या, जोवर आकाशात तूं चमकत असतोस तेंव्हा प्रत्यक्ष तारकाधिपती चंद्रही निष्प्रभ ठरतो. पण, गड्या जेव्हा तुला ग्रहण लागते तेव्हा क्षुद्र काजवेही तुझ्यापुढे चमकतात.’ तात्पर्य हेच की एखादी महान विभूती जेव्हा संकटात सापडते तेव्हा सामान्य लोकही स्वतःच्या मोठेपणाचा टेंभा मिरवितात. पुढे कवी म्हणतो-

देखूनी उदया तुझ्या द्विजकुळें गाती अती हर्षुनी।

शार्दूलादिक दुष्ट सर्व दडती गिर्यंतरी जाऊनी।

देशी ताप परी जसा वरिवरी येशी नभी भास्करा।

अत्त्युच्ची पदिं थोरही बिघडतो हा बोल आहे खरा।।

ज्याचा उदय होताच, आता रात्र सरली उषःकाल झाला म्हणून आनंदाने सर्व नाचू लागतात, वाघ-सिंहादि हिंस्त्र श्‍वापदे डोंगरदऱ्यांत जाऊन लपतात. तोच सूर्य माथ्यावर आला, की साऱ्यांनाच तापदायक ठरू लागतो. खरंय अत्त्युच्च पदावर गेल्यावर थोर व्यक्तीही बिघडतो. तात्पर्य हेच, की सत्ता आली, की तिचा मद भल्याभल्यांना चढतो. शुद्ध चारित्र्याच्या गप्पा मारणारे तिथे गेले, की बिघडताना आपण पाहात नाही का?

रसिका, याप्रमाणे या अन्योक्ती केवळ काव्यगुणांनीच नव्हे, तर अर्थगुणांनीही लोभविणाऱ्या आहेत. त्यांची साठवण तू तुझ्या स्मरण सागरात करून ठेव.

- डॉ. नीरज देव

loading image